बॉलिवुडच्या नायिका- व्यक्तिमत्व आणि प्रतिमा

>> Tuesday, March 24, 2015


मध्यंतरी आपल्या सरसकट मराठी मध्यमवर्गीय मानसिकतेचा थरकाप उडवणारा एआयबी रोस्ट नामक कार्यक्रम पाहिला. खूप गंमत वाटली आणि खरं सांगायचं तर या साऱ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तो साजरा करुन घेणाऱ्या, तसंच त्या वरवरच्या शिव्यांमागची सन्मानाची , प्रेमाची भावना लक्षात घेणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजचं कौतुकही वाटलं.  स्टेजवरच्या , तसच  प्रेक्षकात बसून खो खो हसत दाद देत आपल्यावरचे टोमणेही सहन करणाऱ्या  सेलिब्रिटीजचं  देखील ! या प्रेक्षकात बसणाऱ्यांमधे आपल्या आजच्या आघाडीच्या तीन नायिका खास लक्षात येत होत्या. आयकॉनिक नायिका असून अधिक प्रौढ वळणाचे विनोद वाट्याला आलेली दिपीका पादुकोण, मठ्ठ म्हणून झालेल्या टिकेला एआयबीनेच सादर केलेल्या 'जिनीअस ऑफ द इअर' या अफलातून शॉर्ट फिल्मने उत्तर देणारी  आलिआ भट्ट, आणि अधिक पारंपारिक वळणाच्या भूमिकांमधे स्थिरावत चाललेली आणि कार्यक्रमात  तशा बाळबोध विनोदांना तोंड द्यायला लागलेली सोनाक्षी सिन्हा. या तिघीही वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका साकारणाऱ्या आणि पडद्यावर अतिशय ग्लॅमरस प्रतिमा असणाऱ्या. त्यांचा या कार्यक्रमातला सहभाग हा धाडस मानायचा का? मला नाही तसं वाटत. याऊलट मला ही खूण वाटते, ती आजवर आपल्या चित्रपटात शोभेची बाहुली बनून रहाणाऱ्या नायिकांची  प्रतिमा बदलत चालल्याची. पडद्यावरली तसच लोकांसमोरचीदेखील. एकेकाळी बहुसंख्य प्रमाणात, सौंदर्य हीच ओळख बनलेल्या या नायिकांनी आपल्या व्यक्तिमत्वाला इतर पैलूही आहेत , हे दाखवायला केलेली ही सुरुवात आहे. त्यांच्या एरवीच्या थोड्या अनग्लॅमरस, थोड्या बोल्ड, थोड्या वृत्तीदर्शक वागण्यातून  बदलत जाणाऱ्या प्रतिमा केवळ एका पब्लिक रेकॉर्डचा भाग नाहीत, तर पडद्यावरलं त्यांचं वागणं हेदेखील त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक्स्टेन्शन होऊ पहातय. दिपिकाने फाइन्डींग फॅनी मधली गर्ल नेक्स्ट डोअर वळणाची भूमिका स्वीकारणं आणि त्यातल्या व्हर्जिन शब्दाला घेतलेल्या आक्षेपातून उद्भवलेल्या वादात हिरीरीने पडणं, किंवा नुकत्याच कामं करायला लागलेल्या आलिआ भट्टने हायवे सारखी स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.या साऱ्याजणींना घेऊन आज पडद्यावर येणारे चित्रपट, त्यातल्या स्त्रीभूमिका आणि त्यांना दिलेलं महत्व हे काही वर्षांपूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत रॅडीकली वेगळं म्हणावं असं आहे. याचा अर्थ हा नाही, की या नायिका यापुढे फक्त आपलं व्यक्तीमत्वच पडद्यावर दाखवतील. तसं झालं तर त्यांच्या अभिनेत्रीपणाला मुद्दाच उरणार नाही, पण हे जरुर होईल, की त्यांच्या भूमिकांच्या निवडींमधून, त्या साकारताना केलेल्या विचारातून, त्यांच्या एरवीच्या बोलण्यावागण्यातून त्यांची नवी, काहीशी एकसंध प्रतिमा तयार होईल. पडदा आणि बाहेरचं जग यातलं अंतर मिटवणारी.

आपला चित्रपट हा सुरुवातीपासूनच आपल्या समाजासारखा पुरुषप्रधान आहे. नायकांभोवती चित्रपट घडवायचा अन नायिकांना एक आकर्षण म्हणून उभं करायचं ही सामान्यत: आपल्या चित्रपटांची प्रथा. तरी त्यातही वेळोवेळी मार्ग काढत दुर्गाबाई खोट्यांपासून मधुबालापर्यंत, आणि वहिदा रहमान पासून रेखापर्यंत वेळोवेळी अशा नायिका उभ्या रहात गेल्या ज्यांनी या पुरुषप्रधान परंपरेला आपल्या कामामधून विरोध दर्शवला.  अर्थात केवळ स्त्रीप्रधान चित्रपट निवडणं त्या काळात शक्यच नव्हतं, त्यांना घरी बसण्यापलीकडे पर्याय उरला नसता. असे कितीसे मदर इंडिआ, बॉबी किंवा उमराव जान येणार होते? पण त्यांनी आपली कामं ही व्यक्तीमत्व दर्शवणारी असतीलसं पाहिलं . नायकाबरोबर प्रेक्षकाच्या मनात  त्यांचीही ओळख राहीलसं पाहिलं . आज 'प्यासा' वहिदा रहमानशिवाय, 'चलती का नाम गाडी' मधुबालाशिवाय आणि 'अनाडी' नूतनशिवाय आठवून पहा ! नाही आठवणार !

असं असतानाही नायिकांचं स्थान एका मर्यादेत होतं हे खरं. हे सर्वाना माहीत होतं आणि कोणाचा त्यावर फार आक्षेपही नव्हता. प्रेक्षकांची अपेक्षाही फार वेगळी नव्हती, आणि स्त्रीमुक्तीचे वारे वहायला लागले नव्हते. चित्रपटही फार साधी रचना असणारे असायचे, भल्याचा बुऱ्यावर विजय वगैरे सांगणारे. त्यातल्या व्यक्तिरेखांना कंगोरे यायलाही सुरुवात झालेली नव्हती , अगदी नायकांच्याही, मग नायिका तर दुरच राहिल्या. हे चित्र काहीसं बदलायला लागलं ते समांतर चित्रपटांच्या काळात. ७० च्या दशकात आलेला हिंदी समांतर सिनेमा, खासकरुन बेनेगल/ तेंडुलकर / निहलानींचा , हा स्त्रीभूमिकांचा नव्या काळात नव्याने विचार करायला हवा, हा धडा शिकवून गेला. अंकूर-मंथन-निशांत या तीन महत्वाच्या चित्रपटांतून शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्या रुपाने या बदलांना एक चेहरादेखील मिळाला. या काळातला व्यावसायिक चित्रपट सुधारलेला नव्हता, पण कधी ना कधी सुधारेल अशी आशा या काळात तयार झाली. या नायिकांना केवळ नायकांभोवती घुटमळण्यापलीकडे इतर अनेक कामं असायची. केवळ दिसणं आणि गाणी म्हणणं यापलीकडे जाऊन या व्यक्तीरेखांचा विचार केलेला असायचा. त्यांची प्रादेशिकता, व्यवसाय, विशिष्ट मुद्द्यांवरची त्यांची भूमिका, प्रसंगी नायकाची मतं अमान्य करण्याची मुभा असणं/नसणं ,  याचा विचार या भूमिका रचतानाच करण्याची गरज या साऱ्यांना भासायला लागली. या काळात स्त्रीवाद पुढे आलाच होता. चित्रपटाची समांतर शाखा, स्त्रीवादाचं एक रुप बनली.

सर्वसाधारणपणे असं घडताना दिसत नाही,की चित्रपटाचा एकच पैलू हळूहळू बदलला, बदलत गेला, पण बाकी सारं अनिश्चित काळ जैसे थे राहीलं. बदल हा नेहमीच सार्वत्रिक असतो. एखाद्या छोट्या घटकापासून तो सुरू झाला, तरी हळूहळू तो पसरत जातो, आणि सारंच अमलाखाली आल्याशिवाय थांबत नाही. व्यावसायिक चित्रपटामधल्या नायिकांमधे तो दिसायला लागला याचं कारण हे होतं की व्यावसायिक सिनेमाही त्या दिवसात नव्याने घडत होता. त्याआधी, म्हंणजे अमिताभ बच्चन एेन भरात होता तो  काळ, हा व्यावसायिक चित्रपटातल्या स्त्री भूमिकांना फारच चिंताजनक होता. त्या भूमिका अशा नव्हत्याच. आई, बहीण, प्रेयसी, अशा एखाद्या शब्दात वर्णन होण्यासारखे हे ढाचे असत आणि त्यात जी अभिनेत्री पडद्यावर उभी रहाणार तिची जनमानसातली प्रतिमा कच्चा माल  म्हणून वापरली जायची. त्यामुळे कोणता का सिनेमा असेना, निरुपा रॉयची आई तेच वात्सल्य आणि कठोरपणा यांचं मिश्रण दाखवायची, नितू सिंग आपला टॉमबॉइश खाक्या ,तर परवीन बाबी आपला पाश्चिमात्य अवतार.

या दिवसात नायिकांची प्रतिमा ही वरवरचा रोमॅन्टीक भाव आणि सोवळेपणा यांचं चमत्कारिक मिश्रण बनली होती. सेक्शुअॅलिटी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. आपल्या चित्रपटांमधला हा अँग्री यंग पिरीअड ओहोटीला लागला तेव्हापासून आपला व्यावसायिक चित्रपट स्त्री भूमिकांकडे थोड्या औदार्याने पहायला लागला. महेश भट्टच्या कामापासून व्यावसायिक चित्रपटांमधेही थोडी प्रायोगिक मूल्य यायला सुरुवात झाली. स्त्री भूमिकांमधेही अधिक खोली यायला लागली. 'अर्थ' (१९८२), 'सारांश'( १९८४) अशा निमव्यावसायिक अन खास वेगळ्या चित्रपटांबरोबरच त्याने रोमॅन्टीक वळणाचे चित्रपटही करायला सुरुवात केली ज्यातल्या स्त्रीभूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण होत्या. याच सुमारास आलेल्या शेखर कपूरच्या 'मासूम' (१९८३)  चित्रपटात लग्नसंस्थेबद्दल स्त्रीच्या दृष्टीकोनातून अतिशय सहज भाष्य केलं होतं. कपूरने पुढेही 'बॅन्डीट क्वीन' (१९९४) आणि 'एलिझबेथ'(१९९८) मधे स्त्री व्यक्तिरेखांना समोर ठेवलं . पण त्यावेळी तो बॉलिवुडच्या गणितांपलीकडे पोचला होता.

बॉलिवुडपुरतं बोलायचं तर,  नायिका खऱ्या विकसित झाल्या त्या गेल्या पंचवीसेक वर्षांच्या कालावधीत. त्यातलंही पहिलं दशक हे नव्या चित्रकर्त्यांच्या उदयात, त्यांनी बैठक पक्की करण्यात गेलं असं म्हणता येईल. एकूण चित्रकर्त्यांची एक फळीच्या फळी या काळात बदलली. आदित्य चोप्रा , करन जोहर यांसारखी जुन्या जाणत्या दिग्दर्शकांची मुलं या दिवसात नव्याने काम करायला लागली, शहारुख खान , सैफ अली सारखे नवे स्टार्स लोकप्रियतेत चढत गेले, अनुराग कश्यप सारख्या नंतर महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्ट्रगलर्सचा जम याच काळात बसत गेला. एव्हाना प्रेक्षकालाही तेच तेच पहाण्याचा कंटाळा आला होता. डिव्हीडी पायरसीमुळे शहरी प्रेक्षकापर्यंत पोचलेला जागतिक सिनेमा, केबल टिव्ही, २४ तास चालणारे मुव्ही चॅनल्स यातून आजवर न पाहिलेल्या चित्रपटांचं जग त्याच्यापुढे खुलं झालं होतं. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर हा एक सेटअप होता. प्रत्यक्ष कामाचा नव्हे तर तयारीचा काळ. या बदलांचा परीणाम हा २००० च्या पुढल्या काळात एक्स्पोनेन्शिअल पध्दतीने दिसत गेला.

कोणालाही घरबसल्या करुन पहाण्यासारखा एक प्रयोग सांगतो. हल्ली इन्टरनेटवर दरवर्षी आलेल्या चित्रपटांची यादी सहज उपलब्ध असते. त्यावर पटकन नजर फिरवायची आणि त्यात स्त्रीप्रधान किंवा किमान स्त्रीला महत्वाची आणि चांगली भूमिका असणारे चित्रपट सालानुसार बाजूला काढायचे. यादी पुरी झाली की तुमच्या लक्षात येईल की गेल्या पन्नास वर्षात आले नसतील एवढे स्त्रीप्रधान चित्रपट हे केवळ २००० च्या दशकात आले, आणि आता प्रत्येक वर्षीच्या नव्या यादीत अशा चित्रपटांना स्थान हे असतच.

या काळात काही गोष्टी झाल्या, त्या अशा.

एकतर नायिका या शब्दाची पारंपारिक व्याख्या बदलली. ती सुंदरच दिसायला पाहिजे, तिच्या अस्तित्वासाठी मुळात नायक हा प्राणी चित्रपटात असलाच पाहिजे, तिने स्वत:कडे दुय्यम भूमिकाच घेतली पाहिजे, हे सारे संकेत तितक्या गंभीरपणे पाळण्याचं कारण उरलं नाही. वयाची अटही उरली नाही. २००१ च्या 'दिल चाहता है' मधे जुन्या रोमान्सकडे नव्या पध्दतीने पहाताना  फरहान अख्तरने अक्षय खन्ना बरोबर डिंपल कापाडीआला घेतलं, किंवा आयान मुखर्जीने 'वेक अप सिड' (२००९) करताना  टिपीकल लव्हर बॉय प्रतिमा असणाऱ्या रणबीर कपूरच्या जोडीला त्याची मोठी बहीण शोभेलशी कोंकोणा सेन शर्मा कास्ट केली. डिंपलच्या व्यक्तीरेखेच्या घटस्फोटाची गुंतागुंत, किंवा कोंकोणाच्या वागण्यात दिसणारा करीअरचा विचार हे सारं बॅगेज दाखवणं, या व्यक्तीरेखा पूर्ण रंगवण्यासाठी आवश्यक ठरलं. प्रेक्षकांनाही त्यात काही वावगं, अधिक- उणं वाटलं नाही.

दुसरी गोष्ट झाली, ती म्हणजे विषयाच्या मर्यादा शिथील व्हायला लागल्या. त्या जशा विस्तारत गेल्या , तशी नायिकांवर लादलेली नैतिक मूल्य गळून पडायला लागली. लिव्ह-इन रिलेशनशिप्स, लग्नबाह्य संबंध, भ्रष्टाचार, कॉल गर्ल्स/ बार गर्ल्स सारखे व्यवसाय, एमएमएस स्कँडल्स अशा आजवर पडद्याआड ठेवलेल्या वा आडून आडून सुचवलेल्या गोष्टीही पुढे यायला लागल्या. कुमारी मातेला नवी स्त्रीवादी नायिका बनवणारा कुंदन शाहचा ' क्या कहना ' (२०००) , सर्व उद्योगांमागची भ्रष्ट नैतिकता तपासणारे मधुर भांडारकरांचे 'चांदनी बार'(२००१) , 'पेज ३' ( २००५) , 'फॅशन' (२००८)सारखे  चित्रपट, देवदासची आधुनिक आवृत्ती असणारा अनुराग कश्यपचा 'देव डी' (२००९) अशा , चित्रपटांवरची पारंपारिक बंधनं झुगारणाऱ्या चित्रपटांतून तब्बू, प्रिती झिंटा, कंगना रानावत, प्रियांका चोप्रा, कलकी यांसारख्या कितीतरी नायिका नव्या रुपात पुढे आल्या. प्रिती झिंटा सारख्या काहींनी पुढे नायिकांची परंपरागत भूमिका स्वीकारली, पण इतरांना नवी दिशा मिळाली.

यानंतरची पायरी पाहिली तर असं दिसतं, की काही नायिकांनी आपला स्त्रीप्रधान चित्रपट करण्याकडे कल असल्याचं आज उघड केलय. एके काळी जसा या चित्रपटांचा दुष्काळ होता तसा आज राहिलेला नाही. मल्टीप्लेक्सच्या  कृपेने छोटेखानी चित्रपट करण्याची तयार  झालेली शक्यता वापरु पहाणारे दिग्दर्शक, धाडस दाखवणारे काही निर्माते आणि हुशार बनत चाललेला प्रेक्षक , त्य प्रेक्षकांत वाढत चाललेलं स्त्रियांचं आणि समाजात वाढत चाललेलं करिअरिस्ट स्त्रियांचं प्रमाण या सर्वांमुळे या नायिकांना ते करणं शक्यही होतय. यातलं सर्वात लक्षात येण्याजोगं उदाहरण आहे, ते विद्या बालनचं जिने गेली काही वर्षं केवळ तिला महत्व असणारे चित्रपट केले. 'इश्कीया'( २०१०)  ,' द डर्टी पिक्चर्स'(२०११) , 'नो वन किल्ड जेसिका'(२०११), आणि 'कहानी' (२०१२) यांमधल्या तिच्या भूमिका त्याची साक्ष आहेत. तिच्या पाउलावर पाऊल ठेवून आता रानी मुखर्जी ( नो वन किल्ड जेसिका /अय्या/ मर्दानी) , कंगना रानावत ( क्वीन / रिव्हॉल्वर रानी)  यासारख्या नायिकाही याच दिशेने निघालेल्या दिसतात.

हे सगळं याआधीही कदाचित होऊ शकलं असतं, पण काही कारणाने आपला चित्रपट नायिका या संकल्पनेच्या नको इतका प्रेमात पडला आणि तिचं भूमिका म्हणून , कथानकातली एक व्यक्तिरेखा म्हणून काही एक स्थान असायला हवं, वजन असायला हवं, हेच विसरुन गेला. आजची नायिका बदलते आहे याचा मुख्य अर्थ एवढाच की ती या संकल्पनेत न अडकता आपलं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करते आहे. भूमिकेच्या संदर्भात आणि काही प्रमाणात समाजाच्या संदर्भात देखील. त्या दष्टीनेही नायिकांचं बेधडक बाहेर पडून आपण कोण आहोत, आपले विचार काय, हे खुलेपणाने सर्वांसमोर मांडणं मला सिग्निफिकन्ट वाटतं. मग ते त्यांनी मोकळेपणी दिलेल्या मुलाखतींमधून प्रकट होणं असू दे, ट्विटर/ फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क साईटच्या माध्यमातून लोकात मिसळणं असू दे , वा एआयबी रोस्ट सारख्या कार्यक्रमात स्वत:च्याच केलेल्या चेष्टेवर दिलखुलास हसणं असू दे. जुन्या प्रतिमांची चौकट मोडणं महत्वाचं, त्यातूनच नव्या प्रतिमा बनायला सुरुवात होऊ शकते.
गणेश मतकरी
( तनिष्काच्या महिला विशेष पुरवणीतून )

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP