'द डर्टी पिक्चर'- विद्या बालन आणि करमणूकीचा अट्टाहास

>> Sunday, December 4, 2011

सामान्यत: मी अभिनयाविषयी लिहीण्याचं टाळतो. एकतर ब-याच अंशी अभिनय हा 'what you see is what you get 'या प्रकारचा असतो आणि त्यावर खूप लिहीलं जातं. सर्वसाधारण प्रेक्षक चित्रपटाला गेल्यावर फार विचार न करताही ज्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो त्यातलीच ही एक गोष्टं असते. चांगल्या भूमिकेत अभिनयाचा कस लागतो, हे तर खरच. पण काही अनपेक्षित गेम चेन्जिंग परफॉरमन्स सोडले तर त्यावर फार काही लिहिण्याची मला गरज वाटत नाही. विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर'मधला अभिनय तिचं आजवरचं काम आणि क्षमता पाहाता अनपेक्षित नक्कीच नाही, मात्र गेम चेंजिंग जरुर आहे.
'परिणीता' या पहील्याच, अन इतर दोन मोठे स्टार्स असूनही हिरॉइनसेन्ट्रीक असलेल्या चित्रपटापासूनच बालनचं नाव झालं हे खरं पण २०१० च्या 'इश्कीया' पासून तिने आपल्या कामाच्या पध्दतीत अन चित्रपटांच्या निवडीत महत्वाचा बदल केल्याचं दिसून येतं.प्रतिमेच्या मर्यादेत राहून हातचा प्रेक्षक टिकवण्याच्या धडपडीत असणा-या ( आमिर खान इन्क्लूडेड) स्टार्सच्या जगात तिने केवळ आपल्याला आव्हानात्मक वाटतील अशाच भूमिका निवडायला सुरुवात केली आहे, मग प्रतिमा टिकली नाही तरी चालेल. स्टार होण्यापेक्षा चांगली अभिनेत्री होणं हे तिला महत्वाचं वाटतं आहे. इश्कीया नंतर तिने ' नो वन किल्ड जेसिका' मधली अनग्लॅमरस आणि राणी मुखर्जी बरोबर विभागली जाणारी भूमिका निवडणं, अन आता डर्टी पिक्चर पाहून हे स्पष्ट होतं. तिचा आगामी चित्रपट 'कहानी' टेरेन्टीनोच्या ' किल-बिल' वर आहे असं म्हणतात. असल्यास ही निवडदेखील त्याच सूत्रात बसवता येईल.
'द डर्टी पिक्चर'मधली भूमिका ही नायिकेचीच असली आणि दुस-या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यावर ब-याच प्रमाणात आधारलेली असली तरी ती स्वीकारणं हे धाडसाचंच काम म्हणावं लागेल. माफक प्रमाणात अंगप्रदर्शन (तेही ग्लॅमरस, सौंदर्याला उठाव देईल अशा प्रकारचं नव्हे) , वजन वाढवून १९८० च्या सुमारास दाक्षिणात्यं चित्रपटात लोकप्रिय असणारे भडक (पण तथाकथित सेक्सी) कपडे घालणं, द्व्यर्थी संवाद हे केवळ तिच्या प्रतिमेशी सुसंगत नाहीत, एवढच नाही ,तर ते तिची दुसरी , चुकीची प्रतिमा तयार करण्याची शक्यता असणारे. त्यात मुळात आयकॉनिक असणा-या सिल्क स्मिथाला ह्यूमनाइज करणंदेखील सोपं नाही.विद्या बालन हे करुन दाखवते. त्यातले धोके पत्करुन, आपल्या आजवरच्या कामातलं सर्वात मोठं आव्हान पेलून दाखवते. केवळ तिच्या कामासाठी 'द डर्टी पिक्चर'पाहाणं हे भाग ठरतं. कारण शेवटी या चित्रपटाची गुणवत्ता ही त्यातल्या प्रमुख अभिनेत्रीच्या तोडीची ठरत नाही.
मला वाटतं चित्रपटाचा प्रमुख दोष हा त्यातच मांडल्या गेलेल्या एका युक्तीवादात दडलेला आहे . चित्रपटातली सिल्क (बालन) , एब्राहम (इम्रान हाश्मी) या आर्टी दिग्दर्शकाला सांगते ,की प्रेक्षक चित्रपटाकडून तीन गोष्टींची अपेक्षा करतात ,' एन्टरटेनमेन्ट,एन्टरटेनमेन्ट आणि एन्टरटेनमेन्ट', अन पुढे एब्राहमदेखील हाच मंत्र इतर कोणाला तरी सांगतो.या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा , मिलन लुथरीयाचा, यावर खूप विश्वास असावा. त्यामुळे चित्रपट उद्योगाची काळी बाजू ,आणि एका अभिनेत्रीचा उदयास्त अशा गंभीर आणि अस्वस्थ करणा-या विषयावरचा हा चित्रपटदेखील सर्व वेळ आपल्या प्रेक्षकाला 'एन्टरटेन' करण्याचा प्रयत्न करतच राहातो.
रुप किंवा अभिनय यातली कुठलीच बाजू हा सिल्क स्मिथाचा स्ट्राँग पॉइंट नव्हता.तिची खासियत होती तिचा निर्भीडपणा आणि यशासाठी काहीही करण्याची तयारी. बिनधास्तपणा आणि अंगप्रदर्शनाची तयारी हा तिने आपला USP बनवला. याने तिला चित्रपट जरुर मिळाले पण फिल्म इंडस्ट्रीने तिचा गैरफायदा घेतला. पडत्या काळात तिने निर्माती होण्याचाही प्रयत्न केला ,जो यशस्वी झाला नाही. नैराश्य, पैशांची चणचण ,व्यसनाचा अतिरेक या सगळ्याच्या अतिरेकातून तिने वयाच्या पस्तिसाव्या वर्षी आत्महत्या केली.हा विषय आणि हे ढोबळ कथासूत्र प्रामाणिकपणे दाखवल्यास पारंपारिक अर्थाने एन्टरटेन करेल हे शक्य नाही आणि त्याची गरजदेखील नाही. प्रेक्षक काही केवळ अंगप्रदर्शन ,विनोद आणि गाणी याकडे आकर्षित होत नाहीत, चांगलं कथानक कितीही गंभीर असलं तरी त्याला बांधून ठेवतच. डर्टी पिक्चर्स मात्र हे मान्य करत नाही. किंबहूना या गोष्टींवर त्याचा इतका भर आहे की त्याला सुजाण ,दर्जा ओळखणारा प्रेक्षक अपेक्षित नसून मूळ सिल्क स्मिथाच्या चित्रपटांचा- गुणवत्तेपेक्षा नेत्रसुखाला प्राधान्य देणारा प्रेक्षकच अपेक्षित आहे की काय अशी शंका यावी.
चित्रपट बायोपिक स्वरुपाचा असला तरी ही चरित्राशी प्रामाणिक , आँथेन्टिक बायॉग्रफी नव्हे. वादांपासून दूर राहाणं, वास्तवापेक्षा सिल्कच्या प्रतिमेला चिकटून राहाणं, अन चित्रपटाला आपल्या वैयक्तिक 'एन्टरटेनमेन्ट'च्या कल्पनांप्रमाणे वळवणं ,या गोष्टी शक्य व्हाव्यात म्हणून चित्रपट स्वत:ला फिक्शनचं लेबल लावून घेतो आणि तपशिलात फेरफार करण्यासाठी मोकळा होतो . चित्रपट , आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर आधारुन दोन किंवा तीन भागात विभागलेला आहे. उत्कर्ष आणि अधोगती असं पाहील्यास दोन किंवा प्रेमप्रकरणांच्या हिशेबाने तीन. मात्रं या तीनही प्रकरणांना ,का कोण जाणे ,पण एकाच माणसाचं निवेदन आहे. सिल्कशी लव्ह-हेट रिलेशनशिप असणा-या एब्राहमचं. का ,ते माहित नाही.चित्रपटाचा पाउण भाग एब्राहम तिचा दुस्वास करतो आणि तिच्या पडत्या काळात एकदम तिच्या प्रेमात पडतो. म्हणजे हा माणूस तिच्या जवळचा नाही. तिच्या व्यक्तिगत आयुष्याचे सारे तपशील त्याला माहीत असण्याचं कारण नाही. शेवटाकडे एका प्रसंगात त्यांच्या गप्पा होतात, पण त्या इतक्या तपशिलात जातीलसं वाटत नाही. शिवाय निवेदनातल्या नकारात्मक छटा प्रसंगात दिसत नाहीत.संहीता एका माणसाचा दृष्टीकोन न मांडता ,गोष्टं त्रयस्थपणेच मा़डते.  गावाकडून पळून आलेली सिल्क एका बोल्ड नृत्याचा आधार घेउन फिल्म इंडस्ट्रीमधे शिरकाव करते आणि लवकरच सूर्यकांत (नासीर) या वाढत्या वयाला  जुमानता तरुणांच्या भूमिका करणा-या नायकाच्या प्रेमात पडते. सूर्यकांत तिला इतर कामं मिळवून देतो, पण मोबदल्यात स्वत:चा खूप फायदा करुन घेतो.त्याच्याशी असणा-या संबंधातून भ्रमनिरास झाल्यावर सिल्क त्याच्या भावाच्या , रमाकांतच्या( तुषार) प्रेमात पडते, पण तिथेही तिच्या पदरी निराशाच येणार असते.
चित्रपटाचा बराच भाग चित्रपटसृष्टीची उणीदुणी काढण्यात जाताे मात्र ही उणीदुणी वरवरची , रोजचा पेपर वाचणा-या कोणालाही माहीत असतील अशा प्रकारची आहेत. कास्टींग काउच, भानगडी, लॉबीइंग यात नवीन काय आहे? झोया अख्तरने आपल्या 'लक बाय चान्स' मधली भ्रष्ट चित्रसृष्टी मांडताना दाखवलेली इनसाइट इथे पाहायला मिळत नाही. नाही म्हणायला एक निरीक्षण मात्र इन्टरेस्टींग आहे. डान्सर सिल्कची कामं जावीत म्हणून सूर्यकांत एका नव्या ट्रेन्डची कल्पना मांडतो, ज्यानुसार डान्सरकडून अपेक्षित सा-या गोष्टी नायिकेनेच कराव्यात , म्हणजे डान्सरची गरजच उरणार नाही.हा ट्रेन्ड चित्रपटात आला, हे तर खरच. किंबहुना डर्टी पिक्चर देखिल या ट्रेन्डचाच एक भाग म्हणावा लागेल.
काही अतिशय परिणामकारक प्रसंग असूनही , चित्रपटाचा उत्तरार्ध विस्कळीत होतो , तो सिल्कच्या अस्ताचा आलेख नीट नं मांडल्याने. करमणुक प्राधान्यामुळे हा भाग लांबणीवर टाकला जातो. परिणामी तो अचानक सुरु होतो, आणि त्रोटक होतो. तरीही यातल्या काही प्रसंगात बालन या शापित नायिकेचा आत्मा इतका अचूक पकडते , की आपण चित्रपटाचा करमणुकीचा अट्टाहास विसरतो.सिल्कच्या दु:खाशी समरस होतो. अखेर चित्रपटाला सावरतात ते हेच प्रसंग. त्यातलं दाक्षिणात्य चित्रपटांचं विडम्बन नाही, अश्लील वेषभूषा नाही किंवा गाणी नाहीत. या गोष्टी प्रेक्षकाला चित्रपटगृहापर्यंत खेचू शकतात . तिथून आपण काय परत न्यायचं ,हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
- गणेश मतकरी 

11 comments:

Vivek Kulkarni December 4, 2011 at 10:59 PM  

चित्रपटाचा सूर नेमका कशासाठी आहे याचा मला पत्ताच लागत नव्हता. एका प्रसंगात ती आपल्या चेन्नई मधल्या अम्माला म्हणते की तिला सुर्याकांताच्या बायकोशी काही देणं घेणं नाही लगेच पुढच्या प्रसंगात ती आणि तो फार्म हाउसवर असतात तेव्हा त्याची बायको येते आणि ती बाथरूममध्ये रात्रभर रडते. मला या मागचा लॉजिक नाही कळला.
चित्रपट ई. एम. फोरस्तेरणे लिहिल्या प्रमाणे खूप सारे सपाट करक्तेर्स वापरतो फक्त सिल्कचा अपवाद सोडला तर, हि बाब रोक्सतारला सुद्धा लागू आहे. तिथे तर मुख्य हिरोईनच सपाट या सदरात मोडते. त्यामुळे तुम्ही म्हणाल्या प्रमाणे स्क्रिप्टचा पुनर्लेखन करून त्यातील दोष काढणे गरजेचे आहे आणि हि बाब प्रोडूसिर्स, लेखकांना कोण सांगणार. हे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्या सारखं आहे.

अमित दत्तात्रय गुहागरकर December 5, 2011 at 3:08 AM  

नसीर आणि विद्यासाठी पाहणारेय हा सिनेमा. मस्त लेख. एक सुचना करतोय, फॉन्ट थोडा मोठा कराल का?

ganesh December 5, 2011 at 6:43 AM  

विवेक, त्याहून चपखल phrase म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करण्याचा प्रयत्नं केल्यासारख़ ! अमित, font seems ok on my screen. मी इतर काही जणाना पण विचारलं. कदाचित individual setting चा issue असेल.

Gp December 5, 2011 at 7:34 AM  

पिक्चर काही गोष्टींवर मार्मिक भाष्य करतो... तत्कालीन चित्रपटातील नाटकी संवाद, नायकाची प्रतिमा, 'डर्टी' सिल्कच प्रसिद्ध होण आणि नंतर अपरिहार्यपणे तिची झालेली आणि केली गेलेली घसरण.. दिग्दर्शकाला चित्रपटाची नस अजून व्यवस्थित पकडता आली असती. चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालवा याकडे लक्ष पुरवलेल असल्याने कदाचित तसे झाले असावे.. मात्र, विद्या बालन आणि नसीर यांचा अभिनय अपेक्षेप्रमाणे उत्तम झाला आहे हे खरचं !

ganesh December 5, 2011 at 7:54 AM  

gaurav, all the film industry background is made of cliches and there is nothing new. also,its mostly used to make fun of the industry and the seriousness is not felt. i believe that luck by chance, khoya khoya chand and om shanti om are far better in terms of industry backdrop than this one. this one is fairly ok . even in terms of acting ,i liked balan far better than all the three heroes. even Nasir. he is visibly uncomfortable playing the character.

prashant bhat December 5, 2011 at 11:41 AM  

tuza blog vachun kamit kami Vidya Balan sathi tari ha chitrapat baghin... chaan lihila aahes :)

mynac December 5, 2011 at 9:03 PM  

विवेक,
"मला या मागचा लॉजिक नाही कळला. " हे म्हणण किंवा तसं वाटण अगदी स्वाभाविक आहे कारण खरी स्मिता हि होतीच त्या प्रकारात मोडणारी.तिची पार्श्वभूमी नि शिक्षणाचे मान पाहता नि तिला लहान वयात मिळालेल्या यशाने,नावा मुळे त्याचा डोक्यात गेलेला माज हे लक्षात घेता तिचे हे असे अनाकलनीय वर्तन त्या काळी फार मोठे आश्चर्य नव्हते.उलट ती तिची एक खासियत बनली होती.दिग्दर्शकाला ते नीटसे दाखविता आले नसेल हा तिचा दोष नाही, पण ८० च्या दशकात दक्षिणेतील स्मिताचे खुपसे सिनेमे त्या काळी ह्या प्रकारचे हॉट सिनेमे हिंदी व मराठीत नसल्याने मॅटिनीला पुण्यात अगदी सदाशिव पेठेतील विजय थियेटरला सुद्धा,२-४ आठवडे त्या सिनेमाची भाषा कळो कि न वळो बऱ्याचदा फक्त तिच्या मुळे हाउसफुल्ल जायचे कि अगदी त्याच्या तिकिटांचा ब्लॅक होण्या पर्यंत,आणि त्या मुळेच अगदी इकडच्या सिनेमॅगेझीन मध्ये सुद्धा तिच्या ह्या नि अशा प्रकारच्या सुरस नि चमत्कारिक बातम्या असत.
गणेश,
ह्या सिनेमा बद्दल आता पर्यंत खूप ठिकाणी वाचले पण आता मात्र हे नवे सिल्क दुकानात जाऊन पहिलेच पाहिजे..."वरीज्न्ल" सिल्कचा सुळसुळीत पोत ह्या सिल्क मध्ये कदाचित ...नव्हे नसेलच :) पण तेवढीच दुधाची तहान ताकावर.

Vivek Kulkarni December 6, 2011 at 9:39 PM  

mynac,
तुम्ही आधी चित्रपट बघा मग तुमच्या लक्षात येईल कि चित्रपटात तर्कशास्त्राला अजिबात जागा नाही. त्यामुळे ती जेव्हा रडते तेव्हा ते पटत नाही. हा सरळ सरळ प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत आहे. तसेच हा चित्रपट काही मूळ सिल्कच्या आयुष्यावर प्रकाश टाकत नाही तर फक्त एक कथानक म्हणून तिच्या आयुष्याचा वापर करतो आणि एक तद्दन हिंदी मसाला व्यावसायिक चित्रपट दाखवतो जो कि इंटर्वल नंतर प्रचंड बोर होतो.

ganesh December 7, 2011 at 6:24 PM  

Myanac and vivek ,both of u have a point. That she was unpredictable goes without saying and was known to do weird things. Still ,the film does not portray her acting totally beyond logic. That being apart , mynac , the film ultimately is a fiction and you should see the film before deciding if vivek has a point.

Thanks amit.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP