मॅन आँफ स्टील- अर्थात सुपरमॅन (फायनली) रिटर्न्स

>> Monday, June 17, 2013

सुपरमॅनची आपल्या डोळ्यासमोर एक निश्चित प्रतिमा आहे. त्याचा आयकाॅनिक वेष, त्याची भल्या माणसाची इमेज, त्याचा लुईस लेनबरोबरचा जन्टलमनरी रोमान्स हे सगळं आपल्या परिचयाचं आहे. डिसीचा दुसरा मोठा नायक बॅट मॅन, याच्या पूर्ण विरोधात अशी ही प्रतिमा आहे. सावल्यांमधे वावरणा-या, अनेक मुलींबरोबर वरवरची लफडी करतानाही मनातून एकट्या पडलेल्या आणि शक्तीपेक्षा युक्तीवर अवलंबून राहाणा-या ब्रूस वेन अर्थात बॅट मॅनच्या तुलनेत सुपरमॅनची सूर्याची ओढ आणि न्याय अन्यायाचे सोपे ढोबळ नियम हे अनेकदा अधिक पटणारे, पचणारे वाटतात. हाच सरळपणा त्याच्या कथांच्या तपशीलातही आहे. खेडेगाव आणि शहर यांची स्माॅल व्हिल आणि मेट्रोपोलिस ही नावं, कथानकांमधे  रहस्यांहून अधिक प्रमाणात एन्वायर्नमेन्टल मुद्द्यांना येणारं महत्व, कथनशैलीचा साधेपणा, चित्रांची क्लासिक ठेवण या सार््यातून सुपरमॅन एक भरवशाची यशस्वी नायक व्यक्तिरेखा बनली आहे. नाही म्हणायला सुपरमॅनला त्याच्या पुस्तकी अवतारात रिइन्व्हेन्ट करण्याचे कमी प्रयत्न झालेले नाहीत. विविध चित्रकार आणि लेखकांकडून त्याच्या कथांमधे दृश्य आणि रचनात्मक बदल करण्याचे झालेले प्रयत्न, डूम्सडे कडून ओढवलेला त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म, तथाकथित समांतर विश्वांशी जोडलेले या व्यक्तिरेखेचे धागे, डि सी च्या एल्सवर्ल्ड मालिकेमार्फत वेगवेगळ्या कल्पित विश्वांमधे होणारी त्याची सफर, हे सारं आहेच. पण त्या सगळ्यातूनही त्याची मूळची लार्जर दॅन लाईफ सज्जन प्रतिमा तशीच राहिली  आहे. ही प्रतिमा , 'सुपरमॅन' हे नाव घेताच तिच्या बारीकसारीक कंगो-यांसह डोळ्यापुढे उभी राहाते. त्यामुळे जेव्हा या व्यक्तिरेखेवर आधारीत चित्रपट ,' सुपरमॅन' या शब्दाला आपल्या नावातून टाळतो, तेव्हा त्यामागे काय कारण असेल असा प्रश्न उपस्थित होतो.
आणि कारण अर्थातच आहे. झॅक श्नायडर दिग्दर्शित आणि क्रिस्टफर नोलन निर्मित ' मॅन आॅफ स्टील'चा प्रयत्न हा गेल्या काही ( म्हणजे दुस-या भागापासून पुढल्या) भागांमधून आपला चार्म हरवून बसलेल्या या आेरिजिनल महानायकाला त्याच्या नेहमीच्या प्रतिमेपासून बाजूला काढून रिइन्व्हेन्ट करण्याचा प्रयत्न करतो. काहीसा नोलनने आपल्या बॅटमॅन चित्रत्रयीमधून केला होता तसाच. त्यात त्याची क्रिप्टोनवरुन झालेली क्लासिक पाठवणी ,किंवा केन्ट कुटुंबात त्याचं मोठं होणं असे भाग जरुर येतात पण त्यांच्या संकल्पनेत आणि दृश्य सादरीकरणातही पारंपारीक दृष्टीकोनापेक्षा वेगळेपणा आहे. सुपरमॅन या नावामागचं परिचित वातावरण टाळण्याकडे असलेला कल, हा टायटलमधून हे लोकप्रिय नाव नाहीसं करण्यामागे असावा.
श्नायडरच्या डोक्यातला सुपरमॅन हा आधीच्या सुपरमॅन चित्रपटांपेक्षा आणि काॅमिकबुक वर्जनपेक्षाही बराचसा गडद आहे. त्याच्या मूळ कल्पनेतली फॅन्टसी गृहीत धरूनही थोडा वास्तववाद आणण्याचा प्रयत्न आहे. या वास्तववादाच्या पातळ्याही वेगवेगळ्या आहेत. कधी तो दृश्यांचा ग्लॅमरस बाज काढून टाकून त्यांना खरोखरीच्या जगात कुणीतरी डिजिटल कॅमेराने टिपल्यासारखी राॅ दाखवणारा  आणि काॅम्पोजिशन्सच्या सांकेतिक कल्पनांना बाजूला ठेवत तो क्षण पकडण्यासाठी धावणार््या कॅमेरासारखा  दृश्यात्मकतेशी जोडलेला आहे. कधी तो  क्लार्कच्या मानलेल्या वडिलांनी ,जोनथन केन्टनी ( केव्हिन काॅसनर) दिलेल्या आपलं गुपित लपवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याच्या टोकाच्या प्रॅक्टीकल अॅडव्हाईससारखा विचारांच्या पातळीवरला आहे. तर कधी खलनायकाचा वाईटपणा आपण सीमेच्या कोणत्या बाजूने त्याच्याकडे पाहतो आहोत यावर अवलंबून असल्याचं जाणणारा, संकल्पनांच्या पातळीवरला आहे.
मध्यंतरी आलेला स्टार ट्रेक - इन्टू डार्कनेस  जसा मूळ मालिकेच्या दुसर््या भागात येऊन गेलेल्या 'खान' या लोकप्रिय खलनायकाला कथानकात आणतो, तसाच मॅन आफ स्टीलदेखील मूळ सुपरमॅन मालिकेच्या दुस-या भागातल्या जनरल झाॅडचं पुनरुज्जीवन करतो. इथला झाॅड (मायकेल शॅनन) हा मूळ चित्रपटातल्यासारखा केवळ खुनशी मात्र नाही. त्याला स्वतःचं पटण्याजोगं तर्कशास्त्र आहे.  आेव्हरअॅक्टींग हा एक गुन्हा सोडता त्याचं इतर वागणं हे समर्थनीय आहे. क्रिप्टाॅनला पुनरुज्जीवन देण्याच्या नादात पृथ्वीवासियांकडे काणाडोळा करण, हे त्याच्या दृष्टीकोनातून पाहाता पटायला काय हरकत आहे? शेवटी त्याच्या जागी पृथ्वीवासी असता, तर त्याने आपल्या लोकांपुढे क्रिप्टाॅनचे रहिवासी जगतात का मरतात याची पर्वा केली असती का?
रचनेच्या बाबतीत 'मॅन आॅफ स्टील' एक मजेशीर गोष्ट करतो. तो अपेक्षेप्रमाणेच  उध्वस्त होऊ घातलेल्या क्रिप्टाॅनवर ( मार्लन ब्रँडोची तुल्यबळ रिप्लेसमेन्ट ठरणा-या रसेल क्रो सह) सुरुवात करतो, पण पुढे तो बालपण ,तारुण्य, मेट्रोपोलिसमधे डेली प्लॅनेट मधली नोकरी असा परिचित क्रम घेत नाही . तो लाना लँग, जिमी आेलसन, लेक्स लूथर या नेहमीच्या सुपरमॅन स्टेपल्सनाही थारा देत नाही. त्याएेवजी पटकथेत तो दोन लोकप्रिय चित्रप्रकार एकत्र करतो. ते म्हणजे ठराविक सुपरहिरो साहसकथा आणि पृथ्वीविनाश साधणारे 'इन्डिपेन्डन्स डे ' छापाचे विज्ञान/साहस/ फॅन्टसी पट. क्रिप्टाॅन विनाशानंतर तो सुरुवात करतो, ती व्यथित आणि आपल्या असण्यामागचं कारण शोधणार््या , जगापासून दूर पळणार््या आणि लोकांना मदत करतानाही आपलं नाव लपवणार््या क्लार्कवर( हेन्री कॅविल) . योगायोगाने एका बातमीचा पाठपुरावा करत असणार््या लुईस लेनशी (एमी अॅडम्स) त्याची गाठ पडते.  डेली प्लॅनेटचा संपादक पेरी व्हाईट ( लाॅरेन्स फिशबर्न) तिची या विशेष माणसाबद्दलची बातमी छापायला नकार देतो, पण लुईस पाठपुरावा करुन क्लार्कची सारी माहिती शोधते. मात्र प्रकरण पुढे जाणार एवढ्यात जनरल झाॅड आपल्या यानातून पृथ्वीवर येऊन पोचतो आणि आपल्या ग्रहावरल्या रहिवाशाला ताबडतोब हवाली न केल्यास पृथ्वीच्या विनाशाची धमकी देतो. तोवर पृथ्वीवासियांना माहितही नसणारा सुपरमॅन पृथ्वीला वाचवण्यासाठी झाॅडच्या स्वाधीन व्हायचं ठरवतो पण अर्थातच आपल्या ग्रहाचा विनाश झालेला असताना झाॅड आणि त्याचा चमू आयत्या मिळालेल्या पृथ्वीला हातचं सोडतील ही शक्यताही कमीच असते.
मॅन आॅफ स्टीलचा पूर्वार्ध हा नक्कीच उत्तरार्धाहून अधिक चांगला आहे. मला त्यात कमी वेळ असणारा पण  उत्तम लिहिलेला क्लार्क आणि जोनथनचा भाग खूप चांगला वाटला . पण तो सोडूनही त्यात सुपरमॅनला ह्यूमनाईज करणार््या अनेक गोष्टी आहेत. उत्तरार्धात एकदा का लढाई सुरु झाली की चित्रपट नेहमीच्या नासधूस मोडमधे जातो आणि थोडक्या वेळात अधिकाधिक इमारती खाली कशा येतील हे पाहायला लागतो. स्पेशल इफेक्ट डिपार्टमेन्टचं काम एकदम वाढतं आणि चित्रपट व्यक्तींना बाजूला सारुन केवळ भव्यतेच्या मागे जातो की काय असा धोका तयार होतो.  असा धोका यापूर्वी अनेक चित्रपटांना ( उदां बॅटल: लाॅस एंजेलिस, गाॅडझिला) संपवून गेला आहे . मात्र या चित्रपटात तो तसं करत नाही ते दिग्दर्शक श्नायडरमुळे. ज्यांनी या दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपच पाहिले असतील ( ३००, वाॅचमेन, सकर पंच) त्यांना हे माहित असेल की तो मॅक्झिमलिस्ट वर्गात बसणारा दिग्दर्शक आहे. तो कमीत कमी आणि आवश्यक गोष्टींवर फोकस न ठेवता कमी अवकाशात अधिकाधिक गोष्टी भरण्याचा प्रयत्न करतो. अधिक उपकथानकं, मोठे नटसंच, खूप इफेक्ट्स अशी गर्दी करायला त्याला आवडते, पण माझ्या मते तो भरकटत नाही. गंमत म्हणजे ३०० किंवा वाॅचमेन सारख्या ग्राफिक नाॅव्हेल्सवर आधारित चित्रपटात जरी तो त्या त्या काॅमिक इमेजरीला तशीच पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत असला तरी इथला त्याचा सुपरमॅन हा कन्वेन्शनल ग्राफिक्सपलीकडे जाणारा आहे. श््नायडर काय करतोय ते त्याला इथे माहीत आहे आणि केवळ डोळे दिपवणं हा त्याचा हेतू नाही.
या चित्रपटाच्या उत्तरार्धातली इमेजरी ही ९११ ची आठवण करुन देणारी आहे हे  मी सांगायला नको, आणि त्या प्रकारचा हा पहिला प्रयत्न नाही हेदेखील. क्लोवरफील्ड, बॅटल: लाॅस एंजेलिस आणि हल्लीच्या अनेक चित्रपटांतून हा वर्तमानाच्या भीषण रुपाला समांतर पध्दतीने पडद्यावर आणण्याचा प्रयत्न झाला आहे. इथे या अप्रोचचं महत्व आहे ते तो 'सुपरमॅन' सारख्या महत्वाच्या प्रतीमेला ,प्रतिकाला अपडेट करण्याचा प्रयत्न करत असल्याने. नासधूशीत धन्यता मानणार््या अनेक चित्रपटांत एक क्षण असा येतो की आपण पात्र किंवा चित्रपट याची पर्वा करणं सोडतो आणि 'चला, आता खूप झालं' असं म्हणत चित्रपटातला रस काढून घेतो. मॅन आॅफ स्टीलमधे मी त्या क्षणापर्यंत पोचलो नाही. क्लार्क आणि लुईस यांच्यात मला वाटणारा इंटरेस्ट कायम राहिला.
'मॅन आॅफ स्टील' नोलनच्या डार्क नाईट चित्रत्रयीप्रमाणे सुपरमॅनला पुनरुज्जीवन देईल का, हा इथला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. खासकरुन ब्रायन सिंगरचा 'सुपरमॅन रिटर्न्स' अयशस्वी ठरला असताना. मला वाटतं तो ते  करुन दाखवण्याची खूपच शक्यता आहे आणि त्यात नोलनचं निर्मात्यांमधे असणंही फार महत्वाचं नाही. मात्र आवश्यक आहे ते मधे दिग्दर्शक न बदलणं. श्नायडरला पुढचा मार्ग दिसत असल्याचा स्पष्ट संकेत 'मॅन आॅफ स्टील' मधे आहे. तो त्याच मार्गावर राहू शकला तर मार्वलच्या वाढत्या साम्राज्याला तोंड देऊ शकणारा डिसीचा हा सर्वात मोठा नायक पुन्हा स्पर्धेत येईल हे वेगळं सांगायला नको.
-गणेश मतकरी.

7 comments:

Nils Photography June 18, 2013 at 2:16 AM  

Finally?
Sounds you waiting for this movie for long time ? :) :)

Nice Review....
Well, its a big 1000 Cr movie cost wise and having long run time more than 140 minutes... and its Paisa wassol movie , I think...
I am agree with you about long action pack scenes,wondering what kind of action they can show other than Iorn Man, Avengers but they have tried to show as best as they can.
Overall Nice story, Nice action...

ganesh June 18, 2013 at 7:14 AM  
This comment has been removed by the author.
ganesh June 18, 2013 at 7:17 AM  

Nilesh, actually I wasn't. Finally just signifies that after many years of trying to get back on track , they ( finally) managed to do it

Sameer June 19, 2013 at 7:06 AM  

I think old franchises are copying new successful franchises instead of really re-inventing the franchise. James Bond is becoming more like Jason Bourne. Last half of Man of Steel' can be easily used in next parts of Iron Man or Transformers. But 2 things I found unacceptable in Man of Steel are 1. Superman has to take help from American Army to fight his enemies 2. how Zod and Superman fighting ends. Both point does not match with the character of Superman, specially the second point.

Chaitanya Joshi June 19, 2013 at 7:08 PM  

मी नोलानचं आणि श्नायडरचं नाव बघून सिनेमा बघायला गेलो आणि थोडा डिसपॉइन्ट झालो. स्पेशल इफेक्ट्स, बिल्डींग्सची नासधूस जरा जास्त वाटली! बॅटमॅनच्या वेळी असल्या हवेतल्या मारामाऱ्या वगैरे दाखवता आल्या नाहीत म्हणून नोलानने ती लिबर्टी इथे घेतली असंही वाटून गेलं! थोडा विचार करायला लावणारा सुपरमॅन अपेक्षित होता….'ह्युमन नसूनही ह्युमन रेसला वाचवायची त्याची प्रायोरिटी असणं त्याला मॅनऐवजी सुपरमॅन करतं' असलं काहीतरी ऐकायची अपेक्षा होती! उत्तरार्ध अतिच-फास्ट होता.पहिल्याच भागात हिरोने जग वाचवलं (अर्थात तो सुपरमॅन आहे हे मान्य पण तरी), गावांमध्ये-शहरांमध्ये सगळीकडे धावपळ केली…म्हणजे आता पुढच्या भागांमध्ये काय दाखवणार असा प्रश्न पडलाय!

अर्थात सिनेमाचे संवाद आणि एमी अॅडम्स आवडले! हा खूप नाही आवडला तरी पुढच्या भागाकडून असलेल्या अपेक्षा जराही कमी झाल्या नाहीयेत…नोलान आणि श्नायडरचा दबदबाच तेवढा आहे! :)

ganesh July 8, 2013 at 12:58 AM  

Sameer, both your objections have been raised by many ,specially the second one. I think they are 1. humanizing the heroes and 2. trying to make them more identfiable. frankly speaking, I think Superman should finally do something beyond his almost Gandhian philosophy and I don't mind the ending. Also , Ithink they have given enough reason to do so. Also ,u can take it as a political statement, that the superpower will not tolerate a threat beyound a certain point andwill go to any extremes to stop it.

पश्या July 9, 2013 at 3:38 AM  

चित्रपट पाहण्याची २ प्रमुख कारणे होती. एक : नोलान आणि दोन : तुमचे परीक्षण. चित्रपट पाहिल्यावर २ गोष्टींवर विश्वास बसत नाहीये. एक : नोलानचा या चित्रपटाशी संबंध आहे ही गोष्ट - इतका वरवरचा सिनेमा नोलान कडून (तो फक्त लेखनापुरता मर्यादित असला तरी) अपेक्षित नव्हता. दोन - इतका ढिसाळ सिनेमा तुम्हाला आवडला आहे ही गोष्ट.
मी अलीकडे सिनेमा पाहताना तुम्ही वेळोवेळी सांगत असलेले parameters लावून सिनेमे पाहतो ज्याचा मला खूप फायदा होतो. त्यामुळे दुसऱ्या बाबतीत मला विश्वास का बसला नाही हे तुमच्या आधीच्या एका परीक्षणाच्या आधारे सांगतो.
बर्फीच्या परीक्षणात तुम्ही म्हटले होते की कालखंडाशी संबंधित काही व्हिजुअल क्लूज असतात. इथे बाल काल-एल छोट्या यानातून मधून पृथ्वीच्या कक्षेत धडाक्यात येत असताना दिसतो आणि पाठोपाठ मासेमारी करणाऱ्या बोटीतून एक दाढीवाला तरुण भर समुद्रात जाऊन संकटातून लोकांना धडाक्यात वाचवताना दिसतो. यामध्ये मला काळाचा अंदाज येण्यासाठी काहीही क्लूज दिसले नाहीत. मला तर तो सीन संपेपर्यंत काळजी वाटत होती की एवढ्या आगीच्या तांडवात भर समुद्रात कॅप्सूल पडली तर काल-एल चे काय होणार. मग २-३ प्रसंगात एकच तरुण लोकांना वाचवताना दिसल्यावर कळले की हाच आपला suprman … मोठे होतानाचे सगळे संदर्भ गाळून आलेला ! यामध्ये घटनाक्रमात फेरफार करून वेगळे काहीतरी केल्याचा आभास निर्माण करणे एवढाच हेतू मला दिसला.
बर्फी चित्रपट सादरीकरणात वेगळा असूनही त्यात अडकून न पडता पुढे जाऊन तुम्ही हे नमूद केले होते की रणबीर - इलियाना यांची प्रेमकथा अजिबात विकसित न करता पटकथेमध्ये हा महत्वाचा भाग अनुरागने दुर्लक्षित ठेवला आहे. पण मग या ठिकाणी क्लार्क आणि लुईसमधले तथाकथित प्रेम त्यांच्यातला intrest कायम कसे काय ठेवू शकते ? तो तिला एकदा वाचवतो यापेक्षा दोघांपाध्ये प्रेम जमावे असे पटकथेमध्ये काहीही नाही. (त्यातूनही तिला तो आवडतो ही बाजू त्याच्या पराक्रमांमुळे समजण्याजोगी आहे पण ती त्याला का आवडावी ?? केवळ तिने चार लोकांना विचारून त्याला शोधून काढले म्हणून ?). बर त्यांच्या प्रेमकथेवर वेळ घालवणे हे चित्रपटाच्या लांबीला मारक ठरेल म्हणून ते थोडक्यात उरकले आहे असे म्हणावे तर शेवटचा पाउण तास श्नायडरने फक्त विध्वंसात घालवला आहे. माफ करा, पण 'केवळ डोळे दिपवणं हा त्याचा हेतू नाही' या विधानाला पुष्टी मिळेल असे मला काहीही मिळाले नाही. अन्यथा आकाशपातालात एकमेकांचा पाठलाग करून आणि सर्व गोष्टींचा विनाश करून झाल्यावर झॉड superman कडून एका झटक्यात फक्त मान मोडून मेला नसता.
(आणि मगाशी याचमुळे घटनाक्रमात फेरफार करण्याचा मुद्दा मांडला त्याचे आणिक एक उदाहरण : प्रेस मध्ये काम करणारा क्लार्क ही पूर्वापार चालत आलेली ओळख चित्रपटभर आधी कुठेही नाही पण त्या ऐवजी शेवटी सगळ्या जगाला superman कोण आहे हे कळल्यावर देखील तो फक्त एक चष्मा घालून लोक आपल्याला ओळखणार नाहीत अश्या विश्वासाने प्रेस जॉईन करतो असा अत्यंत हास्यास्पद प्रकार दाखवलाय !!)
त्याचा ड्रेस गडद करण्यामागे त्याचे character अधिक गडद होत गेले असेल असे सिनेमा पाहण्याआधी वाटले होते. पण इथे तर त्याचाही इथे पत्ता नाही. रसेल क्रो कथानकाच्या (म्हणजे superman च्या सोयीने ये जा करतो आणि supermanलाच नव्हे तर लुइसला पण मदत करतो....
असो. खटकलेल्या गोष्टी फार आहेत. पण superman ने निराश केलं हे मात्र खरे… यापेक्षा avengers बरा म्हणायचा. 'वेगळा' असल्याचा आव तरी आणला नव्हता ...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP