वर्ल्ड वाॅर झी- तिसरं महायुध्दं?

>> Sunday, June 23, 2013

डॅनिएल एच विल्सनची 'रोबोपोकॅलिप्स'( २०११) आणि मॅक्स ब्रुक्सची ' वर्ल्ड वाॅर झी' (२००६)या दोन कादंब-या लोकप्रिय वाङमयप्रकारात राहूनही प्रयोग करणा-या कादंब-यांची हल्लीची उत्तम उदाहरणं म्हणता येतील. दोन्ही कादंब-यांमधे मानवजातीला भयानक आपत्तींना तोंड द्यावं लागलय, आणि आता ती सावरत आली आहे. दोन्हीमधे त्या त्या आपत्तींचा आढावा हा महत्वाच्या प्रातिनिधिक क्षणांमधून घटनांमधून घेतलेला आहे.  जरी दोन्ही कादंब-या असल्या तरी रोबोपोकॅलिप्सचा फाॅरमॅट अधिक डाॅक्युमेन्टरी वळणाचा , मुलाखतींबरोबर व्हिडिआे चित्रण गृहीत धरणारा आहे. मॅक्स ब्रुक्सने आपण या इतिहासाची नोंद घेणारा अधिकारी असल्याची कल्पना करुन प्रामुख्याने मुलाखतींची ट्रान्स्क्रिप्टस संकलित केल्याचा फाॅर्म आपल्या पुस्तकासाठी वापरला आहे. जगभर पसरलेल्या या आपत्तीचा उगम , प्रसार आणि अखेर याबद्दलची ही नोंद असल्याने नावातला जागतिक संदर्भ योग्यही आहे. . एक मात्र खरं ,की दोन्हीमधे येणा-या आपत्तींमधे वरवर साम्य असलं , तरी मूलभूत पातळीवर त्या  परस्परांहून भिन्न आहेत.
रोबोपोकॅलिप्स मधे यंत्रांनी मानवजातीशी युध्द पुकारल्याची कल्पना आहे तर वर्ल्ड वाॅर झी मधे होणारा हल्ला हा झाॅम्बी वा तशी लक्षणं दाखवणा-या रोगग्रस्त माणसांचा आहे. प्रत्यक्षात झाॅम्बींशी लढावं लागत असल्याने त्यात युध्दाच्या हिंसक इमेजरीला स्थान असलं तरी हे पारंपरिक अर्थाने युध्द नसून भयानक रोगाची साथ आहे. त्याचं या प्रकारचं चित्रण हे झाॅम्बींंना त्यांच्या भयाच्या कवचातून बाहेर काढतं आणि त्याच्या कथनाचा नोंदवहीसारखा दृष्टिकोन, त्याची शैली परिचित भयकथांच्या जवळ जाऊ देत नाही.
पुस्तकाबद्दल एवढं सांगितल्यावर हेही सांगायला हवं की मार्क फाॅस्टर दिग्दर्शित 'वर्ल्ड वाॅर झी' चित्रपट हा पुस्तकाहून खूपच वेगळा आहे. पुस्तकाला म्हणावा असा नायकच नाही. आहेत त्या सुट्या घटना आणि त्यांमधून तयार होणारा एक आलेख. या घटनांमधे स्वतंत्रपणे नाट्य जरुर आहे, किंबहुना त्यातल्या काही तर कथा म्हणून उत्कृष्ट वाटतीलशा आहेत, पण त्यांना एकत्रितपणे बांधणारी प्रातिनिधिक नायक व्यक्तिरेखा, त्यात नाही. अशा व्यक्तिरेखेखेरीज या चित्रपटाला अस्तित्व असणं कठीण असा व्यावसायिक विचार निर्मात्यांनी ( ज्यात ब्रॅड पिट स्वतःही आहे)  केला असावा. मग यावर मार्ग काय, तर अशी एक व्यक्तिरेखा तयार करणं, जी नायकसदृश असेल, आणि तिच्या आधारे चित्रपट जागतिक वारी करु शकेल.
हा नायक आहे जेरी लेन ( ब्रॅड पिट) . एकेकाळी यु एन साठी काम करणारा अधिकारी पण सध्या निवृत्त. चित्रपट जेरीला धरुन राहातो आणि त्याची उपस्थिती कायम ठेवत कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातले पहिले दोन सिक्वेन्सेस अतिशय चतुर पटकथेचे नमुने आहात. पहिला आहे तो केवळ एक प्रसंग ज्यात आपल्याला जेरीच्या कुटुंबाची आणि कौटुंबिक जीवनाची थोडक्यात आेळख करुन दिली जाते. चित्रपटाचा अवाका मोठा असल्याने त्याला बिनमहत्वाच्या गोष्टींवर घालवायला वेळ नाही. मात्र बराच काळ जेरी एकटा राहाणार हे उघड असल्याने प्रेक्षक भावनिकरीत्या समरस होण्यासाठी त्याला एक तो पैलू असणंही आवश्यक. या प्रसंगात थोडक्यात तो कोण आहे याची थोडक्यात पण पूर्ण आेळख करुन दिली जाते जी संपूर्ण चित्रपटात कामाला येते.
दुसरा सिक्वेन्स मोठा आहे. तो म्हणजे जेरीशी आणि  प्रेक्षकांशी होणारी झाॅम्बीजची पहिली आेळख. ही प्रसंगमालिका सुरू होते, ती गाडीच्या अंतर्भागात,आनंदी  जेरी आपली पत्नी आणि दोन मुलींबरोबर ट्रॅफिक मधे अडकला असताना आणि शेवट होतो तो हेलिकाॅप्टरमधून निघालेला, पुढल्या क्षणाची खात्री नसलेला जेरी हेलिकाॅप्टरमधून खालच्या उध्वस्त शहराकडे पाहात असताना. यातला विनाश हा मायक्रोपातळीवर, पोलिसच्या बाईकने जेरीच्या गाडीचा आरसा तोडण्यापासून सुरु होतो आणि संपतो तो मॅक्रो पातळीवर, संपूर्ण शहराचं रणभूमीत रुपांतर झाल्यावर. इथे आपल्याला झाॅम्बींपासूनचा खरा धोका कळतो, इतर चित्रपटांहून वेगळी असणारी झाॅम्बींची प्रचंड गती दिसते, ही साथ कशी पसरते हे दिसतं, विनाशाच्या विविध पातळ्या दिसतात, आणि एकूणच बर््याच गोष्टी स्पष्ट होतात. चित्रपट झाॅम्बी फिल्म चित्रप्रकारातला असूनही त्याची प्रकृती ही अधिक अॅक्शन थ्रिलर वळणाची असेल हेदेखील आपल्याला इथेच समजतं.
मला सामान्यतः क्राॅस जेनेरीक फिल्म्स आवडतात. मात्र त्या त्या चित्रप्रकाराची वैशिष्ट्य त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला तर अधिक आवडतात. वर्ल्ड वाॅर झी, हा हाॅरर, साय फाय आणि अॅक्शन थ्रिलर यांच्या तिठ्यावर उभा आहे, मात्र तो थ्रिलर्सची वैशिष्ट्य जितक्या प्रामाणिकपणे उचलतो तितकी इतर दोन प्रकारची घेत नाही. भयपटांवर या भानगडीत फारच अन्याय होतो. हा चित्रपट सामान्य भयपटांप्रमाणे केवळ प्रौढांसाठी असू नये असा चित्रकर्त्यांचा इरादा आहे, पण ते साधताना त्यांना अनेक गोष्टींमधे पाणी घालावं लागतं. रक्ताबिक्ताचं प्रमाण तर कमी करावंच लागतं पण झाॅम्बींनी इतर लोकांना मारणंही सूचक किंवा बर््याच प्रमाणात आॅफ स्क्रीन ठेवावं लागतं. यामुळे या चित्रप्रकाराचा प्रभाव पुरेसा उरत नाही. तरीही परिणामकारक ठरते ती झाॅम्बींची प्रचंड संख्या आणि गती. मी झाॅम्बी स्कूलच्या सर्वे सर्वा जाॅर्ज रोमेरोचे हल्लीचे काही चित्रपट पाहिले नाहीत पण सामान्यतः झाॅम्बींची गती खूप संथ असते. ती वाढवणारा आणि रोगाच्या साथीचं कारण पुढे करणारा डॅनी बाॅइलचा '२८ डेज लेटर' आला होता, आणि मथीसनच्या कादंबरीवर आधारीत 'आय अॅम लेजन्ड' मधेही त्याच्या छटा होत्या, पण त्यात ' झाॅम्बी' असणं नसणं इतकं महत्वाचं नव्हतं. इथे उघडच ते आहे.
या चित्रपटाची रचना ही प्रामुख्याने सेट पीसेसची बनलेली आहे. जेरीला विविध देशांत येणारे अनुभव ,ही थीम झाल्याने त्याला इलाज नाही. फाॅस्टरने याआधी बाॅन्ड सीरीजमधला 'क्वान्टम आॅफ सोलेस' केल्याने, ही रचना त्याला नक्कीच परीचयाची आहे.  हे तुकडे स्वतंत्रपणे चांगले आहेत. मला स्वतःला यातला जेरुसलेमचा भाग खूप आवडला जो बराचसा सेल्फ कन्टेन्ड आणि मूळ पुस्तकाची आठवण करुन देणारा आहे. शेवटाकडचा रेझोल्यूशनकडे नेणारा तुकडाही असाच जमलेला पण भयपटाच्या अधिक जवळ जाणारा आहे. मात्र या तुकड्यांचा एकत्रित परिणाम मात्र जितका हवा तितका चढत नाही. गोष्टीची भव्यता राहाते, पण वर्ल्ड वाॅरची पातळी गाठते असं वाटत नाही. अशी शक्यता आहे, की चित्रपट एका टप्प्यापर्यंत आणून पुढल्या भागांमधे त्याला वाढवत न्यावं अशी कल्पना असेल. पण तसं असेल तर हा शेवट गरजेपेक्षा अधिक पुरा वाटतो.
शक्यता अशी आहे की मुळात प्रयोग असणार््या या कादंबरीच्या रुपांतरातही हा प्रयोग राहाता तर कदाचित ते रुपांतर अधिक प्रभावी ठरलं असतं. मात्र ब्रॅड पिटचं नाव जोडलं गेल्याने त्याच्या निर्मितीत अधिक खर्च करता आला आणि आता त्याला प्रेक्षकही अधिक मिळतील हेही तितकच खरं . शेवटी त्यालाही अमुक एका प्रमाणात महत्व आहेच !
पोस्ट स्क्रिप्ट - कदाचित या पुस्तकावर काॅल आॅफ ड्यूटी किंवा माॅडर्न काॅम्बॅट मालिकेसारखा गेम अधिक परिणामकारक झाला असता, ज्यात एकाएेवजी अनेक नायक असतील आणि खेळणार््याला वेगवेगळ्या भूमिकेतून खेळून कथाभाग पूर्ण करता येईल. सध्याच्या त्यांच्या टॅब्लेट/ फोन गेम मधे मात्र त्यांनी अशी योजना केलेली नाही. इथली मुख्य भूमिका जेरीची नसली ,तरी नायकाची व्यक्तिरेखा एकच आहे.  असो, ही कल्पना गेम डेव्हलपर्सकडून सुटणारी नाही, त्यामुळे या नाही, तर वेगळ्या नावाने तिची अंमबजावणी होईलच हे नक्की.
-गणेश मतकरी.

Read more...

मॅन आँफ स्टील- अर्थात सुपरमॅन (फायनली) रिटर्न्स

>> Monday, June 17, 2013

सुपरमॅनची आपल्या डोळ्यासमोर एक निश्चित प्रतिमा आहे. त्याचा आयकाॅनिक वेष, त्याची भल्या माणसाची इमेज, त्याचा लुईस लेनबरोबरचा जन्टलमनरी रोमान्स हे सगळं आपल्या परिचयाचं आहे. डिसीचा दुसरा मोठा नायक बॅट मॅन, याच्या पूर्ण विरोधात अशी ही प्रतिमा आहे. सावल्यांमधे वावरणा-या, अनेक मुलींबरोबर वरवरची लफडी करतानाही मनातून एकट्या पडलेल्या आणि शक्तीपेक्षा युक्तीवर अवलंबून राहाणा-या ब्रूस वेन अर्थात बॅट मॅनच्या तुलनेत सुपरमॅनची सूर्याची ओढ आणि न्याय अन्यायाचे सोपे ढोबळ नियम हे अनेकदा अधिक पटणारे, पचणारे वाटतात. हाच सरळपणा त्याच्या कथांच्या तपशीलातही आहे. खेडेगाव आणि शहर यांची स्माॅल व्हिल आणि मेट्रोपोलिस ही नावं, कथानकांमधे  रहस्यांहून अधिक प्रमाणात एन्वायर्नमेन्टल मुद्द्यांना येणारं महत्व, कथनशैलीचा साधेपणा, चित्रांची क्लासिक ठेवण या सार््यातून सुपरमॅन एक भरवशाची यशस्वी नायक व्यक्तिरेखा बनली आहे. नाही म्हणायला सुपरमॅनला त्याच्या पुस्तकी अवतारात रिइन्व्हेन्ट करण्याचे कमी प्रयत्न झालेले नाहीत. विविध चित्रकार आणि लेखकांकडून त्याच्या कथांमधे दृश्य आणि रचनात्मक बदल करण्याचे झालेले प्रयत्न, डूम्सडे कडून ओढवलेला त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म, तथाकथित समांतर विश्वांशी जोडलेले या व्यक्तिरेखेचे धागे, डि सी च्या एल्सवर्ल्ड मालिकेमार्फत वेगवेगळ्या कल्पित विश्वांमधे होणारी त्याची सफर, हे सारं आहेच. पण त्या सगळ्यातूनही त्याची मूळची लार्जर दॅन लाईफ सज्जन प्रतिमा तशीच राहिली  आहे. ही प्रतिमा , 'सुपरमॅन' हे नाव घेताच तिच्या बारीकसारीक कंगो-यांसह डोळ्यापुढे उभी राहाते. त्यामुळे जेव्हा या व्यक्तिरेखेवर आधारीत चित्रपट ,' सुपरमॅन' या शब्दाला आपल्या नावातून टाळतो, तेव्हा त्यामागे काय कारण असेल असा प्रश्न उपस्थित होतो.
आणि कारण अर्थातच आहे. झॅक श्नायडर दिग्दर्शित आणि क्रिस्टफर नोलन निर्मित ' मॅन आॅफ स्टील'चा प्रयत्न हा गेल्या काही ( म्हणजे दुस-या भागापासून पुढल्या) भागांमधून आपला चार्म हरवून बसलेल्या या आेरिजिनल महानायकाला त्याच्या नेहमीच्या प्रतिमेपासून बाजूला काढून रिइन्व्हेन्ट करण्याचा प्रयत्न करतो. काहीसा नोलनने आपल्या बॅटमॅन चित्रत्रयीमधून केला होता तसाच. त्यात त्याची क्रिप्टोनवरुन झालेली क्लासिक पाठवणी ,किंवा केन्ट कुटुंबात त्याचं मोठं होणं असे भाग जरुर येतात पण त्यांच्या संकल्पनेत आणि दृश्य सादरीकरणातही पारंपारीक दृष्टीकोनापेक्षा वेगळेपणा आहे. सुपरमॅन या नावामागचं परिचित वातावरण टाळण्याकडे असलेला कल, हा टायटलमधून हे लोकप्रिय नाव नाहीसं करण्यामागे असावा.
श्नायडरच्या डोक्यातला सुपरमॅन हा आधीच्या सुपरमॅन चित्रपटांपेक्षा आणि काॅमिकबुक वर्जनपेक्षाही बराचसा गडद आहे. त्याच्या मूळ कल्पनेतली फॅन्टसी गृहीत धरूनही थोडा वास्तववाद आणण्याचा प्रयत्न आहे. या वास्तववादाच्या पातळ्याही वेगवेगळ्या आहेत. कधी तो दृश्यांचा ग्लॅमरस बाज काढून टाकून त्यांना खरोखरीच्या जगात कुणीतरी डिजिटल कॅमेराने टिपल्यासारखी राॅ दाखवणारा  आणि काॅम्पोजिशन्सच्या सांकेतिक कल्पनांना बाजूला ठेवत तो क्षण पकडण्यासाठी धावणार््या कॅमेरासारखा  दृश्यात्मकतेशी जोडलेला आहे. कधी तो  क्लार्कच्या मानलेल्या वडिलांनी ,जोनथन केन्टनी ( केव्हिन काॅसनर) दिलेल्या आपलं गुपित लपवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याच्या टोकाच्या प्रॅक्टीकल अॅडव्हाईससारखा विचारांच्या पातळीवरला आहे. तर कधी खलनायकाचा वाईटपणा आपण सीमेच्या कोणत्या बाजूने त्याच्याकडे पाहतो आहोत यावर अवलंबून असल्याचं जाणणारा, संकल्पनांच्या पातळीवरला आहे.
मध्यंतरी आलेला स्टार ट्रेक - इन्टू डार्कनेस  जसा मूळ मालिकेच्या दुसर््या भागात येऊन गेलेल्या 'खान' या लोकप्रिय खलनायकाला कथानकात आणतो, तसाच मॅन आफ स्टीलदेखील मूळ सुपरमॅन मालिकेच्या दुस-या भागातल्या जनरल झाॅडचं पुनरुज्जीवन करतो. इथला झाॅड (मायकेल शॅनन) हा मूळ चित्रपटातल्यासारखा केवळ खुनशी मात्र नाही. त्याला स्वतःचं पटण्याजोगं तर्कशास्त्र आहे.  आेव्हरअॅक्टींग हा एक गुन्हा सोडता त्याचं इतर वागणं हे समर्थनीय आहे. क्रिप्टाॅनला पुनरुज्जीवन देण्याच्या नादात पृथ्वीवासियांकडे काणाडोळा करण, हे त्याच्या दृष्टीकोनातून पाहाता पटायला काय हरकत आहे? शेवटी त्याच्या जागी पृथ्वीवासी असता, तर त्याने आपल्या लोकांपुढे क्रिप्टाॅनचे रहिवासी जगतात का मरतात याची पर्वा केली असती का?
रचनेच्या बाबतीत 'मॅन आॅफ स्टील' एक मजेशीर गोष्ट करतो. तो अपेक्षेप्रमाणेच  उध्वस्त होऊ घातलेल्या क्रिप्टाॅनवर ( मार्लन ब्रँडोची तुल्यबळ रिप्लेसमेन्ट ठरणा-या रसेल क्रो सह) सुरुवात करतो, पण पुढे तो बालपण ,तारुण्य, मेट्रोपोलिसमधे डेली प्लॅनेट मधली नोकरी असा परिचित क्रम घेत नाही . तो लाना लँग, जिमी आेलसन, लेक्स लूथर या नेहमीच्या सुपरमॅन स्टेपल्सनाही थारा देत नाही. त्याएेवजी पटकथेत तो दोन लोकप्रिय चित्रप्रकार एकत्र करतो. ते म्हणजे ठराविक सुपरहिरो साहसकथा आणि पृथ्वीविनाश साधणारे 'इन्डिपेन्डन्स डे ' छापाचे विज्ञान/साहस/ फॅन्टसी पट. क्रिप्टाॅन विनाशानंतर तो सुरुवात करतो, ती व्यथित आणि आपल्या असण्यामागचं कारण शोधणार््या , जगापासून दूर पळणार््या आणि लोकांना मदत करतानाही आपलं नाव लपवणार््या क्लार्कवर( हेन्री कॅविल) . योगायोगाने एका बातमीचा पाठपुरावा करत असणार््या लुईस लेनशी (एमी अॅडम्स) त्याची गाठ पडते.  डेली प्लॅनेटचा संपादक पेरी व्हाईट ( लाॅरेन्स फिशबर्न) तिची या विशेष माणसाबद्दलची बातमी छापायला नकार देतो, पण लुईस पाठपुरावा करुन क्लार्कची सारी माहिती शोधते. मात्र प्रकरण पुढे जाणार एवढ्यात जनरल झाॅड आपल्या यानातून पृथ्वीवर येऊन पोचतो आणि आपल्या ग्रहावरल्या रहिवाशाला ताबडतोब हवाली न केल्यास पृथ्वीच्या विनाशाची धमकी देतो. तोवर पृथ्वीवासियांना माहितही नसणारा सुपरमॅन पृथ्वीला वाचवण्यासाठी झाॅडच्या स्वाधीन व्हायचं ठरवतो पण अर्थातच आपल्या ग्रहाचा विनाश झालेला असताना झाॅड आणि त्याचा चमू आयत्या मिळालेल्या पृथ्वीला हातचं सोडतील ही शक्यताही कमीच असते.
मॅन आॅफ स्टीलचा पूर्वार्ध हा नक्कीच उत्तरार्धाहून अधिक चांगला आहे. मला त्यात कमी वेळ असणारा पण  उत्तम लिहिलेला क्लार्क आणि जोनथनचा भाग खूप चांगला वाटला . पण तो सोडूनही त्यात सुपरमॅनला ह्यूमनाईज करणार््या अनेक गोष्टी आहेत. उत्तरार्धात एकदा का लढाई सुरु झाली की चित्रपट नेहमीच्या नासधूस मोडमधे जातो आणि थोडक्या वेळात अधिकाधिक इमारती खाली कशा येतील हे पाहायला लागतो. स्पेशल इफेक्ट डिपार्टमेन्टचं काम एकदम वाढतं आणि चित्रपट व्यक्तींना बाजूला सारुन केवळ भव्यतेच्या मागे जातो की काय असा धोका तयार होतो.  असा धोका यापूर्वी अनेक चित्रपटांना ( उदां बॅटल: लाॅस एंजेलिस, गाॅडझिला) संपवून गेला आहे . मात्र या चित्रपटात तो तसं करत नाही ते दिग्दर्शक श्नायडरमुळे. ज्यांनी या दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपच पाहिले असतील ( ३००, वाॅचमेन, सकर पंच) त्यांना हे माहित असेल की तो मॅक्झिमलिस्ट वर्गात बसणारा दिग्दर्शक आहे. तो कमीत कमी आणि आवश्यक गोष्टींवर फोकस न ठेवता कमी अवकाशात अधिकाधिक गोष्टी भरण्याचा प्रयत्न करतो. अधिक उपकथानकं, मोठे नटसंच, खूप इफेक्ट्स अशी गर्दी करायला त्याला आवडते, पण माझ्या मते तो भरकटत नाही. गंमत म्हणजे ३०० किंवा वाॅचमेन सारख्या ग्राफिक नाॅव्हेल्सवर आधारित चित्रपटात जरी तो त्या त्या काॅमिक इमेजरीला तशीच पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत असला तरी इथला त्याचा सुपरमॅन हा कन्वेन्शनल ग्राफिक्सपलीकडे जाणारा आहे. श््नायडर काय करतोय ते त्याला इथे माहीत आहे आणि केवळ डोळे दिपवणं हा त्याचा हेतू नाही.
या चित्रपटाच्या उत्तरार्धातली इमेजरी ही ९११ ची आठवण करुन देणारी आहे हे  मी सांगायला नको, आणि त्या प्रकारचा हा पहिला प्रयत्न नाही हेदेखील. क्लोवरफील्ड, बॅटल: लाॅस एंजेलिस आणि हल्लीच्या अनेक चित्रपटांतून हा वर्तमानाच्या भीषण रुपाला समांतर पध्दतीने पडद्यावर आणण्याचा प्रयत्न झाला आहे. इथे या अप्रोचचं महत्व आहे ते तो 'सुपरमॅन' सारख्या महत्वाच्या प्रतीमेला ,प्रतिकाला अपडेट करण्याचा प्रयत्न करत असल्याने. नासधूशीत धन्यता मानणार््या अनेक चित्रपटांत एक क्षण असा येतो की आपण पात्र किंवा चित्रपट याची पर्वा करणं सोडतो आणि 'चला, आता खूप झालं' असं म्हणत चित्रपटातला रस काढून घेतो. मॅन आॅफ स्टीलमधे मी त्या क्षणापर्यंत पोचलो नाही. क्लार्क आणि लुईस यांच्यात मला वाटणारा इंटरेस्ट कायम राहिला.
'मॅन आॅफ स्टील' नोलनच्या डार्क नाईट चित्रत्रयीप्रमाणे सुपरमॅनला पुनरुज्जीवन देईल का, हा इथला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. खासकरुन ब्रायन सिंगरचा 'सुपरमॅन रिटर्न्स' अयशस्वी ठरला असताना. मला वाटतं तो ते  करुन दाखवण्याची खूपच शक्यता आहे आणि त्यात नोलनचं निर्मात्यांमधे असणंही फार महत्वाचं नाही. मात्र आवश्यक आहे ते मधे दिग्दर्शक न बदलणं. श्नायडरला पुढचा मार्ग दिसत असल्याचा स्पष्ट संकेत 'मॅन आॅफ स्टील' मधे आहे. तो त्याच मार्गावर राहू शकला तर मार्वलच्या वाढत्या साम्राज्याला तोंड देऊ शकणारा डिसीचा हा सर्वात मोठा नायक पुन्हा स्पर्धेत येईल हे वेगळं सांगायला नको.
-गणेश मतकरी.

Read more...

वुई आर आँन , होऊन जाऊ द्या- एक फिक्स्ड मॅच

>> Monday, June 10, 2013

चित्रपट यशस्वी कधी मानावा यावर मी गेले बरेच दिवस विचार करतो आहे. केवळ त्याची आर्थिक कमाई म्हणजे त्याचं यश का? केवळ त्याला मिळणारं रसिकांचं प्रेम म्हणजे त्याचं यश का?  का त्याच्या कलात्मक दर्जालाही गणितात धरणं आवश्यक आहे? आणि समजा एखादी कलाकृती जर यातल्या एखाद्या पातळीवर यशस्वी होऊन इतर पातळ्यांवर तडजोड करत असेल तर? मग तिचं यश हे यश मानता येणार नाही का? का यातली कोणतीही एक फुटपट्टी चित्रपटाला यशस्वी मानण्यासाठी पुरेशी आहे?
जर माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल, तर मला वाटतं पालेकर-गोखले कृत ( हा शब्द चांगला!) ' वुई आर आँन, होऊन जाऊ द्या' या चित्रपटाला यशस्वी मानायला काहीच हरकत नाही. कारण वुई आर आँनने आर्थिक दृष्टिकोनातून समाधानकारक कामगिरी केली असेल अशी माझी खात्रीच आहे. मात्र ते उत्तर होकारार्थीच असेल अशी माझी अजून खात्री नाही.
या चित्रपटाबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा क्रिकेट मॅच या विषयावर आता पुन्हा चित्रपट करण्याची काय गरज ,ही माझी प्रथम प्रतिक्रिया होती. लगान मधे हा विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या उत्तम रितीने हाताळला गेलाय, की फार रॅडिकली वेगळं काही सांगायचं नसेल तर तो पुन्हा हाताळणं अनावश्यक ठरावं. वुई आर आँन रॅडिकली वेगळं काही सांगत नाही. ( आता मला कोणी प्लीज असं सांगू नका, की तो हिंदी चित्रपट होता आणि हा मराठी आहे, किंवा त्यात ब्रिटीश विरुध्द ग्रामीण भारतीय असा लढा होता आणि इथे सुखवस्तू मध्यमवर्गीय समाजातल्या दोन पिढ्यांमधे तो खेळला जातो हा वेगळेपणा आहे वगैरे) एका मूलभूत पातळीवर हा संघर्ष तोच आहे. खेळाची जाण असणारी आणि हमखास जिंकण्याची शक्यता असणारी एक टीम ,तर खेळाबाबत अनभिज्ञ,कमकुवत पण न्याय्य बाजू लढवणारी दुसरी टीम. यातली कोणती टीम जिंकणार, हे पारंपारिक सुखांतिकांच्या न्यायाने आधीच ठरून गेलेलं. त्यामुळे खरा संघर्षही लुटुपुटीचा, मात्र उत्तम  पटकथा आणि तरबेज दिग्दर्शकाच्या हाती जमण्याची शक्यता असणारा. लगान मधे तो जमून जातो, पण म्हणजे तो वुई आर आँन मधेही तो जमेल असं सांगता येणार नाही.
पालेकरांची ख्याती ही वेगळ्या प्रकारचे चित्रपट करणारा दिग्दर्शक अशी आहे. त्यांचा त्यातल्यात्यात पारंपारिक वळणाचा व्यावसायिक चित्रपट म्हणजे 'पहेली' , मात्र तोही लक्षवेधी होता तो त्याच्या मनी कौलांच्या दुविधावर आधारित असण्यामुळे, ज्यासाठी या रुपांतरालाही एक प्रयोग म्हणता येईल. पण असा वेगळा ट्रॅक रेकॉर्ड असलेला माणूस परिचित नाट्यपूर्ण विषयावर ,सरधोपट विनोदी चित्रपट का काढेल, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि जर काढला , तर त्यात काही वेगळं करुन पाहाण्याजोगं असेल अशी अपेक्षा तयार होते. 'विनोदी का?' याचं एक सोपं उत्तर म्हणजे ऋषिकेष मुखर्जी आणि बासू चतर्जी यांच्या चित्रपटांतून पालेकरांनी केलेल्या उत्तम विनोदी भूमिका. या भूमिकांची आठवण त्यांना त्या मार्गाने येणं शक्य जरुर आहे, आणि या चित्रपटाच्या सुरुवातीला आलेल्या या दोन मोठ्या दिग्दर्शकांची आठवण जागवणा-या पाटीमुळे हा चित्रपट त्या वळणाचा असल्याचा संभव आपल्याला वाटणंही स्वाभाविक आहे, मात्र त्यात तथ्य नाही.
वुई आर आँनचं कथानक हे मुळात विनोदी वळणापेक्षा अधिक नाट्यपूर्ण वळणाचं आहे. त्यातला विनोद हा प्रासंगिक नसून शाब्दिक आहे. तोही फार वेगळ्या शैलीतला नाही . त्यामुळे त्याला प्रामुख्याने विनोदी चित्रपट म्हणून सादर करणं आणि त्यासाठी कमी जास्त वजनाच्या आणि विनोदाची उत्तम जाण असणा-या विनोदी नटांची भली मोठी यादी  चित्रपटात आणणं हा अट्टाहास मुळातच का, हे कळायला मार्ग नाही. एरवीच्या विनोदी चित्रपटांहून कितीतरी अधिक विनोदी नट इथे एकत्र पाहायला मिळतात. पण पाहायलाच. त्यापुढे जाऊन त्यांनी तुम्हाला हसवावं अशी अपेक्षा असेल, तर मात्र ती पुरी होणं कठीण!
चित्रपटाच्या कथानकाबद्दल लिहिण्यासारखं फार काही नाही, कारण मुळात कथानक म्हणण्याजोगं इथे फार काही नाही. ( ते तसं नसणं हे मुळात वाईट नाही. एखाद्या वाक्यात सांगण्याजोग्या कल्पनेवर चांगले चित्रपट होणं सहज शक्य आहे. कल्पना इथे आहे, पण तेवढंच) एका मध्यमवर्गीय वस्तीजवळच्या मैदानात सकाळी चालायला येणारा पेन्शनरांचा गट ( यात दिलीप प्रभावळकर ,आळेकर, अशोक सराफ आणि या वयोगटातल्या इतर लोकांबरोबर अनासपुरे का असतो? हा गट नक्की कोणाचा आहे) आणि तिथे एका क्रिकेट मॅचसाठी प्रॅक्टीस करणारी तरुण मुलं ( यातली बहुतेक जणं पहिल्या गटाच्या मुलांपैकीच) यांच्यात मैदानावरच्या हक्कावरुन होणारा संघर्ष आणि त्यासाठी खेळली जाणारी मॅच हा इथला कथानकाचा ऐवज. लगानप्रमाणेच इथेही उत्तरार्धात मॅच खेळली जाते. ती उत्कंठावर्धक वगैरे मात्र होत नाही.
माझ्या मते इथले दोन प्रमुख प्रश्न आहेत ते मोठ्या संख्येने असणा-या सारख्याच वजनाच्या व्यक्तिरेखा आणि खेळाशी मुळात जोडलेला तोचतोचपणा या संबंधातले. इथे म्हणायला कोणीच प्रमुख व्यक्तीरेखा नाही किंवा म्हंटलं तर सा-याच प्रमुख व्यक्तिरेखा. त्यामुळे सर्वांना मिळणारा पडद्यावरला वेळ लोकशाही तत्वावर समान विभागलेला. त्यामुळे प्रेक्षकांना विशिष्ट व्यक्तिरेखांवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. सर्वच घरांमधले प्रसंग आलटून पालटून येत राहातात , पटकथा मात्र पुढे सरकत नाही. शिवाय ही नटमंडळी विनोदी असल्याने चित्रपटात तथाकथित विनोदी संवादांची रेलचेल. सर्व नट सतत, विश्रांती न घेता बोलतात. त्यातला बराच विनोद 'चावट' वर्गातला. का, कोणाला माहीत. आपला प्रातिनिधिक मध्यमवर्ग इतका सेक्शुअली डिप्रेस्ड आहे ही नवीनच माहिती मला इथे मिळाली.
दुसरा प्रश्न आहे तो पडद्यावरल्या खेळासंदर्भात नेहमीच पडणारा. मुळात कोणताही खेळ हा रिपीटीटीव असतो. तो नियमितपणे पाहाणारे, हे त्याच्या उर्जेसाठी , उतार चढावांसाठी आणि अनपेक्षित निकालासाठी तो पाहातात. एकदा का तो चित्रपटात आला की मुळातच त्याच्या निकालाची अनपेक्षितता निघून जाते आणि गेम फिक्स्ड होतो. कोण जिंकणार हे तुम्हाला समजलेलं असतं आणि तरीही त्यात अनपेक्षिताचा आभास तयार करणं हे आव्हान ठरतं . इथे आपल्या मनात कोण जिंकेल याबद्दल जराही संभ्रम राहात नाही. मग उरतो तो केवळ उपचार.
वुई आर आँन मधे मधल्या काळातल्या सो कॉल्ड विनोदी चित्रपटांप्रमाणे जशी बडबड आहे, तसं सर्वांनी रांगेत उभं राहून बोलणंही आहे. मला वाटलं होतं हल्ली ही पध्दत टाळली जाते. पण नसावी. पूर्वार्धात आपल्याला व्यक्तिरेखांची माहिती दिली जाते आणि निदान थोडी व्हरायटी दिसते. उत्तरार्धात मात्र तेही नाही. एकदा मॅच सुरू झाली की हे का आणि किती वेळ पाहायचं याचा हिशेब उरत नाही. पात्रांचं वागणंही रँडम होत जातं. मग अजित केळकरांची व्यक्तिरेखा स्कोअरबोर्ड लिहायला आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनचे कपडे घालते, मनोज जोशी उगाचच स्त्री वेशात येतात , एका ओव्हरमधे किती बॉल हे माहीत नसलेले प्रभावळकर उत्तम बॅटींग करायला लागतात आणि अचानक टीममधे खेळायला दिलीप वेंगसरकरही येऊन पोचतात. या वेळपर्यंत पटकथेची सारी अपरिहार्यता संपते आणि पाहाणं हादेखील एक उपचारच होतो.
हे असं का होतं याला मला विचाराल तर काही स्पष्टीकरण नाही. मुळात पालेकरांपासून तांत्रिक अंग सांभाळणा-यांपर्यंत ही सारीच टीम चांगली आहे. नटसंचात तर नाटक आणि चित्रपटांमधले अनेक जाणकार आहेत. सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, विजय केंकरे, सतीश पुळेकर आणि इतर अनेकांनाही या माध्यमाची आणि संहीतेची जाण आहे. मग मुळात हा चित्रपट असा का रचला आणि तो सावरण्याचा कोणी प्रयत्न का केला नाही असा प्रश्न उरतोच.
ब-याच वेळा प्रतिकूल लिहिणा-या समीक्षकांवर, परीक्षकांवर अशी टीका होते की ते दिग्दर्शकानी केलेला चित्रपट न पाहाता वेगळाच आपल्या डोक्यातला चित्रपट पाहाताहेत. क्वचित प्रसंगी ही टीका योग्य असते जेव्हा समीक्षक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न न करता नुसती टीका करतात. पण ब-याचदा असंही असतं की समीक्षक चित्रपटातल्या कोणत्या त्रुटी वगळता आल्या असत्या आणि त्यामुळे चित्रपटात काय सुधारणा झाली असती असा विचार करत असतात. त्यामुळे त्यांना मूर्ख वा विरोधक समजणं हे योग्य नसतं. असा वेगळा, डोक्यातला चित्रपट पाहाण्याचा प्रयत्न मी इथे करुन पाहिला, पण तो काही यशस्वी झाला नाही. काही वेळा काही गोष्टी मुळातच फसतात, तसं काहीसं या चित्रपटाचं झाल़य. त्याचा दोष कोणावर हा मुद्दा गौण आहे, इतका चांगला चमू असताना त्याचं तसं होणं ही मात्र दुर्दैवी घटना आहे.
- गणेश मतकरी

Read more...

चित्रांगदा- सत्याचा प्रयोग

>> Sunday, June 2, 2013

ऋतूपर्णो घोष हे नाव आपल्याकडे चांगलंच परीचयाचं आहे, खासकरुन ब्लॉकबस्टर वर्गापलीकडलं चित्रपटांचं अस्तित्व मान्य करणा-या प्रेक्षकांमधे , आणि अशा चित्रपटांमधे काम करु पाहाणा-या कलावंत-तंत्रज्ञांमधे. आजच्या महत्वाच्या आधुनिक भारतीय दिग्दर्शकांमधल्या एक  असणा-या घोषांचं गेल्याच आठवड्यात अकाली निधन झाल्याने आपल्या चित्रपटसृष्टीला मोठाच धक्का बसला आहे. घोषांनी जरी दोनच हिंदी चित्रपट केले असले( रेनकोट आणि अजून अप्रदर्शित सनग्लास)  तरी त्यांच्या बारीवाली, चोखेर बाली, द लास्ट लिअर, अंतरमहल सारख्या चित्रपटातून अनेक परिचित हिंदी चेहरे आपण पाहिलेले आहेत. त्यांचं व्यक्ती म्हणून दर्शन मात्र आपल्याला कमी झालंय आणि त्यातही त्यांच्या दिसण्यात मध्यंतरी आलेल्या मोठ्या बदलाने या व्यक्तीबद्दल अधिक कुतूहल निर्माण झालंय जे स्वाभाविक आहे. त्यांचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला आणि राष्टीय चित्रपट पुरस्कारांनी ज्युरी प्राईज देऊन गौरवलेला 'चित्रांगदा' हा काहीसा त्यांच्यात घडून आलेल्या बदलाशी जोडलेला, आणि वैचारिक दृष्टीने पाहाता आत्मचरित्रात्मक आहे असंही म्हणता येईल.
महाभारतातली अर्जुन जिच्या प्रेमात पडला त्या मणीपुरच्या राजकन्येची, चित्रांगदेची गोष्ट किंवा त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे टागोरांनी त्यावर रचलेली संगीतिका ,ही या चित्रपटाच्या केंद्रस्थानी, संकल्पनेच्या स्वरुपात आहे. मुळात साध्या प्रेमकथेचं संगीतिकेत रुपांतर करताना टागोरांनी , या कथानकात एक महत्वाचा नाट्यपूर्ण बदल केला आहे.
त्यांची राजकन्या चित्रांगदा ही गादीची वारस असल्याने राजाने मुलासारखी वाढवलेली आहे. त्यामुळे तिचं रुप एका योध्यासारखं, पुरुषी आहे. मात्र अर्जुनाला पाहाताच ती प्रेमात पडते आणि त्याला वश करण्यासाठी मदनाकडून आदर्श  स्त्री रुप मिळवते.  ऋतुपर्णोंच्या चित्रपटाची प्रमुख व्यक्तीरेखा रुद्र ( घोष) नृत्यदिग्दर्शक आहे जो ही संगीतिका आपल्या ग्रुपसाठी बसवतोय. स्वतःची सेक्शुअँलिटी किंवा जेंडरही ठरवण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, ही चित्रांगदेमागची सबटेक्स्ट ( सब न ठेवता) रुद्र उलगडून दाखवतो आणि चित्रपटाला सुरुवात होते.
रुद्रची स्वतःची परिस्थिती ही बरीचशी या चित्रांगदेच्या व्यक्तिरेखेसारखी आहे. तो पुरुष असला तरी त्याचं अंतरंग स्त्रीचं आहे. त्याची स्वतःची तसं असण्याला हरकत नसली तरी त्याच्या आई वडीलांना हे मानवलेलं नाही. खासकरुन वडीलांना . एकदा रुद्रची ओळख पार्थो ( अर्थातच अर्जुनाचा संदर्भ) या ड्रमरशी होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकत्र राहण्याची स्वप्नं पाहायला लागतात. पण आपल्या देशात गे पालकांना कायद्याने मूल दत्तक घेता येत नाही( असं चित्रपट सांगतो. खरं खोटं माहीत नाही, पण हे खरं असेल तर तो शुध्द मूर्खपणा म्हणायला हवा. ) यातून मार्ग काढण्यासाठी रुद्र लिंगबदल करून घेण्याचं ठरवतो, आणि रुद्र-पार्थोचं कथानक खरोखरंच चित्रांगदेच्या वळणाने जायला लागतं.
या चित्रपटातली खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तो ज्या मोकळेपणी , या टॅबू असलेल्या विषयाकडे पाहातो तीच. ऋतुपर्णोंनी स्वतः एका मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे त्यांच्याही घरी पारंपरिक वातावरण होतं आणि घरच्यांचा त्यांच्यात दडलेल्या स्त्रीत्वाला व्यक्त होऊ देण्याला विरोध होता. ते असेस्तवर ऋतूपर्णो वरवर पुरुषी वेषा-अविर्भावात राहिले. ते गेल्यानंतर मात्र त्यांनी आपलं व्यक्तिमत्व शक्य तितक्या पारदर्शकपणे लोकांपुढे मांडलं. असं वागणं प्रत्यक्षात आणणं जितकं कठीण आहे ,तितकाच हा त्या वागण्यामागच्या विचारांची चर्चा करणारा चित्रपट बनवणं आणि त्यात प्रमुख भूमिका करणं हेदेखील कठीण आहे. ( ऋतूपर्णोंनी एका स्वतः दिग्दर्शित न केलेल्या चित्रपटात, 'मेमरीज इन मार्च' मधेही या वळणाची भूमिका केली आहे, पण इथलं व्यक्तिचित्रण अधिक अवघड आहे. ) चित्रांगदाला आर्थिक यश मिळालं नाही यात आश्चर्य नाही कारण त्यातला आशय हा आपल्या प्रेक्षकांसाठी फारच नवा आहे. या विषयाकडे पाहाणारा इतका स्वच्छ दृष्टिकोन आपल्या प्रेक्षकाला ( मग तो साहित्य, चित्रपट आणि सर्वच कलांना खूपच मानणारा बंगाली प्रेक्षक का असेना) काहीसा बिचकवणारा आहे. मात्र महत्व याचं, की निदान त्याची निर्मिती होऊ शकली. मराठी वा हिंदी उद्योगात हे होऊ शकलं नसतं.
असं असतानाही मला काही  गोष्टी खटकल्या.  एक म्हणजे टागोरांच्या कथेतला सिम्बॉलिझम आणताना रुपांतर फार शब्दशः होतं. म्हणजे मदनाऐवजी कॉस्मेटीक सर्जन वगैरे (थेट असूनही )आपण समजू शकतो, पण इतर काही गोष्टी खटकतात. म्हणजे चित्रांगदाचं पुरुषी रुप जाऊन प्रेमात पडल्यावर तिनं सुंदर स्त्री  होणं हे संगीतिकेचा भाग असेल पण इथे सेक्स चेंज आँपरेशन वगैरे फापटपसा-याची काय गरज होती? नुसतं घरच्या शिस्तीत वाढल्याने पुरुषी अवसानानने वावरणा-या मुलाला प्रेमाची जाणीव होताच त्याने घरचे पाश तोडून मोकळेपणी व्यक्त होणं, इतकं साधं आणि पटण्यासारखं रुपांतर होउ शकलं असतं. त्यासाठी तपशीलात जाण्याची गरज मला तरी वाटली नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सादरीकरणाचा टोकाचा डेकोरेटीवपणा. ही ऋतूपर्णोंची शैली नाही असं नाही, पण ते ती सरसकट वापरत नसत.  इथे तिचा वापर  काही वेळा कृत्रिम वाटतो. एक साधी गोष्ट म्हणजे नाटकाच्या तालमी. रंगीत तालमी सोडता , प्रत्यक्ष तालमी फार साध्यासुध्या असतात. इलॅबरेट वेशभूषा, प्रकाशयोजना , हे सारं अनावश्यक वाटतं. व्यावसायिक चित्रपटांमधे हे मी शोमनशिपचा भाग म्हणून सहन करीन, किंवा या दिग्दर्शकाच्याही 'नौका डूबी' सारख्या चित्रपटात असे अनावश्यक रेखीव तपशील ते त्या कादंबरीच्या टेक्श्चरशी सुसंगत असल्याने चालून जातात.  पण आशय वरचढ असणा-या चित्रांगदामधे ते योग्य वाटत नाही.
पटकथेची रचना मात्र चांगली आहे. सायकिअँट्रिस्टच्या पात्राला हाताशी धरुन भूतकाळात जाणं खूप नवीन नसलं तरी  अडकवून ठेवणारं आहे. लेखन दिग्दर्शनापासून सारे उद्योग करणा-या अष्टपैलू अंजान दत्तची या भूमिकेसाठी  निवडही महत्वाची आहे. ब-याचदा चित्रपट, हे पटकथेतला काळाचा गुंता हा केवळ एक क्लुप्ती म्हणून , लेअर्ड कथनाचा आभास आणण्यासाठी करताना दिसतात. इथे मात्र तसं होत नाही. त्यातला रुद्र आणि सायकिअॅट्रिस्टच्या चर्चेचा काळ आणि प्रत्यक्ष कथानकाचा काळ यांच्या योजनेमागे काही निश्चित विचार आहे. कथानकाच्या शेवटाचा मुद्दाही चपखल आहे.
मी मध्यंतरी एक अशी तक्रार ऐकली, की यातला लिंगबदलाच्या ट्रिटंन्टचा भाग हा सिम्प्लिफाईड, कथानकाच्या सोयीसाठी केलेला आहे. प्रत्यक्ष होणारी अशा प्रकारची ट्रिटमेन्ट ही बरीच वेगळी असते. इथे वास्तवाचा विपर्यास आहे. या युक्तीवादात मला तरी तथ्य दिसत नाही. गोदारच्या सुप्रसिध्द वक्तव्याप्रमाणे सिनेमा हे २४ फ्रेम्स पर सेकंदाच्या वेगाने पळणारं सत्य असलं, तरी हे सत्य वास्तवाशी प्रत्यक्ष जोडलेलं असण्याची गरज नाही. ते त्या चित्रपटाच्या विचाराशी प्रामाणिक असणं याला खरं महत्व आहे. चित्रांगदा एका प्रसिध्द कलावंताच्या आयुष्यात डोकावून त्याच्यापुरतं पण त्याचवेळी व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित अगदी मूलभूत स्वरुपाचं  सत्य आपल्यापुढे ठेवतो. अशा वेळी त्यातल्या तपशीलाचा  बाऊ करण्यापेक्षा त्याने दाखवलेल्या अधिक मोठ्या सत्याला सामोरं जाणं हेच योग्य ठरतं.  आपल्याकडून या चित्रपटाची अपेक्षाही हीच आहे.
- गणेश मतकरी 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP