डीस्पिकेबल मी- लक्षात राहण्याजोगा

>> Sunday, August 8, 2010

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट कुठला, असं विचारलं, तर अजून तरी `टॉय स्टोरी - 3 `चंच नाव घ्यावं लागेल. काही बाबतीत आधीच्या दोन भागांहून वरचढ असणा-या भागात मुलं अन् त्यांचे पालक या दोघांनाही आवडण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. प्रत्येकाच्या वयानुसार अन् अनुभवानुसार ज्याला जे पटेल ते, अन् पचेल ते घेण्याची त्यात सोय होती. यंदाच्या इतर अ‍ॅनिमेशनपटांनी (श्रेक 4, हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन इ.) फार वाईट कामगिरी केली नसली, तरी टॉय स्टोरीच्या दर्जाला कुणी येऊ शकलेलं नाही. काहीशी हीच गोष्ट `डीस्पिकेबल मी`च्या बाबतीतही म्हणता येईल. सर्वोत्तम नसला तरी हा चित्रपट पाहायला मात्र काहीच हरकत नसावी, असं माझं मत आहे. `ऑस्टीन पॉवर्स ` मालिकेत मायकल मायर्सने जे जेम्स बॉण्डमधल्या खलनायकांचं विडंबन करायला सुरुवात केली, त्यानंतर या प्रकारच्या व्यक्तिरेखा पडद्यावर आणि इतरत्र यायला सुरुवात झाली. इतरत्र म्हणजे कॉमिक्स, कम्प्यूटर गेम्स वैगैरे. मुलांच्या चित्रपटात, अन् तेही प्रमुख भूमिकेत, अशा मेगॅलोमॅनिअ‍ॅक खलनायकाची व्यक्तिरेखा आल्याचं आठवत नाही. (लवकरच येणारा मेगामाइन्ड देखील अशाच व्यक्तिरेखेविषयी आहे, मात्र त्याचा फॉरमॅट सुपरहीरोपटाचा आहे.) इथल्या खलनायकाची उघड स्पर्धा, कोणत्याही नायकाशी नाही. तर एका नव्या, उभरत्या खलनायकाशीच आहे.
इथला नायक (किंवा खलनायक म्हणूया हवं तर) आहे ग्रू (स्टीव कारेलचा आवाज). ग्रूचं खलनायकी विश्वात ब-यापैकी नाव आहे, अन् त्याची महत्त्वाकांक्षा देखील जबरदस्त आहे. त्याच्या नावावरच्या चो-या मात्र फार गाजलेल्या नाहीत. आणि आता त्याचं वयही व्हायला लागलंय. अशातच एकदा इजिप्तमधला पिरॅमिड कोणीतरी चोरल्याचं लक्षात येतं, आणि ग्रूची महत्त्वाकांक्षा पुन्हा उभारून येते. आपला वृद्ध सहकारी डॉ निफॅरिओ आणि टॉय फ्रँचाईज करणा-यांसाठी खूषखबर असलेली छोट्या, पिवळ्या हस्तकांची फौज, यांच्या मदतीने ग्रू प्रत्यक्ष चंद्र चोरायचं ठरवतो. खलनायकांना आर्थिक मदत करणारी `बँक ऑफ इव्हिल` मात्र व्हेक्टर या नव्या खलनायकाच्या (अर्थातच बँकेच्या चेअरमनच्या मुलाच्या) पाठीशी उभं राहायचं ठरवते. ग्रू स्वतंत्रपणे पाऊल उचलतो, आणि चंद्राचा आकार छोटा करण्यासाठी लागणारी गन पळवतो. त्याच्या मागावर असलेला व्हेक्टर, ती लगेचच हस्तगत करतो. आता पुढचं पाऊल उचलायचं तर ती गन परत मिळवायला हवी. व्हेक्टरच्या अभेद्य घरात जाण्यासाठी ग्रू योजना आखतो, ती तीन अनाथ मुलींना व्हेक्टरच्या घरी असणारा मुक्त प्रवेश गृहीत धरूनच. त्यासाठी तो या मुलींना दत्तकही घेतो. पण लवकरच या मुलींचं निरागस प्रेम त्याच्यातल्या खलनायकावर मात करेलसं दिसायला लागतं.
`डीस्पिकेबल मी`ची पटकथा स्मार्ट, चटपटीत आहे. मात्र ती कथेने उपलब्ध केलेल्या शक्यतांचा पुरेपूर वापर करताना दिसत नाही. पेचप्रसंग किंवा भावनाविवष करणारे प्रसंग, या दोघांनाही टोकाला न्यायला ती बिचकते. परिणामी प्रसंग उत्कर्षबिंदूपर्यंत जाण्याआधीच संपतात. त्यामुळे प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागणा-या जागा त्यात घेतल्या जात नाहीत. व्हेक्टरच्या घरात ग्रू अडकणं, मुलींची पुन्हा अनाथाश्रमात होणारी पाठवणी, चंद्र पळवण्यातले धोके, हे सगळं आपण पाहातो, पण त्यातून व्यक्तिरेखा मार्ग काढू शकणार नाहीत, असा ताण आपल्या अनुभवात कधीही येत नाही. भावनेच्या पातळीवरही पुस्तक वाचतानाच्या दोन प्रसंगांच्या दर्जाला कोणताही प्रसंग जाऊ शकत नाही. तरीही प्रसंगाला वळण देण्याच्या शक्यता, आणि व्यक्तिरेखांचे तपशील याबाबतीत पटकथा बाजी मारते. परिणामी ती प्रसंग पूर्ण डेव्हलप न करताही आपण गुंतून राहू इतकं कौशल्य जरूर दाखविते.
चित्रपटाची रचना पाहता, ग्रू तिच्या केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. (ग्रू हे नाव कुठून आलं असावं? मॅड मॅगझिनसाठी अनेक वर्ष काम करणा-या सर्जिओ अ‍ॅरेगॉन्सच्या `ग्रू द वॉन्डरर`वरून ते सुचलं असेल का? अर्थात त्या ग्रूचं स्पेलींग थो़डं वेगळं , Groo असं आहे.) त्यामुळे यातल्या सर्व, म्हणजे ज्युली अँड्रूजने आवाज दिलेल्या ग्रूच्या आईपासून मार्गो एडिथ आणि अ‍ॅग्नेस या अनाथ मुलींच्या त्रिकुटापर्यंत सर्व व्यक्तिरेखा या ग्रूच्या भोवती फिरतात. त्यांना दुय्यम महत्त्व आहे. दिग्दर्शक पिएर कॉफिन आणि क्रिस रेनॉड या दुकलीने ग्रूचं महत्त्वं थोडं कमी करून इतरांचं थोडं अधिक वाढवलं असतं, तर चित्रपट अधिक रंगला असता, कदाचित.
`डीस्पिकेबल मी`ची चित्रशैली थोडी पिक्सारच्या इन्क्रीडीबल्सच्या जवळ जाणारी आहे. दृश्यमांडणी अधिक मोकळी, ठळक ठेवून पसारा टाळणारी आहे. मात्र दिसणा-या दरेक गोष्टींचा इथे खूप विचार झाल्याचं दिसतं. ग्रू आणि व्हेक्टरच्या घरांचे अंतर्भाग, ग्रूने प्रयोगशाळेत जाण्यासाठी तयार केलेली अदभूत लिफ्ट, व्हेक्टरच्या घरातल्या बैठकीखालचं अ‍ॅक्वेरीअम किंवा त्याच्या समुद्री जीव फेकणा-या बंदुका, ग्रूच्या मिनीयन्स नामक हस्तकांच्या पेहरावातलं साम्य आणि वैविध्य, या सगळ्याचा चित्रपटाच्या व्हिज्युअल डिझाइनमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
चित्रपटाच्या स्वतंत्र घटकांचा, त्यातल्या स्वतंत्र प्रसंगांचा परिणाम कितीही कमी वा अधिक असला, तरी कलाकृतीचा एकूण परिणाम ही काहीतरी वेगळीच गोष्ट असते. जिचा आपण हिशेब मांडू शकत नाही, पण ती आपल्याला निश्चितपणे जाणवते. `डीस्पिकेबल मी`मधल्या त्रुटी प्रसंगी लपत नसूनही चित्रपटाचा एकूण परिणाम हा या त्रुटींवर मात करणारा असल्याचं आपल्याला तो संपताना लक्षात येतं. अन् या गोष्टींमुळेच तो अ‍ॅनिमेशनपटांच्या गर्दीतही उठून दिसतो. आपलं स्थान निर्माण करतो.

-गणेश मतकरी.

2 comments:

Anee_007 August 13, 2010 at 7:13 AM  

after Toy Story only animated movie I wanted to watch this year was megamind,but this really came out as a huge surprise to me.But still I will say Toy Story was far more superior that this.I think because the plot was very familiar

Vivek Kulkarni June 17, 2012 at 7:03 AM  

चित्रपट बघतानाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्यातील तपशिलावर दिलेला भर लगेच लक्षात येतो. मला वाटत संहितेत चुका (येथे याचा अर्थ लूपहोल्स) नसतील पण तुम्ही ज्या पद्धतीने त्या दाखवून दिल्यात त्या परत एकदा बघताना लक्षात येतील.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP