सेफ्टी नॉट गॅरन्टीड- रुपकात्मक कालप्रवास
>> Sunday, November 18, 2012
वॉन्टेड - समवन टु गो बॅक इन टाईम विथ मी. धिस इज नॉट ए जोक. यू'ल गेट पेड आफ्टर वुई गेट बॅक. मस्ट ब्रिंग युअर ओन वेपन्स. सेफ्टी नॉट गॅरन्टीड. आय हॅव ओन्ली डन धिस वन्स बीफोर.
ही ’छोटी जाहिरात’ अर्थातच एखाद्या साय फाय विनोदी कथेचा वा पटकथेचा भाग वाटणं साहजिक आहे ,मात्र खरं सांगायचं तर ती प्रत्यक्ष प्रकाशित झालेली जाहिरात आहे. ब्लॅकवुड होम्स मासिकाच्या १९९७ च्या सप्टेम्बर/आँक्टोबरच्या अंकात ,ती छापली गेली. मासिकाचे संपादक जॉन सिल्वीएरा यांनी ती लिहीली ती विनोद म्हणूनच, पण पुढे या जाहिरातीला कल्ट स्टेटस मिळालं.टॉक शोज, इन्टरनेट ,यांवर ती गाजलीच, वर या वर्षी त्या जाहीरातीलाच संकल्पनेप्रमाणे वापरून आणि तिच्यातल्या एका वाक्याचच नाव देउन केलेला कॉलिन ट्रेवेरो दिग्दर्शित ’सेफ्टी नॉट गॅरन्टीड’ हा चित्रपटदेखील बनवण्यात आला.
मेन स्ट्रीम हॉलीवूडमधे कालप्रवास हा विषय असणारे चित्रपट काही कमी आलेले नाहीत . किंबहुना त्यांच्या ’विज्ञानपट’ या मुळातच लोकप्रिय चित्रप्रकारातला हा एक प्रमुख विषय मानला जाऊ शकतो.त्यातही ’बॅक टू द फ्युचर’ सारख्या चित्रपटांनी विनोदालाही स्थान देउ केलेलं आहे. मात्र ,'सेफ्टी नॉट गॅरन्टीड ' यातल्या कोणत्याही चित्रपटासारखा आहे असं म्हणता येणार नाही. एकतर मुळात तो मेनस्ट्रीम नसून इंडीपेन्डन्ट निर्मिती असल्याने त्याचा फोकस हा नुसत्या करमणुकीवर, अँक्शन वा इफेक्टवर नाही, तर व्यक्तिरेखांवर आहे.प्रायमर किंवा टाइमक्राईम्स सारख्या कमी खर्चात केलेल्या, प्रायोगिक प्रकारच्या टाईम ट्रॅवल चित्रपटांपेक्षाही तो वेगळा आहे कारण तो केवळ प्लॉटींग वा सुडोइन्टलेक्चुअलिझमवर अडकून राहात नाही. त्याच्या मूळाशी एक ,किंवा खरं तर दोन प्रेमकथा आहेत आणि त्या अगदी कोणालाही आवडण्यासारख्या आहेत.
जाहीरातीला आधीच मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ’सेफ्टी नाॅट गॅरन्टीड’ हा चित्रपटाच्या नावात येणारा छोटा संदर्भ ,इथे पूर्ण जाहीरातीकडे आणि पर्यायाने त्यात येणा-या सायन्स फिक्शन आणि विनोद या मिश्रणाकडे निर्देश करण्यासाठी वापरण्यात आला आहे ,कारण शब्दश: घेतल्यास या नावाला इथे फारसा अर्थ नाही. उलट हे नाव मग एखाद्या अँक्शन वा भयपटाला अधिक शोभून दिसेल. पण संदर्भ अपरिहार्य आहे, आणि चित्रपट सुरुवातीलाच ही जाहीरातही दाखवून तो स्पष्टही करतो.
सिअँटल मॅगेझिनसाठी काम करणारा जेफ (जेक जॉन्सन)एका बातमीसाठी ही नुकतीच पेपरात छापून आलेली जाहीरात निवडतो, आणि आपल्याला या कामात मदत व्हावी म्हणून डेरीअस (आँब्री प्लाझा) आणि अर्णव (करण सोनी) या दोन इंटर्न्सची मदत घेतो. ओशन व्ह्यू गावात पोचल्यावर त्यांना कळतं, की जाहिरात देणारा माणूस ,हा एका सुपरमार्केटमधे काम करणारा केनेथ (मार्क डुप्लास) हा विक्षिप्त तरुण आहे आणि त्याची माहिती काढायला सुरुवात होते .लवकरच उघड होतं की जेफने ही बातमी केवळ ओशन व्ह्यूला येण्याकरता निमित्त म्हणून निवडली होती आणि त्याचा खरा अजेन्डा आहे तो लिझ (जेनिका बर्जर)या आपल्या शाळेतल्या मैत्रिणीचा माग काढायचा. जेफ लिझच्या मागे लागतो आणि बातमी मिळवण्याची जबाबदारी डेरीअसवर येउन पडते. ती केनेथशी ओळख तर करुन घेते पण गोष्टी वेगळच वळण घेतात. केनेथची कालप्रवासाची स्वप्न ही वेडाची लक्षणं समजणार््या डेरीअसला त्याचं बोलणं हळूहळू खरं वाटायला लागतं.
चित्रपटातला कालप्रवासाच्या संकल्पनेचा ,नियोजित प्रवासाचा वापर हा काही प्रमाणात मेटफॉरिकल, रुपकात्मक आहे. हे अधोरेखित होतं ते त्यातल्या पात्रांच्या पार्श्वभूमीमुळे, त्यांनी भूतकाळात जाण्यासाठी निवडलेल्या कारणांमुळे आणि ती कारणं मांडताना चित्रपट ज्याप्रकारे वेळ घेतो त्यामुळे. सामान्यत: साहीत्या-चित्रपटांत भूतकाळात जाणार््या व्यक्तिरेखांची कारणं ही लार्जर दॅन लाईफ असतात आणि काळाचा पल्ला हा भलामोठा असतो. इथे मात्र हा टप्पा अगदी दहाबारा वर्षांचा आहे आणि कारणं आहेत ती हातून घडलेल्या चुकांवर मार्ग काढण्याची. ही कारणं व्यक्तिरेखा ,दिग्दर्शक आणि पर्यायाने चित्रपट यांना विशेष महत्वाची वाटतात हे पटकथेत वेळोवेळी स्पष्ट होतं. एका प्रसंगी तर केनेथ डेरीअसला सांगतोदेखील ,की तिचं भूतकाळात येण्यामागचं कारण त्याला पटलं तरच तो तिला आपल्याबरोबर नेईल. यावर डेरीअसने खोटं कारण रचून सांगण्याएेवजी चित्रपटाने आधीच ओझरता उल्लेख केलेलं खरंखुरं कारण वापरणं आणि ते केनेथला पटणं ,हेदेखील या गोष्टीचच उदाहरण मानता येईल.
प्रत्येकासाठी आपलं आयुष्य डिफाईन करणारे क्षण वेगवेगळे असतात आणि त्यावेळी आपण वेगळा निर्णय घेतला असता ,वा वेगळ्या पध्दतीने वागलो असतो तर आपलं आजचं आयुष्य खूप वेगळं झालं असतं असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं .बहुतेकांना ते आता आहे त्यापेक्षा चांगलच झालं असतं असं वाटतं. 'सेफ्टी नॉट गॅरन्टीड' हा या अशा क्षणांची आठवण आपल्या डोक्यात जागी करतो, ज्यामुळे पाहाणार््या सर्वांनाच या व्यक्तिरेखा जवळच्या वाटायला लागतात. मात्र केवळ आठवण जागवून वा समस्या सोडवण्यासाठीच्या कालप्रवासाचं अशक्य स्वप्न आपल्यासमोर ठेवून तो सोपी पळवाट काढत नाही ,तर असंही सुचवतो की कदाचित जे झालं ते तुमच्या अधिक फायद्याचं असेल. कदाचित तुम्हाला आजवर वाटणारी चूकच भविष्यात तुमचं भलं करुन दाखवेल .
केनेथ/ डेरीअस आणि जेफ/ लिझ ही यातली प्रेमप्रकरणही या भूत/ वर्तमानाच्या खेळाशीच जोडलेली आहेत. काळ या सार््यांच्याच गोष्टीत महत्वाचा घटक आहे आणि त्यांचं यशस्वी होणं न होणंही अखेर काळाच्याच हाती आहे. अगदी शेवटचा भाग वगळता, इथला कालप्रवास मात्र कथानकातला घडवता भाग असण्यापेक्षा हिचकॉकच्या ’मॅकगफिन’ या शब्दप्रयोगासारखा आहे.मॅकगफिन म्हणजे अशी गोष्ट जी चित्रपटाच्या चौकटीतल्या व्यक्तिरेखांसाठी खूप महत्वाची आणि या व्यक्तिरेखांना धावतं ठेवणारी आहे, मात्र प्रत्यक्ष कथानकात तिला अजिबात महत्व नाही.मॅकगफिन हा उत्प्रेरक असतो ,ज्याचा प्रत्यक्ष घटीतात काहीच हात नाही. या व्याख्येला अनुसरुन ,चित्रपटातली पात्र जरी केनेथच्या कालप्रवासाच्या वायद्याला पडताळून पाहाण्यासाठी धावपळ करत असली आणि केनेथ स्वत: या प्रवासाच्या तयारीत मग्न असला तरी प्रत्यक्ष प्रवासाला चित्रपटात दुय्यम स्थान आहे . किंवा त्याहूनही खालचं.
असं जरी असलं ,तरी विज्ञानपटाच्या चाहत्यांना चित्रपट फसवतो असं नाही. आपल्या अनपेक्षित शेवटाने ,तो सर्वांचं समाधान करणारा चित्रपट होण्याचा प्रयत्न करतो. ते त्याला जमतं की नाही , हा प्रत्येक प्रेक्षकाने स्वतंत्रपणे पडताळून पाहाण्याचा प्रश्न झाला.
- गणेश मतकरी
6 comments:
धन्यवाद , चित्रपट छान समजून संगीताल . फक्त पहिला आसल्टर कलला नसता कृपया जरा लेख वादावा .
ह्या सिनेमाचा जो आशय आहे तेच सूत्र पकडून वेगळ्या पद्धतीने बटर फ्लाय एफेट्स
ह्या त्रीओलोजी असलेल्या सिनेमात मांडले आहे. कि भूतकाळातील चुका तुम्ही कालप्रवाहाद्वारे सोडवायला गेला तर त्यातून अजून वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात ,कारण आपण एखादी कृती करतो त्याचे अनेक अंगाने परिणाम साधले जातात.
Ninad, you have a point in terms of the theme but characteristically there is a vast difference between two films ( i have seen only first butterfly effect but both endings). its like saying Ardhasatya is like Janjeer because both deal with police issues.
गणेश, जंजीर हा चित्रपट पोलीस समस्यांबद्दल नाहीच आहे. हे आपल्याला माहीतच आहे. त्याची तुलना अर्ध्यसत्यशी नाही होऊ शकत. कुठल्याही प्रकारे. जंजीर फक्त नायकाने सूड घेणे या एक कलमी कार्यक्रमाला उद्देश मानून तद्दन व्यावसायिक सिनेमा दाखवतो. अर्धसत्यत जरी पोलीस नायकाभोवती फिरत असला तरी तो एक सामाजिक पैलूकडे वास्तवाच्या नजरेतून बघतो. जंजीर उघडच व्यावसायिक असल्यामुळे कचकड्याच्या व्यक्तिरेखा घेऊन सत्तरच्या दशकातला उत्तम व्यावसायिक सिनेमा देतो एव्हढंच काय ते.
vivek, please read the comment carefully. that is exactly what i am saying. though both are about police they cant be compared .similarly ,both safety not guaranteed and butterfly effect talk about past mistakes, they cant be compared. you seriously thought i was comparing janjir to ardhsatya?
No. I was not.
Post a Comment