(नॉ़ट) अबाउट एली

>> Sunday, May 26, 2013


कल्पना करा, की तुम्ही उच्च मध्यमवर्गीय समाजाचा एक मान्यवर घटक आहात. तुमचं आयुष्य सुरळीत, आनंदात चाललंय. वैवाहीक जीवनात तर तुम्ही सुखी आहातच, वर तुम्हाला अनेक जवळचे, विश्वासाचे मित्र आहेत. तुम्ही स्वतःचं असं जग तयार केलय जे सुरक्षित, ओळखीचं आहे, जे कधी बदलणार नाही, तुम्ही या कोषात कायम समाधानी राहाल. आणि एके दिवशी अचानक असं काहीतरी होतं, की या कोषाला तडे जातात. ज्या गोष्टी आजवर तुम्ही गृहित धरल्या होत्या, त्या धरणं योग्य होतं का असा प्रश्न तुम्हाला भेडसावायला लागतो. आजवर जपलेली नाती क्षणात मातीमोल होतात आणि तुम्ही एकटे आहात असं तुमच्या लक्षात येतं. यात तुमचं कुठे चुकलं हेच मग तुम्हाला कळेनासं होतं.
' ए सेपरेशन' चित्रपटाच्या निमित्ताने बर्लिन महोत्सवातल्या सर्वोच्च पारितोषिकापासून थेट आँस्करपर्यंत धडक मारणा-या इराणी दिग्दर्शक असगर फरहादीच्या त्याआधीच्या 'अबाऊट एली' (२००९) चित्रपटात दिसणारी ही मध्यवर्ती कल्पना आपल्या रोजच्या आयुष्याशी सहजपणे जोडली जाऊ शकणं यातच या चित्रपटाचं खरं यश आहे.
एका दृष्टीने पाहिलं तर 'अबाऊट एली' हे नाव दिशाभूल करणारं आहे. कारण चित्रपट हा एलीविषयी नसून तिच्या निमित्ताने आहे. तिच्या संबंधातल्या एका घटनेने सामान्य पण आनंदी आयुष्य जगणा-या एका मित्रपरिवारावर काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दिसतं.
सेपरेशन आणि अबाऊट एली यांमधे तुलना होणं हे अपेक्षित आहे, आणि ती केवळ तुलनेसाठी केलेली तुलनाही मानता येणार नाही. या दोन्ही चित्रपटांची जात, ही बरीचशी एकमेकांसारखी आहे. दोन्ही चित्रपट हे कोणाही सामान्य माणसाच्या आयुष्यात येण्याची शक्यता असणा-या परिस्थितीपासून सुरुवात करतात आणि पुढे थोड्याफार थ्रिलरच्या वळणाने पुढे सरकतात. तरीही त्यांच्यात मांडलेला आशय हा सामाजिक वळणाचा राहातो. त्यांचे शेवट हे थ्रिलरचा मार्ग न स्वीकारता मनुष्यस्वभावाच्या मुलभूत पैलूंशीच जोडलेले राहातात. तरीही एक छोटा फरक. सेपरेशन मधली समाजावरची टीका, ही काही प्रमाणात इराणच्या सध्याच्या परिस्थितीशी जोडलेली, कन्ट्री स्पेसिफिक होती असं मानता येईल ( जरी त्यातला आशय हा अधिक विस्तृत होताच)  , पण एली बद्दल मात्र मला तसं वाटलं नाही. माझ्या मते एलीमधलं चित्रण हे जगाच्या पाठीवर कुठेही चालू शकणारं आहे.
चित्रपटातली एली ( तराने अलीदूस्ती) ही आपल्या सेपिदे( गोल्शिफ्ते फराहानी) या मैत्रिणीसोबत सहलीला आलेली आहे. सोबत आहेत सेपिदेचं कुटुंब आणि त्यांच्या मैत्रीतली इतर दोन कुटुंब. त्यांची मुलं वगैरे. बरोबर त्यांचा एक घटस्फोटित मित्रही आहे, अहमद ( शाहाब होसेनी) नावाचा. यातलं कोणीच एलीला ओळखत नाही आणि तसं असतानाही तिला आणल्याबद्दल सेपिदेचा पती आमीर ( मनी हागेगी) काहीसा त्रासलेला आहे. सेपिदेची योजना आहे, ती एली आणि अहमदचं लग्न जुळवून देण्याची , ज्यासाठी तिने हा सारा घाट घातला आहे. सहलीच्या सुरूवातीलाच पहिला अडथळा येतो तो राहाण्याच्या जागेचा. काही कारणाने त्यांना त्याचा नेहमीचा बंगला मिळत नाही आणि  एका मोडकळीला आलेल्या घरात त्यांना मुक्काम ठोकावा लागतो. घर एकाकी समुद्रकिना-यावर. सेलफोनचा सिग्नल नाही. अशा परिस्थितीतही मंडळी सेटल होतात. साफसफाई करतात. गप्पा ,खेळ यांना सुरुवात होते. आधी परकी वाटत असलेली एली सगळ्यांनाच आवडायला लागते. अहमदलाही.
आता हा चित्रपट अमेरिकन असता, तर निर्मनुष्य किना-यावरल्या पडक्या घरातल्या लोकांना दुस-या दिवशीची सकाळ दिसणं कठीण झालं असतं पण हा चित्रपट इराणी असल्याने सकाळ सुरळीत होते.  पण मग काहीतरी घडतं. इतरांसारखं तीन दिवस न थांबता लगेच परतण्याची इच्छा असणा-या एलीला सगळे थांबण्यासाठी पटवतात पण कोणाचं लक्ष नसताना एली गायब होते. पेमानचा ( सेपरेशन मधल्या भूमिकेसाठी बर्लिनमधे पुरस्कारप्राप्त ठरलेल्या पेमन मोआदीची पहिली भूमिका) छोटा मुलगा समुद्रात बुडताबुडता वाचतो आणि एली त्याला वाचवायच्या प्रयत्नात समुद्रात तर बुडली नसेल, असा एक विचार समोर येतो.
अबाऊट एलीचा सुरुवातीचा भाग अनेकाना कंटाळवाणा वाटतो असं मानलं जातं. मला स्वतःला तो तसा वाटला नाही, तोदेखील मी इराणी चित्रपटांचा खास प्रेमी नसूनही. या सा-यांच्या वागण्या बोलण्यात एक विलक्षण जिवंतपणा आहे आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे बारीकसारीक मामुली तपशीलही मला पाहावेसे वाटले. हवं ते घर न मिळाल्याबद्दलची कुरबूर, अहमद-एलीची चिडवाचिडवी, सिनेमाची नुसत्या हावभावावरुन नावं ओळखण्याचा डम्ब शराडचा खेळ हे सारं आपल्याला या लोकांमधे गुंतवत नेतं. हा भाग काहीसा संथ आणि अर्थात काही विशेष न घडणारा आहे हे उघड आहे, पण घडवणं हे त्याचं कामच नाही. प्रेक्षकाला पात्रांच्या जितक्या जवळ नेता येईल तितकं नेण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो कितपत यशस्वी होतो यावरच पुढल्या भागाचं यश अवलंबून आहे.
चित्रपटांचे पटकथा संवाद हे अनेकदा चित्रपटाला तारक किंवा मारक असतात. एलीमधली संहिता ही प्रत्यक्ष लिहीलेली असण्यापेक्षा दिग्दर्शक आणि कलाकारांनी मिळून केलेल्या इम्प्रोवायजेशनच्या ताकदीची आहे. ती सर्वगुणसंपन्न नाही ( मला जाणवलेला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे एली बुडली असावी या निष्कर्षापर्यंत या पात्रांनी पोचण्यातली अँम्बिग्विटी म्हणावी लागेल) मात्र त्याला जोरकसपणा आणि प्रेक्षकांना ( त्यांना या मंडळींचं वागणं पटत असो वा नसो) आपल्याबरोबर घेऊन जाण्याची ताकद मात्र आहे. आपण यातल्या त्रुटींचा विचार करत बसत नाही, तर चित्रपटाबरोबर पुढे जात राहातो.
एलीचं रहस्यमय पध्दतीने गायब होणं ही यातली महत्वाची आणि पुढला जवळपास पासष्ट टक्के भाग घडायला कारणीभूत असलेली घटना असली तरी तत्वतः हा रहस्यपट नव्हे, आणि हे रहस्य शेवटी उलगडेल वा नाही यावर त्याचा परिणामही अवलंबून नाही ,कारण मी मघाशी म्हणाल्याप्रमाणे हा चित्रपट एलीचा नाहीच. एली नाहीशी होताच सेपीदेसह सर्वांच्या लक्षात येतं की आपल्याला तिची किती थोडी माहिती आहे. मग चालू होतात ती प्रश्नोत्तरं , झाल्या घटनेला कोण जबाबदार यामागचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक क्षणाला या वरवर आनंदी ,सुखवस्तू अगदी आपल्याचसारख्या सामान्य माणसांच्या एकमेकांतल्या संबंधांना पडत जाणारे तडे.
फरहादीच्या चित्रपटांमधे माणसाचं बाह्यरुप आणि अंतरंग , त्याने समाजात वावरताना ओढलेला बुरखा आणि त्याची खरी ओळख यासंबंधात काही एक निश्चित विचार दिसून येतो. सेपरेशन मधे तो होता, आणि या, त्याआधीच्या निर्मितीतही तो आहे. आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला किती आेळखतो? आपलं वागणं हे नेहमीच आपल्या विचारांशी सुसंगत असतं का? आपल्या वागण्यामागचा हेतू चांगला असणं  त्या वागण्यामुळे ओढवलेल्या अनिष्ट परिणामाचं समर्थन असू शकतं का? असे अनेक प्रश्न या चित्रपटाला पडतात. माणसाच्या स्वभाविषयीही त्यात काही मूलभूत निरीक्षणं मांडली जातात. तणावाखाली माणसाचा मुखवटा गळून त्याचं मूळ व्यक्तिमत्व उघड होतं , दुस-याबद्दलचा अविश्वास हा माणसाचा खरा स्वभावधर्म आहे, आणि बिकट प्रसंगी तो साधं सत्य सांगण्यापेक्षा गुंतागुंतीचं पण खोटं बोलणं पसंत करतो अशी पटण्यासारखी मतं तो नोंदवतो.
 सेपरेशनचा छायानिर्देशक (महमूद कलारी ) आणि अबाऊट एलीचा छायानिर्देशक ( हूसेन जफारिआ) वेगळे आहेत ,मात्र दोन्ही चित्रपटांची दृश्यशैली तीच आहे. सलग मोठे टेक्स टाळून अनेक छोट्या तुकड्यात आणि बरंचसं स्टेडीकॅम/हॅन्डहेल्ड पध्तीचं चित्रण इथे दिसतं . ही दृश्यशैली देखील गतीचा आभास तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. मुळात एकच लांब आणि सलग प्रसंगमालिका असल्यासारख्या या चित्रपटात त्याचा खूपच उपयोग आहे.
मी या चित्रपटाची वेळोवेळी सेपरेशनशी तुलना केली आहे , मात्र या तुलनेपलीक़डे जाऊन मी यातल्या एकाला दुस-यापेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करणार नाही. हे दोन्ही चित्रपट आपापल्या जागी लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मात्र तुम्ही यातला एक पाहिला असेल तर दुसरा जरुर पाहा असं सुचवणं मात्र माझं काम आहे.
- गणेश मतकरी

2 comments:

Meghana Bhuskute May 26, 2013 at 10:22 PM  

हं. सेपरेशन नाही पाहिलाय मी. पाहीन. खूपच ऐकलं त्याबद्दल. अबाउट एली बघून मला एक दिन अचानकची आठवण झाली होती.

ganesh May 26, 2013 at 10:32 PM  

I haven't seen ek din achanak but plan to, after sushma datar mentioned it in her comment.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP