रेजरेक्टिंग बाँड
>> Sunday, November 11, 2012
’एव्हरीवन नीड्स ए हॉबी’ , ’सो व्हॉट्स युअर्स ?’
’रेजरेक्शन’
जेम्स बाँड आणि राउल सिल्वा , स्कायफॉल
जेम्स बाँड आपला पुनरुज्जीवनाचा छंद ’स्कायफॉल’मधे मोकळेपणाने
मान्य करत असला ,तरी त्याच्या
कारवायांवर नजर ठेवणा-या चाणाक्ष प्रेक्षकांना तो पूर्वीपासूनच परिचित आहे. ’डॉ.नो’
(१९६२) ते ’स्कायफाॅल’ (२०१२)या आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ही किमया
किमान तीन वेळा करुन दाखवली आहे. इयान फ्लेमिंगच्या
कादंबरीतल्या व्यक्तिरेखेवर आधारून शाॅन कॉनरीने ’डॉ, नो’ चित्रपटात
मुळात उभा केलेला बाँड हा लोकप्रिय झाला खरा पण या नायकाचं त्याच प्रकारचं चित्रण एवढ्या
मोठ्या कालावधीवर पसरलेल्या ,पाच अभिनेत्यांना प्रमुख भूमिकेत
आणणा-या तेवीस चित्रपटांमधे प्रेक्षकांनी सारख्याच उत्साहाने पाहिलं असतं अशी शक्यता
नाही. काळ ,पिढी ,बदलती विचार सरणी,आंतरराष्टीय राजकारणातले बदल, या सगळ्याचा विचार करुन
ही व्यक्तिरेखा अपडेट करत राहाणं आवश्यक होतं आणि तशी ती करण्यातही आली. कॉनरीच्या
टफ गाय प्रतिमेच्या तुलनेत रॉजर मूरचा बाँड अधिक नाजूक आणि स्टायलिश होता तर ब्रोस्नॅन
अधिक पोलिटिकली करेक्ट होता.ब्रोस्नॅनच्या चित्रपटांमधे नायिका आणि ’एम’ सारख्या तोवर
दुय्यम असणा-या व्यक्तिरेखांना अधिक वाव दिला जायला लागला होता. किंबहुना ब्रोस्नॅन
आला तेव्हा याहून काही बदल या व्यक्तिरेखेत आणि चित्रपटांत संभवेल असं वाटलच नव्हतं.
पण ’कसिनो रोयाल ’मधे डॅनिएल क्रेग चा प्रवेश झाला आणि सारी गणितंच बदलली.
क्रेगने साकारलेला बाँड आणि तो असणारे चित्रपट याबद्दल
बाँडच्या चाहात्यांमधे टोकाचे मतभेद संभवतात.बाँडच्या जुन्या चाहत्यांसाठी ही व्यक्तिरेखा
जवळजवळ सुपरहीरो आहे. तो कोणालाही न घाबरता कितीही मोठ्या खलनायकाशी सामना करु शकतो.
त्याच्याकडे अद्ययावत यांत्रिक चमत्कृतींचं भांडार आहे. तो हसत हसत कोणत्याही मुलीला
फशी पाडू शकतो. त्याच्या गाड्या,त्याची मार्टिनी (शेकन ,नॉट स्टर्ड) ,त्याचा सेक्सिस्ट विनोद या सा-याचं त्याच्याभोवती एक वलय होतं ,जे त्याच्या आजवरच्या दरेक अवतारात थोड्या बहुत प्रमाणात टिकून राहिलं होतं.मार्टिन
कँपबेल दिग्दर्शित क्रेगच्या पहिल्या चित्रपटानेच हे वलय तोडून टाकलं आणि एक नव्या
अवतारातला नायक उभा केला. हा नवा बाँड कॉनरीच्या ढाच्यातला पण अधिक खरा होता. त्याचा
सुपरहिरोपणा गायब होता, धाडसं वृत्तपत्रातल्या बातम्यांशी अधिक
सुसंगत होती, सुंदर मुलींपेक्षा हातातल्या कामगिरीवर त्याचं अधिक
लक्ष होतं. क्रिस्टफर नोलनने ज्याप्रकारे बॅटमॅनला अधिक वास्तव पार्श्वभूमी देत डार्क
नाईट मालिका नव्याने रचली, काहीसा त्याच प्रकारचा प्रयत्न नव्या
बाँडपटांनीही केला. मात्र दिग्दर्शक बदलत. सॅम मेन्डिस दिग्दर्शित स्कायफॉल हा क्रेगचा
तिसरा बाँड आजवरच्या सर्व बाँडपटात सर्वात वेगळा आहे ,तोदेखील
अगदी मूलभूत पातळीवर.
फ्रँचाईज चित्रपटांना मुळात ते चित्रपट काय प्रकारे हाताळले
जाउ शकतात याची एक मर्यादा असते, काही अलिखित नियम असतात. या मालिकांचा प्रेक्षकवर्ग ठरुन गेलेला असल्याने
,या नियमांत केलेला कोणताही बदल चित्रपटाला महागात पडू शकतो. उदाहरणार्थ
’कॅरी आँन’ मालिकेने अचानक द्वयर्थी विनोद करणं सोडलं असतं ,किंवा
’ट्वायलाइट’ ने आपला सुडोरोमँटिसिझम सोडून निव्वळ भयपट करायचं ठरवलं असतं तर त्यांचा ठरलेला प्रेक्षक त्यांना मिळणं कठीण
झालं असतं. त्यामुळे कितीही वेगळा प्रयत्न केला तरी काही गोष्टी जशाच्या तशा ठेवणं
या मालिकांना भाग असतं. ’स्कायफॉल’ बाँडपटांसाठी ही मर्यादा नेमकी कुठपर्यंत खेचता
येईल हे पाहातो आणि शक्य तितका नवा दृष्टिकोन या चित्रपटांना द्यायचा प्रयत्न करतो.
अमेरिकन ब्युटी, रोड टु पर्डीशन, रेव्होल्यूशनरी
रोड असे मेन्डिसचे आजवरचे चित्रपट पाहिले तर तो जे करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं आश्चर्य
वाटू नये.बाँडपट फॉर्म्युलातून मुक्त व्हावेत आणि त्यांना केवळ एका विशिष्ट लेबलाखाली
न अडकवता अधिक विस्तृत प्रेक्षक उपलब्ध व्हावा यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न
आहे. मात्र हे करताना बाँडच्या सर्व चाहात्यांना विसरून जाणं ही मोठी व्यावसायिक चूक
ठरेल.मग हे करायचं कसं ,तर मुळात बाँडपटाचं सत्व कशात आहे ते
शोधून. आणि हे शोधताना जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेची व्याख्या नव्याने करता येते का
हे पाहून. ’स्कायफॉल’ यासाठी मागे मागे जायचं ठरवतो. या व्यक्तिरेखेच्या मुळाशी
,तिच्या भूतकाळात , आणि या चित्रपट मालिकेच्याही.
हे मागे जाणं आणि मूळ ढाचा वापरून व्यक्तीरेखा नव्याने
घडवणं हे दोन्ही पटकथेत स्पष्ट आहे आणि वेळोवेळी पात्रांच्या तोंडून वा प्रसंगांमधून
ते सुचवलं जातं.याची सुरूवातंच होते ,ती श्रेयनामावलीआधी अपेक्षेप्रमाणे घडणा-या विविधं वाहनं आणि हत्यारं वापरात
आणणा-या लांबलचक पाठलागापासून.या पाठलागाचा धक्कादायक शेवट होतो तो आगगाडीच्या टपावर
मारामारी करत असणारा बाँड गोळी वर्मी लागून खोलवर वाहाणा-या पाण्यात कोसळण्यावर .जेम्स
बाँडच्या मृत्यूवर. अर्थात बाँडफिल्ममधे ,तो स्वत: श्रेयनामावलीआधी
मरणार नाही हे उघड आहे. मात्र त्याचं परागंदा ,जायबंदी असणं
,त्याचा परफेक्ट बाँडपणा त्याच्याकडून हिरावून घेतं. तिनेक महीन्यांनी
एम आय सिक्सला , आणि एम(डेम जुडी डेन्च)लादेखील संकटात सापडलेलं
पाहून परत ड्यूटीवर हजर झालेल्या बाँडला आपल्यात पूर्वीची धमक न राहिल्याचं लक्षात
येतं आणि चित्रपटाचा सूर बदलतो. यापुढे चित्रपट अनेक अपेक्षित जागा घेतो मात्र बाँडच्या बदललेल्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच या जागांचं
स्वरुपही यापुढे बदलणार असल्याचं सादरीकरणात अनपेक्षितपणा आणून सूचित करतो. ’क्यू’
शी होणारी भेट आणि त्याच्याकडून मिळणारी नवनवी तंत्रसामुग्री हा प्रत्येक बाँडपटामधला
खास प्रसंग. इथे पोरगेला आगाऊ क्यू (बेन विशॉ) त्याला एक पिस्तूल आणि छोटा ट्रान्स्मिटर
देऊ करतो आणि वर ’व्हॉट वेअर यू एक्सपेक्टिंग, अॅन एक्स्प्लोडिंग
पेन? ’असं म्हणत बाँडचीच टिंगल करतो. लिफ्टला हिरोसारख्या लटकलेल्या
बाँडच्या हाताला रग लागणं, खलनायकी सिल्वा (हावीएर बारदेम)बरोबरच्या
जुगलबंदीला गे टोन आणणं, मैत्रिणीचा प्राण वाचवतानाही बाँडच्या
हाताची थरथर न थांबणं अशा अनेक ठिकाणी बाँडचं अपरिचित दर्शन घडतं . हे घडवत असताना
दिग्दर्शक एक नवी गोष्ट करतो, ती म्हणजे फोकस अॅक्शनवरून हलवून तो व्यक्तिरेखांवर आणून सोडतो.
बाँडची इतकी साहसं पाहूनही वरवरची ओळख असणारे आपण आता त्याला माणूस म्हणून समजवून घ्यायला
लागतो. फुटकळ प्रेमप्रकरणं आणि सेक्स सीन्स, यंत्रसामुग्री आणि
छानछोकी कमी केल्यावर दिसतं की बाँड या फापटपसार््यापलीकडे कुठेतरी आहे . ती एक वृत्ती
आहे ,जी हा वरवरचा दिखाउपणा काढूनही शाबूत आहे. आता केवळ त्यालाच
नाही, तर या चित्रपटाचा फोकस असणारी एम,खलनायक सिल्वा ,क्यू किंवा मॅलरी सारख्या दुय्यम व्यक्तिरेखा
,या सा-यांना स्वतंत्रपणे वाव मिळतो आणि आजवर एका व्यक्तिरेखेला जोडून
राहिलेलं बाँडपटांचं विश्व रुंदावायला लागतं.
चित्रपटाचं मागे जाणं ,भूतकाळाशी जोडलेलं असणं हे एका परीने सिम्बॉलिक आहे. त्यासाठी
चित्रपट ज्याप्रमाणे वरवरचा दिखाउपणा कमी करत नेऊन मूलभूत प्रवृत्तीला समोर आणण्याची
युक्ती वापरतो ,तसाच तो गोल्डफिंगरमधल्या अँस्टीन मार्टीन गाडीला
पुन्हा हजर करणं किंवा मध्यंतरी बदलत जाणारं लोकप्रिय थीम म्युझिक जसंच्या तसं वापरणं
अशा प्रेक्षकांना रसिक म्हणून जाणवणा-या गोष्टी करतो ,तसाच तो
बाँडच्या व्यक्तीगत आयुष्यातली बालपणीची गोष्ट उघड करुन त्याला आशयाच्या पातळीवरही
मुळाकडे परत नेतो.हा उलटा प्रवास आपल्याला जेम्स बाँडकडे पाहाण्याची एक नवी नजर देतो.
बाँडचं पुनरुज्जीवन पूर्ण करतो.
स्कायफॉल जरी क्रेगचा तिसरा बाँडपट असला आणि क्रेगने
नव्या पध्दतीने बाँड साकारत हे तीनही चित्रपट केले असले तरी मी त्याला चित्रत्रयीच्या
गणितात बसवणार नाही. कारण यामागचा विचार, दृष्टी ,संकल्पना ही आधीच्या भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी
आहे. इथे जर चित्रत्रयी असलीच तर बाँडला सर्वार्थाने रीबूट करणारा हा चित्रपट त्यातला
पहिलाच भाग मानावा लागेल अाणि पुढले भाग तोडीस तोड असतीलशी अपेक्षा करावी लागेल. आणि
त्रयी असो वा नसो , या लोकप्रिय मालिकेची पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी
यासारखा उत्तम चित्रपट मिळणं हे काय कमी आहे ! मालिकेच्या उज्वल भविष्याकडे निर्देश
करणारी ही खूणच मानायला हवी.
गणेश मतकरी
11 comments:
क्रेग बॉन्ड म्हणून आधी अजिबात आवडला नव्हता...मात्र स्कायफॉलमध्ये तो जबरी आवडला....दुर्दैवाने स्कायफॉल हा पन्नास वर्षांच्या बॉन्डपटांच्या रांगेत अजिबात बसत नाही..आणि म्हणून तो चित्रपट म्हणून चांगला असला तरी बॉन्डमुव्ही म्हणून पटला नाही :(
No doubt this bond character is different from previous bonds.
So, many of my friends don't like the movie. Now its interesting to see if there is any triology? If so, then how they make it.
Personal favourite - Batman series.
चित्रपटाचा हा सूर कळला नव्हता. तसेच स्याम मेंडीससारखा ऑस्कर जिंकणारा दिग्दर्शक इतका बाळबोध हाताळणी असणारा चित्रपट का बनवेल असे वाटले होते पण आता त्यातील गंमत लक्षात येतेय. तुम्ही जसं बघितलत तसं बघितलं तर हा चित्रपट कुठल्या कुठे जातो कारण पहिल्या चेज सिक्वेन्स मधे जेव्हा तो मारला जातो तेव्हा वाटलं यांची काहीतरी ट्रिक आहे. तसेच जिथे तिथे बॉंडला सर्वजण हिणवत असतात सुरुवात एमपासून ते मला खटकलं होतं अन थोडा राग पण आला होता.
कसिनो रॉयल या चित्रपटाची समीक्षा करताना तुम्ही म्हणाला होतात की हा चित्रपट म्हणजे बॉण्डचा नवा अध्याय आहे. तो अध्याय असेल तर हा चित्रपट त्यातील पहिली कथा आहे. जेम्स बॉण्ड विल रिटर्न.
चैतन्य आणि दिगम्बर, हा बाँड वेगळा आहे आणि सर्वाना आवडणार नाही हे उघडच आहे आणि I am sure even the filmmakers know this. मुद्दा हाच आहे की जर कोणती गोष्ट टिकायची तर अपडेट होत राहाणं आवश्यक असतं . माझ्या मते ही लागलेली दिशा योग्य आहे. विवेक, एक गोष्ट मी डोक्यात असून लेखात स्पष्ट केली नाही ,ती म्हणजे त्यातला सुरुवातीचा पारंपारिक साहसाच्या शेवटी येणारा बाँडचा मृत्यू प्रतिकात्मक असणं.its almost the end of the typical image of Bond. Things change from there on and the process of ressurection starts. New Bond retains certain qualities of the old Bond but clearly is diffrent.
हो बरोबर आहे तो प्रतीकात्मक आहे पण त्यांचा पूर्वीच्या बॉन्डचे संदर्भ जून्या आठवणींसारखे असल्याप्रमाणे वापरणे हे प्रत्यक्ष पडद्यावर दाखवल्यामुळे यातून तयार झालेलं चमत्कारिक मिश्रण सर्वांनाच न पचणारे झाले. त्यामुळे बर्याच जणांना न आवडण्याचं कारण यात मी पण आलो. तसेच एमची चौकशी चालू असताना तिने शेवटाकडे तिच्या नवर्याची कविता म्हणून दाखवणे अन इंटरकटिंगमधे बोन्डला त्या ठिकाणी येताना दाखवणे हे नव्या बोन्डचा पुनर्जन्म होत असल्याचे दर्शवतो तसेच शेवटी एम मरण्याआधी जेम्सची वाट बघते अन मगच मारते. जेम्स-एमचा आई-मुलाप्रमाणे असणारे नातंही संपुष्टात येतं.
LOL , Vivek, Kavita navryachi nahi, It's Ulysses by Lord Tennyson.
हो मी विसरलो. चित्रपट बघताना ती टेनिसनची आहे हे लक्षात नाही आलं.
12लेख आवडला.
हा बॉंड माझा आवडता आहे.
मात्र मुंबईच्या जागी तुर्कस्थान चे चित्रण पाहायला मिळाले ह्याचा खेद वाटतो.
CHITRAPAT BAGTANACH HE LAKSHAT ALE HOTE KI HA NEHME RAMANE BOND PAT NAHI . LEKA BOND WAL LHILYA BADDAL THANKS .. BOND KHUPACH AWADTO ..
स्कायफॉल पाहीला. मी केवळ ५-७ च बॉन्डपट पाहीलेत. (त्यातही ब्रोसनन आणि क्रेगचेच) नवा बॉन्डपट निश्चित वेगळा आहे. याआधी बॉन्डचा भुतकाळ या मालिकेत दाखवला गेला नसावा.
काहीही असो, मी बॉन्डचा निस्सीम चाहता आहे.
I am a big fan of Daniel Craig's Bond. I loved this movie and after reading the post, I understood why :)
Great post!
Post a Comment