मामा- मातृभयाचे दिवस
>> Tuesday, February 12, 2013
पॅन्स लॅबिरीन्थ पाहिल्यापासून गिआर्मो डेल टोरो माझा आवडता दिग्दर्शक आहे. दुर्दैवाने त्याने लॅबिरीन्थ नंतर केवळ एकच चित्रपट ( हेलबॉय २: द गोल्डन आर्मी) दिग्दर्शित केलाय, पण निर्माता/ कार्यकारी निर्माता म्हणून मात्र त्याने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. आँर्फनेज, स्प्लाईस, ब्युटीफूल अशी अनेक नावं आपल्याला त्याच्या कामाचा नमुना म्हणून घेता येतील. भय आणि फॅन्टसी या दोन्ही गोष्टी आपल्याला टिपिकल डेल टोरो चित्रपटात पाहायला मिळतात, आणि मी नेहमीच या माणसाच्या नव्या निर्मितीकडे नजर ठेवून असतो.
'मामा' चित्रपट, हा 'पॅन्स लॅबिरीन्थ' किंवा 'आॅर्फनेज'च्या पातळीला पोचू शकत नसला तरी त्याचा सूर हा बराचसा या दोन्ही चित्रपटांच्या खूप जवळ जाणारा आहे. वास्तव आणि फॅन्टसी यांची सांगड, अतिमानवी घटकांचा केवळ भीतीपुरता मर्यादित नसणारा वापर, लहान मुलांच्या महत्वाच्या भूमिका, मातृत्वाच्या संकल्पनेचा विचार अशा अनेक जागा या तिन्ही चित्रपटात कायम आहेत. मामामधे एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे ही सरळ भूतकथा आहे. इथलं कथानक इतर दोन चित्रपटांसारखं मल्टीलेअर्ड नाही.
'मामा' ची सुरुवात आन्द्रे आणि बर्बरा मुशेती या भावंडांनी बनवलेल्या अतिशय भीतीदायक शॉर्ट फिल्म पासून झाली. जेमतेम तीन मिनीटांची ही शॉर्ट इन्टरनेटवर उपलब्ध आहे, प्रत्येकाने जरूर पाहावी . आई (?) पासून पळणा-या दोन मुली इतकंच कथानक असणारी ही छोटी फिल्म पाहताक्षणी आवडणारी पण पूर्ण लांबीच्या चित्रपटात हा परिणाम टिकणार नाही असं वाटायला लावणारी आहे. गंमत म्हणजे, थोड्या फरकासह इथे दिसणारी दृश्य चित्रपटात एका प्रसंगी जशीच्या तशी येतात मात्र वाढीव कथानक हे पाणी घातल्यासारखं ताणलं जात नाही. कथेच्या तर्कात बसणा-या शक्यतांचा विचार करुनच मग पटकथा तयार होते.
चांगल्या आधुनिक भयकथा या वास्तवाचे संदर्भ घेऊन येतात. त्यामधलं अपरिचित जग हे आपल्याच आजूबाजूला कुठेतरी आहे ही जाणीव घाबरवणारी असते. मामा मधे हा संदर्भ सुरूवातीला येतो पण कथेच्या जवळपास क्लासिकल रचनेमुळे पुढे फारसा टिकत नाही. 'मामा' ची सुरुवात ही २००८ च्या आर्थिक संकटापासून होते. देणेक-यांपासून पळणारा जेफ्री आपल्या पत्नीला मारतो आणि दोन मुलींना गाडीत घालून निघतो. गाडीला अपघात होतो आणि तिघंजण एका निर्जन जंगलातल्या बंगलीवजा घराशी पोचतात. मुलींनाही मारुन स्वतः आत्महत्या करायची योजना आखणा-या जेफ्रीला या बंगलीत काहीतरी भेटतं आणि गोष्टीला वेगळं वळण लागतं.
तब्बल पाच वर्षांनी जेफ्रीच्या भावाला, लुकसला ( निकोलाय कॉस्टर वाल्दो, दोन्ही भावांच्या भूमिकेत) आपल्या जंगलात राहिलेल्या भाच्यांचा शोध लागतो. या काळात दोघींचं वागणं जवळजवळ वन्य प्राण्यांसारखं झालेलं असतं.आठ वर्षांची व्हिक्टोरिआ ( मेगन चारपेन्टीअर) निदान आपली जुनी आठवण निदान जागवू शकते, पण एक वर्षाची असल्यापासून जंगलातच वाढलेली लिली ( इजबेल नेलीस) शहरात अगदीच हरवते. लुकसला ती दाद देणं शक्यच नसतं. तिला फक्त दोघं माहीत असतात. आपली मोठी बहीण व्हिक्टोरीआ आणि जंगलात त्यांच्याबरोबर असणारी आणि त्यांना एवढा काळ जिवंत राहायला मदत करणारी 'मामा'.
लुकस आणि त्याची मैत्रीण अँनाबेल ( झीरो डार्क थर्टी साठी नामांकन मिळवणारी जेसिका चेस्टेन) एका मानसोपचारतज्ञाच्या मदतीने त्यांना वाढवायचं ठरवतात, पण लुकसला संशयास्पद परिस्थितीत अपघात होतो आणि मुलींची जबाबदारी एकट्या अँनाबेलवर येऊन पडते. मध्यंतरी आपल्या मुलींच्या मागावर मामाही हजर झालेली असतेच.
मामा मधे 'बर्फी'इतके नसले तरी ब-यापैकी चित्रपटांमधले संदर्भ आहेत. रिंगू, ग्रज सारख्या जे-हॉरर चित्रपटातल्या वातावरण आणि केशसंभाराच्या प्रेमापासून ते रीअर विंडोमधल्या कॅमेरा फ्लॅशपर्यंत अनेक जागा इथे आहेत. मात्र फरक असा की इथे दिग्दर्शक संदर्भाचा उपयोग प्लॉटमधल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी करतोय असं वाटत नाही, तर आपल्यावर आजवर झालेले चित्रपटांचे आणि ग्राफिक नाॅव्हेल्सचे संस्कार परीणाम चढवत नेण्यासाठी वापरतोय असं वाटतं. आशयाच्या दृष्टीने बराच वेगळेपणा मामाकडे मुळातच आहे. त्यासाठी त्याला उसनवारीची गरज पडत नाही.
सामान्य भयपटांमधल्या पिशाच्चांपेक्षा मामामधे एक प्रमुख वेगळी गोष्ट आहे ती ही ,की मामाचं ,तिच्या विकृत दृष्टीकोनातून का होईना पण मुलींवर प्रेम आहे. त्यांचं रक्षण ,हा तिच्या वागण्यामागचा प्रमुख हेतू आहे. याचा अर्थ ती अनेक चित्रपटांत दिसणार््या प्रेमळ भूतांसारखी आहे असा मात्र नाही. तिच्यापासून इतरांना आणि क्वचित प्रसंगी मुलींनाही वाटणारी भीती खरीच आहे. मात्र या वेगळेपणाचा उपयोग करुन दिग्दर्शक आन्द्रे मुशेतीने पाश्चात्य भयकथांमधल्या अनेक संकेताना उलटं पालटं केलं आहे. एरवी कथांमधे मुलाना भेडसावणार््या, कपाटात आणि पलंगाखाली दडलेल्या राक्षसांचा उपयोगही त्याने वेळोवेळी केला आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मामा या नावाचा दुहेरी अर्थ. चित्रपटात मामा म्हणून ज्याकडे सतत पाहिलं जातं ते पिशाच्च आणि मुळात आई होण्याच्या कल्पनेला बिचकणारी , तिच्या पहिल्या प्रसंगातच प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव आल्याने सुखावलेली, आणि मुलींनी तिला आई म्हणायला बंदी करणारी अॅनाबेल या दोघीही जणी इथे मामाच्या किंवा आईच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचा बराच भर हा अॅनाबेलच्या आईच्या भूमिकेत शिरण्यावर आहे. चित्रपटाच्या संकल्पनेशी तिच्यातला हा बदल सुसंगत आहे.
चित्रपटातली मामा आपल्याला बराच काळ दाखवली जात नाही. तिचं अस्तित्व अनेक छोट्यामोठ्या गोष्टी सूचित करतात. छोट्या लिलिचं फ्रेमबाहेर पाहून गोड हसणं ही बहुधा त्यातली सर्वात अंगावर येणारी गोष्ट. ही बहुतेक भयपटांची नेहमीची युक्ती आहे. प्रेक्षक त्याला जे समोर दिसतं त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात जे न दाखवता सूचित केलं जातं त्याला घाबरतो. त्यामुळेच चांगले भयपट हा गौप्यस्फोट जमेल तितका टाळतात, लांबवतात. मामा देखील तो तसा टाळतो, मात्र एरवी गौप्यस्फोटानंतर चित्रपटाचा परिणाम खाली घसरायला लागतो, तसं मात्र इथे़ होत नाही. यामागचं एक कारण म्हणजे यातल्या मामाचं डिझाईन भयावह असूनही मंत्रमुग्ध करणारं आहे. तिची चाल, केस, विचित्र जागी असणारा बाक, वारा भरल्यासारखा उडणारा वेष, गती, या सगळ्यांमधून तिला एक ग्रेस आलीय जी पाहाणार््याला बांधून ठेवते. दुसरं कारण आहे ते कथानकाची अनपेक्षितता. शेवट काय होणार ,कसा होणार याची आपण एका मर्यादेत कल्पना करु शकतो असं आपल्याला वाटतं, मात्र इथे अंदाज चुकत राहातो. प्रत्यक्ष शेवट आपल्याला चुकचुक लावत असला तरी त्याला कथेच्या तर्कशास्त्रात एक निश्चित न्याय आहे हे विसरता येणार नाही.
केवळ दिग्दर्शकाचा प्रथम प्रयत्न म्हणूनच नव्हे तर कोणत्याही निकषावर पाहाण्यासारखा हा चित्रपट आहे. भयपटाच्या लेबलाखाली त्याची रवानगी मध्यम दर्जाच्या स्लॅशर्स, किंवा यशस्वी फॉर्म्युलांच्या कितव्यातरी झेरॉक्स कॉप्यांच्या पातळीवर करणं न्याय्य ठरणार नाही.
- गणेश मतकरी
4 comments:
हा पहायचाच आहे.
Hi Ganesh, sorry for posting here but I am waiting for Pune 52 review. When I watched it, there were many things I could not understand. Hope you throw some light in your blog.
I had decided not to write about it for some personal reasons. but lets see.
For me the best thing was dream sequences, it gave a compelling idea to the whole story telling. The start with story how those girls managed and things happened was marvelous. Secondly, fear of unknown was beautiful used, With nearly no gore, it really excel itself from the rush of American Horror.
Another good thing was the sweet and sour climax which I honestly was expecting to be a lot negative
.Still I feel it could've been a great psychological thriller than a complete ghost story.
BTW, recently watched 'Sinister' with no expectations turned out to be a good one, so do watch.
.
Post a Comment