‘द लास्ट स्टेशन’- अखेरचा पडाव

>> Sunday, November 21, 2010

असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तींची शोकांतिका अनेकदा हीच असते, की त्यांच्या जवळची, घरातली माणसं ही सामान्य असतात. याचा अर्थ घरातल्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव नसते असं नाही. ती जरूर असते. मात्र, हा आदर वैयक्तिक पातळीवरल्या व्यवहारांत उतरत नाही. अर्थात सामान्य असणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे त्यात घरच्या मंडळींचं काही चुकतं, असंही आपण म्हणू शकत नाही. मात्र, त्यांच्या सामान्यत्वाचा एका असामान्य कर्तृत्वाबरोबर जाणारा छेद हा त्या संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. मन:स्ताप वाढविणारा, अन् क्वचित प्रसंगी घातकही.
शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडकांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक मोठय़ा माणसांना कौटुंबिक आघाडीवर असा मन:स्ताप अनुभवायला मिळाल्याची उदाहरणं आपल्याकडेही खूप प्रमाणात आहेत. त्याच प्रकारचं- त्याहूनही अधिक वरच्या दर्जाचं जागतिक पातळीवरचं उदाहरण म्हणजे प्रख्यात रशियन लेखक, तत्त्वज्ञ लेव निकोलायविच टॉलस्टॉय यांचं. त्यांच्या वादातीत असणाऱ्या वैचारिक, सर्जनशील कारकीर्दीपुढे त्यांच्या घरातल्या वैमनस्याचा भावनिक संघर्ष त्यांच्या आयुष्यातल्या काही काळापुरता उलगडला जातो, तो गेल्या वर्षी पडद्यावर आलेल्या ‘द लास्ट स्टेशन’ चित्रपटातून.
जे पारीनी यांच्या चरित्रात्मक कादंबरीवर आधारित असलेला हा मायकेल हॉफमन दिग्दर्शित चित्रपट टॉलस्टॉय यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या वर्षांवर लक्ष केंद्रित करतो. त्याच्या नावातलं ‘शेवटचं स्टेशन’ हा अर्थ त्यादृष्टीने प्रतीकात्मक अन् अर्थपूर्णही असला, तरी केवळ प्रतीकात्मक नाही. कुटुंबाचे सर्व पाश तोडून बाहेर पडलेल्या टॉलस्टॉय यांच्या आस्तोपोवो स्टेशनवरल्या अखेरच्या मुक्कामाचा त्याला संदर्भ आहे.
या चित्रपटाचा अजेंडा दुहेरी आहे. एका बाजूने त्याला आपल्या चरित्रनायकाच्या आयुष्यातल्या घटना शक्य तितक्या प्रामाणिकपणे मांडायच्या आहेत, तर दुसरीकडे त्याला सामान्यत: चळवळींमध्ये येऊ पाहणारा व्यक्तिवाद अन् त्यातून तिचा मूळ उद्देश मागे पडत जाणं, याला टीकेचं लक्ष्य करायचं आहे. हा दुहेरी हेतू या चित्रपटाच्या आशयाच्या दृष्टीने बलस्थान म्हणता येईल, तर रचनेच्या दृष्टीने कमकुवतता. कारण त्यात असलेला त्रयस्थपणा हा आपल्याला टॉलस्टॉयन चळवळीकडे प्रातिनिधिक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी उपलब्ध करून देतो, तरी तोच त्रयस्थपणा दुसरीकडे आपल्याला त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या पुरेशा जवळ जाऊ देत नाही.
चित्रपटातली खरी प्रमुख पात्रं तीन. स्वत: टॉलस्टॉय (क्रिस्टोफर प्लमर), त्यांची पत्नी सोफिया (हेलन मिरेन) आणि त्यांचा जवळचा मित्र व्लादिमीर चर्टकोव (पॉल गिआमाती). टॉलस्टॉय अन् सोफिया यांचं एकमेकांवर अजूनही प्रेम असलं तरी त्यांचे सतत खटके उडतात. याला प्रमुख कारण आहे तो व्लादिमीर. व्लादिमीरने टॉलस्टॉयना पूर्णपणे पटवून दिलं आहे की, त्यांचं सर्व लिखाण हे मुक्तपणे सर्व जनतेपर्यंत पोहोचायला हवं. त्यासाठी मृत्युपत्राद्वारे आपला कॉपीराइटचा अधिकार सोडून आपल्या सर्व कामाचं नियंत्रण व्लादिमीरच्या हाती सोपविण्यात यावं. आजवर टॉलस्टॉयच्या साहित्याची सर्व आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या सोफियाला हे मान्य नाही. आपला अन् आपल्या मुलांचा अधिकार हिरावून घेतला जातोय, हे तिला सहन होत नाही. व्लादिमीरशी ती उघड युद्ध पुकारते.
मघा मी ‘खरी’ प्रमुख पात्रं असं म्हटलं त्याला कारण आहे. ही तिघांची गोष्ट थेट तिघांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांतून येत नाही, तर त्यांना साक्षीदार असणाऱ्या चौथ्या व्यक्तीच्या नजरेतून येते. हा चौथा माणूस आहे- व्लादिमीरने टॉलस्टॉयसाठी नेमलेला नवा सेक्रेटरी वॅलेन्टीन (जेम्स मॅकअ‍ॅवॉय). जेम्सच्याच नजरेतून (पूर्ण नव्हे, पण बराचसा) चित्रपट असल्याने आपला कथेतला सहभाग हा कायमच अप्रत्यक्ष राहतो. वर वॅलेन्टीनचं मत हे आपल्याला दिशादर्शक मानावं लागतं. त्यात टॉलस्टॉय- सोफियाच्या संसाराला एका अर्थी समांतर जाणारी जोडी म्हणून माशा ही बंडखोर मैत्रीण वॅलेन्टीनला दिली जाते, अन् पटकथेची बांधणी सैल व्हायला लागते.
चित्रपटाचा काळ हा १९१० च्या सुमाराचा आहे. टॉलस्टॉय हे तेव्हादेखील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व होतं, हे चित्रपटात स्पष्टच आहे. टॉलस्टॉय साहित्याचा त्यांच्या मिळकतीवरील परिणाम, टॉलस्टॉय पंथाचा गवगवा, कॉपीराइट नियंत्रणासाठी होणारे डावपेच या सगळ्याकडे पाहता हे आपण प्रत्यक्ष इतिहासाची पानं न चाळताही गृहीत धरू शकतो. मात्र पुढल्या काळातही हे नाव टिकून राहिलं, वाढीला लागलं, जगभरात पोहोचलं, यात स्वत: व्लादिमीरचा हात होताच. त्याने मिळविलेल्या हक्कांचा टॉलस्टॉय साहित्याच्या प्रसारासाठी वापर केला. टॉलस्टॉयन विचार त्यातून सर्वत्र पसरला. त्यात त्याचा स्वार्थ असेल कदाचित, पण अप्रत्यक्षपणे का होईना, एका महान विचारवंताची जगाला ओळख होण्यासाठी तो कारणीभूत ठरला. स्वत: टॉलस्टॉय जे विचार मांडत असत ते आचरणात आणत असतंच असं नाही. व्लादिमीरचा मात्र टॉलस्टॉयन आदर्शवादावर पूर्ण विश्वास होता. चित्रपटातही एका प्रसंगी ‘ही इज ए मच बेटर टॉलस्टॉय दॅन आय अ‍ॅम..’ असं व्लादिमीरकडे निर्देश करणारं वाक्य टॉलस्टॉयच्या तोंडी आहे. व्लादिमीरची कीर्तीही याहून वेगळं सत्य सांगत नाही. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ा पाहिलं तर व्लादिमीरची बाजू, त्याचे मार्ग फारसे बरे नसले, तरीही योग्य होती. याउलट सोफियाच्या हाती नियंत्रण जातं, तर कदाचित तिने केवळ आर्थिक फायदा पाहिला असता; जो टॉलस्टॉयन प्रचारासाठी फार योग्य ठरला नसता. स्वत: टॉलस्टॉयनेदेखील सोफियाच्या विरोधात जाणारी अन् व्लादिमीरला दुजोरा देणारी भूमिका घेतली, यावरूनही हेच सिद्ध होतं. मात्र, चित्रपटात हे थोडं वेगळ्या पद्धतीने उभं राहतं, ते व्ॉलेन्टीनचा दृष्टिकोन त्याला मिळाल्याने, मूळ लेखकाच्या चळवळीच्या राजकारणाकडे खोलात जाऊन पाहण्याने, अन् आम प्रेक्षकाच्या सामान्य व्यक्तिरेखेच्या सुख-दु:खांशी सहजपणे समरस होण्याच्या क्षमतेने.
हा चित्रपट व्लादिमीरच्या व्यक्तिरेखेकडे जवळजवळ सतत नकारात्मक दृष्टीने पाहतो. पॉल गिआमातीने ‘बिट्वीन द लाइन्स’ शोधलेल्या जागा, संवादांत मुद्दाम असणाऱ्या खाचाखोचा अन् सुरुवातीपासून सहानुभूती घेणाऱ्या सोफियाबरोबर या व्यक्तिरेखेचा असणारा वाद यामुळे प्रेक्षकाला व्लादिमीरचा स्वार्थापलीकडे जाणारा काही हेतू असेल, यावर विश्वासच ठेवू देत नाही. सोफियाचा विचार हा खरा अधिक स्वार्थी आहे. कारण टॉलस्टॉयनंतरच्या संपत्तीविभाजनाचा विचार त्यात डोकावतो. मात्र, प्रेक्षकाला टॉलस्टॉयच्या साहित्यप्रसारापेक्षा एका पत्नीने नवऱ्याच्या मिळकतीवर हक्क सांगणं अन् आपल्या वारसांचा विचार करणं, चटकन पटतं. रास्त वाटतं. एका दृष्टीने ही दिशाभूल आहे. मात्र कळेल- न कळेलशी.
मात्र, ही दिशाभूल गृहीत धरूनही ‘द लास्ट स्टेशन’ आपल्याला खिळवून ठेवतो, तो प्रामुख्याने या भूमिकांसाठी ऑस्कर नामांकनात स्थान मिळवून गेलेल्या क्रिस्टोफर प्लमर अन् हेलन मिरेन या दोघांनी साकारलेल्या लेव अन् सोफिया टॉलस्टॉय या व्यक्तिरेखांमुळे. या दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय खऱ्या वाटणाऱ्या आहेत. किंबहुना त्यामुळेच त्या युक्तिवादातली दिशाभूलही उघडपणे लक्षात येऊ देत नाहीत. त्यांचं प्रेम, त्यातला शारीरिक आकर्षणाचा भाग, सोफियाच्या मनातली असुरक्षितता, टॉलस्टॉयला व्लादिमीरचं पटणं, पण तरीही आपण आपल्या माणसांशी डावपेच खेळतोय, ही सलत राहणारी जाणीव, हे सगळं आपल्यापर्यंत थेटपणे पोहोचतं. टॉलस्टॉय ही व्यक्ती अन् टॉलस्टॉय ही प्रतिमा- या दोघांबद्दलही चित्रपट थेटपणे भाष्य करतो. चित्रपट जोवर टॉलस्टॉय अन् सोफिया या दोघांवर केंद्रित राहतो, तोवर तो प्रेक्षकाला जणू त्या काळात घेऊन जातो.
किंबहुना त्यामुळेच स्टेशनवरची या दोघांची अखेरची भेट हा ‘द लास्ट स्टेशन’चा सर्वोच्च पे ऑफ ठरतो. इतर व्यक्तिरेखांचे दृष्टिकोन आपण जाणतो. मात्र, या क्षणापुरते आपण ते बाजूला ठेवतो, अन् या दोघांनी व्यापलेल्या क्षणात समरस होतो. आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी रशियामधल्या एका एकलकोंडय़ा स्टेशनवर घडलेला हा क्षण मग आपल्याला परका वाटत नाही. आपण जणू त्या क्षणाचाच एक भाग बनलेले असतो. दूरवर उघडणाऱ्या काळाच्या खिडकीतून पाहणारे मूक साक्षीदार!
-गणेश मतकरी. 
(लोकसत्तामधून)

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP