मॉन्स्टर्सः रोड (मॉन्स्टर) मुव्ही

>> Sunday, November 28, 2010

एम नाईट श्यामलनचा `साईन्स` आठवतो ? या दिग्दर्शकाची ही मला सर्वाधिक आवडती (सिक्स्थ सेन्सहून देखील अधिक) फिल्म असल्याने मी तरी ती सहजासहजी विसरणार नाही. साईन्स जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा श्यामलनची खूप हवा होती. शिवाय काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या `इन्डीपेन्डन्स डे`ने `परग्रहवासीयांचा पृथ्वीशी होणारा संपर्क` या विषयाकडून काय अपेक्षा ठेवावी याचं फार ढोबळ समीकरण मांडून ठेवलं होतं. त्यामुळे ब-याच उडत्या तबकड्यांना टीव्हीवरल्या ग्रेनी फूटेजमध्ये दाखवणारा, बरीचशी वातावरण निर्मिती शेतात काढलेल्या क्रॉप्स सर्कल्समधून  करणारा अन् जेमतेम एका परग्रहवासियाला लढ्यासाठी पुढे करणारा साईन्स पाहून आम प्रेक्षक हबकला यात आश्चर्य नाही. २००२चा साईन्स अन् २०१०चा मॉन्स्टर्स यांमधे मिनिमलीस्टीक दृष्टिकोन एवढं एकच साम्य आहे, असं नाही. साईन्सचा प्रवास हा थिऑलॉजिकल अंगाने जाणारा होता.त्याची नजर वर असली, तरी ती केवळ इतर ग्रहता-यांपर्यंत जाण्यात समाधान मानणारी नव्हती. तिला थेट देवाचाच शोध घ्यायचा होता. मॉन्स्टर्सचा अजेन्डा एवढा वेगळा नाही. पण माणूस म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय असे तात्त्विक प्रश्न त्याला पडतात. त्यापलीकडे जाऊन युद्धग्रस्त वर्तमानाची एक बदललेली झलकही त्याला दाखवावीशी वाटते. मात्र तो परग्रहवासीयांना पूर्णपणे दुय्यम स्थान देत नाही. अत्यंत माफक वेळासाठी का होईना, पण वेगळ्या प्रकारच्या एलिअन्सशी तो पुरेशा प्रभावीपणे आपला परिचय करून देतो.
 लेखक दिग्दर्शक गॅरेथ एडवर्डस समोर,  हा चित्रपट मांडतेवेळी साईन्सबरोबर इतरही काही चित्रपट असावेत.रिअ‍ॅलिटी टीव्हीने हॉरर फिल्म आणि थ्रिलर्समध्ये जो बदल घडवून आणला, आणि छायाचित्रणातही अभिजात संकल्पना बाजूला ठेवून उस्फूर्ततेचा आभास तयार करण्याची पद्धत लोकप्रिय केली, त्या लाटेतून पुढे आलेले `क्लोवरफिल्ड`, `पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी` आणि `डिस्ट्रिक्ट-9` हे मॉन्स्टर्सवर आपला प्रभाव सोडून गेल्याचं स्पष्टपणे लक्षात येतं. मात्र आशयगर्भतेच्या दृष्टीने पाहाता `डिस्ट्रिक्ट-9` चा अपवाद वगळता इतर दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत `मॉन्स्टर्स` सरस ठरतो. `मॉन्स्टर्स`ला फॉर्म्युला लावायचा, तर रोड मुव्हीचा लावता येईल.
चित्रपटात सुरूवातीलाच सांगितलं जातं, की एका यानाला झालेल्या अपघाताने मेक्सिकोमध्ये परग्रहावरच्या जीवांचा सुळसुळाट झाला आहे. मेक्सिकोचा अर्धा भाग दूषित असल्याचं जाहीर करून अमेरिकन सरहद्दीवरही सुरक्षा वाढविली आहे. तरीही हे परग्रहवासी जनतेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात सरकारला यश आलेलं नाही. कथानकाला सुरूवात होते, ती या घाडामोडीनंतर सुमारे सहा वर्षांनी. सॅम (व्हिटनी एबल) ही एक श्रीमंत मुलगी जी मेक्सिकोत आहे. तिचा एक हातही जायबंदी झालेला. सॅमला मेक्सिकोतून  बाहेर काढून अमेरिकेत सुरक्षितपणे पोहोचवायचं काम येऊन पडतं ते कॉल्डरवर (स्कूट मॅकनेअरी). कॉल्डर सॅमच्या वडीलांकडे नोकरी करतो. या कामगिरीत त्याला फार रस नाही, पण नोकरी टिकवायची तर दुसरा इलाज नाही. कॉल्डर फोटो जर्नलिस्ट आहे. आर्थिक/सामाजिक वर्गवारीत त्याची सॅमशी बरोबरी नाही. अन हे दोघेही जण जाणून आहेत. मेक्सिको सोडून अमेरिकेत जायची जवळपास अखेरची संधी असलेली फेरीबोट कॉल्डरमुळे चुकते, तेव्हा सॅम दूषित भागातून जीवावरच्या जोखमीने अमेरिकेत जायचं ठरविते. कॉल्डर अर्थातच तिच्याबरोबर निघतो. राक्षसांच्या सानिध्यात जाताना, पुन्हा आपण माणसांच्या जगात परतू का नाही, याची शाश्वती दोघांनाही वाटत नाही. मॉन्स्टर्सच्या पहिल्या प्रसंगात, आपल्याला चित्रपटाबद्दल माहिती देणा-या काही विशेष गोष्टी दिसून येतात. हॅन्डीकॅम सारख्या कॅमेरावर चित्रित होणा-या या दृश्यात आर्मीच्या दोन गाड्यांवर होणारा हल्ला, अन् तो करणारा महाकाय ऑक्टोपससदृश्य परग्रहवासी दिसतो. या प्राण्यांची जी काही माफक दृश्य या चित्रपटात आहेत, त्यातलं हे महत्त्वाचं दृश्य. या दृश्यावरून आपल्याला चित्रपटाची लो बजेट शैली दिसून येते. ज्यांनी मघा उल्लेखलेले चित्रपट पाहिले असतील त्यांना मॉन्स्टर्समध्ये काय पाहायला मिळेल याचा एक निश्चित अंदाज बांधता येतो. राक्षसाच्या प्रत्यक्ष दर्शनाने (एडवर्डस हा एच.पी. लव्हक्राफ्टच्या कथुल मायथोजचा चाहता असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या राक्षसी प्राण्यांवर द ग्रेट कथुलूची असलेली छाप स्पष्ट दिसणारी आहे.) हा बंदुकधारी ऑर अदरवाईज असणा-या, मानवी स्केलच्या शत्रूंपेक्षा खूपच वेगळा प्रकार असल्याचं दिसून येतं, अन् आपण प्रीडेटर,एलिअन्स वैगैरे मंडळींच्या आसपासचं काही पाहायला मिळेल हा विचार डोक्यातून काढून टाकतो. एकूणात ही प्रस्तावना उपयोगी आहे. मात्र प्रस्तावना म्हणूनच. या प्रस्तावनेचं चित्रपटाच्या शेवटल्या प्रसंगाशी असलेलं नातं अनावश्यक तर आहेच, वर चित्रपटाच्या एकूण परिणामातही बाधा आणणारं आहे. गंमत म्हणजे हा संबंध उघड, वादातीत असला, तरी तो प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्षात येईलसं नाही. किंबहुना मी म्हणेन, की न येणंच चांगलं. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटाकडे आपण सकारात्मक पद्धतीने पाहू शकू.
 मॉन्स्टर्स हा मुळात प्रवृत्तींचा खेळ आहे. कॉल्डरवर अन्याय करणारा बॉस, सॅमच्या डोक्यातला भेदभाव, जनतेच्या सुरक्षिततेकडे पैसे मिळविण्याची संधी म्हणून पाहणारे भ्रष्ट अधिकारी, युद्धापुढे गरीबांकडे दुर्लक्ष करणारी सत्तास्थानं, चेह-यावर गॅस मास्क लावून स्वतःच राक्षसाचं रूप घेणारे सामान्य जन, अशी इथली परिस्थिती पाहता नावातला मॉन्स्टर्स हा शब्द नक्की कोणाला उद्देशून आहे, असा प्रश्न पडावा. प्रस्तावना विसरून चित्रपटाचा शेवट पाहिला, तर हे अधिकच स्पष्ट होतं. मॉन्स्टर्समध्ये राक्षसाचं प्रत्यक्ष दर्शन कमी वेळा होत असलं तरी प्रेक्षकाला आपली फसगत झाल्यासारखं वाटत नाही. याला कारणं दोन. एक तर दर्शनाशिवायही या राक्षसाचं असणं हे वेळोवेळी जाणवत राहतं. त्यांची अदृश्य छाया ही आजूबाजूच्या जगावर पडलेली दिसून येते. लोकांच्या वागण्यापासून प्रत्यक्ष नासधुशीपर्यंत आणि संवादापासून सुरक्षाव्यवस्थेने उचललेल्या टोकाच्या पावलांपर्यंत सर्वत्र त्याचा प्रभाव आहे. त्याखेरीज प्रत्यक्ष वावर जाणवण्यासाठी साउंड इफेक्टचा उत्तम वापर इथे पाहायला किंवा ऐकायला मिळतो. फसगत न वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे मूळ कथानकातच प्रेक्षकांना गुंतविण्याची असलेली ताकद. सॅम आणि कॉल्डर या व्यक्तिरेखा पुरेशा वेधक आहेत. त्याबरोबर ब-याच चित्रपटात (अन् मिडनाईट रन, थ्री फ्युजिटीव्ह्ज सारख्या रोड मुव्हीजमध्येही) पाहायला मिळणारं विसंवादाचं सुसंवादात होणारं रुपांतर इथे जमलेलं आहे.
असे चित्रपट व्यक्तिचित्रणावर खूप अवलंबून असतात, अन् ते जितकं अस्सल, तितकी त्यांची प्रेक्षकांवरली पकड मजबूत. ही पकड मॉन्स्टर्स सैल होऊ देत नाही. अशा चित्रपटाच्या प्रगल्भ आणि दर्जेदार असण्यात, उघडंच त्यांचा कमी बजेटचा भाग असतो. जेव्हा पैसे नसतात, अन् भव्यतेने प्रेक्षकांना गार करणं शक्य नसतं, तेव्हा चित्रकर्ते ही कमी भरून काढण्याचे अधिकाधिक सर्जनशील मार्ग शोधून काढतात. मात्र हे चित्रपट चालताच पुढल्या चित्रपटांना पैसा उपलब्ध होतो, अन् क्रिएटिव्हीटी ही मागे पडते. चित्रपट जुन्याच पठडीत फिरायला लागतात. एडवर्डसकडेही पुढल्या निर्मितीच्या निमित्ताने पैसा येईलंच. तेव्हा तो काय करेल हे त्याच्या निर्मितीचा पुढला आलेख ठरवणारं ठरेल. ते पाहण्यात मला नक्कीच रस आहे.

-गणेश मतकरी.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP