ऑस्कर्स 2011 - इट्स ऑल अबाऊट विनिंग!
>> Saturday, February 26, 2011
इट्स नॉट विनिंग ऑर लुजिंग, बट हाऊ यू प्ले द गेम’ असं म्हटलं जातं आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र त्याचवेळी हेदेखील खरं, की जिंकण्यातून तयार होणारी ईर्षां ही अनेकांना प्रेरित करत असते. केवळ जेत्याला आपल्या पुढल्या कारकीर्दीसाठीच नव्हे, तर जिंकण्याची संधी हुकलेल्याला, ती पुढल्या वेळी हुकू नये अशी कामगिरी करून दाखवण्यासाठीही. जिंकण्याचा हा सोहळा दिमाखात साजरा करणारी ‘ऑस्कर नाईट’ जगभर सारख्याच उत्साहात पाहिली जाते ती कदाचित त्यामुळेच...
जागतिक पातळीवर चित्रपटांसाठी होत असणाऱ्या सन्मानात ऑस्करचा हात क्वचितच कोणी धरू शकेल. प्रामुख्याने ही अमेरिकन व्यावसायिक चित्रपटसृष्टीची पारितोषिकं दर्जेदार खचितच, मात्र दर्जाबरोबरच व्यावसायिक गणिताचा विचारदेखील मनात धरणारी, वादग्रस्तता टाळून सेफ गेम खेळणारी. त्यामुळे नामांकनात मोकळेपणा दाखवून पारितोषिकांत मात्र क्वचित तडजोड करणारी. गोल्डन ग्लोब, बाफ्टासारख्या पारितोषिकांचा थाटमाट, उपस्थितांची स्टार पॉवर, ऑस्करपेक्षा कमी नाही. पण सामान्य रसिकांपर्यंत पोचलेली ऑस्कर ब्रॅन्डची लोकप्रियता इतरत्र नसल्याचं सहज लक्षात यावं. हल्लीच ऑस्करने आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी असणाऱ्या नामांकनाची संख्या पाचवरून वाढवून दहावर नेली आहे. हे जरा अती वाटतं, अगदी आपल्याकडे ‘फिल्म फेअर’ प्रकारातल्या पारितोषिकांनी जसं सर्वाना खूष करण्याचा प्रयत्न करावा, त्या प्रकारचं. मात्र अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसने या प्रकारचं सावध धोरण स्वीकारावं यात आश्चर्य नाही. चित्रपट उद्योगातल्या कर्त्यांधर्त्यांबरोबर असणारे अॅकेडमीचे लागेबांधे पक्के होण्यापासून ते समारंभाला उपस्थित सेलिब्रिटीजच्या संख्येत मोलाची भर पडण्यापर्यंत या निर्णयाचे अनेक फायदे असतील हे निश्चित. या वर्षीची बेस्ट पिक्चर वर्गातली नामांकनं मात्रं हा अॅकेडमीचा निर्णय योग्य असल्याची पावती वाटण्यासारखीच आहेत. त्यामुळं अंतिम विजेता कोण ठरणार याबद्दलचं कुतूहल अधिक वाढवणारी.
ऑस्कर्स कोणाला मिळण्याची शक्यता अधिक आहे, याचा अंदाज हा बहुतेक वेळा बांधता येतो कारण पारितोषिक विजेता हा दर्जातल्या स्पर्धेचा विजेता नसतो. बऱ्याचदा नामांकनातले सर्वचजण, पारितोषिकासाठी लायक असतात अॅकेडमी मेम्बर्सच्या मतदानातून ठरत असणारा विजेता हा अंतिमत: या उद्योगातल्या अंतप्रवाहांना सूचित करत असतो. उद्योगाचं राजकारण, गोल्डन ग्लोब/ डिरेक्टर्स गिल्डसारख्या इतर प्रमुख पारितोषिकांचे निकाल, नामांकनात आलेल्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’, वादग्रस्तता टाळण्याकडे असलेला कल या सगळ्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रभाव घोषित विजेत्यांवर होत असतो. हे वर्षही त्याला अपवाद ठरू नये. यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात नक्की विजेते ठरणार नाहीत, असे तीन चित्रपट आहेत. इंडीपेन्डंन्ट प्रॉडक्शन असलेला ‘विन्टर्स बोन’, स्लमडॉग टीमचा ‘127 अवर्स’ आणि ‘टॉय स्टोरी ३’. ‘टॉय स्टोरी’चा इथला सहभाग हा त्याला अॅनिमेटेड चित्रपटाचं ऑस्कर नक्की असल्याचं सूचित करणारा आहे. उरलेल्यांमध्येही आरोनोफ्स्कीचा ‘ब्लॅक स्वान’ अन नोलानचा ‘इन्सेप्शन’ थ्रिलर्स असल्याने, तर कोलोडेन्कोचा ‘द किड्स आर ऑल राईट’, कॉमेडी असल्याने बाजूला राहणं निश्चित. नोलान अन कोलोडेन्कोला तर दिग्दर्शनाचं नामांकनदेखील नसल्याने त्याचं भविष्य स्पष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर बक्षिसपात्र ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तो डेव्हिड फिन्चरचा ‘द सोशल नेटवर्क’, अन तसं झालं तर तो अॅकेडमीचा अतिशय योग्य निर्णय ठरेल. नेटवर्क हा एक प्रकारचा आधुनिक इतिहास मांडणारा, गुंतागुंतीचा आशय सांगू पाहणारा, दिग्दर्शन अन पटकथेत मुबलक प्रयोग करणारा चित्रपट आहे. तो डावलला जाण्याची शक्यता कमी, पण तसं जर झालंच तर टॉम हूपरचा ‘द किंग्ज स्पीच’ हा दुसरा लायक चित्रपट ठरेल. त्यातलं नाटय़ थोडं अधिक सांकेतिक आहे. अन मांडणीदेखील पटकथेपेक्षा नाटकाच्या जवळ जाणारी आहे. दिग्दर्शन फिन्चरइतकं शैलीदार नसलं तरी चित्रपटाला पूर्णपणे न्याय देणारं आहे. याउलट कोएन ब्रदर्सच्या ‘ट्रू ग्रिट’चा अभिनेता/छायाचित्रण वगळता इतर सर्वच वर्गातला सहभाग हा दर्जादर्शक जरूर आहे, पण तो परितोषिक प्राप्त ठरणं कठीण आहे. यादीतल्या समावेशाने या अत्यंत सर्जनशील बंधूंबाबत सर्वानाच असणारा आदर सूचित होतो इतकंच.
अनेकदा ऑस्कर पारितोषिकात असं दिसून येतं की निर्विवाद दर्जा वाढविणाऱ्या दोन कलाकृती असल्या की एकीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळतो, तर दुसरीचा दिग्दर्शनाचा. इथे ‘सोशल नेटवर्क’ अन् ‘किंग्ज स्पीच’बाबत तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तसं होईल असं मला वाटत नाही. यंदा हे पारितोषिकही नेटवर्कच्या अर्थात फिन्चरच्याच वाटय़ाला येण्याची चिन्हे आहेत. गोल्डन ग्लोबमध्ये त्याने ही कमाई केलेलीच आहे, अन बाफ्टामध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान किंग्ज स्पीचकडे जाऊनही दिग्दर्शनांच पारितोषिक फिन्चरलाच मिळालेलं आहे. ऑस्करलाही तोच पारितोषिक प्राप्त ठरेल अशी खात्री वाटते.
सर्वोत्तम अभिनयाच्या पारितोषिकांबद्दल यावर्षी कोणताही वाद संभवत नाही. जनतेशी संवाद साधण्यात कमी पडणाऱ्या सहाव्या जॉर्ज राजाच्या भूमिकेतल्या कॉलिन फर्थला ‘द किंग्ज स्पीच’साठी तर सत्य अन कल्पितामध्ये भेद करता न येऊ शकणाऱ्या बॅलेरीनाच्या भूमिकेतल्या नॅटली पोर्टमनला ‘ब्लॅक स्वान’ साठी ही पारितोषिक निश्चित आहेत. ‘ट्र ग्रिट’साठी जेफ ब्रिजेस आणि ‘द किडस आर ऑल राइट’साठी अॅनेट बेनिंग या दोघांच्या अभिनयाचा दर्जाही पारितोषिक प्राप्त ठरावा असाच आहे. मात्र या वर्षी तरी त्या दोघांना नामांकनावरच समाधान मानावं लागेल. ब्रिजेस यापूर्वी क्रेझी हार्टसाठी विजेता ठरला आहे. बेनिंगचं मात्र हे चौथं नामांकन असूनही तिच्या हाती निराशाच येण्याची चिन्हं दिसतात.
सहाय्यक भूमिकेतल्या अभिनयासाठी मात्र स्पर्धा जरूर आहे. अभिनेत्यांच्या स्पर्धेत ‘द फायटर’मधल्या भूमिकेसाठी निवडल्या गेलेल्या क्रिश्चन बेलचं पारडं हे किंग्ज स्पीचसाठी वर्णी लागलेल्या जॉफ्री रशपेक्षा जड आहे, तर अभिनेत्रीच्या स्पर्धेत ‘द फायटर’ मधल्याच भूमिकेसाठी लढणाऱ्या मेलिसा लिओचं पारडं, ‘टू ग्रिट’साठी नामांकन
मिळालेल्या हेली स्टाईनफेल्डपेक्षा जड आहे. मात्र हा तोल नाजूक आहे. रश अन स्टाईनफेल्ड दोघांच्या भूमिका मोठय़ा आहेत. रशची भूमिका फर्थशी तुल्यबळ आहे, अन् स्टाईनफेल्डची तर चित्रपटातली एकमेव स्त्री भूमिका असल्याने खरं तर प्रमुख भूमिकाच आहे. त्यामुळे पारडय़ांचा जडपणा आयत्यावेळी सरकल्यास फार आश्चर्य वाटू नये.
‘सोशल नेटवर्क’ला अभिनयाचं पारितोषिक जाणार नाही, यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण खरं तर हा दिग्दर्शकाचा अन त्यानंतर लेखकाचा चित्रपट आहे. त्यामुळे पटकथेचं, आधारित पटकथेचं पारितोषिक नक्कीच आरोन सोरकीनला या चित्रपटासाठी मिळेल. स्वतंत्र पटकथेचं पारितोषिक बहुधा जाईल, ते क्रिस्टोफर नोलानला इन्सेप्शनसाठी. दिग्दर्शक म्हणून नामांकनातून वगळण्यात आल्याने त्याच्यावर होणारा अन्याय बहुधा इथे भरून काढला जाण्याची शक्यता आहे. इतर तांत्रिक पुरस्कारातही इन्सेप्शन पुढे राहाण्याची शक्यता आहेच.
छायाचित्रणाचा दर्जा पाहता ‘इन्सेप्शन’ किंवा ‘ब्लॅक स्वान’चा नंबर इथे जरूर लागायला हवा. मात्र आठव्यांदा नामांकन मिळून ही अजून पारितोषिक प्राप्त न ठरलेल्या रॉजर डेकिन्सची ‘ट्र ग्रिट’साठी वर्णी लागल्यास आश्चर्य वाटू नये, त्याचं काम इतर दोन चित्रपटांहून अधिक सोपं असूनही. ऑस्करच्या प्रमुख पारितोषिकांमधली वर्गवारी, ही चित्रपट व्यावसायिक आहे हे गृहीत धरून, आशयाकडे किंचित डोळेझाक करून केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आशय, प्रयोग, सामाजिक बांधिलकी, यासारख्या गोष्टींना महत्त्व येतं, ते उर्वरित पारितोषिकांमध्ये. म्हणजे परभाषिक चित्रपट, माहितीपट, लघुपट इत्यादी वर्गात. इथली स्पर्धा संपूर्ण निरपेक्ष, म्हणूनच अधिक अटीतटीची असते. इथल्या अडचणी वेगळ्या असतात. चित्रकर्त्यांची नावं अॅकेडमीसाठी अनोळखी असल्याने, अॅकेडमी सभासदांना मतदानासाठी चित्रपट/माहितीपट दाखवणं हेच जिकीरीचं काम होऊन बसतं. भारतीय चित्रपटांना त्यासाठी कसा अन् किती त्रास झाला याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपण दरवर्षी ऐकत असतोच- आणि आपल्याला न मिळणाऱ्या पारितोषिकाचं खापर त्या अनुपस्थित अॅकेडमी मेंबरांवर फोडतही असतो!
यंदाचे सर्व परभाषिक चित्रपट काही मी पाहिलेले नाहीत. परंतु जे पाहिलंय त्यावरून मेक्सिकोच्या ‘ब्युटिफूल’ला किंवा डेन्मार्कच्या ‘इन ए बेटर वर्ल्ड’ला पारितोषिक मिळण्याची शक्यता अधिक वाटते. ब्युटिफूलमधला झाविएर बारदेम हा ‘नो कन्ट्री फॉर ओल्ड मेन’साठी साहाय्यक भूमिकेत ऑस्कर विजेता ठरलेला तर यंदा इथल्या प्रमुख भूमिकेसाठी नामांकनातही आहे. चित्रपटाचा संपूर्ण टोन मात्र अतिशय नकारात्मक असल्याने ऑस्कर हुकण्याची शक्यता अधिक!मोठय़ा माहितीपट विभागातदेखील सर्वच फिल्म्स उत्तम असल्या, तरी बॅन्क्सीच्या ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’ या स्ट्रीट आर्ट डॉक्युमेन्टरीला सन्मान मिळण्याची शक्यता खूप आहे. मात्र युद्धविषयक चित्रपट/माहितीपट हा अॅकेडमीचा वीक पॉईन्ट असल्याने रेस्टरेपोलादेखील निकालात काढता येणार नाही.
अॅनिमेटेड लघुपटांमध्ये केवळ अॅनिमेशन उत्तम असून भागत नाही, तर त्यामागचा विचारदेखील महत्त्वाचा ठरतो. पिक्झारच्या ‘डे अॅण्ड नाईट’ची शैली फार वेगळी नसली, तरी कल्पना मुळात सुचायचा अन मग प्रत्यक्षात उतरवायला अतिशय कठीण आहे. दोन मनुष्याकृतींच्या बाह्याकारातून दिसणारा दिवस-रात्रीचा हा खेळ केवळ वेधक नाही, तर आपल्याला विचारात पाडणारा आहे. दृश्य आणि ध्वनी याचा तपशील इथे फार खोलात जाऊन भरलेला दिसतो. पिक्झारच्या फिल्म्स ब्रिलीअन्ट असणं यात नवीन काही नाही. मात्र त्यांच्या ब्रिलिअन्सची सतत बदलती तऱ्हा मात्र थक्क करून सोडणारी आहे.
‘इट्स नॉट विनिंग ऑर लुजिंग, बट हाऊ यू प्ले द गेम’ असं म्हटलं जातं आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र त्याचवेळी हेदेखील खरं, की जिंकण्यातून तयार होणारी ईर्षां ही अनेकांना प्रेरित करत असते. केवळ जेत्याला आपल्या पुढल्या कारकीर्दीसाठीच नव्हे, तर जिंकण्याची संधी हुकलेल्याला, ती पुढल्या वेळी हुकू नये अशी कामगिरी करून दाखवण्यासाठी. जिंकण्याचा हा सोहळा दिमाखात साजरा करणारी ‘ऑस्कर नाईट’ जगभरात सारख्याच उत्साहात पाहिली जाते ती कदाचित त्यामुळेच. या रात्रीपुरतं महत्त्व आहे, ते फक्त जिंकलेल्याला. इट्स ऑल अबाऊट विनिंग, अॅण्ड नथिंग एल्स!
- गणेश मतकरी Read more...