सिनेमा- त्यांचा आणि आपला
>> Monday, July 22, 2013
गेल्या शतकाच्या उत्तरार्धातला हिंदी व्यावसायिक चित्रपट हा एका चाकोरीत फिरत राहिला असं आपण निश्चित म्हणू शकतो. त्यामागे फार मोठं स्पष्टिकरण मांडण्याची किंवा उदाहरणं देण्याची गरज आहे अशातलाही भाग नाही. कोणत्याही चार चित्रपटांची नावं घेतली तरी त्यांचा चित्रपटनिर्मितीमागचा दृष्टिकोन, त्यांना प्रेक्षकांसमोर मांडावीशी वाटणारी प्रतिमा, प्रेक्षकांकडून त्यांना असणारी अपेक्षा आणि मिळालेल्या प्रतिसादांवरून त्यांनी काढलेले निष्कर्ष हे उघड होतात. जगात स्वतंत्र कथासूत्र ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत ही गोष्ट आपण मान्य केली तरीही ,ही कथासूत्र सादर करण्याच्या पध्दती या शेकड्याच्या घरात जाउ शकतात याचा विसर आपल्या चित्रपटसृष्टिला पडला असावा की काय ़, अशी शंका सहजच उपस्थित होउ शकते . खरं तर ही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी ,कारण आपला सिनेमा हा स्वतंत्र म्हणू कधीच विख्यात नव्हता. गोळाबेरीज प्रभावापासून ते संपूर्ण नकलांपर्यंत अनेक प्रकारे आपण पाश्चिमात्य आणि अधेमधे जागतिक चित्रपटांची उसनवारी करत आलेलो आहोत.त्यामुळे या परकीय चित्रपटामधे युनिव्हर्सली दिसणारी एक गोष्ट,म्हणजे विषय,टोन आणि कथासूत्र यांवरची बैठक पक्की ठेवूनच पटकथा रचण्याची कला म्हणा ,हातोटी म्हणा ,आपण कशी उचलली नाही कोण जाणे. पण नाही उचलली हे खरं . आपण ’मसाला चित्रपट’ या गोंडस पण विचार केला तर कनिष्ठ भासणार््या नावाखाली पटकथेची पाणीदार भेसळ तयार केली जी मूळ कल्पनेला इतकी बदलेल, की मुळात ती विशिष्ट कथाकल्पना निवडण्यामागे मुद्दाच उरु नये. आपण त्यात एका प्रत्यक्ष सुपरहिरो नसणार््या ,पण जवळपास त्याच पध्दतीचा पराक्रम दाखवणार््या नायकाची प्रतिमा घातली, त्याला जोड म्हणून नेत्रसुखद पण आशयदृष्ट्या कमकुवत भूमिकेतल्या नायिकेची भर घातली .मग कट कारस्थानं, विनोद, गाणी असं करत जागा भरत नेली आणि पटकथेच्या नावाखाली एक असा कामचलाऊ आराखडा तयार केला की तपशील बदलताच तो कोणत्याही कथाकल्पनेवर सहज बसवता यावा .
एकदा तयार झाल्यावर या तथाकथित पटकथेने आपला चांगलाच जम बसवला. इतका,की हा प्रचंड यशस्वी फाॅर्म्युला तयार झाल्यावर कोणीच तो बदलायचं नाव काढेना.गेल्या बारा पंधरा वर्षात आपल्या चित्रपटांनी त्यामानाने बर््यापैकी वेगळ्या शैलीतले चित्रपट हाताळायला सुरुवात केली अाहे, तरीही व्यावसायिक चित्रपटांवरला या फाॅर्म्युलाचा प्रभाव आजही बराचसा टिकून आहे. विदेशी चित्रपटांकडून काही निश्चित अपेक्षा न ठेवता मोकळ्या मनाने जाणारा प्रेक्षकही हिंदी चित्रपट म्हणताच तरुण जोडी,परिचित स्वरुपातले नायक- नायिका- खलनायक, गाणी अशा काही किमान अपेक्षा डोक्यात ठेवतोच यातच सारं काही आलं.
आपला चित्रपट आणि हाॅलिवुडचा चित्रपट यांमधे खूप साम्य आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक प्रकारे आपण हाॅलिवुडवर मोठाच अन्याय करत असतो. या दोन्ही चित्रपट घराण्यांमधलं साम्य कुठे आहे, तर प्रामुख्याने या चित्रपटांमधे सुचित होणार््या व्यावसायिक दृष्टिकोनात. त्यांचा आणि आपला हे दोन्ही व्यावसायिक चित्रपट हे पूर्णपणे प्रेक्षकांचा विचार करणारे आहेत. कदाचित गरजेपेक्षा अंमळ अधिकच. चित्रपट ही एक कला आहे आणि या कलाकृतीच्या कर्त्याचा ,अर्थात दिग्दर्शकाचा काही स्वतंत्र दृष्टिकोन या कलाकृतीतून मांडला जावा हे या चित्रपटांच्या गावीही नसतं . त्यांचं सारं लक्ष असतं ते मागणी आणि पुरवठा या गणितात. प्रेक्षकांची आवड लक्षात घेणं आणि त्या मागणीनुसार त्यांना हवा तो माल पुरवणं हा त्यांचा हेतू असतो. तो कसा साध्य करावा याविषयावरचे त्यांचे काही ठोकताळे असतात, काही फाॅर्म्युले असतात. त्यांचा प्रेक्षक कोणत्या वर्गातला आहे, त्याची आर्थिक- सामाजिक पार्श्वभूमी कोणती , त्याचं बोलणंचालणं कसं आहे, ,त्याच्या महत्वाकांक्षा काय आहेत हे त्याना ठाउक असतं आणि या माहितीच्या आधारे अधिकाधिक प्रमाणात लोकांना आपला चित्रपट पसंत पडावा या दृष्टिने त्यांचे प्रयत्न चालू असतात.हाॅलिवुड आणि तथाकथित बाॅलिवुड यांमधलं साम्य संपतंं ते इथेच.
आपला समाज हा खूप वेगवेगळ्या सामाजिक घटकांचा ,स्तरांचा ,संस्कृतींचा बनलेला आहे आणि आपला राष्ट्रीय सिनेमा , अर्थात सर्वत्र पाहिला जाणारा व्यावसायिक हिंदी सिनेमा हा या सार््या जनसमूहांनी पाहावा अशी मूळ योजना आहे.आता भाषा ही राष्ट्रभाषा असल्याने सर्वत्र पोचावी, पोचत असावी असं आपण (पूर्णपणे खरं नसूनही) गृहीत धरु शकतो.मात्र केवळ भाषा पोचणं हे चित्रपट पोचण्यासाठी पुरेसं नाही. त्यासाठी या प्रत्येक जनसमुदायातल्या बहुतांश व्यक्तींना तो आपला वाटावा लागतो. हे आपलेपण घडवण्याचा आपल्या चित्रपटांनी केलेला विचार हा मुळात ’मसाला’ चित्रपटांच्या जन्मामागचं रहस्य आहे.हा विचार असा ,की चित्रपट जर सर्व प्रकारच्या लोकांनी पाहायला हवा असेल तर या सार््या जणांच्या आवडीचं काहीबाही त्यात असण्याची गरज आहे. हे काहीबाही देखील केवळ कथासूत्रापुरतं वा विनोद, मारामार््या रहस्य अशा स्वतंत्र घटकांच्या उतरंडीपुरतं मर्यादित नाही तर त्यात सारंच आलं.चित्रपटांना असणारं दृश्य परिमाण , शैली , एस्थेटिक , संवादांची पध्दत अशा सर्व गोष्टिंमधे मसाला चित्रपट हे आपला सार्वत्रिक प्रेक्षकवर्ग गृहित धरतात आणि त्याची आवडनिवड चित्रपटात उतरवण्यासाठी धडपडतात. आता या सार््या गोष्टी एकत्र केल्याने आपला चित्रपट चांगला होईल, किमानपक्षी चालेल अशी या चित्रकर्त्यांची अाशा असली ,तरी प्रत्यक्षात परिस्थिती तयार होते ती बरोबर उलट. कारण मुळात सार्वत्रिक प्रेक्षकवर्ग असा काही प्रकारच नसतो. खासकरून छोट्या घटकांच्या बाबतीत.
या सार््यांची सारी आवड पूर्ण करण्याच्या प्रयत्नाचा परिणाम इतकाच होतो की चित्रपटाचा विशिष्ट विषयावरला फोकस जातो. प्रत्येकाच्या आवडीचा एखाद दुसरा घटक घेण्याच्या नादात शैलीची एकसंधता हरवते आणि कोणाही एका प्रेक्षकसमूहाचं पूर्ण समाधान करणं या चित्रपटांना शक्य होत नाही. दुसरा मोठा गोंधळ म्हणजे सारेच चित्रपट हे करत नसल्याने बर््याच प्रमाणात ते एकमेकांसारखे व्हायला लागतात. त्यातही एखादा चित्रपट चांगला चालला की विचारायलाच नको. मग तर सारख्या वागणार््या बोलणार््या दिसणार््या चित्रपटांची लाट येते आणि कोणत्याही प्रकारचा क्वालिटी कन्ट्रोल अशक्य होउन बसतो. आपला हिंदी चित्रपटांचा इतिहास हा अशा अनेक छोट्या मोठ्या लाटांनी बनलेला समुद्र आहे. दिलीप कुमारच्या एेन भरातली गोल आेरिएन्टेड नसणार््या नायकाच्या चित्रपटांची लाट, अमिताभचा अँग्री यंग सिनेमा, चोप्रा जोहर मंडळींनी उचललेली सुडो रोमँटिक वळणाच्या गोड गोड कथानकांची लाट अशी अनेक उदाहरण सांगता येतील. गंमत म्हणजे जेव्हा आपण एखाद्या घटकाचा चित्रपटातला डिफायनिंग घटक म्हणून उल्लेख करतो तेव्हाही हे घटक इथे इतर मसाल्याचा भाग म्हणूनच उपस्थित असतात. शोलेसारख्या हार्डकोअर वेस्टर्न चित्रपटांचे गुण सांगणार््या चित्रपटातही असरानी,जगदीपचा विनोद असतोच आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारखा आधुनिक प्रेमकथेचा उच्चांक मानला जाणारा चित्रपटही आपल्या वाटणीच्या मारामार््या आणि मेलोड्रामाचा वापर केल्यावाचून राहात नाही.
प्रेक्षक प्रतिसाद मिळवण्याच्या नादात त्याच त्या घटकांची तशीच मांडणी करण्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या आपल्या चित्रपटांच्या तुलनेत जर आपण हाॅलिवुडने आपला व्यावसायिक चित्रपट कसा पुढे नेला हे पाहिलं तर त्यांचा दृष्टिकोन हा कितीतरी अधिक न्याय्य ,वेगळेपणाला संधी देणारा आणि प्रेक्षकांचाही अधिक दयाबुध्दीने विचार करणारा असल्याचं लक्षात येईल.अमेरिकेला आपल्या तुलनेत उघडच एक फायद अधिक आहे. त्यांचा पूर्ण प्रेक्षकवर्ग हा एक भाषा बोलणारा आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समान वळणाची पार्श्वभूमी असलेला आहे, त्यामुळे त्यांच्या प्रेक्षकांच्या आवडिनिवडीत आपल्याइतका पराकोटीचा फरक नाही. त्याशिवाय त्यांची भाषा आणि संस्कृतिचा प्रसारही जगभरात अनेक ठिकाणी झालेला असल्याने प्रेक्षकसंख्याही अधिक आहे . सबब मर्यादित वेगळेपणात मोठ्या प्रेक्षकवर्गाला सामोरं जाणं त्यांना शक्य आहे. अर्थात ,हे फार ढोबळ गणित झालं. करमणूकीबद्दल प्रत्येकाची व्यक्तिगत मत इतकी असतात की या प्रेक्षकवर्गातही विशिष्ट प्रकारे विचार करणारे उपवर्ग संभवतातच. अमेरिकन व्यावसायिक चित्रपटांची संपूर्ण स्ट्रॅटेजी ,ही या उपवर्गांचा स्वतंत्रपणे विचार करण्यामधून पुढे आलेली आहे.
हाॅलिवुडच्या सिनेमाचं एक व्यवच्छेदक लक्षण सांगायचं तर तो 'गोष्ट सांगणारा सिनेमा’ आहे असं म्हणता येईल. आपल्या चित्रपटांमधेही गोष्ट जरुर असते, नाही असं नाही, पण बर््याच चित्रपटांमधे तशीच गोष्ट त्याच पध्दतीने वापरली जात असल्याने आपण तिला पुरेसं महत्व देत नाही. याउलट आपण नाच /गाणी/विनोद/ नाट्य या सार््याने युक्त असा व्हरायटी एन्टरटेनमेन्ट शो असल्याप्रमाणे आपल्या चित्रपटांकडे पाहातो . किंबहुना त्यामुळेच की काय, पण या ’व्हरायटी’ मधले काही भाग फसले तरी केवळ गाणी, केवळ एखाद्या अभिनेत्याची अजरामर प्रतिमा यावर आपला चित्रपट तग धरु शकतो. हाॅलिवुडमधे असा प्रकार अपवादानेच दिसतो. त्यांच्या चित्रपटांचं यश हे स्टार पाॅवर आणि नेत्रसुख या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असलं तरीही प्रथम ते सांगितल्या जाणार््या गोष्टिच्या ताकदीवर अवलंबून असतं.
हाॅलिवुडचा जगभर पसरलेला प्रेक्षकवर्ग, मूळची श्रीमंती आणि उद्योगाप्रमाणे असलेली शिस्त याचा फायदा त्यांच्या चित्रपटांच्या जडणघडणीत दिसून आला. अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे स्टुडिओ सिस्टिम अस्तित्वात आली जिने दिग्दर्शक, कलावंतांवर काही प्रमाणात मर्यादा जरुर घातल्या ,पण त्यांना नव्या चित्रपटांसाठी आर्थिक सहाय्य उभं करण्याच्या ,नवं काम शोधण्याच्या विवंचनेतून वाचवलं. इतर देशांमधल्या मोठ्या दिग्दर्शकांना त्यांनी आपल्या चित्रपटांमधून वाव दिला आणि आपल्या सिनेमासाठी हुकूमी प्रेक्षक उभा करण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न केला. सर्व प्रेक्षकांची व्यक्तिगत आवड वेगळी असणार हे आेळखून त्यांनी सारख्या आवडीच्या प्रेक्षकांचा स्वतंत्र उपवर्गात विचार केला आणि त्या त्या वर्गासाठी ,त्यांच्या आवडीनुसार चित्रपट बनवायला सुरुवात केली. हाॅलिवुडची चित्रप्रकारांनुसार किंवा जेनेरिक वाढ व्हायला इथेच सुरुवात झाली.
आपल्या मसाला चित्रपटाच्या फाॅर्म्युलाचा मुख्य गोंधळ हा होता की त्यात कथानक वा विषयाशी संबंध असलेल्या/नसलेल्या गोष्टिंची जंत्री केवळ 'प्रेक्षकांना आवडते म्हणून ' या एका कारणासाठी लावली जायची. हाॅलिवुडच्या चित्रप्रकारांनी मूळ व्याख्येपासूनच हा गोंधळ दूर केला. त्यांनी विषयांच्या विविधतेनुसार आणि त्या विषयाशी सुसंगत अशा गोष्टिंना एकत्र करणारे फाॅर्म्युले बनवले. असे फाॅर्म्युले जे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचा स्वतंत्रपणे विचार करतील.सर्वांनाच आवडणारे अभिजात वळणाचे भव्य चित्रपट, संगीताला महत्व असणार््या आणि वेळोवेळी गाण्यांना संवादाच्या जागी घेणारी म्युझिकल्स, तरुण वर्गाला विशेष प्रिय असणारे भयपट आणि रोमँटिक काॅमेडी , युध्दपट, स्वत:चा कॅप्टिव आॅडिअन्स असणारे विज्ञानपट , गुन्हेगारी वळणाचे थ्रिलर्स आणि अमेरिकन वेस्टच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी साहसी वेस्टर्न्स या आणि अशा अनेक विषयांना या चित्रप्रकारांनी सामावून घेतलं. मुळात दरेक चित्रप्रकार आपल्या विशिष्ट लक्षणांना आणि कथनशैलीला बरोबर घेऊन येत असूनही त्यांमधे तोचतोचपणा आला नाही कारण या चित्रप्रकारांवर काम करत असणारे मास्टर फिल्ममेकर्स. डेव्हिड लीन पासून आल्फ्रेड हिचकाॅकपर्यंत आणि जाॅन फोर्ड पासून हाॅवर्ड हाॅक्स पर्यंत अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी या जेनेरीक चित्रपटांवर स्टुडिआे सिस्टिम मधे राहून महत्वाचं काम केलं.या दिग्दर्शकांचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्गही यातून तयार झाला ,आणि जेनेरीक सिनेमा केवळ 'फाॅर्म्युला फिल्म्स' या मर्यादित व्याख्येबाहेर पडला.
१९७० च्या दशकात ,म्हणजे ज्या काळात आपला संपूर्ण व्यावसायिक चित्रपट अँग्री यंग मॅन या एकमेव कल्पनेभोवती फिरण्यात धन्यता मानत होता तेव्हा हाॅलिवुडमधे स्टुडिआे सिस्टिमची गणितं बदलायला लागली होती आणि कपोला, स्पीलबर्ग, स्कोर्सेसी, ल्युकस अशा नव्या दिग्दर्शकांची पिढी पुढे येत होती . या पिढिनेही चित्रप्रकारांची संकल्पना जागृत ठेवत नव्या ,वेगळ्या पध्दतीचं काम करुन दाखवलं . या नव्या हाॅलिवुड प्रेक्षकांसाठी चित्रप्रकार हे त्याच त्या फाॅर्म्युलाची खूणगाठ न बनता एका क्लासिफिकेशन सिस्टिमप्रमाणे, मार्गदर्शनपर वापरण्याजोगे ठरले.
आपण आणि हाॅलिवुड या दोन्ही ठिकाणचा चित्रपट मुळात प्रेक्षकशरण असूनही त्यांच्या चित्रनिर्मितीमधे इतक्या प्रमाणात फरक पडण्यामागे केवळ स्टुडिओ सिस्टिमने आणलेली शिस्त किंवा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन या दोनच प्रमुख गोष्टि असाव्यात का? माझ्या मते नाही. जर आपण तसं गृहीत धरलं ,तर आपण चित्रपटांच्या एका मोठ्या बाजूकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल जी या क्षेत्रासाठी खूप महत्वाची आहे. ती म्हणजे पटकथाकाराची बाजू. या व्यवसायातल्या कोणालाही पटकथाकाराच्या बाजूविषयी विचारलं तर एकच निरीक्षण आपल्यापर्यंत पोहोचेल ,आणि ते म्हणजे एकूण चित्रपटांमधे आणि खासकरुन व्यावसायिक चित्रपटांमधे पटकथाकाराची भूमिका ,ही दुय्यम असते.
एकूण कथामाध्यमांचा विचार केला तर असं लक्षात येईल की साहित्य हे लेखकाचं एकट्याचच माध्यम असल्याने तो त्या माध्यमाचा राजा असतो , नाट्यक्षेत्रात त्याचं श्रेय हे बर््याचदा दिग्दर्शकाइतकंच मानलं जातं कारण मर्यादित स्थलकालात प्रोसिनियमच्या चौकटीत घडणार््या या प्रयोगावर संहितेचं नियंत्रणही बरंच असतं. चित्रपटात मात्र दृश्यचौकटही अधिक विस्तृत होते आणि संहितेचा धागा उरतो तो दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला आधार असल्यासारखा. व्यावसायिक चित्रपटांमधले पटकथाकार हे एका वेळी अनेक बाजूंचा तोल राखताना आपल्याला दिसतात. कधी दिग्दर्शकाचा कथानकाला अन्यायकारक ठरु शकेल असा टोकाचा दृष्टिकोन, कधी निर्मात्यांची विशिष्ट स्टारसाठी विशिष्ट प्रकारची भूमिका लिहिण्याची मागणी,आधारीत पटकथांवर येणारं मूळ साहित्यकृतीच्या चाहत्यांचं दडपण, अभिनेत्यांच्या उलट सुलट सूचना . मात्र असं असतानाही पटकथांचा दर्जा आणि पटकथाकाराची दृष्टि यांचा चांगल्या चित्रपटांवर परिणाम होतच असतो.त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक (स्वत: लेखकही असलेले काही अपवाद वगळता) हाती आलेल्या पटकथेवर आपल्या नजरेने संस्कार करु शकतो पण नव्याने संहिता लिहू शकत नाही.लेखकाचा पहिला विचार आशयावरुन सुरु होतो तर दिग्दर्शकाचा दृश्य संकल्पनांवरुन . हा मुलभूत फरक अनेकदा चित्रपटांचं भवितव्य ठरवून जातो असं आपल्याला दिसून येईल.
अशा परिस्थितीत आपल्या चित्रपटांच्या फाॅर्म्युलात अडकण्याला , एका मर्यादेपलीकडे काही नवीन करु न शकण्याला पटकथाकारही जबाबदार आहेत असं म्हणावं का? अर्थातच.आपला फाॅर्म्युला मुळात तयार झाला आणि आहे त्या प्रमाणात लोकप्रिय झाला तो लेखकांच्या सहभागाशिवाय नाही. हाॅलिवुडमधे जेम्स एजी पासून राॅबर्ट टाउन पर्यंत आणि पाॅल श्रेडरपासून विलिअम गोल्डमनपर्यंत अशी अनेक नावं घेता येतील ज्यांनी सर्व अडचणींना तोंड देत चित्रपटाची पटकथा स्वत:हून काही प्रगती करेल असं पाहिलं. कधी परीचित चौकटीतले उपाय शोधत तर वेळप्रसंगी बंड पुकारत त्यांनी आपला चित्रपट आपला ठेवण्याचा प्रयत्न केला . आपल्याकडे फाॅर्म्युलाला विरोध न करता आधीच्या लोकप्रियतेचा दाखला समोर ठेवून त्यावरच हुकूमी यश मिळवण्याची परंपरा आहे. के ए आब्बास किंवा अब्रार अल्वी सारख्या जाणत्या पटकथाकारांच्या वळणाचे प्रयत्नही पुढल्या सलीम जावेदच्या काळात पुसले गेल्याचं आणि केवळ टाळीबाज संवाद आणि आेळखीच्या प्रतिमांना या पटकथांचा केंद्रबिंदू केल्याचं आपल्या लक्षात येउ शकतं. या काळात पटकथांनी जवळ केलेली चाकोरी दूर व्हायला पुढे कितीतरी वर्ष जावी लागली.
हाॅलिवुडने ध्वनिपटांच्या सुरुवातीपासून , म्हणजे १९३० च्या दशकापासून सुरु केलेला विषयवार विभागणीत चित्रपटांना बसवण्याचा आणि त्या विषयांना प्रमाणिक राहाण्याचा, थोडक्यात सांगायचं तर जेनेरिक चित्रपटनिर्मितीचा प्रयत्न हा आपल्याकडे गेल्या दहाबारा वर्षात सुरु झाला आहे. मल्टिप्लेक्सेसच्या निमित्ताने मर्यादित वितरण आणि छोटेखानी बजेटवर चित्रपट बनवण्याची माफक प्रमाणातली चळवळ सुरु झाल्यावर. किंबहुना आज इतक्या वर्षांनी बर््याच गोष्टी त्या काळच्या हाॅलिवुडची आठवण करुन देताहेत. काॅर्पोरेट संस्थाच्या सहभागाने स्टुडिआे सिस्टिम सारखी निर्मिती यंत्रणा देखील सुरु झाली आहे आणि नियमांना न जुमानणारे नवे दिग्दर्शकदेखील पुढे येतायत. पटकथांमधे मात्र म्हणावी तितकी नवी कामगिरी अजून पाहायला मिळत नाही. पटकथेची स्वतंत्रपणे जाण असणारे कश्यप, विशाल भारद्वाजसारखे काही दिग्दर्शक जरुर आहेत, मात्र स्वतंत्र पटकथाकारांची टंचाई मात्र चांगलीच जाणवण्यासारखी आहे. तरीही बदलाचं वारं काही प्रमाणात सूचित करणारं हे चित्रही आशादायकच म्हणायला हवं. अर्थात, ते किती दिवस टिकेल हा प्रश्न अाहेच.
-गणेश मतकरी
(शब्ददिवाळीतून)
3 comments:
apana preksha lok sudha titakecha jabadar ahot karan jar prekshaka ek tha tiger sarkhe baghayala lagale tar industry hi same movies kadhanar...
छान लेख. अभ्यासपूर्ण आणि ओघवता. तुमचा ब्लोग बर्याच कालावधीपासून वाचत आहे मी RSS च्या मार्गे. हा लेख वाचल्यावर, येउन प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं.
आपण लिहित राहा. आम्ही वाचत राहूच.
अवांतर : प्रतिक्रियांसाठी DISQUS नावाची एक विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. त्या योगे प्रतिक्रिया अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतात. आपण त्यावर एक कटाक्ष टाकावा ही विनंती.
AAPALYA KADE BARECH GHOL AAHET. SCREENPLAYCHYA NAVAKHALI. MULAT SALIM JAVED LA FOLLOW KARANARYANA SUDDHA TE TEVADHE SAMJALELE NAHEE. CINEMA KATHA SODUN NUSATA KHILAVUN THEVAT ASEL TARI AAPALYALA TYACHA SCREENPLAY SUPERB AAHE ASHI DAD MILATE. INTERVAL NANTAR GOST SURU HONE HE SARRAS BAGHAYALA MILATE. KARMNUK MHANUN KHAPAVATAT. AANI DUSARE MHANAJE CINEMA SLOW AAHE MHANAJE TYACHA SCREENPLAY VAIT AAHE. ASHI KHUP SAMJUT AAHE.
Post a Comment