एन्ड आँफ वॉच- पोलिसातली माणसं
>> Monday, December 17, 2012
एखाद्या कलाकृतीकडे पाहाताना तिच्या सर्व बाजूंकडे स्वतंत्रपणे , तुकड्या तुकड्यात न पाहता एकसंधपणे आणि त्या कलाकृतीचा फोकस ,तिची दिशा लक्षात घेऊन पाहाणंच योग्य असतं हे दाखवणारं उत्तम उदाहरण म्हणून याच वर्षी प्रदर्शित झालेल्या डेव्हिड आयरच्या 'एन्ड आँफ वॉच' या चित्रपटाकडे पाहाणं सहज शक्य आहे. आपल्याकडे सामान्यतः चित्रपटातला हिंसाचार आणि संवादातला शिव्यांचा वापर याला नाकं मुरडण्याची पध्दत आहे. या दोन निकषांवर जर या चित्रपटाचा दर्जा जोखायचा तर तो काठावर उत्तीर्ण होणंदेखील कठीण आहे. मात्र या घटकांना या पध्दतीने चित्रपटात समाविष्ट करण्यामागची कारणं, चित्रपटात मांडला जाणारा आशय ,त्याचा रोख आणि तो काय साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे याची जाणीव, या सा-या गोष्टी डोक्यात ठेवल्या तर आपण एक विचारपूर्वक केलेली अर्थपूर्ण निर्मिती पाहातो आहोत ,याविषयी आपल्या मनात शंका राहाणार नाही.
एन्ड आँफ वॉचमधे व्यावसायिक फॉर्म्युलात सहज बसणा-या आणि त्यामुळे अनेक चित्रपटांमधे आपल्याला पाहायला मिळत असणा-या खूप गोष्टी आहेत. मुळात पोलिस कारवायांशी संबंधित कथानक हेच आपण नियमितपणे अनेक मेन स्ट्रीम चित्रपटात पाहातो. त्याबरोबरच दोन जीवाला जीव देणा-या मित्रांची पात्रं प्रमुख भूमिकांत आणणारा 'बडी मुव्ही ' फॉर्म्युलाही इथे असल्याचं जाणवतं. नायकांवर शत्रूपक्षांनी केले जीवावरचे हल्लेही इथे आहेतच. शिवाय हॉलिवुडमधली निर्मिती आणि जेक गिलेनालसारखा लोकप्रिय नट प्रमुख भूमिकेत असणं हेदेखील त्याला परिचित वळणांवरच घेऊन जातं. मात्र हे सारं नेहमीचं वाटतं ते केवळ त्या चित्रपटाची माहिती त्रयस्थपणे ऐकताना किंवा त्याचा परिणाम बाजूला ठेवून त्यातले घटक स्वतंत्रपणे चाचपून पाहाताना . प्रत्यक्ष चित्रपट पाहाताना आपण त्याला असे नियम लावूच शकत नाही. हे काही कृत्रिम रचलेलं आहे हेच विसरुन जातो आणि वृत्तपत्रातल्या बातमीच्या खरेपणाने चित्रपटात गुंतत जातो. आपल्याला बांधून ठेवतो तो त्याचा अस्सलपणा.
सध्या रिअँलिझमचा एक डिव्हाईस म्हणून सर्रास वापर होत असलेला आपल्याला दिसतो तो टेलिव्हिजनवरुन परिचित झालेल्या रिअँलिटी टीव्ही या फॉर्ममुळे. पूर्वनियोजित आणि रेखीव दृश्यरचनांना फाटा देऊन आशयाला प्राधान्य देत प्रत्यक्ष घडणा-या घटनांना जसंच्या तसं चित्रित करण्याच्या वा तसा आभास तयार करण्याच्या या पध्दतीला 'सर्व्हायवर' किंवा 'बिग ब्रदर/बॉस' सारख्या गेम शोज पासून 'कॉप्स' आणि 'क्राईम पेट्रोल' सारख्या वृत्तप्रधान कार्यक्रमापर्यंत अनेकांनी लोकप्रिय केलं. चित्रपटात या शैलीचा सर्वाधिक उपयोग करुन घेतला तो भयपटांनी . पण 'एन्ड आँफ वॉच ' सारख्या चित्रपटात त्याचा उपयोग केवळ चमत्कृती म्हणून करण्यात आलेला दिसत नाही. पडद्यावर दिसणा-या गोष्टी या केवळ रंजक किंवा पडद्यापुरत्या मर्यादित नसून त्यांच्यामागे अधिक व्यापक सत्य असल्याचं सूचित करणं हा या योजनेमागचा खरा हेतू आहे.
हा वापर आपल्याला चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच दिसायला लागतो. हे पहिलं दृश्य आहे ते एका प्रदीर्घ पाठलागाचं ,ज्याचा शेवट गोळीबाराने होतो. एरवीच्या प्रघातामुळे इथे आकर्षक दृश्ययोजना आणि स्टायलाईज्ड चित्रणाला खूप वाव आहे मात्र इथे आपल्याला तसं काहीच पाहायला मिळत नाही. जवळजवळ पूर्ण दृश्य दिसतं ते पेट्रोल कारमधल्या माउन्टेड कॅमेराच्या नजरेतून. कॅमेरावरल्या डिजिटल डिस्प्लेसकट. गाडीत बसलेल्या पात्रांशी आपली ओळख होते ती केवळ त्यांच्या आवाजातून कारण ते दोघं या दृश्यात केवळ शेवटी दिसतात ,तेही पाठमोरे. रिअॅलिटी टिव्ही , फस्ट पर्सन व्हिडिओ गेम्स , यांना एकत्र करणारा हा सीक्वेन्स आहे. पुढल्या भागातही याप्रकारचं वेगळं छायाचित्रण दिसतं. इथली विविध पात्रं ही छोटे व्हिडिओ कॅमेरे बाळगतात आणि चित्रपट अनेकदा या कॅमेरामधूनच दृश्यांकडे पाहातो. इतर वेळा त्रयस्थ दृश्यांमधेही कॅमेरा सतत हँडहेल्ड राहातो, नेमकेपणा छायाचित्रणातलं सोफेस्टिकेशन टाळत .
सुरूवातीच्या पाठलागानंतर पुढल्या दृश्यात दिसते ती पोलिस स्टेशनवरली लॉकर रुम जिथे ब्रायन ( जेक गिलेनाल) आणि माईक ( मायकल पेना)यांच्याशी आपली पहिली भेट होते. हे दोघं लॉस एंजेलिसच्या पोलिस खात्यात आहेत. दोघं पार्टनर आणि अतिशय चांगले मित्र आहेत. ब्रायन सतत एक व्हिडिओ कॅमेरा जवळ बाळगतो आणि दिसणारी प्रत्येक गोष्ट चित्रीत करतो. त्याचं लग्न झालेलं नाही पण जेनेट ( अँना केन्ड्रिक )च्या तो प्रेमात आहे. ब्रायन काहीसा उतावळा, धाडसी पण पुरेसा विचार न करता झटक्यात गोष्टी करुन टाकणारा आहे. याउलट माईक शांत, सारं पूर्ण विचारांती करणारा आहे. त्याचं गॅबी (नॅटली मार्टनेझ)बरोबर लग्न झालय आणि तो तिच्या पूर्ण प्रेमात आहे. दोघाना आपल्या पोलिस म्हणून कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे,मात्र ही जाणीव चित्रपटाच्या नायकाच्या गृहीत धरलेल्या व्यक्तिमत्वांमधून येणारी नाही,तर सज्जन पोलिसांच्या मूलभूत जाणिवेचा भाग असल्यासारखी आहे. या जाणीवेला जागून ते पार पाडत असलेली कामं कोणाच्यातरी डोळ्यात येतात आणि त्यांना खलास करण्याचा फतवा निघतो. अर्थात , हे दोघं असल्या फुटकळ अफवांना थोडेच जुमानणार असतात?
आयरने पटकथाकार म्हणून केलेल्या कामात पोलिसांचा विषय अनेकदा हाताळला आहे. स्वॉट, डार्क ब्लू या चित्रपटांबरोबर पोलिसांच्या नीतीमत्तेचा कस पाहाणारा 'ट्रेनिंग डे' त्याचा खास महत्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. मात्र ते चित्रपट काही प्रमाणात व्यावसायिकता गृहीत धरतात. त्यांमधे एन्ड आँफ सर्चची अकृत्रिमता दिसत नाही.
हा चित्रपट बराच काळ ब्रायन आणि माईकबरोबर असतो. त्यांच्याबरोबर गाडीतून फिरतो, त्यांची थट्टामस्करी ऐकतो, मारामा-यांमधे सामील होतो. मात्र त्याचा इमोशनल कोअर ,हा जेनेट आणि गॅबी असलेल्या प्रसंगांत पाहायला मिळतो. ब्रायन आणि जेनेटने केलेलं नृत्य, दोघींमधे पार्टीच्या वेळी होणारं संभाषण , जेव्हा या दोघींचा उल्लेख होतो ,तेव्हा या एरवीच्या कठोर नायकांच्या बोलण्यात येणारं मार्दव हे चित्रपटातल्या हिंसाचाराला आणि शिवराळपणाला बॅलन्स करतं.
परिचित कथासूत्रांचा वापर करत असूनही एन्ड आँफ वॉचचा शेवट खूपच अनपेक्षित आहे. केवळ काय घडतं यासाठी नाही तर कथनात ते ज्या पध्दतीने आणि ज्या क्रमाने सांगितलं जातं यासाठी,प्रेक्षकांना अखेर कोणतं दृश्य पाहायला मिळावं हे लक्षात घेत दिग्दर्शकाने केलेल्या निवडीसाठी.हा शेवट चित्रपटाला केवळ सुखांत वा शोकांत या नेहमीच्या गणितापलीकडे नेतो आणि पोलिसांमधल्या माणसाला आपल्यापर्यंत पोचवतो. ट्रेनिंग डे मधल्या उपहासात्मक दृष्टीकोनानंतर डेव्हिड आयरने पोलिसांकडे असं सहानुभूतीने पाहाणं हे चित्रपटातली पोलिसांची प्रतिमा बदलते आहे की काय ,असा प्रश्न विचारायला लावणारं आहे.
- गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment