`हाय नून` - वेस्टर्न नसणारा `वेस्टर्न`

>> Sunday, December 25, 2011

अमेरिकन चित्रपटांत आढळणा-या चित्रप्रकारात अतिशय लोकप्रिय असलेला, जगभर पाहिला जाणारा अन् अनेक देशांच्या चित्रपटांवर प्रभाव टाकणारा चित्रप्रकार म्हणून  `वेस्टर्न`चं नाव घेता येईल. शहरीकरणाच्या आधी अस्तित्त्वात असणारी जुन्या अमेरिकन वेस्टमधली खेडी, त्यांच्या दुतर्फा पसरलेला वाळवंटी प्रदेश याच्या पार्श्वभूमीवर घडणा-या, भल्याबु-यामधल्या अत्यंतू मूलभूत संघर्षाभोवती आकाराला येणा-या, साध्या पण नाट्यपूर्ण साहसकथा वेस्टर्न चित्रपटांमध्ये पाहायला मिळत. रचनेच्या दृष्टीने केलेले प्रयोग हे सहसा वेस्टर्नमधे दिसत नाहीत. प्रवृत्ती सहजपणे उठून दिसणा-या काळ्या पांढ-या व्यक्तिरेखा, पटकन कळण्यासारख्या नायक अन् खलनायक अशा दोनच बाजू, सज्जन नायकाचा विनाशर्त विजय अशी काही नियमितपणे दिसणारी लक्षण असणारे वेस्टर्नस् हे सरळ रेषेत चढत जाणारी पटकथा नित्य मांडताना दिसत. अगदी सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून आकाराला आलेला हा चित्रप्रकार, गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत चांगलाच लोकप्रिय अन् हमखास प्रेक्षकवर्ग असणारा ठरला होता. १९५२च्या `हाय नून`ने मात्र त्याचा वापर एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट सांगण्यासाठी केला. नेहमीच्या वेस्टर्नची अपेक्षा कऱणारे, गॅरी कूपरसारख्या सांकेतिक वेस्टर्नमधे शोभणा-या स्टारच्या भरवशावर आलेले प्रेक्षक गडबडले. त्यांना जो चित्रपट पाहायचा होता, तो हा नव्हता.
वरवर पाहता `हाय नून`चा वेस्टर्नपणा, हा वादातीत आहे, कारण या चित्रप्रकाराशी जोडलेले अनेक संकेत त्यात पाहायला मिळतात. प्रगतीच्या प्रतीक्षेत असणारं छोटेखानी गाव, तिथल्या जनतेचं चोर लुटारूंपासून रक्षण करणारा, कायद्याने चालणारा, आदर्शवादी नायक, नायकाचा बदला घेण्यासाठी येणारा क्रूरकर्मा खलनायक, नायक अन् खलनायकाच्या आमनेसामने होणा-या संघर्षावर येणारा शेवट, पोलीस चौकी, मद्यालय यासारखी परिचित स्थलयोजना अशा अनेक ओळखीच्या जागा घेत हा चित्रपट पुढे जातो. मात्र त्याचा प्रमुख उद्देश हा लोकांना आवडेलसं वेस्टर्न पडद्यावर आणण्याचा नाही, तर ओळखीच्या संकेतामधून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचा आहे.
त्या काळासाठी अन् वेस्टर्नसारख्या अभिजात, भव्य चित्रप्रकारासाठी यापूर्वी वापरली न गेलेली पहिली अन् उघडच लक्षात येणारी गोष्टं म्हणजे चित्रपटाचं `रिअल टाइम` असणं. चित्रपटाचा पंचाऐंशी मिनिटांचा कालावधी कथेतही तितकाच काळ व्यापतो. एका नाट्यपूर्ण संघर्षाशी जोडलेल्या प्रसंगाला तास- सव्वातास उरलेला असताना चित्रपट सुरू होतो, अन् प्रसंगाबरोबरच संपतो.
वेस्टर्नमधे नित्य हजेरी लावणा-या अ‍ॅक्शन प्रसंगांना, साहसदृश्यांना देखील शेवटच्या दहा पंधरा मिनीटातच जागा मिळते, कारण उरलेला पूर्ण चित्रपट हा त्या संघर्षाकडे नेणा-या, प्रामुख्याने संवादी, परंतु निश्चित युक्तीवाद मांडणा-या घटनांनी व्यापला जातो.
प्रत्यक्ष पाहता, इथला लढा आहे, तो गावचा शूर, सुस्वभावी मार्शल विल केन (गॅरी कूपर) आणि जेलमधून सुटून गावात परतणारा माथेफिरू गुन्हेगार फ्रॅन्क मिलर (इआन मॅकडोनल्ड) यांच्या मधला, परंतु चित्रपटाचा दृष्टिकोन संघर्षाचं स्वरूप बदलून टाकतो, आणि लढ्याला नैतिक स्वरूप आणून देतो.
चित्रपटाची सुरुवात होते, ती अशा चित्रपटांमधे नित्य आढळणा-या अन् प्रेक्षकाला चटकन आपली ओळख पटवून देणा-या तीन संशयास्पद व्यक्तिरेखांपासून. ज्या एका निर्जन ठिकाणी भेटतात अन् पुढे गावक-यांना आपला दरारा दाखवत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचतात. हे तिघं वाट पाहात असतात बारा वाजता स्टेशनवर अपेक्षित असलेल्या ट्रेनची, ज्यातून त्यांचा जुना सहकारी फ्रॅन्क मिलर परतेल.
मिलरच्या अनपेक्षित आगमनाची खबर नुकत्याच लग्न झालेल्या केनपर्यंत पोहोचते, अन् आपल्या नववधूच्या, एमिच्या (ग्रेस केली) मताची पर्वा न करता, तो मिलरशी सामना देण्याचं ठरवतो. खरं तर लग्नाबरोबरच निवृत्ती स्वीकारलेल्या, मार्शलला पुन्हा ही जबाबदारी स्वीकारण्याची सक्ती नसते, मात्र तो ही आपली जबाबदारी मानतो. गावक-यांनी मदत केली, तर मिलरचा बंदोबस्त करणं काही कठीण नसतं, पण आत्तापर्यंत केनला मित्र म्हणवणारे अन् त्याच्या कारकीर्दीचं कौतुक करणारे गावकरी केनच्या (खरं तर केन हा गावाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्या स्वतःच्याच) मदतीला येणं नाकारतात, आणि केन एकटा पडतो. प्रत्यक्ष मिलरची गाडी स्टेशनात येईपर्यंत उलगडत जाणारा चित्रपट हा केनची द्विधा मनःस्थिती अन् आपल्या माणसांकडून होणारा विश्वासघात यावर बेतलेला आहे. यात केनची बाजू, त्याच्या विरोधात अन् क्वचित बाजूने मांडले जाणारे युक्तीवाद याला सर्वाधिक महत्व आहे. शेवटी मिलरशी होणारी मारामारी ही नाममात्र आहे. चित्रपटाचा शेवटदेखील नायकाचा विजय अशा अपेक्षित सुखांत शेवटावर संपत नाही, तर मार्शलने आपल्या बिल्ल्याला धुळीत फेकण्यावर होतो. केनचा इथे व्यक्त होणारा उद्वेग हा चित्रपटाच्या आशयाला टोकदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.
`हाय नून` प्रदर्शित होईपर्यंत काळ्या-पांढ-याची सवय असलेल्या प्रेक्षकांना इथल्या ग्रे-शेड्स खटकल्या यात आश्चर्य नाही. ओळखीच्या फॉर्मचं वेगळंच काही सांगण्यासाठी वापरलं जाणं अनेकांना मंजूर झालं नाही. प्रेक्षकांना, तसंच चित्रपटसृष्टीतल्या अनेकांना देखील.
उत्तम वेस्टर्नपटांसाठी ओळखली जाणारी दोन नावं या टीकेत पुढे होती. पहिला होता अभिनेता जॉन वेन, ज्याने प्लेबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत हाय नूनला `अन अमेरिकन` असं संबोधलं, तर दुसरा होता दिग्दर्शक हॉवर्ड हॉक्स, ज्याने `हाय नून`ला उत्तर म्हणून १९५९ मधे `रिओ ब्राव्हो` बनविला. ब्राव्होमधल्या स्टॅन्ड ऑफचा प्रकार हाय नूनच्याच पद्धतीचा, मात्र त्यात नायकाला एकटं पाडलं जात नाही.
एका दृष्टीने पाहायला गेलं, तर हाय नून हा मुळात वेस्टर्न चित्रपटच नाही. तो विशिष्ट पार्श्वभूमी वापरत असला, तरी त्याचा आशय अधिक गुंतागुंतीचा आहे, त्याची शैली संवादाना अँक्शनहून अधिक प्राधान्य देणारी आहे. आपला आशय पोहोचविण्याची त्यांची पद्धत स्पष्ट, अन् खरोखरीच एखाद्या युक्तीवादासारखी आहे. उदाहरणार्थ केन जेव्हा गाव सोडून जायचं नाकारतो, तेव्हा तो आपल्या अशा वागण्याचं मुद्देसूद उत्तर एमीला देतो. पुढे जेव्हा गावकरी त्याला मदत नाकारतात, तेव्हाही ते आपली बाजू विविध प्रकारे सिद्ध करतात.
केनची बाजू वरवर बरोबर असली, तरी अंतिमतः त्याचं वागणं गावाच्या अन् गावक-यांच्या हीताचं नाही, असं गावक-यांचं म्हणणं. ते एखाद्या प्रसंगात ढोबळ कारणं मांडून आपटता येणं शक्य होतं, पण इथे या प्रश्नाचा तपशीलात विचार होतो. व्यापार, कायदा, धर्म आणि समाज या सा-यांची साक्ष विविध प्रसंगात काढली जाते, अन् केनला दर प्रसंगी निरुत्तर केलं जातं. चित्रपटाच्या दृष्टीने केनचं वागणं योग्य आहे, कारण तो आपलं वागणं नैतिक बाजूने पाहून आपल्या मनाला पटेल तो निर्णय घेतो. इतर लोक केवळ आपला स्वार्थ, तोही तत्कालिन स्वरूपाचा स्वार्थ पाहातात. आपल्या वागण्याचे पुढे होणारे दुष्परिणाम त्यांना दिसत नाहीत. त्यांची हीच चूक चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न करतो.
दिग्दर्शक फ्रेड झिनमन आणि `हाय नून`चा अजेंडा हा काहीसा राजकीय असल्याचं मानलं जातं, अन् ते काही खोटं नाही. सिनेटर जो मॅकार्थींच्या काळात योग्य त्या पुराव्याशिवाय अनेक अमेरिकन नागरिकांवर कम्युनिस्ट असल्याचा आळ आणला गेला, अन् त्यांना एकटं पाडून चौकशी केली गेली. मित्रांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडण्यात आलं. हॉलीवूडमधेही अनेकांना अन अमेरिकन गोष्टीत गुंतल्याच्या सबबीवरून ब्लॅकलिस्ट केलं गेलं. हाय नून चा रोख हा स्वार्थाच्या राजकारणावर आहे, जे माणसाची किंमत, मूल्य,नीतीमत्ता न जाणता केवळ वैयक्तिक फायद्यासाठी दुस-याला अडचणीत आणायला कमी करीत नाही.
हाय नूनला गॅरी कूपरसह चार ऑस्कर पारितोषिकं मिळाली आणि कालांतराने प्रेक्षकांनाही त्याची खरी किंमत कळायला लागली. राजकीय प्रतिष्ठाही त्याने मिळविली, कारण अनेक राष्ट्राध्यक्षांचा आवडता, अन् व्हाईट हाऊसमध्ये सर्वाधिक वेळा दाखविण्यात आलेला चित्रपट ही आज त्याची दुसरी ओळख आहे. माझ्या दृष्टीने मात्र त्याला सर्वाधिक श्रेय द्यायला हवं, ते त्याच्या संकेताच्या चौकटीत न अडकणा-या विचारासाठी. त्याचं फॉर्मची लवचिकता ओळखणं, हे पुढे येणा-या दिग्दर्शकांना प्रेरणादायी ठरलं असेल यात शंका नाही.
- गणेश मतकरी 

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP