स्टार ट्रेक - इन्टू डार्कनेसः अपेक्षांना अनुसरुन
>> Sunday, May 19, 2013
मागे एकदा एका लोकप्रिय, दर्जेदार मराठी वृत्तपत्रात 'स्टार वॉर्स भाग ३ - रिव्हेन्ज आँफ द सिथ' चं हसून हसून लोळवणारं आणि एकूणच मराठी चित्रपट समीक्षेच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करणारं संग्राह्य परीक्षण वाचलं होतं. लिहिणा-या व्यक्तीला स्टार वॉर्स युनिव्हर्सची सोडाच , पण या मालिकेत किती चित्रपट आहेत, त्यांचा क्रम काय, ते कोणत्या दृष्टीने पाहाणं आवश्यक आहे याची जराही कल्पना नव्हती. तिने आपली स्वतःची वास्तववादी कौटुंबिक चित्रपट पाहाण्याची आवड मधे आणून चित्रपटाला चुकीची फूटपट्टी लावली आणि चित्रपटाचा भयंकर वाईट रिव्ह्यू लिहिला. आता हे उघड आहे, की 'रिव्हेन्ज आँफ द सिथ' म्हणजे 'एम्पायर स्ट्राईक्स बॅक' नव्हे. तरीही हा चित्रपट उघडच टाकाऊ नव्हता. मात्र वैयक्तिक पसंतीकडे असलेला कल , चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षक /चाहत्यांकडे दुर्लक्ष आणि ज्या चित्रप्रकाराविषयी लिहायचं त्याविषयी घोर अनादर यामधून हे अतिशय करमणूकप्रधान आणि पूर्णपणे चुकीचं समीक्षण लिहिलं गेलं होतं. 'स्टार ट्रेक- इन्टू डार्कनेस' चं आपल्या वृत्तपत्रात परीक्षण आलं असल्यास मी ते अजून वाचलेलं नाही. कदाचित ते ( हॅ: सायन्स फिक्शनचं काय परीक्षण लिहायचं ! या दृष्टिकोनाने बाजूलाही टाकलं असू शकतं) पण आलं असल्यास आशा आहे, की ते लिहीणा-याच्या मर्जीपेक्षा पाहिलेल्या चित्रपटाला अधिक महत्व देऊन लिहिलं गेलं असेल, कारण स्टार ट्रेकचा मामला हा स्टार वॉर्सहूनही अधिक गुंतागुंतीचा आहे. स्टार वॉर्सचे सहा चित्रपट खरे महत्वाचे मानले जातात. ग्राफिक नॉव्हेल्स, टिव्ही सिरीज, पुस्तकं यांना एवढं महत्व नाही. पण १९६० च्या दशकातल्या मूळ स्टार ट्रेक मालिकेनंतर वर्षानुवर्षं बदलत्या स्वरुपासह चालू असणा-या अनेक मालिका , जे जे अँब्रम्सने २००९ मधे फ्रँचाईज रिबूट करेपर्यंतचे दहा आणि नंतरचे दोन चित्रपट एवढं पाहिलं तरी स्टार ट्रेक संदर्भाचं भांडार मोठं आहे, मग पुस्तकं वगैरे तर सोडाच.
स्टार वॉर्स आणि स्टार ट्रेक ही दोन्ही नावं ब-याचदा एका दमात घेतली जातात , आणि दोन्हीही 'स्पेस अँडव्हेन्चर' या ढोबळ वर्गवारीत बसवणं शक्य आहे, परंतु त्यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. स्टार वॉर्सचा कल एपिक फॅन्टसी आणि दंतकथांच्या बाजूला झुकणारा आहे तर स्टार ट्रेक मधल्या कथा अधिक अस्सल वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित असूनही तत्कालिन सामाजिक मुद्द्यांना सामावून घेतात. 'स्टार ट्रेक -इन्टू डार्कनेस' हा प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या रिबूटचा पुढला भाग. आधीच्या चित्रपटाने वाढवलेल्या अपेक्षांना सामोरं जाणारा, त्यामुळे निर्मितीसाठी अधिकच कठीण.
हार्ड कोअर चाहत्यांना ,अर्थात ट्रेकीजना माहीत असेल की 'इन्टू डार्कनेस' आणि मूळ स्टार ट्रेक चित्रपटमालिकेचा दुसरा आणि सर्वाधिक लोकप्रिय भाग 'द राथ आँफ खान ' यामध्ये एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते म्हणजे या दोन्ही चित्रपटांमधली खलनायकाची व्यक्तिरेखा ( तीही रिबूट झालेली, पण ) सारखीच आहे. त्यामुळे ट्रेकीजना या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा होत्या. त्या सगळ्या पु-या झाल्या का हे पाहण्याआधी कथासूत्राकडे एक नजर टाकणं आवश्यक ठरेल.
स्टार ट्रेकचा फॉरमॅट हा तसा निश्चित आहे ( जरी या चित्रपटात तो थोडाफार बदलून पाहिला जातो) . अवकाशयानामधून नवनव्या ग्रहांचा, जगांचा शोध घेत जाणा-या भविष्यकालिन चमूची ही साहसं आहेत. यात काही पात्रं अधिक महत्वाची असली तरी लहान भूमिकांतली पात्रही प्रेक्षकांना परिचित आहेत, आवडती आहेत. साहस हे एकट्यादुकट्याचं नसून चमूचं आहे. यानाची ओळखही इथल्या पात्रांइतकीच महत्वाची. ही यानं जणू यातल्या व्यक्तिरेखाच आहेत. चाहत्यांनी वर्षानुवर्ष आपल्या मानलेल्या. नव्या चित्रपटांचा काळ हा मूळ चित्रमालिकेशी सुसंगत असल्याने इथे जिम कर्क ( क्रिस पाईन) हा धाडसी, सज्जन पण नियम न जुमानणारा कॅप्टन, कायम तर्काला महत्व देणारा त्याचा उजवा हात असणारा मिस्टर स्पॉक(झॅ़करी क्विन्टो)आणि कामाचा पक्का पण तिरकस स्वभावाचा डॉक्टर मॅककॉय (कार्ल अर्बन) आणि इतर अनेक परिचित नावं त्यांच्या 'एन्टरप्राइज' यानावर हजर आहेत.
इन्टू डार्कनेस सुरु होतो, तो जेम्स बॉन्ड वा इंडिआना जोन्स मालिकेतल्या एखाद्या भागाप्रमाणे. चालू साहसाच्या उच्चबिंदूवर. चाललेल्या धुमश्चक्रीत स्पॉकचा जीव वाचवण्यासाठी कर्क नियमाना गुंडाळून ठेवतो. स्पॉक वाचतो, पण कर्कला कॅप्टन पदावरुन काढलं जातं आणि यानाचा ताबा हा अँडमिरल क्रिस्टफर पाईक यांना सुपूर्द केला जातो. मात्र लवकरच एक आपत्ती येऊन ठेपते. स्टारफ्लीटमधून बाहेर पडून बंड पुकारणा-या जॉन हॅरीसनने ( बीबीसीच्या शेरलॉक मालिकेतल्या आधुनिक होम्सच्या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेला बेनेडिक्ट कम्बरबॅच) चढवलेल्या हल्ल्यात पाईकसह अनेक वरिष्ठ अधिका-यांचा बळी जातो. क्लिंगॉन ,या मानवजातीशी वैर असणा-या परग्रहवासीयांच्या ग्रहावर हॅरीसन लपल्याचं कळताच कर्क आपल्या एन्टरप्राईजच्या चमूसह तिथे पोचतो ,पण आधी ठरवल्याप्रमाणे त्याच्या लपण्याच्या ठिकाणावर दुरुन फोटॉन बॉम्ब्सचा मारा न करता त्याला जिवंत ताब्यात घ्यावा असं सर्वांचं मत पडतं. मात्र एकदा ताब्यात आल्यावर हॅरीसन जे प्रश्न उपस्थित करतो त्याची उत्तरं कर्कच्या चमूला एका अनपेक्षित आणि मोठ्या संघर्षाकडे घेऊन जातात.
रिबूटमागची कल्पना ही केवळ जुना चाहता वर्ग जसाच्या तसा ठेवणं एवढीच नसते, तर चित्रपटमालिकेचं स्वरुप नव्या पिढीच्या आवडीनिवडींशी जोडलेलं ठेवत ती चालू राहील हे पाहाणं हेदेखील असतं. जेम्स बॉन्ड, बॅटमॅन या मालिकांनी हे यशस्वीपणे करुन दाखवलय. स्टार ट्रेकचाही या यशस्वी मालिकांत समावेश करायला हरकत नाही. कारण पहिल्या ,बरीचशी 'ओरिजिन स्टोरी' असणा-या भागानंतर इथेही दिग्दर्शक जे जे अँब्रम्सची कथावस्तू , सादरीकरण आणि नव्याजुन्याचा मेळ यांवरली पकड अचूक असल्याचं दिसून येतं. काळ आणि वाढीव बजेट यांमुळे त्याचं दृश्य स्वरुप आणि स्पेशल इफेक्ट्स यांमधे होत चाललेली सुधारणा इथेही आहेच. खासकरुन स्पेशल इफेक्ट्समधली. या स्टार ट्रेकचा अँक्शन आणि भव्य प्रसंगमालिका यांवरला भर पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि नवा प्रेक्षक जमवताना ते नक्कीच उपयोगी पडणारं आहे. ट्रेकीजनाही यावर काही आक्षेप नसावा कारण अखेर स्टार ट्रेक हे कधीच त्याच्या व्यक्तीरेखांच्या खोलीसाठी किंवा संवादांच्या अर्थपूर्णतेसाठी प्रसिध्द नव्हतं. ज्यासाठी ते होतं त्यातला बराच भाग, म्हणजे दृश्यभाग, वैज्ञानिक संकल्पना आणि समाजात घडणा-या उलाढालींचं प्रतिबिम्ब ( जे गेल्या भागात नसल्याने त्यावर काही प्रमाणात टीका झाली होती) इथे उपस्थित आहेच.
ट्रेकीजना आक्षेप असण्याची शक्यता असलेला आणि खरं तर पुढल्या भागासाठी एक प्रश्न उभा करणारा इथला भाग आहे, तो कर्क आणि स्पॉक रोल रिव्हर्सलचा, जो राथ आँफ खान मधल्या एका महत्वाच्या प्रसंगाची व्यक्तिरेखांच्या जागा बदलून नक्कल तर करतोच, वर एकूण चित्रपटातच या दोन व्यक्तिरेखांच्या वागण्याच्या पध्दतीत इतका मोठा बदल दाखवतो, की पुढल्या भागात काय अपेक्षा करावी याबद्दल संभ्रम उपस्थित व्हावा. मात्र माझ्या कल्पनेप्रमाणे जेव्हा चित्रकर्ते एवढा रॅडिकल निर्णय घेतात तेव्हा त्यावरच्या उपायाचाही त्यांनी काही प्रमाणात विचार करुन ठेवलेला असतो. शिवाय हा बदल असला तरी चित्रपटाचा शेवट क्लिफहॅन्गर नाही, त्यामुळे प्रेक्षकांना चुकल्या चुकल्यासारखं न वाटण्याची खबरदारी इथे घेतली गेलेली आहे.
यातले सारे अभिनेते चांगले असूनही या भूमिकांमधे टाईपकास्ट होण्याची शक्यता आहे, जे मूळ मालिकेतल्या चमूचं झालेलं आपण पाहिलं आहे. हा धोका आहे आणि तो टाळण्यासाठी या मंडळींनी इतर काम करत राहाणं गरजेचं आहे. याला अपवाद आहे तो स्कॉटी ही लोकप्रिय पण लहान भूमिका करणा-या सायमन पेगचा. 'शॉन आँफ द डेड' आणि 'हॉट फज' मुळे लोकप्रिय झालेला हा विनोदी अभिनेता स्कॉटी म्हणून टाईपकास्ट होणं शक्य नाही पण स्टार ट्रेक, मिशन इम्पॉसिबल सारख्या मालिकांतल्या फुटकळ भूमिका करण्यात त्याचा वेळ फुकट जातेय हे नक्की. लवकरच येणा-या त्याच्या 'द वर्ल्ड्स एन्ड' कडून मात्र अपेक्षा आहेत.
मी स्वतः मूळ स्टार ट्रेक चित्रपटमालिकेचा फार मोठा चाहता नव्हतो. प्रामुख्याने त्यांच्या रिजिड फॉरमॅटमुळे आणि काहीशा मध्यम दर्जाच्या सादरीकरणाने. त्यामुळे या दोन्ही गोष्टीत बरीच सुधारणा करणा-या रीबूटचं मी तरी स्वागतच केलं आहे. ही मालिका अंतिमतः स्टार वॉर्सच्या दर्जाला जाण्याची शक्यता नाही ती तिच्या संकल्पनेच्या मर्यादांमुळे हे खरं असलं, तरी त्यांमधली तुलनाही त्यांनी निवडलेल्या भिन्न् दिशांमुळे योग्य नाही. स्टार ट्रेकच्या विश्वापुरतं बोलायचं, तर एन्टरप्राईज सध्या तरी योग्य चालकांच्या हातात आहे असा विश्वास वाटावा.
- गणेश मतकरी
8 comments:
i watch this film last week at metro in 3d format print is very bad and blur (not so clear) i feel screen play is typical masala and nothing special as i expected from dir.J.J.
who give lost series ,mI3.
according to point of view its just add on franchise buildup for money making i dont think so its memorable film belong to star trek saga
Kaustubh, all I can say is that you should watch it at a better screen. I saw it at Gorgaon PVR at Oberoi Mall. It was a very good projection, and I had no complaints about 3D. Although I wouldn't have minded 2D as well. My reaction to the first half was that they r on auto pilot (But a fairly good auto pilot) I liked the second half much better. Although I hope they address the role reversal in the next film. I think it's a good film, but don't compare it to Dark Knight.
Will try and watch this movie this week. Is watching the Wrath of the Khan (again off course) before this movie is advised?
not necessary Nitin .
Well said, Ganesh.
I think this film does well for the franchise, with all it's shortcomings (that only ardent trekkies would be pointing to). But I don't mean only in monetory terms. This has hope of continuation, and the credit goes to JJ. Was the second episode of Lost 'memorable'? I guess we will have to see how he takes this storytelling further. Although I have heard rumors that The third movie is in the pipeline, but JJ's involvement is a questionmark.
One more point of difference (in addition to those you mentioned) between Star Wars and Star Trek is that the former is a 6 movie saga loved and followed by generations of cinemagoers, whereas the latter can be said to be truly an example of transmedia storytelling. 10 movies, 5 TV shows. Even this 2 movie old Reboot is part of that grand scheme. As you said, रिबूटमागची कल्पना ही केवळ जुना चाहता वर्ग जसाच्या तसा ठेवणं एवढीच नसते, तर चित्रपटमालिकेचं स्वरुप नव्या पिढीच्या आवडीनिवडींशी जोडलेलं ठेवत ती चालू राहील हे पाहाणं हेदेखील असतं. and this movie does that eminently.
Your comment about Simon Pegg reminds me of the same criticism Whoopie Goldberg had faced after appearing in TNG.
Your comment ही मालिका अंतिमतः स्टार वॉर्सच्या दर्जाला जाण्याची शक्यता नाही ती तिच्या संकल्पनेच्या मर्यादांमुळे हे खरं असलं, तरी त्यांमधली तुलनाही त्यांनी निवडलेल्या भिन्न् दिशांमुळे योग्य नाही. is fair, but Let me state it for the record that it is this self-imposed (by Roddenberry) limitation of staying within the scientific (and psyudo-scientific) laws and the strict adherance to the physical form of our galaxy is what has given Star Trek respect and fans in the scientific community.
You open doors to possibilities when you say "Long time ago in a galaxy far far away". But it is impressive to see the amount of creative material coming out of a concept that does not even let writers overrule the Heisenberg Principle.
Fantasies do entertain, but this franchise shows a possible future, and that to me is a different kind of entertainment.
'बॉम्बे टॉकीज'वर नाही लिहिणार का?
pahila nahiy meghana
पाहणारपण नाही का? मला तुमचं मत वाचायची उत्सुकता आहे. :)
Post a Comment