तलाश'- शोध , वेगळ्या सिनेमाचा !

>> Sunday, December 2, 2012स्पॉयलर वॉर्निंग- ही सूचना खरंतर निरर्थक आहे, कारण मी ज्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे त्याहून कितीतरी अधिक गोष्टी फेसबुक आणि 'इन्डिआ टुडे' सारख्या समीक्षणांमधून वाचकांपर्यंत आधीच पोचलेल्या आहेत. आणि मुळातच रहस्यभेद व्हावा ,अशी माझी इच्छा नाही. तरीही ज्यांना चित्रपट कोणत्याही अधिक माहितीशिवाय पाहायचाय, त्यांनी हे वाचण्याआधी चित्रपट पाहावा.

कोंबडी आधी की अंडं ,या गहन प्रश्नासारखाच चित्रपटांसंबंधात विचारला जाणारा प्रश्न आहे ,तो प्रेक्षक आधी सुधारावेत, का चित्रपट हा ! प्रेक्षकांची समज बेताची असल्याने आम्ही बाळबोध चित्रपट देतो असे सांगणारे चित्रकर्ते आणि मुळात पाहायला मिळणारे चित्रपट बाळबोध असल्याने समज वाढणार तरी कशी , अशी तक्रार असणारा प्रेक्षक ,हे चित्र बॉलीवूडमधे नित्याचं आहे. फिल्म सोसायटी चळवळीत ,मी प्रेक्षकांना दमात घेणारं ' उत्तम चित्रपटाची अपेक्षा असेल तर प्रथम आपण उत्तम प्रेक्षक बनलं पाहिजे' ,या अर्थाचं वचनही ऐकलेलं आहे, मात्र ते काही खरं नाही. हा काही वन वे स्ट्रीट नाही आणि बदल हा केवळ एका बाजूलाच घडणं पुरेसं नाही, तर तो दोन्ही ठिकाणी दिसायला हवा.  जसे केवळ प्रेक्षक सुधारून भागत नाही तसंच केवळ चित्रपट सुधारणंही पुरेसं नाही. जसं चित्रकर्त्यांनी लोकप्रिय आवडीनिवडीचा विचार न करता वेगळा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं तसंच जेव्हा या प्रकारचा वेगळा प्रयत्न चित्रपटातून दिसेल तेव्हा प्रेक्षकांनी त्याचं स्वागत करणंही महत्वाचं . हा प्रयत्न  सर्वगुणसंपन्न असेल असं नाही, किंबहुना प्रेक्षकांच्या धोरणाला बिचकणा-या चित्रकर्त्यांनी कदाचित रॅडीकली काही वेगळं करणं टाळलं असण्याचीही शक्यता आहे. पण जेव्हा चित्रपटात काही नवं घडण्याची शक्यता दिसेल तेव्हा प्रक्षकांकडून प्रोत्साहन मिळणं ,हे उद्योगाचं स्वरुप बदलण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाहाता ,आमीर खान प्रॉडक्शन्स कडून केल्या जाणा-या चित्रपटांच्या वेगळेपणात सातत्य आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही . पीपली लाईव्ह आणि धोबीघाट या त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच परिचित व्यावसायिक चौकटीबाहेरच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न आपल्याला त्यांचीच निर्मिती असलेल्या रीमा कागटी दिग्दर्शित 'तलाश' मधे दिसून येतो .
मध्यंतरी रामसे कँपमधे सेटल झालेली आपल्या चित्रपटांतली भूतं  हल्ली  बाहेर पडून भट् आणि वर्मा कँपमधे सामील झाली आणि त्यांचे चित्रपट अधिक स्टायलिश आणि चांगलं छायाचित्रण असणारे झाले तरी प्रेक्षकांच्या बुध्यांकावरचा त्याचा अविश्वास अजूनही कमी झालेला नाही. अतिमानवी चित्रपट हा केवळ भयपट असू शकतो आणि भयपटाने प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी अमुक अमुक युक्त्या करायच्या असतात ,असे संकेत आपला सिनेमा अजूनही पाळतो.  त्यामुळे 'तलाश ' सारख्या चित्रपटांमधे जेव्हा हा विषय पध्दत बदलून आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडला जातो तेव्हा त्याची दखल घेणं अपरिहार्य ठरतं. तलाश पूर्णपणे स्वतंत्र नसला तरी प्रयत्नाचं स्वरूप हे प्रामाणिक आहे आणि अंतिमतः पडद्यावर दिसणा-या गोष्टिंमधे काहीतरी मनापासून केल्याची जाणीव आहे. अवघड विषय आणि प्रेक्षकाला झेपेल याची खात्री नसतानाही मोकळेपणाने काहीतरी चांगलं करण्याचा त्याचा हेतू आहे. तो सर्वांना आवडेल याची खात्री नाही मात्र ज्यांना आवडेल त्यांना तो याच चित्रपटाच्या गुणांमुळे आवडेल, मध्यंतरी 'बर्फी' ला जसा 'इतर चित्रपट अधिक वाईट असल्याने हा आवडला' असा नकारात्मक प्रतिसाद आला तसा इथे होणं संभवत नाही.
मात्र एवढं सांगितल्यावर मी असंही म्हणेन की त्याला ज्या प्रकारचा गोंधळलेला रिस्पॉन्स मिळाला आहे ,त्याचं मला फार आश्चर्य वाटत नाही. त्याच्या स्ट्रक्चरपासून ते तथाकथित रहस्यभेद करणा-या शेवटापर्यंत अनेक जागा अशा आहेत ज्या संपूर्णपणे जमलेल्या नाहीत आणि त्यांचं न जमणं हे कोणत्याही क्षणी प्रेक्षकांचा रसभंग करु शकतं . अशा वेळी आवश्यक आहे तो पेशन्स , आणि केवळ अमुक एका गोष्टीवर तो आवडण्याची पूर्ण मदार ठेवण्यापेक्षा , एकूण चित्रपटाकडे पहाण्याची तयारी आणि क्षमता.
'तलाश' हा दोन जवळजवळ पूर्णपणे वेगळ्या कथानकांना एकत्र करतो आणि त्यांना एकच असल्याप्रमाणे भासवण्याचा प्रयत्न करतो. पुत्रवियोगाच्या दुःखाने नातं जवळजवळ संपुष्टात आलेल्या एका जोडप्याचं कथानक हा इथला  एक धागा आहे, तर मृत्यूच्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं भूतकाळात दडलेलं रहस्य हा दुसरा. हे दोन्ही धागे आपल्याला स्वतंत्रपणे परिचित आहेत आणि आपण अनेक चित्रपटांतून कथा कादंबर््यांतून त्यांना वाचलं ,पाहिलं आहे. पहिला धागा आँर्डीनरी पीपल, सन्स रुम पासून रॅबिट होल पर्यंत अनेक चित्रपटात आलेला आहे . गंमत म्हणजे ,त्याचं हेच रुप त्यातल्या अतिमानवी सूत्रासह आणि याच प्रकारच्या शेवटासह , रत्नाकर मतकरींच्या 'बंध' या कथेतही आलेलं आहे, मात्र हा विषय तसा परिचित असल्याने तो योगायोग असण्याची शक्यता मी निकालात काढणार नाही. दुसरा धागा हा सरळसरळ पीटर स्ट्रॉबच्या कादंबरीवर आधारीत एका चित्रपटावरुन सुचला असण्याची शक्यता आहे. मात्र कादंबरीचं ,चित्रपटाचं नाव इतकं प्रसिध्द आहे की ते घेणं ,हे चित्रपटातलं रहस्य उलगडून टाकल्यासारखं होईल. सबब, मी इथे ते नोंदवणार नाही. या दोन धाग्यांना एकत्र करते ती सुर्जन ( आमिर खान )ची व्यक्तिरेखा, जो  आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूला स्वतःलाच जबाबदार धरतो , आणि आपल्यातच कुढत राहातो. आपल्या पत्नीलाही ( राणी मुखर्जी) आपल्यापर्यंत पोचू देत नाही आणि कामातच स्वतःला बुडवून घेण्याचा प्रयत्न करतो. या परिस्थितीत त्याच्याकडे अरमान ,या सुप्रसिध्द अभिनेत्याच्या रहस्यमय अपघाती मृत्यूची केस येते. अरमानची गाडी काहीच कारण नसताना रस्ता सोडून समुद्रात कोसळलेली असते. या मृत्यूशी जोडलेलं  हरवलेल्या वीस लाख रुपयांचं रहस्यदेखील असतं ,जे पोलिसतपासाला जवळच्याच वेश्यावस्तीत घेऊन जातं. तिथे सुर्जनची गाठ पडते ,ती रोजीशी ( करीना कपूर) , जिचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध असल्याचं सुर्जनच्या लक्षात येतं . वस्तीतलाच लंगडा भिकारी तेमूर ( नवाझुद्दीन सिद्दीकी - कहानी ,गँग्ज आँफ वासेपूर आणि मिस लवली मुळे अचानक प्रकाशात आलेला मोठा स्टार, तुलनेने छोट्या ,पण लक्षवेधी भूमिकेत) देखील या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणार असं दिसायला लागतं.
हे उघड आहे ,की सुर्जनचं व्यक्तिगत आयुष्य आणि पोलिस तपास या जवळजवळ एअरटाईट अशा स्वतंत्र गोष्टी आहेत आणि चित्रपटाने त्यांचा एकमेकांशी लावलेला संबंध हा वरवरचा आहे. त्यामुळे कथा ही कंपार्टमेन्टलाईज होते. कधी ती एका भागावर रेंगाळते ,तर कधी दुस-या आणि ज्या प्रेक्षकाला ज्या गोष्टीत अधिक रस आहे, त्याला तिचं दुस-या भागावर रेंगाळणं खटकतं. पुन्हा त्यातही गुंतागुंत अशी, की पुत्रवियोगाच्या गोष्टीचा इमोशनल पेआँफ जास्त असला तरी ती खूप संथ आहे आणि पोलिस तपासात घटना अधिक ,तपशील , वातावरणनिर्मिती अधिक असूनही त्यातलं रहस्य हे केवळ रहस्य ,म्हणजे 'गुन्हेगार कोण' छापाचं आहे, ज्यात प्रेक्षकाची म्हणावी तशी भावनिक गुंतवणूक नाही. त्यामुळे दोन्ही कथांचं रेझोल्यूशनदेखील स्वतंत्र आणि प्रत्येकावर कमीअधिक परिणाम करणारं आहे.
आपल्यातल्या बहुतेक सर्वांनाच ,या चित्रपटातल्या रहस्याचा अनेकांनी श्यामलनच्या ' द सिक्स्थ सेन्स' शी लावलेला संबंध हा परिचित आहे. हा संबंध म्हंटला तर महत्वाचा आहे आणि म्हंटला तर नाही. महत्वाचा नाही तो अशासाठी ,की ही सिक्स्थ सेन्सची कॉपी नाही. केवळ कथेतला एक विशिष्ट घटक इथे सिक्स्थ सेन्सच्या पध्दतीने वापरण्यात आला आहे. महत्वाचा आहे तो अशासाठी ,की केवळ या नावाचा उल्लेख ,हा आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी पुरेसा आहे. पटकथा जितकी हलक्या हाताने लिहीली जायला हवी होती तितकी इथे लिहीली गेलेली नाही आणि काही  जागा या जागरुक प्रेक्षकासाठी हा छुपा घटक उघड करतात. अगदी मध्यांतराच्या वेळेपर्यंतच. आणि एकदा का हा घटक तुमच्यासाठी उघड झाला ,की तुम्ही तो पुन्हा विसरुन जाऊ शकत नाही. पुढला भाग हा तुमच्यासाठी रहस्यमय ठरत नाही, कारण तुम्हाला ते आधीच समजलेलं असतं.
मग प्रश्न उरतो ,तो रहस्याचा उलगडा शिल्लक नसताना ,हा चित्रपट तुम्हाला बांधून ठेवतो का नाही, हा . किंवा दुस-या शब्दात सांगायचं  तर तुम्ही 'तलाश' कडे केवळ रहस्यपट म्हणून पाहाणं योग्य आहे का नाही, हा .या चित्रपटातलं  भावनिक नाट्य ,त्यातल्या शोकांतिका, त्याची सामाजिक चाड,त्यातल्या सुर्जन पासून तेमूरपर्यंत अनेकांचं व्यक्तिचित्रण आणि  या व्यक्तिंच्या स्वतंत्र आलेखांमधे दिसून येणारी त्या व्यक्तिरेखांबद्दलची कणव ,हे सारं तुम्ही स्वतंत्रपणे पाहू शकता, पचवू शकता, या व्यक्तिरेखांशी मानसिक जवळीक साधण्याची तुमची तयारी आहे ,की केवळ रहस्यभेदासारख्या लहानशा गोष्टीवर, आणि शेवटी धक्का बसण्या न बसण्यावर ,तुम्ही या चित्रपटाचा परिणाम जोखू पाहाता? हा प्रश्न इथे विचारण्यासारखा आहे. किंबहुना रहस्यभेदापलीकडे जाऊन 'तलाश'कडे पाहाणं हे खरंतर त्याला अधिक न्याय देणारं ठरेल. तसा तो द्यायचा का नाही हे मात्र तुम्ही स्वतःच ठरवायचं.
- गणेश मतकरी 

25 comments:

Sachin Powar December 2, 2012 at 11:34 PM  

शेवटच्या परिच्छेदाशी अगदी सहमत. रहस्यभेद व्हायच्या आधीच बाकीच्या अनेक गोष्टींमुळे चित्रपट आवडून गेला होता :)
रहस्य कळल्यानंतर त्यातील तार्किकता आणि वैयक्तिक orientation ह्यामुळे शेवट पटतोय की नाही असा वाद चालू होता, पण एकदा का ती गोष्ट('गोष्ट' म्हणून हवं तर) convince झाली की मग त्याच्यासकट चित्रपट आवडतो!
मला तरी पूर्ण बांधून ठेवणारा चित्रपट वाटला, टीव्ही वर गाणी इतकी आवडली नव्हती पण चित्रपटात एकदम चपखल वाटली लक्षात राहिली.
तांत्रिक गोष्टी कळत नाहीत काही पण कॅमेरा, पार्श्वसंगीत ह्या गोष्टी भारी वाटल्या!

Harshad Samant December 3, 2012 at 5:37 AM  

सहमत आहे. रहस्य predictable असूनही त्यापलीकडे कथेत salvation व सुरजनला भावनिक कोलाहलातून शेवटी मिळणारी शांतता हा मुद्दा महत्वाचा वाटल्याने चित्रपट आवडतो.

Vivek Kulkarni December 3, 2012 at 5:44 AM  

मला चित्रपट खूपच आवडला. याचं कारण चित्रपट आजच्या मुंबईचं चित्रण अतिशय सर्वसामान्य पातळी करतो. त्यांना बटबटीत होऊ देत नाही. त्यामुळे कथानकात गुंतून रहायला मध्यंतरापर्यंत काहीही वाटत नाही. तेमूर जेव्हा मरताना रोझीला बघतो तिथेच याचा वेगळेपणा उघड व्हायला लागतो. तुम्ही मागे म्हणाला होतात चित्रपट कधी यशस्वी होतो जेव्हा त्यातील व्यक्तिरेखा ह्या खऱ्या वाटायला लागतात. हा चित्रपट तो निकष बरोबर पाळतो.

चित्रपट संपल्यानंतर मला रत्नाकर मतकरींच्या मृत्युंजयी, फाशी बखळ आणि अंश या भय/गूढ कथा संग्रहातल्या कथा आठवत होत्या. यासाठी की चित्रपट त्यातील व्यक्तिरेखा आपल्या परिचयातल्या ठेवतो म्हणून आपण लगेच कथेत गुंतून राहतो. शेवटाकडे रहस्यभेद होतो तेव्हा अरे असं खऱ्या आयुष्यात घडणार नाही हे माहिती असूनसुद्धा दिग्दर्शकाने आपल्याला विश्वासात घेऊन हे सगळं घडवून आणलंय याचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

Vivek Kulkarni December 3, 2012 at 5:49 AM  

फक्त मला जाणवलेली चूक म्हणजे तो जर रात्र-रात्रभर घरा बाहेर राहत असेल तर त्याला अपचनाचा अन असिडीतीचा त्रास व्हायला हवा. तो दाखवला असता तर त्याचा एकटेपणा जास्त भावला असता. अन आपल्याला माहित आहे की मानसिक आघात असेल तर त्याचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. चित्रपट त्याचं सर्वसामान्य असणं कधीही सोडत नाही मग अशी चूक पटकथाकारांकडून अपेक्षित नाही.

Dnyaneshwar December 3, 2012 at 5:55 AM  

चित्रपटाचे रहस्य जेव्हा मला कळले त्याच्या पुढच्याच क्षणी ते execute झाल्यामुळे मला तो रहस्यभेद छानच वाटला.. गाणी चपखल वाटली.. त्यातल्या त्यात "जिया लागे ना"..
आपल्या लेखातील पहिल्या आणि शेवटच्या परिच्छेदाशी सहमत.. खरे तर पूर्ण लेखाशीच सहमत.. :)
धन्यवाद!

aativas December 3, 2012 at 7:01 AM  

परीक्षण आवडलं.
खर तर प्रेक्षकांनी स्वत:चा अर्थ लावावा कोणत्याही कलाकृतीचा असं अपेक्षित असतं; पण ते घडत नाही. त्यामुळे एकूण बाकीचे लोक काय न्याय करतात त्यावरून आपण आपली भूमिका बेततो - समर्थनाची किंवा विरोधाची.

Pradip Patil December 3, 2012 at 8:55 AM  

It felts as if two different films are being played and towards the end (last accident) it felt as if a third film, straight from ramsay/bhatt camp, has started.

Another question that haunts me is what would the public reactions be if the same film had came not from the biggies like Excel/Aamir but an independent venture ? It's hard to put aside the Amir Khan factor while evaluating a film like this and its position in todays time .

ganesh December 3, 2012 at 10:28 AM  

Thanks Sachin, Harshad , Dnyaneshwar and aativas.
aativas, nice point. very valid.
Vivek, Aamir’s films pretend to be radically different but they are not. they have their commercial sides intact , so don't expect extreme realism. A completely realistic film won’t have songs, or such self conscious noir style lighting. also , don’t reveal too many plot points in comments. mental stress and effect on the physical condition you mention is marvelously portrayed in the film’ The Machinist’ which u may have seen. It is one of my favorite films and it also reminds me of my father’s stories.
Pradip, two diffrent stories are obviously being played of two different genre.
your third film point is also interesting, though I would discount it as it’s just there for a fraction.
your other point is not valid as I look at it. you can’t separate the studio and the actors from this film because it is conceived with these actors. if Aamir was not doing the part, the role would be conceived in a different way, and if Zoya and Reema were not writing for Aamir , the script would not be the same. the film does not depend only on it’s subject but who makes it, what kind of production is visualized and how the detailing is done. if someone else would have made this, it would have been an entirely different film, and would be evaluated differently .

Unknown December 3, 2012 at 11:36 AM  

mala picture avadala .picture cha jo shevat ahe to lokanini vegvegalya chitrapatatun anubhavalay pan tyach shevatach etakya vegalya padhtine kelel presetion avadal.prekshakna chukichya muddyavr athva probablity var vichar karayla lavun picture corret pointvar neun thevane

Pradip Patil December 3, 2012 at 9:24 PM  

---------Spoiler------

One more thing that I found out while discussing with a friend. He said he was looking for pointers like absence of mirror reflection etc.
But the film made a point to highlight them and this convinced him that kareena is not a ghost indeed.

Funnt how genre conventions play a part in our understanding.

I would like to know opinion from others about this.

ganesh December 3, 2012 at 10:56 PM  

-------spoiler--------
That would be very elementary. For all u know, तो पाय उलटे आहेत का हे पण बघत असेल. In fact they have explained things more than necessary when they say that spirits take human form for such and such reason. When human form is mentioned, it should be taken at the face value unless otherwise specified.

Sneha December 4, 2012 at 12:31 AM  

You have mentioned about the associations made with 'the sixth sense'. And that is right. But i was more reminded of 'signs' and what you had written about it. That some people were disappointed as they were expecting a movie about aliens, but signs was more about a man getting his faith back. Talaash is more like that i guess. And so as you said the experience would depend on whether you are ready to see it beyond the suspense-thriller.

Unknown December 4, 2012 at 1:40 AM  

Using character in form of spirit is an easy way out for the director. The issue is not with the script or actors. The issue is what has been promised in the promos and what is presented on screen. In a realistic murder mystery use of spirit may not be palatable to many.

Unknown December 4, 2012 at 1:47 AM  

Use of spirit has been done by none other than Akira Kurasawa in Rashomon. However there has been a wood-cutter's character to depict the "TRUTH" angle.

ganesh December 4, 2012 at 3:02 AM  

Sneha, I agree with you. thats the way it should be looked at.

---spoiler----

Unknown,
I am not even sure what you mean by what is promised in the posters and promos? who said anything about a realistic murder mystery? It is purely an assumption on your part. and Rashomon is not at all relevant. It just tells me that you are familiar with a classic world cinema. a comparison to what lies beneath or shutter island ( or the film I havent mentioned based on straub's novel) is more relevant. and how is it easy to present a spirit as a real character? specially in a police procedural?

Vivek Kulkarni December 4, 2012 at 5:33 AM  

If they are showing him in a convincing role then they must not forget this trivial and important thing which adds to build the character.

Unknown December 4, 2012 at 6:09 AM  

Sorry Ganesh, but can not agree with you. I am not sure how shutter island is related to Talaash.
I am not saying Rashoman is relevant to Talaash. It just can not be....
I mentioned Rashomon here because of a simple fact that both films have used spirit in the plot..

Now let me enlist few drawbacks
The drawbacks of Talaash
1) You mentioned how is it easy to present spirit? Why is it difficult when director does not have to owe any explanation that a spirit talks to a person and then rescues central character....
2) Movie keeps audience engaged there is no doubt about that however when spirit is used in a childish way it is then the film loses its charm
3) Why do we have to believe that whatever spirit is telling is complete truth?

Having said that I liked the movie because it has been shot earnestly.
But does that mean we should not ask the questions that director should have answered?

ganesh December 4, 2012 at 6:53 AM  

If you are saying u don’t agree about the promise of posters and trailer ,I have no argument because in my opinion Talash never promised to be a straight film . If you are not agreeing with shutter island point , I took that name when you astonished me with Rashomon. However ,Shutter island does have similarities. It’s also a sort of a police procedural with supernatural and psychological overtones. Though supernatural there is figment of imagination. The dark tone throughout and the mystery involving problems between a couple and dead children with father feeling guilty and responsible is also similar. Far more similarity in fact than Rashomon.
If spirit is the reason to bring the film in the argument ,then why not madhumati or om shanti om, or any number of films with the spirit. Search for truth in rashomon and Talash is quite different than one another and as you now say ,rashomon is irrelevant here.
Talash has many drawbacks and loose ends. I think I have mentioned it myself so there is no contradiction here. Still..
1. are you talking about a physical presence of the character? Then what about 100s of horror films with physical presence of ghosts? And what about sixth sense, which is obviously one of the major influences.
2. I don’t think the spirit is used in a childish way. It is used however in an obvious way .and anyone who has some inkling of the mystery can easily figure out by asking logical questions.
3. U can ask this about any character in any film. but she almost never tells the complete truth. He finds out from the surviving friend. She just drops some hints.
The film is scripted very loosely and there is no denying that there can be several questions one can ask the director. Or the writer.

Pradip Patil December 4, 2012 at 10:17 AM  

One film that keeps coming back to my mind is Hereafter. I feel that film has seamlessly integrated the supernatural with the human stories. I have seen it long ago so don't remember exactly. But I still think Talash couldn't achieve it somehow.

ganesh December 4, 2012 at 12:42 PM  

Hereafter was a good attempt, but I felt it was ineffective in the end. There seemed to be very little point to it. It did blend human relations , philosophy and supernatural but got nowhere after that. The first Tsunami sequence was amazing though.

ganesh December 4, 2012 at 12:43 PM  

Others was an excellent idea to hide the ghosts in plane sight. A very remarkable film.

Unknown December 4, 2012 at 6:02 PM  

सिनेमा आवडला .
आणि कथानक सुद्धा
सिनेमात जेव्हा नायकाची शेजारीण राणी मुखर्जीला आत्मा ह्या विषयी सांगते. व त्या संधर्भात त्यांच्यात चर्चा होतात ह्यावरून सिनेमात सुपरनेचरल अंगेल आहे हे स्पष्ट होते.
पण आपण म्हणतात तसे सिनेमात अनेक जागा अधुर्या राहिलेल्या असल्या तरी
ह्यात भारतीय प्रेक्षकांना नात्यातील बंध व सिनेमाचा शेवट नवरा बायको व मुलगा बाप व आई मुलाचे नाते फार सुंदररीत्या दाखवले आहे.
करीना चा वावर फारच लक्षणीय आहे.

attarian.01 December 6, 2012 at 4:38 AM  

प्रामानिकपने सांगय्चे म्हणजे म़ी इन्टरवल पर्यंत बोर जालो कारण मी आलो होतो मर्डर मिस्ट्री बघायला फॅमिली ड्रामा बघायला नाही , जाहिरातीत्त दाख्वाल्या प्रमाणे .आमीर खानने का हा सिनेमा केला प्रशन पडला होता . खुपच संथ वाटला . नन्तर चांगला वाटला .शेवट खुपच अनपेक्षित होता .आवडला,काही कच्चे दूवे आहेत . मला जास्त कौतुक वाटते नावाजून्दीन सिधिकी चे , प्रामाणिक पने रोल केला .दूसरे त्याचे प्रियसी ला सगळे पैसे मिळतात तो प्लाट .मला और्थेर हेल्ली ची होटेल कादंबरी आटवाली त्या मधे सुधा चोर आसच यशश्वी निसततो . आपल्या इथे आसे दखावत नाही .

Avirat patil December 8, 2012 at 8:48 PM  
This comment has been removed by the author.
Avirat patil December 8, 2012 at 8:49 PM  

मी तुमच्या शेवटच्या परीछेदाशी संपूर्णतः सहमत दर्शवतो...आणि एक गोष्ट मी ईथे आवर्जून नमूद करू इच्छितो ती म्हणजे...one Dialogue can define this country status..."कमाल कि बात है ना सब एक लाडकी गायब होती है, और साला किसीको कुच नही पडी "

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP