`हेवनली क्रिचर्स`-भ्रमाचं वास्तव दर्शन

>> Sunday, March 27, 2011

`लॉर्ड ऑफ द रिंग्ज` य़ा अदभूत चित्रत्रयीने लोकांना माहिती झालेला दिग्दर्शक पीटर जॅक्सन आणि `टायटॅनिक` या लोकप्रिय प्रेमकथेने ऑस्करपर्यंत पोहोचलेली नायिका केट विन्स्लेट यांना एकत्र आणणारा आणि `हेवनली क्रिचर्स` असं गोंडस नाव धारण करणारा चित्रपट एका अस्वस्थ करणा-या शोकांत सत्यकथेवर आधारित आहे, हे पटकन सांगून खरं वाटणार नाही. पण तसा तो आहे. १९५४मधे न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च या टुमदार गावात पॉलाईन रिप आणि जुलिएट ह्यूमस या अनुक्रमे पंधरा आणि सतरा वर्षांच्या मुलींनी पॉलाईनच्या आईची निर्घृण हत्या केली. हेवनली क्रिचर्स हा दोघींच्या मैत्रीची, त्यांच्या एकमेकांत गुंतत जाण्याची, त्यांच्या वास्तव/कल्पित दुनियेची आणि त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची गोष्ट सांगतो.
या चित्रपटाचे दोन विशेष आहेत. पहिला म्हणजे त्याचा दृष्टिकोन. १९५२ मधे जुलिएट (केट विन्स्लेट) क्राईस्टचर्चमधे आली आणि तिची गप्प गप्प राहणा-या पॉलाईनशी (मेलनी लिन्स्की) मैत्री झाली. शारीरिक शिक्षणाच्या वर्गादरम्यान जुलिएटला असणा-या टीबीमुळे आणि पॉलाईनच्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना वेगळं बसायला लागे, त्यादरम्यान ही मैत्री वाढायला लागली. दोघी एकमेकांच्या सतत बरोबर राहायला लागल्या. इतकंच नाही तर त्यांनी स्वतःचं एक वेगळं कल्पनाविश्व तयार केलं. जुलिएटला इस्पितळात ठेवायला लागल्यावर त्यांनी काल्पनिक नावाने एकमेकांना लांबलचक पत्रंही लिहायला सुरूवात केली. हे कल्पित जग हळूहळू त्यांच्यासाठी वास्तवाइतकंच खरं होत गेलं.
मुलींनी केलेल्या खुनापर्यंत त्या पोहोचण्यात या कल्पित जगाचा मोठा हात होता. या जगाने त्या दोघींना एकत्र बांधलं. त्यांच्या या मैत्रीचा हळूहळू विपरित अर्थ काढला जायला लागला आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचे शरीरसंबंध आहेत असं वाटायला लागून ते पुरते हबकले. हेवनली क्रिचर्स त्यांचे खरे शरीरसंबंध होते की नव्हते, हे पूर्णपणे स्पष्ट करीत नाही. केवळ एका प्रसंगी तो ते असल्याचं दाखवतो, पण ही जवळीकही त्यांच्या भ्रामक दुनियेबरोबर मिसळली जाते. ख-या पॉलाईन आणि जुलिएट बद्दलही असा संशय व्यक्त करण्यात आला होता, पण त्याकाळी समलिंगी संबंधांबद्दल उघड फार बोललंच जात नसल्याने काही ठाम माहिती उपलब्ध नाही. पण शरीरसंबंध इथे महत्त्वाचे नव्हते. महत्त्वाचा आहे तो त्यांच्या पालकांनी घेतलेला ही मैत्री तोडण्याचा निर्णय, ज्यातून या गुन्ह्याची कल्पना रुजली.
या मुलींचं आपल्या कल्पनांच्या आहारी जाणं हे एकप्रकारे त्यांच्या मनोरूग्ण होत जाण्याचं, वास्तवाकडे पाठ फिरवून भ्रमिष्ट होण्याचं लक्षण आहे. बहुतेक चित्रपटात हे वेड त्रयस्थपणे किंवा डॉक्टरच्या नजरेतून घेतलेलं दिसतं. हेवनली क्रिचर्सच्या दृष्टिकोनातला वेगळेपणा हा की तो आपल्याला या मुलींच्या नजरेतून घटना दाखवितो. त्यांना दिसणारं स्वप्नमय जग, मातीच्या बाहुल्यांनी वसवलेलं शहर , मारिओलान्झा या गायकाची आणि ऑर्सन वेल्सच्या अभिनयाची त्यांच्या मनावर पडलेली मोहिनी या सगळ्याला प्रत्यक्ष घटनांप्रमाणे दाखवितो आणि मुलींची शाळा, त्यांची वाढणारी मैत्री आणि पालकांनी त्यांच्यावर केलेले आरोप. या कठोर वास्तवाबरोबर मिसळून टाकतो. त्यामुळे आपण केवळ या मुली अशा वागल्या या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काय चाललं होतं याचा विचार करू लागतो.
चित्रपटाचा दुसरा विशेष आहे, तो त्यात घेतलेल्या गुन्ह्याला जबाबदार घटकांचा माग. यातील हत्या कोणतीही एक मुलगी करू शकली नसती. दोघींचं एकत्र येणं हे ती घडण्यामागचं प्रमुख कारण होतं. दोघींच्या किंचित विकृतीचं एकमेकांना पूरक ठरणं हा म्हणाल तर अपघात, या घटनेला कारणीभूत ठरला. चित्रपटाच्या सुरुवातीला दिग्दर्शक आपल्याला रक्तरंजीत शेवटाची एक झलक दाखवितो, ज्यामुळे आपण या कथेतल्या घा़डामोडींकडे काळजीपूर्वक पाहतो आणि अपरिहार्य शेवटाकडे जाणा-या कहाणीला अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो.
पॉलाईन आणि जुलिएट पूर्णपणे वेड्या मात्र नव्हत्या. एकमेकांच्या संगतीत उफाळून आलेलं दोघींचं वेड हे पुढल्या आयुष्यात टिकलं नाही. निदान जुलिएटबाबत तर नाहीच. मुली अल्पवयीन असल्याने कोर्टाने त्यांना मृत्यूदंड दिला नाही. तीन-चार वर्षांच्या कैदेनंतर त्यांची एकमेकांना कधीही न भेटण्याच्या अटीवर सुटका झाली. हेवनली क्रिचर्स १९९४मधे प्रदर्शित झाल्यावर या दोघींना शोधण्याचा जोरदार प्रयत्न झाला. पॉलाईन सापडली नाही, जुलिएट मात्र सापडली. ती स्कॉटलंडमधे राहते. अ‍ॅन पेरी या नावाने गुन्हेगारी कादंब-या लिहिणारी एक अत्यंत यशस्वी लेखिका ही जुलिएट असल्याचं सिद्ध झालं. कल्पित विश्वात रमण्याची इच्छा आणि गुन्हेगारीबद्दल कुतूहल या दोन्ही गोष्टींचा हा सकारात्मक उपयोग म्हणावा लागेल. दोघींना वेगळं करण्याचा कोर्टाचा निर्णय योग्यच म्हणायला हवा. जरी ख-या अर्थाने या दोघींच्या मैत्री कम प्रेमकहाणीचा त्यांच्यात कायद्याने आलेला दुरावा हाच अधिक मोठा शोकांत आहे, निदान त्यांच्यापुरता.
- गणेश मतकरी. 

Read more...

‘बॅटल: लॉस एन्जेलिस’ - युद्धस्य कथा..

>> Sunday, March 20, 2011

‘द बेसिस फॉर ऑल मोरॅलिटी, इज डय़ूटी’
- रॉबर्ट ए हाइनलिन स्टारशिप ट्रूपर्स
‘ओन्ली द डेड हॅव सीन द एण्ड ऑफ वॉर’

- जॉर्ज सान्टायाना, सॉलिलोक्वीज इन इंग्लंड अँण्ड लेटर सॉलिलोक्वीज.
१९८६ मध्ये आलेला ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित ‘प्लटून’ आणि १९९८ मधला स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ यांच्याकडे युद्धपटांना ‘रिइन्व्हेन्ट’ करण्याचं श्रेय जायला हवं. पूर्वी युद्धपटांचं स्वरूप हे प्रामुख्याने वीरांच्या गाथा पडद्यावर आणल्यासारखं असायचं. त्यातली पात्रं पूर्वनियोजित आलेखावर चालणारी असायची. त्यांच्या प्रतिमा या मुळातच भव्य, असामान्य वाटायच्या. त्यांचं मरण हे त्यातल्या भयानकतेला वगळून समर्पणाच्या स्वरूपात सादर केलं जायचं. ‘प्लटून’ आणि ‘रायन’ यांनी पडद्यावरच्या रणभूमीला तिच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपात रंगवलं. युद्धाचा गदारोळ, त्यातलं क्रौर्य, नियतीचा अनपेक्षित न्याय आणि सैनिकांची हतबलता या दोन्ही चित्रपटांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने पोहोचवल्या. ‘रायन’च्या पुढल्या चित्रपटांनी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणं पसंत केलं आणि युद्धपट कायमचे बदलले. प्रेक्षकांना केवळ शौर्याची अन् त्यागाची गोष्ट न सांगता युद्धाच्या धुमश्चक्रीत खेचून आणणारा नवा युद्धपट तयार झाला.
हे हॉलीवूड इतिहासातलं त्यामानाने हल्लीचं प्रकरण अगदी जुनं नाही, पण म्हटलं तर नवीनही नाही. हे अचानक आठवायचं, कारण म्हणजे नुकताच पाहिलेला जोनाथन लायबसमन दिग्दर्शित चित्रपट ‘बॅटल: लॉस एन्जेलिस’. या चित्रपटाच्या नावातच असणारा ‘बॅटल’ हा शब्द चित्रपटाचा फोकस लक्षात आणून देण्यासाठी उपयुक्त आहे, कारण अन्यथा हा विषय फॅन्टसीकडे झुकतो. मुळात यातलं युद्ध हे दोन देशांमध्ये घडत नाही, ते घडतं मानवजात आणि परग्रहवासी या दोघांत. ‘बॅटल’ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या एका चमत्कारिक घटनेवरून स्फुरल्याचं म्हटलं जातं, पण त्यात फार तथ्य नाही, कारण मूळ घटनेत लॉस एन्जेलिसवर होऊ घातलेल्या हल्ल्याची केवळ पूर्वसूचना दिली गेली होती, तीदेखील पृथ्वीवासीय शत्रूकडूनच. प्रत्यक्षात हल्ला झालाच नाही, मात्र कॉन्स्पिरसी थिअरिस्टना शंका आली की सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतंय. मग या लपवल्या जाणाऱ्या गोष्टींचा सायीस्कर अर्थ ज्याने त्याने लावला.
‘बॅटल: लॉस एन्जेलिस’ हा चित्रपट बरा की वाईट, याबद्दल कोणामध्येच एकमत नाही. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाने पूर्णपणे विभागले गेले आहेत. मला तो पूर्णपणे आवडला नसला, तरी त्यात बऱ्याच गोष्टी लक्षवेधी वाटल्या. त्याचा सूर हा आजचा आहे. अनेकानेक संदर्भस्थळांचा त्याला आधार आहे आणि फॅन्टसी त्याच्या पटकथेतला महत्त्वाचा घटक असूनही त्याने वास्तववादाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं नाही. ‘बॅटल’ सुरू होतो, तो प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटल्यावर. पण प्रत्यक्ष शत्रूंचं दर्शन न घडवता. मग चटकन तो आदल्या दिवसावर येतो आणि त्यातल्या पात्रांचा परिचय करून देतो. त्यांचा व्यक्तिविशेष हा जाड टाइपात अधोरेखित करतो. फ्लॅशबॅक संपल्यासंपल्या लक्षात येतं की, आतापर्यंत मिटीओराइट भासत असलेल्या यानातून हा परकीय शत्रू पृथ्वीवर पोहोचला आहे आणि युद्ध कोणत्याही क्षणी आपल्या विरोधात जाईल. आतापर्यंत परिचित झालेल्या पात्रांवर आता एक कामगिरी सोपवली जाते, ती एका विशिष्ट भागात अडकलेल्या काहीजणांना सोडवून आणण्याची. अमुक तासांनंतर या भागावर बॉम्बहल्ला करण्यात येणार असतो आणि सारं बेचिराख होणार असतं. एका पोलीस चौकीत आश्रय घेतलेले हे नागरिक बळी पडू नयेत म्हणून त्यांच्याहून संख्येने अधिक सैनिकांना या धोक्यात लोटलं जातं आणि चित्रपट सुरू होतो.
युद्धाच्या राजकारणावर फार न बोलताही बरंच काही बोलून जाणाऱ्या ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’मध्ये एका माणसाला सोडवायला धाडलेले आठजण आणि त्याची ‘द मॅन इज द मिशन’ ही टॅगलाइन आपल्यापैकी अनेकांना नक्कीच आठवत असेल. मात्र इथलं मिशन केवळ त्यावरूनच स्फुरलेले आहे असं नाही अन् दुसऱ्या बाजूने बोलायचं तर, ‘रायन’चा प्रभावदेखील या एका घटकापुरता मर्यादित नाही. ‘रायन’च्या काळात दिग्दर्शकाला कथा सांगण्यापलीकडे जाऊन प्रेक्षकाला थेट अनुभव द्यावासा वाटणं हा योगायोग नव्हता, तर तो चित्रपट माध्यमाच्या नैसर्गिक उत्क्रांतीचा भाग होता. प्रेक्षकांना केवळ गोष्ट सांगणारा चित्रपट नको होता, तर या ना त्या प्रकारे त्याच्या आयुष्याशी संबंधित असणारा, त्यांना केवळ भावनिकदृष्टय़ाच नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणारा चित्रपट हवा होता. ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ला आज १० वर्ष उलटून गेली आहेत. मधल्या काळात घडलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रिअॅलिटी टी.व्ही.चा वाढता पगडा अन् गेमिंग इंडस्ट्रीमध्ये झालेली क्रांती. पूर्वी चित्रपटांचं जग अन् सामान्यांचं जग यात फार अंतर होतं. इंटरनेट अन् टीव्हीने आज हे अंतर पुसून टाकलंय. या दोन माध्यमांद्वारे सामान्य माणसंच अचानक स्टार होऊ घातलीयत, घराघरांत पोचलीयत. कॉम्प्युटर अन् कन्सोल गेम्सनी तर त्याहीपुढे जाऊन सामान्य माणसांना परकाया प्रवेशाची संधी देऊ केली आहे. छोटय़ा पडद्यावरच्या रोमहर्षक साहसांना नायकाच्या भूमिकेतून जगण्याची दृष्टी दिली आहे. त्यामुळे आज चित्रपटाकडून दिला जाणारा अनुभव हा पूर्वीपेक्षा अधिक अस्सल, अधिक जिवंत असण्याची गरज तयार झाली आहे, जो आपल्या प्रेक्षकाला टी.व्ही./ इंटरनेट/गेम्सपासून बाजूला करून चित्रपटगृहात घेऊन येईल.
‘बॅटल: लॉस एन्जेलिस’चा फॉरमॅट हा गेमर्सना परिचित फॉरमॅट आहे; किंबहुना एका दृष्टीने तेच त्याचं आकर्षणही आहे. ‘गिअर्स ऑफ वॉर’ किंवा ‘हॅलो ट्रिलजी’सारखे खेळ खेळणाऱ्यांना या प्रकारचं आंतरग्रहीय युद्ध नवीन नाही. मात्र असं असूनही मोठय़ा पडद्याचे फायदे अन् तोटे दोन्ही आहेत. फायदा हा की, चित्रपटाचा अनुभव हा कधीही अधिक अस्सल वाटणारा! ‘बॅटल’ने निवडलेली शैलीदेखील ‘रायन’ किंवा रिडली स्कॉटच्या ‘ब्लॅक हॉक डाऊन’ या चित्रपटांना फाइन टय़ून करणारी आहे. छायाचित्रण प्रत्यक्ष रणभूमीचा आभास तयार करणारं, पूर्वीच्या न्यूजरील फूटेजच्या पठडीतलं- गतिमान अन् प्रत्यक्ष लढाईत सहभागी होऊन घेतल्यासारखं वाटणारं आहे. ‘बॅटल’ संपूर्ण युद्धातल्या स्ट्रॅटेजिक घडामोडींवर, हारजीतीवर लक्ष न देता आपलं लक्ष हे एका मिशनवर केंद्रित करतो. दिग्दर्शकाचा हा निर्णय चित्रपटाचा वास्तववाद वाढवणारा अन् खेळांमधल्या गेमप्लेच्याही अधिक जवळ जाणारा, त्यांच्या चाहत्यांना परिचित वाटणारा आहे. मात्र असं असूनही खेळाचा मुख्य फायदा असतो, तो खेळाडूच्या प्रत्यक्ष सहभागाचा, जो चित्रपटात अजून तरी येऊ शकत नाही. आणि जर चित्रपट इन्टरअॅक्टिव्हिटी आणू शकत नसेल तर निदान त्याने वैचारिक मतप्रदर्शन करणं किंवा पटकथा अधिक चांगल्या रीतीने फुलवत नेणं अपेक्षित आहे, जे करण्यात ‘बॅटल’ कमी पडतो.
खरं तर ‘बॅटल’ पुढे एक उत्तम प्रेरणास्थान असू शकलं असतं. रॉबर्ट ए. हाइनलिन यांची ‘स्टारशिप ट्रूपर्स’ कादंबरी ही या प्रकारच्या मानव-परग्रहवासी युद्धाचा आधार घेणारी, वरकरणी सायन्स फिक्शन, पण मुळात युद्धविषयक तत्त्वचिंतनात्मक आशय मांडणारी होती. त्या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा पॉल वेरोवन दिग्दर्शित चित्रपट कीटकांसारख्या परग्रहवासीयांना चित्रित करणारा; परंतु दुसऱ्या महायुद्धाकडे निर्देश करणारा उत्तम युद्धपट होता. ‘रायन’च्या एकच वर्ष आधी पडद्यावर आलेल्या या चित्रपटाकडून ‘बॅटल’ काही शिकला असता, तर तो केवळ थरारक अनुभवापलीकडे जाऊन काही भाष्यकर्ता युद्धपट होऊ शकला असता. मात्र त्याऐवजी तो प्रेरणा घेतो ती ‘इन्डिपेन्डन्स डे’ (१९९६) सारख्या केवळ रंजनप्रधान चित्रपटाच्या पटकथेवरून. जिचा भर आशयापेक्षा सुखान्त शेवटावर आणि खोटय़ा वीरश्रीवर आहे. परिणामी त्याचा उत्तरार्ध हा योगायोग आणि अमेरिकन नायकांचा अंतिम विजय या भाबडय़ा स्वप्नरंजनात्मक वाटेने जातो अन् फार काही हाती लागत नाही. तरीदेखील आपल्या दृश्यात्मकतेतून तो करत असलेली कामगिरी ही दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाही.
प्रश्न हा आहे, की पुढे काय? चित्रपट हे नेहमीच दृश्य आणि विचार या दोन डगरींवर पाय ठेवून चालत आलेले आहेत. जेव्हा पारडं एका बाजूने जड व्हायला लागतं, तेव्हा दुसऱ्या बाजूने हलकं. प्रभावी सादरीकरण हे प्रेक्षकांना अशा प्रकारे दृश्यात अडकवू पाहतं, की त्यांची अपेक्षा दृश्यापलीकडे जाणार नाही. हे स्वतंत्र चित्रपटांपुरतं चालून जाणारं असलं, तरी या प्रकारची लाट ही या माध्यमाला मारक ठरू शकते, कारण दृश्य-भाग हा कलेचं तात्पुरतं आकर्षण ठरला, तरी तिचा पुढला मार्ग दाखवतो तो विचार. ‘बॅटल’चं यश वा अपयश हे केवळ युद्धपटासाठी नव्हे, तर एकूण चित्रपटांसाठी कोणता कौल देतं, हे निरीक्षण करण्याजोगं आहे.
-गणेश मतकरी (लोकसत्तामधून)

Read more...

मॅन बाईट्स डॉग- एका खुन्याची गोष्ट

>> Monday, March 7, 2011

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर धक्कादायक बातमीपत्रात एका भुरट्या चोराचा मृत्यू दाखवला गेला, चवताळलेल्या जमावाच्या हातून घडलेला. आश्चर्य म्हणजे ही घटना मीडियाने उत्तम रितीने चित्रित केली होती. हे चित्रण होऊ शकलं म्हणजे ही चॅनलवाली मंडळी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होती. मात्र त्यांनी हा प्रकार थांबविण्याचा काही प्रयत्न केलेला दिसला नाही. नंतर काही पोलिसांच्या मुलाखतीही या संदर्भात (अर्थात प्रतिस्पर्धी चॅनलवर) दाखविण्यात आल्या, ज्यात हा आश्चर्याचा सुरच पुढे आवळण्यात आला होता.
मीडियाची जबाबदारी- बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याची, हे मान्य. पण हा त्रयस्थपणा कितपत योग्य? हा एक प्रकारचा गुन्ह्यातला सहभागच नाही का ? सध्या टीव्ही चॅनल्समुळे बातमीपत्रांची जी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे, त्यामुळे मीडियाची भूमिका ही वेळोवेळी शंकास्पद ठराय़ला लागलेली आहे. आपल्याला आता पडायला लागलेला हा प्रश्न याआधी जगभरातल्या अनेकांना पडला असल्यास नवल नाही. बेल्जियममधला चित्रपट `मॅन बाईट्स डॉग` (१९९२) हा या प्रश्नाला वाचा फोडण्याचाच एक प्रयत्न आहे.
 `मॅन बाईट्स डॉग`  ही एक मॉक्युमेन्टरी आहे. म्हणजे दुस-या शब्दात सांगायचं तर बनावट डॉक्युमेन्टरी. दिग्दर्शक रेमी बेल्वॉच्या नेतृत्त्वाखाली चार स्टुडन्ट फिल्म मेकर्सनी केलेला हा प्रयोग आहे. काही खास कामगिरी बजावलेल्या असामान्य व्यक्तींपासून ते सामान्यजनांपैकी कोणीही माहितीपटाचा संभाव्य विषय असल्याने या विभागात एरवीच चिकार विविधता पाहायला मिळते. असं असूनही इथल्या नायकासारखी व्यक्ती क्वचितच माहितीपटात वापरली गेली असेल. बेनॉईट (बेनॉईट पोलवूर्दे) हा `मॅन बाईट्स डॉग` चा नायक. एरवी वागायला वाईट माणूस नाही. त्याच्या पालकांचं तर त्याच्याबद्दल उत्तमच मत आहे, पण तसा तो इतरांनाही फार उपद्रवी वाटत नाही. त्याला मित्र-मैत्रिणी आहेत, कला-साहित्याची त्याला आवड आहे, तो पियानो उत्तम वाजवतो. मात्र तो माहितीपटाचा विषय होण्याचं कारण म्हणजे तो खुनी आहे. एखाददुसरा नाही तर त्याने अनेक खून केले आहेत. त्यातून थोडेफार पैसे त्याला जरूर मिळतात. पण प्रामुख्याने ही त्याची आवड आहे. या विषयाचा त्याचा अभ्यासही दांडगा आहे. आपल्या बळींकडे एक नजर टाकून तो सांगू शकतो की, त्यांनी मौल्यवान चीजवस्तू कुठे लपवली असेल. म्हाता-यांपासून लहान मुलांपर्यंत सर्व वयाची प्रेतं बुडवायला त्यांना किती वजन बांधावं लागतं हेही त्याला तोंडपाठ आहे. तो फारसा भावनेच्या आहारी जात नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचं वेगळं तत्त्वज्ञान आहे. अर्थातच त्याच्या बाजूने पाहणारं, पण म्हणून काय झालं?
बेनॉईटवर माहितीपट करणारा चमू हा सुरूवातीला पूर्णपणे त्रयस्थ (?) आहे. वाघाने केलेली हरणाची शिकार नॅशनल जॉग्रफीकचे लोक जितक्या निर्विकारपणे चित्रित करतात तितक्याच निर्विकारपणे ते बेनॉईटचे उद्योग टिपतात. मात्र पुढेपुढे हा सहभाग वाढत जातो. एखादं वजनदार प्रेत उचलायला हात लावणं काय, गुन्ह्याचा साक्षीदार ठरलेल्या मुलाला पकडायला बेनॉईटला मदत करणं काय किंवा मग अधिक प्रत्यक्ष भागीदारी... शेवटी मर्यादा ही नक्की कुठे घालायची?
एकदा का तुमचा पाय घसरला की तो घसरतच जायचा!  मीडियाची चमत्कृतीची आवड, त्यांच्या दृष्टिकोनाची संदिग्धता आणि भूमिकेमागचा प्रामाणिकपणा या सगळ्यांवर मॅन बाईट्स डॉग यथेच्छ टीका करतो, त्यातला बोचरा विनोद हा ब-याच मुद्दयांना सहजपणे स्पर्श करून जातो.
विषयासाठी हाय कॉन्सेप्ट असलेला हा चित्रपट बघायला मात्र सोपा अजिबात नाही. ब्लॅक अँन्ड व्हाईट चित्रिकरण, मुलाखती आणि कॅमेरामागचे संवाद यांनी माहितीपटाचा बाज पूर्णतः शाबूत राहतो अन् त्यामुळे बेनॉईटच्या कारवाया अधिक भयंकर वाटतात. त्यातून चित्रपट काहीच लपवत नाही. खून (अनेक), बलात्कार यासारख्या घटना तर तो दाखवतोच, वर त्याही कलात्मक वैगैरे न करता उघड्यावाघड्या तपशीलात. बळींच्या हत्यांचे प्रकार, त्यांच्या वयातील विविधता आणि बेनॉईटचं सततचं समालोचन अनेकदा अंगावर येतं. प्रसंग अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून किळसवाणे होतात. हे असं असण्याला एक सोपं स्पष्टीकरण आहे. मुळात हा विषय निवडला गेला तो चित्रणासाठी. स्वस्त आणि चर्चा होऊ शकेल, वादग्रस्त झाल्याने प्रसिद्धी मिळेल आणि भडकपणासाठीच प्रेक्षकवर्ग मिळेल या अपेक्षेने. त्यामुळे त्याची या प्रकारची दृश्ययोजना ही गृहीतच धरली आहे. मात्र त्यामुळे आशयाबद्दलही सहानुभूती असूनही तो सर्वांना पाहता येईल, असं म्हणता येणार नाही.
शेवटी चित्रपटाबद्दल आणखी एक प्रश्न. गुन्हेगार अन् त्याला अप्रत्यक्षपणे साथ देणारा मीडियावर्ग यावर चित्रकर्त्यांचा रोख संपत असेल का? मला स्वतःला तसं वाटत नाही. अखेर मीडिया जर तडजोडी करत असेल, तर त्या कोणासाठी? तर प्रेक्षकांसाठी. म्हणजे जर दाखविणारे गुन्हेगार तर पाहणारेही (अप्रत्यक्षच पण तरीही) गुन्हेगारच. मग त्याच न्यायाने ही अपराधीपणाची भावना  `मॅन बाईट्स डॉग`च्या प्रेक्षकांपर्यंत न्यायला हरकत नाही. कदाचित दृश्यांमध्ये येणारा किळसवाणेपणा आडपडदा न ठेवता दाखविण्यामागे प्रेक्षकांना अस्वस्थ कऱणं अन् आपण जे पाहतो आहोत त्याबद्दल अधिक थेट प्रश्न उभं करणं हे देखील असू शकतं. असे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्याला चटकन सापडणार नाहीत.
-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP