थिसिअसचं जहाज आणि स्वत्वाचा शोध

>> Monday, August 5, 2013




शिप ऑफ थिसिअस. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे सहसा कुणाचं लक्ष जाण्याची शक्यता नाही. त्याचा दिग्दर्शक आनंद गांधी याचा पूर्वलौकिकही तद्दन व्यावसायिक टीव्ही मालिकांच्या लेखनाचा आहे. पण त्याच्या या चित्रपटाने व्यावसायिक करमणुकीच्या पलीकडे जात अगदी वेगळा आनंद दिला आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट आपल्यापुढे ठेवला आहे... 

थिसिअसच्या जहाजाचा प्लूटार्कने मांडलेला प्रश्न विचाराला खाद्य पुरवणारा आहे यात वाद नाही. जहाजाच्या दुरुस्तीच्या कामात जर अशी वेळ आली , की त्याचा प्रत्येकच जुना भाग काढून टाकून नवा वापरण्यात आला तर दुरुस्ती पूर्ण झालेलं जहाज हे तेच मूळचं जहाज म्हणता येईल का ? आणि समजा त्या काढून टाकलेल्या भागाला जोडून जर पुन्हा जहाज नव्याने बनवलं , तर या दोघातलं कोणतं जहाज मूळचं म्हणावं ?

थिसिअस पॅराडॉक्समागचा हा प्रश्न हा प्लेटोपासून लॉकपर्यंत वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी उदाहरणादाखल घेऊन वेळोवेळी मांडलेला आहे , आणि त्याचा रोख आहे , तो आयडेन्टिटीशी जोडलेला. एखाद्या गोष्टीचं सत्व कशात असतं , तिची ओळख काय , असा हा प्रश्न आहे , आणि त्याच्या खऱ्या उत्तराचा तपास आजही सुरू आहे. नुकताच आपल्याकडे अतिशय सूक्ष्म स्वरुपात प्रदर्शित झालेल्या आनंद गांधी दिग्दर्शित ' शिप ऑफ थिसिअस ' नावाच्या चित्रपटाच्या संकल्पनेशी तो प्रश्न संबंधित आहे. मात्र सामान्य प्रेक्षकाला हे काहीतरी परकं आहे असं वाटण्याची सुरुवात त्याच्या नावापासून होते. मात्र अगम्य नाव , अनोळखी कलावंत , परिचित नसलेला दिग्दर्शक , इंग्रजीचा अधिक वापर या बिचकवू शकणाऱ्या वरवरच्या गोष्टींना न जुमानता प्रेक्षकांनी तो पाहिला तर त्यांना केवळ एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट पाहायला मिळेल , एवढंच नाही , तर त्यांना आयुष्याकडे पाहाण्याची एक वेगळी नजरही मिळेल.

थिसिअसच्या प्रश्नाचा संबंध या चित्रपटात येतो तो निर्जीव वस्तुंसंदर्भात नाही , तर त्याचं माणसांशी असलेलं नातं इथे तपासून पाहिलं जातं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर. त्यातला प्रत्यक्ष भाग हा सोपा , कोणतंही वेगळं स्पष्टीकरण आवश्यक नसणारा आहे , पण चित्रपटातला सखोल विचार दिसून येतो , तो अप्रत्यक्ष पातळीवर. जिथे हा चित्रपट माणसाच्या स्वत्वाकडे , त्याच्या व्यक्तिमत्वाकडे , त्याच्या जीवनविषयक दृष्टीकडे , विचाराकडे पाहातो. आपण कोण आहोत , हे कशामुळे ठरतं ? ते तसं ठरण्यात आपल्या मूळ प्रवृत्तीचा भाग किती आणि आपण ज्या समाजात , ज्या परिस्थितीत राहातो तिचा भाग किती ? जगणं म्हणजे नक्की काय ? मृत्यू हा शेवट मानावा का ? आपल्या विचारात , व्यक्तिमत्वात बदल कशामुळे संभवतो आणि असा बदल झालाच तर ती आपल्या मूळ व्यक्तिमत्वाशी तडजोड तर नाही ? असे अनेक प्रश्न ' शिप ऑफ थिसिअस ' च्या केंद्रस्थानी आहेत. ते मांडताना तो आधार घेतो , तो जवळजवळ स्वतंत्र भासणाऱ्या तीन कथासूत्रांचा. यातल्या पहिल्या दोन कथा या पारंपरिक कथारचनेचा आधार पूर्णपणे नाकारतात आणि केवळ एक विचार मांडणं हा अजेंडा ठेवतात. तिसरीचा आशय वेगळ्या प्रकारचा असला तरी मांडणी ओळखीची राहाते.

पहिली कथा आहे ती एका अंध फोटोग्राफरची. आलिया कमाल (आयदा एल कशेफ) अत्याधुनिक कॅमेरे , संगणक आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने (उत्तम) फोटो काढते. तिचा प्रयत्न आहे तो आपल्या विषयवस्तूचं सत्व पकडण्याचा. तिचं आपल्या पद्ध्तीवर नियंत्रण आहे. इतकं की अपघाताने चांगला आलेला फोटो त्याच्या अपघाती असण्यामुळेच तिला मंजूर नाही. तिच्या छायाचित्रांना नाव आहे. मान आहे. ती असं गृहीत धरते की आपली दृष्टी परत मिळाल्यावरही आपली ही आतली नजर कायम राहील. पण तसं खरंच घडेल याची खात्री कोण आणि कशी देणार ?

दुसरी कथा आहे ती मैत्रेय ( नीरज कबी) या देवाचं अस्तित्व नाकारू पाहाणाऱ्या उच्चशिक्षित भिक्षूची. संशोधनात वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्याचा लढा आहे. अचानक उद्भवलेला आजार त्याला आपल्या धारणांच्या विरोधात जाणारं पाऊल उचलायला लावेलशी शक्यता तयार होते , जी स्वीकारण्यापेक्षा मृत्यूला सामोरं जाणं त्याला योग्य वाटतं.

तिसऱ्या कथेतल्या नवीनचं ( चित्रपटाचा निर्माता सोहम शाह) जग संकुचित पण आनंदी आहे. आपल्या पुरोगामी विचारांच्या आजीचा क्षितीज विस्तारण्याचा सल्ला तो मानत नाही. पण आपल्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशनमधे बसवण्यात आलेली किडनी एका गरीब कामगाराकडून अन्यायाने काढून घेतल्याचा संशय त्याला प्रथमच आपल्या रोजच्या आयुष्यापलीकडे पाहायला लावतो , आणि एका बदलाची सुरुवात करतो.

या कथानकांचं स्वरुप पाहून लक्षात येतं की हा ऐवज आपल्या नेहमीच्या चित्रपटांचा नाही. या व्यक्तिरेखा अस्सल आहेत , त्यांचं जग बारकाईने उभं केलं आहे. आलियाची फोटोग्राफी दाखवण्यातला तपशील , मैत्रेयने घोणीला अलगद उचलून बाजूला ठेवण्यासारख्या प्रसंगातून दिसणारा त्याचा विचार , नवीनने आपल्या आजीबरोबर घातलेली हुज्जत आणि त्याच्या आधीचा प्रसंग हे पाहून दिसतं की आपल्या पटकथांकडून जशी गोष्ट पुढे नेण्याची अपेक्षा असते तशी या पटकथेकडून करणं चूक आहे. इथे काही घडणं महत्त्वाचं नाही , तर आपल्या नजरेच्या परिघात येणारं चित्र अधिकाधिक स्पष्ट होत जाण्याला महत्त्व आहे. ते आपल्याला जितकं खरं वाटेल तितके आपण चित्रपटात गुंतू. वास्तववादाचा भर हा सेल्फ कन्टेन्ड गोष्ट सांगण्यावर नसतो. जग हे एकाच वेळी चालू असणाऱ्या अनेक गोष्टींनी बनलंय आणि आपण त्यातला कोणतातरी तुकडा न्याहाळतोय , असं वास्तववाद सांगतो. या कथनात दरेक गोष्ट सोयीस्करपणे अथपासून इतिपर्यंत सांगितली जाण्याची गरज नसते , उलट बऱ्याचदा त्यांचं अपूर्णत्वच त्यांच्या अस्सल असण्याचा पुरावा ठरतं. हे असे तुकडे ' शिप ऑफ थिसिअस ' जिवंत करतो. त्यातला आशय जिवंत करतो.

हे जिवंत होणं जितकं पटकथेच्या साधेपणी निरीक्षणं मांडण्यातून होतं , तितकंच ते अभिनेत्यांच्या नैसर्गिक वावरातून आणि खिळवून ठेवणाऱ्या , पण चमत्कृतीचा वापर सहसा ( पण नेहमीच नव्हे) टाळणाऱ्या छायाचित्रणातूनही होतं.

आनंद गांधीचा याआधीचा संचार हा डेली सोप (त्याने ' क्योंकी साँस भी कभी बहु थी ' आणि ' कहानी घर घर की ' या आपल्या टीव्ही उद्योगाला भलतं वळण लावणाऱ्या महामालिकांचे सुरुवातीचे अनेक भाग लिहिले) , रंगभूमी , शॉर्ट फिल्म्स (त्याची ' राईट हिअर , राईट नाऊ ' नावाची अफलातून , उत्तम कथा मांडणारी आणि प्रचंड गिमिकी शॉर्ट फिल्म संधी मिळाल्यास जरुर पाहावी.) अशा विविध ठिकाणचा आहे , मात्र हा चित्रपट त्यातल्या कोणत्याही एका ठिकाणची ओळख न सांगणारा , स्वयंभू आहे. गांधीमधला दिग्दर्शक आपल्याला इथे जाणवतो तो त्याने हा चित्रपट उलगडताना घेतलेल्या निर्णयांवरून. त्यातल्या दृश्यविचाराची , संवादाची जात काय असावी , आलियाने अंध असताना काढलेल्या फोटोंचं दर्शन कथेत नेमकं कोणत्या टप्प्यावर व्हावं , मैत्रेयंचं मृत्यूला कवटाळणं हे केवळ अभिनयातून नव्हे तर प्रत्यक्ष घटत जाणाऱ्या वजनातून दिसायला हवं , हे आणि असे विविध निर्णय त्याचं सादरीकरणावरलं नियंत्रण दाखवतात. त्याची भूमिका स्पष्ट करतात.

आपला सामान्य प्रेक्षक हा समांतर सिनेमाकडे काहीशा संशयाने पाहातो. हे काहीतरी अगम्य , दुर्बोध , स्वतःला अधिक हुशार समजणाऱ्या चित्रकर्त्यांनी केलेलं काही आहे , असा या चित्रपटांकडे पाहाण्याचा होरा असतो. पण चांगला समांतर सिनेमा हा कधीच केवळ आपली चतुराई दाखवण्यासाठी काही करत नाही. उलट व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे तो प्रेक्षकाला जी ती गोष्ट नको इतकी स्पष्ट करून सांगणं टाळतो. प्रेक्षकालाही काही कळत असेल , त्याचीही निष्कर्ष काढण्याची क्षमता असेलसं गृहीत धरतो. या ठिकाणचे सारेच संदर्भ प्रत्येकाला कळतीलसं नाही (उदाहरणार्थ , आलियाच्या मुलाखतीदरम्यान तिने दिलेला ' परफ्यूम ' कादंबरीचा संदर्भ). मात्र त्याशिवायही आशयाला पूरक भाग स्पष्ट होईलसं चित्रपट पाहातो.

आपला व्यावसायिक चित्रपट ' करमणूक ' या शब्दाच्या आहारी गेल्याचं आपण जाणतोच. मात्र पडद्यावरलं निर्बुद्ध , ढोबळ कथाकथन , विनोद आणि अॅक्शनची रेलचेल , अनावश्यक नाचगाणी याला आपण किती दिवस करमणुकीचं फसवं लेबल लावणार आहोत ? शेवटी डोक्याला चालना मिळणं , वैचारिक खाद्य मिळणं , गुंतण्यासारखा आशय मिळणं हेदेखील तितकंच किंबहुना त्याहून कितीतरी महत्वाचं नाही का ? आपल्या चित्रपटाकडून आपल्याला नक्की काय हवं , हा विचार करण्याची गरज या चित्रपटाने आपल्या प्रेक्षकात निर्माण केली , तर ' शिप ऑफ थिसिअस ' ची निर्मिती सार्थ ठरल्याचं मी मानेन.
-गणेश मतकरी(मटातून)

3 comments:

आशा जोगळेकर August 5, 2013 at 5:23 PM  

बघायला हवा चित्रपट . तुमची समीक्षा उत्सुकता वाढवतेय.

kaustubh August 6, 2013 at 11:05 AM  

khup chan me tumcha Maharashtra times madhil lekh vachla ... ship of thes.. chakori baheril indian cinemache product aanand aahe nirmitis

Vishalkumar August 7, 2013 at 5:08 AM  

बरेच दिवसांनी भारतीय सिनेमाबद्दल कौतुक असणरा लेख वाचायला मिळाला. छान वाटले. पुन्हा पुन्हा वाचायला मिळोत हीच अपेक्षा. एक लक्षात घ्यायला हवे की असे चित्रपट १०० कोटी क्लबचे नसतात, तेव्हा बौक्स ओफ़िस गल्ला वर या चित्रपटाचे यश मोजले जाउ नये.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP