कोर्ट - एक प्रतिक्रिया

>> Monday, April 20, 2015The most important characteristic, and the most important innovation, of what is called neorealism,it seems to me, is to have realised that the necessity of the "story " was only an unconscious way of disguising a human defeat, and that the kind of imagination it involved was simply a technique of imposing dead formulas over living social facts. Now it has been perceived that reality is hugely rich, that to be able to look directly at it is enough; and that the artist's task is not to make people moved or indignant at metaphorical situations, but to make them reflect ( and if you like, to be moved or indignant too) on what they and others are doing, on the real things, exactly as they are.

Cesare Zavattini, Some ideas on the cinema'वेगळा', हा शब्द इतका चावून चोथा झालेला नसता, तर कोर्ट चित्रपटासंबंधात वापरायला अतिशय योग्य होता. चांगल्या मराठी चित्रपटातले  व्यावसायिक वळणाचे आणि समांतर वळणाचे , हे दोन्ही प्रकार पाहिले तरी त्यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा तयार झालेल्या आहेत. आणि त्यातले बहुतेक चित्रपट या अपेक्षा कमी अधिक प्रमाणात पुऱ्या करतात. कोर्टला या अपेक्षा माहीत आहेत किंवा नाहीत याची कल्पना नाही, कारण या अपेक्षांचं कसलच ओझं तो बाळगताना दिसत नाही. अगदी मराठी चित्रपटाची भाषा मराठी हवी, इतक्या मुलभूत गोष्टीचंही बंधन तो पाळत नाही.

आता या संबंधात, म्हणजे चित्रपट इतका वेगळा असावा की नसावा या संदर्भात दोन विचार पुढे येऊ शकतात. एक गट म्हणू शकतो, की काय हे, या मंडळींना त्यांच्या प्रादेशिक प्रेक्षकाची इतकीही पर्वा नसावी ना? मराठी प्रेक्षकांसमोर चित्रपट दाखवताना  सरळ इंग्रजी आणि मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची काय गरजा आहे? या प्रेक्षकाला, चित्रपटात काय सांगितलं जातय कसं कळावं? वर सबटायटल्सदेखील इंग्रजी? ती तरी मराठीत द्यावी ! आणि किती ते संथ कॅमेरावर्क? आज आपला चित्रपट ( मराठी नसला तरी गेला बाजार हिंदी तरी) हॉलिवुडच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती दाखवत असताना कॅमेरा साधे जागचेही हलू नयेत? प्रेक्षक कंटाळणार नाही का?

याउलट दुसरा गट हा हे मुद्दे दिग्दर्शकाच्या हेतूविषयी शंका म्हणून पुढे आणत नाही, तर तो हेतू काय असावा, याचा विचार करतो. मी तरी सरळसरळ याच गटातला आहे. दिग्दर्शकाचा हेतू समजून घेताना, हे लक्षात घ्यायला हवं, की कोर्टला प्रादेशिक सिनेमा म्हणणं ही फक्त एक सोय आहे. चित्रपट कोणत्या तरी एका भाषेतला मानावा लागतो, आणि मराठीचा वापर यात सर्वाधिक आहे, वातावरण महाराष्ट्राच्या राजधानीतलं, मुंबईतलं आहे, चारातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखा मराठी आहेत, तो प्रदर्शितही इथेच करायचा आहे, म्हणून हा मराठी चित्रपट. खरं तर दिग्दर्शकासाठी तो बहुभाषिक/ युनिवर्सल आहे आणि अपेक्षा आहे ती त्याचा प्रेक्षकही बहुभाषिक असावा ही. यात आपल्या प्रेक्षकाचा मानापमान होण्याचं कारण नाही. चित्रपट सर्वांसाठी आहे म्हणजे तो आपल्यासाठी नाही अशातला भाग नाही. आपल्यासाठी काय आहे आणि काय नाही, हे आपण आपल्या कक्षा किती विस्तारु शकतो यावर बरचसं अवलंबून आहे. आणि मराठी प्रेक्षकाला जर त्याच्या भाषेने बनवलेली राष्ट्रीय आणि काही प्रमाणात जागतिक ओळख टिकवायची असेल, तर त्याने आपल्या कक्षा रुंदावलेल्या बऱ्या. अन्यथा भारताला ऑस्कर कधी, हा प्रश्न पुढच्या अॅकेडमी अवॉर्ड्सच्या वेळी अजिबात विचारु नये !

जी गोष्ट भाषेची , तीच दृश्यशैलीची. सध्या झालेल्या डिजीटल क्रांतीने आणि हॉलिवुडमधली जी ती गोष्ट क्षणार्धात आपल्याकडे उचलण्याच्या प्रथेने आपल्या हल्लीच्या चित्रपटात कॅमेरा मुक्तपणे फिरताना दिसतो. छोट्यात छोटे शॉट्स, गतीमान संकलन, याची आपल्यालाही आता सवय झालीय. प्रत्यक्ष फार काही घडत नसलं, तरीही ही गती काही होत असल्याचा आभास निर्माण करु शकते. कोर्टमधे असं काहीच नाही. तो आपला प्रसंगाची आहे ती गती तशीच ठेवतो.  आता याचा अर्थ या दिग्दर्शकाला हे तंत्र माहीत नाही, किंवा जमत नाही असा नाही, तर त्यांच्या चित्रपटाला ते योग्य वाटत नाही , एवढाच घ्यायचा.

हॅविंग सेड दॅट, एक गोष्ट स्पष्ट आहे, की हा चित्रपट आवडीने पाहू शकेलसा प्रेक्षक प्रामुख्याने शहरी आहे. ज्याला काही प्रमाणात वेगळ्या निवेदनशैलीचं एक्स्पोजर आहे, किंवा निदान ती असू शकते हे मान्य करु शकेल , असा हा प्रेक्षक असेलशी अपेक्षा आहे. जर हा प्रेक्षक पुरेशा प्रमाणात कोर्ट पर्यंत पोचला, तर त्यांना तो नक्कीच आवडू शकेल.

जे लोक हे वाचतायत, त्यांना कोर्ट या चित्रपटाची जुजबी माहिती तरी निश्चित असणार. त्याच्याबद्दल खूपच लिहिलं गेलय, आणि प्रेक्षकांचा पाठिंबा आहे वा नाही, याबद्दल अमुक एका प्रमाणात संभ्रम असला, तरी बहुतांश समीक्षकांनी, म्हणजे अगदी व्हरायटी पासून लोकसत्ता पर्यंत सर्वांनीच तो सरसकट उचलून धरला आहे. या मंडळींनी लिहिलेलं सगळं वाचूनही अनेकांच्या डोक्यात हा संभ्रम आहेच, की कोर्ट नक्की आहे कशाविषयी? कोर्टरुम ड्रामा, हा एक तद्दन बेतीव प्रकार आपल्या ( आणि अमेरिकन) सिनेमा नाटकांमधे अनेक वर्ष ठाण मांडून बसलाय. 'कोर्ट' हेच नाव आणि कथेचा बराच भाग व्यापणारी एक केस, त्यातही एका व्यक्तीवर उघड अन्याय, तिला सोडवण्याचा प्रयत्न करणारी एक नायकसदृश व्यक्ती, आणि यांच्या विरोधात उभी असणारी संपूर्ण व्यवस्था, म्हणजे कोर्टरुम ड्रामा नाही तर दुसरं काय? असा एक विचार , बाय डिफॉल्ट , प्रत्येक प्रेक्षकाच्या डोक्यात असणार यात शंका नाहीच. त्यामुळे चित्रपट सुरु होताच जे काही दिसतं, ते ज्या प्रकारे पुढे सरकत जातं, त्याने पहाणारा गांगरतो, जे घडतय ते पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कोणता, हे शोधण्याचा जमेल तितका प्रयत्न करतो. हा दृष्टीकोन सापडला, तर चित्रपट त्याच्यापर्यंत पोचतो, अन्यथा, 'किती कंटाळवाणा चित्रपट होता' ,हे मत घेऊनच हा प्रेक्षक बाहेर पडतो. हा चित्रपट काही जणांना कंटाळवाणा का वाटतो, याचं उत्तर बहुधा त्यांच्या या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षांमधे दडलेलं आहे.

चित्रपटाला सुरुवात होते, ती एका छोट्या खोलीत. दिसणारी फ्रेम, ही पुढे येणाऱ्या चित्रपटाच्या एकूण दृश्य संकल्पनेशी सुसंगत. सर्व तपशील एका फटक्यात दाखवणारी, विस्तृत. पाहताक्षणी ही खोली साधारण कोणत्या वस्तीत, काय सांपत्तिक स्थितीतल्या लोकांची, समाजाच्या कुठल्या वर्गातली असेल, हे समजतय. एका पलंगावर एक मध्यमवयीन गृहस्थ बसलेला. हा नारायण कांबळे ( वीरा साथीदार) .  त्याच्या आजूबाजूला बसलेल्या पोरासोरांची शिकवणी घेतोय.तिथून तो बाहेर पडताच चाळीखालचं एक तसच विस्तृत दृश्य येतं. मग रस्ता, बस , वगैरे. दर दृष्यचौकट ही चित्रित होणाऱ्या घटनेबरोबरच, त्या घटनेच्या सामाजिक ( क्वचित राजकीय ) पार्श्वभूमीकडेही सूचना करणारी. आजूबाजूचा तपशील अधोरेखित करणारी. हे दर शॉटचं लॉजिक थोडं वाढवून सीनलाही लावण्यासारखं. त्यामुळे दर प्रसंग त्यात मुख्य पात्रांचा प्रवेश होण्याच्या किंचित आधी सुरु होणारा, आणि मुख्य घटना संपल्याच्या किंचित नंतर संपणारा. या कथानकातल्या प्रसंगांबरोबरच ते सामावणाऱ्या वास्तवाबद्दलही दोन शब्द सांगणारी ही शैली मग आपल्याला अनेक गोष्टी दाखवते. न्यायासनाच्या एथिक्सबद्दलच्या कालबाह्य कल्पना , जागृतीचं आवाहन करणाऱ्या शाहीराच्या गाण्याहून अधिक पंधरा वर्षाच्या मुलींचा फिल्मी नाच पसंत करणारी मनोवृत्ती, मध्यमवर्गाच्या मनोरंजनासंबंधीच्या कल्पना, व्यक्तीपूजनापासून सेन्सॉरशिप पर्यंत अनेक गोष्टींची नवी रुपं आणि असं बरच काही.

हे सारं समाजवास्तव दाखवताना, कॅमेरा हा शक्य तितका कमी हलणारा. एका जागी उभा राहून निरीक्षण करणारा. तटस्थ. हे स्पष्ट असावं की हा चित्रीकरणाचा आणि संकलनाचा पॅटर्न दिग्दर्शकाकडून आलेला आहे. त्यातली छायाचित्रकार (मृणाल देसाई) आणि संकलक ( रिखव देसाई ) यांची कामगिरी ही स्वत:कडे कमीत कमी लक्ष वेधून घेणारी आहे. अलीकडे अनेक चित्रपटात तंत्रज्ञान आशयावर कुरघोडी करताना आपण पहातो. किंबहुना जितका तांत्रिक बडेजाव अधिक तितकं दिग्दर्शकीय चातुर्य अधिक असाही एक समज आहे. कोर्टने तो नं स्वीकारणं हीच तो दिग्दर्शकाचा निर्णय असल्याची खूण आहे. मात्र अनपेक्षित काही  करणं इतकाच हेतू यात आहे असं नाही. तर वास्तवाचा वास्तवपणा शक्य तितका तसाच ठेवणं अशी ही कल्पना आहे. याचं एकच उदाहरण घ्यायचं, तर वकील विनय व्होरा ( निर्माता विवेक गोम्बर) इन्स्पेक्टरला भेटून केस समजून घेतो तो सीन पहाता येईल. यात टेबलाच्या एका बाजूला लावलेला कॅमेरा हा सर्व व्यक्तिरेखांना प्रोफाईलमधेच दाखवतो. तो कुठेही या पात्रांचे क्लोज अप घ्यायला जात नाही, वा एकाला दुसऱ्यापेक्षा अधिक महत्व देऊ पहात नाही.

ज्या प्रकारे चित्रपट दर प्रसंगात मध्यवर्ती अॅक्शनच्या आजूबाजूच्या आशयाचा शोध घेताना दिसतो त्याप्रकारेच कोर्टची एकूण पटकथाही प्रमुख घटनेच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी टिपते असं दिसतं. इथली मुख्य घटना आहे ती नामदेव कांबळेवर चालवण्यात येणारी ( काही प्रमाणात सत्य घटनेवर आधारीत असलेली) केस.  चित्रपट या खटल्याची प्रगती उलगडत नेतो.  महत्वाची हिअरींग्ज दाखवत , साक्षी पुरावे नोंदत,  आपल्या न्यायव्यवस्थेचा आढावा घेतो. तिच्यातल्या विसंगती, दुटप्पीपणा , पसरटपणा, कालबाह्य कायदे याकडे तो निर्देष करत जातो. मात्र त्याबरोबरच तो विचार करतो,  तो ही न्यायव्यवस्था चालवणाऱ्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचा. यातून समोर येणारं चित्र हे वेगवेगळ्या पातळ्यांवर समोर येतं.

समाज एका विशिष्ट परिस्तिथीतून जात असल्याने त्यातली माणसं तशी आहेत, आणि माणसं तशी असल्याने न्यायव्यवस्था ही इतकी दुटप्पी बनली आहे, असा या चित्रपटाचा एकूण आलेख आहे. त्यामुळे वरकरणी विषय हा न्यायव्यवस्थेचा वाटला तरी कोर्टचा रोख आहे तो एकूण समाजावर.

संपूर्ण कोर्टला विसंगतीवर आधारित विनोदाचा एक बाज आहे, जो या चित्रपटाला कंटाळवाणा म्हणणाऱ्यांच्या नजरेतून कसा सुटला हे एक कोडं आहे. मात्र हा विनोद थेट नाही हे खरं. त्यामुळे विनोदी संवाद आणि प्रासंगिक विनोद, याची सवय झालेला आपला प्रेक्षक कदाचित यावर आपलं लक्ष चटकन केंद्रित करु शकला नसेल. किंवा हे वास्तव त्यांच्या फार जवळचं असल्याने तो त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहूही शकत नसतील. या विनोदाच्या मुबलक जागा आहेत. विनय व्होराच्या सेमिनार भाषणावेळचा पंख्याचा प्रसंग, सरकारी वकील नूतन( गीतांजली कुलकर्णी) हिने केलेलं एका लांबलचक कालबाह्य आणि सर्वसमावेषक कायद्याचं वाचन, मघा उल्लेख केला तो कांबळेंच्या गायनानंतरचा पंधरा वर्षाच्या मुलींचा नाच, न्यायमूर्ती सदावर्ते ( प्रदीप जोशी) यांनी फिर्यादीच्या स्लीवलेस ड्रेसला  घेतलेला आक्षेप अशी कितीतरी उदाहरणं. व्होराच्या पालकांच्या तक्रारींसारख्या अधिक ढोबळ जागाही हास्यकारक आहेत. पण त्या तुलनेने कमी आहेत.

या चित्रपटात काही क्लिशेजचा वापर आहे जो कधीकधी  ताणला जातो. नूतनच्या व्यक्तिगत आयुष्याचा जुनाट मध्यमवर्गीय रोख , हा त्यातला सर्वात जाणवणारा. मुख्य कारण म्हणजे तो अनेकदा येतो. लोकलमधल्या मैत्रिणीबरोबरच्या गप्पा, जेवतानाचं सिरीअल, नाट्यप्रयोग, या दर प्रसंगात हा मध्यमवर्गीयपणा चढत्या क्रमाने अधोरेखित होतो. त्याचा अतिरेक होतो तो नाटकाच्या प्रसंगात , कारण मुद्दा असला, तरी हे दृश्य फार भडक होतं. ते तसं होईल याची चित्रकर्त्याना खात्री असेलच,पण ते तसं असणं अनावश्यक वाटतं, किंवा मला अनावश्यक  वाटलं, हे खरं. गीतांजली कुलकर्णी केवळ आपल्या इंग्रजी बोलण्याच्या ' मराठी ' अॅक्सेन्टमधून जे क्षणात सांगून जाते, ते सांगायला ही इतकी दृश्य अनावश्यकच खर्ची घातल्यासारखं वाटतं. त्यामानाने विनयचं व्यक्तीगत आयुष्य अधिक पैलू घेऊन येणारं, त्यामुळे अधिक इन्टरेस्टिंग. कदाचित अधिक खरं.

शेवटाबद्दल सर्वसाधारण ( म्हणजे मनोरंजनाच्या पारंपारिक कल्पना जपणारा) प्रेक्षक बुचकळ्यात पडेल, हे मामीत हा चित्रपट पहातानाच लक्षात आलं होतं, मात्र एक नक्की, की स्पूनफिडींग न करताही आपला प्रेक्षक शेवटच्या भागाला आपापल्या पध्दतीने इन्टरप्रीट नक्की करु शकेल. एक गोष्ट मात्र मी म्हणेन की परिणामाच्या दृष्टीने, थोडा आधी येणारा, अन उघडच अधिक ऑब्विअस क्लायमॅक्स वाटणारा प्रसंग खरा शेवट मानला गेला तर बरं. सदावर्तेंचा पुढला भाग हा एपिलॉग असल्यासारखा आहे. त्याला अर्थ आहे, पण वजन थोडं कमी आहे.

आता काही मूलभूत प्रश्न. कोर्टचा खरा प्रेक्षक कोणता आणि चित्रपटाला कलाकृती मानलं तर त्याची  गुणवत्ता ही प्रेक्षकानुसार कमीजास्त होऊ शकते का? प्रेक्षकाला जर या चित्रपटाचं एस्थॅटिक्स मान्य नसेल, तर सर्वांनी  तो पहावाच असा आग्रह समीक्षकांनी  धरण्यात मुद्दा तो काय?
आणि अखेर, कोर्ट हा खरोखर वेगळा प्रयत्न आहे का फेस्टिवल्सचा प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेला अपरिचित फॉर्म्युला ?

माझ्या मते गुणवत्ता, कुठल्याही कलाकृतीची गुणवत्ता,  ही दोन प्रकारची असते. एक सजग रसिकासमोरची अन दुसरी , कोणाही रँडम व्यक्तीपुढची. साऱ्याच गोष्टी सरसकट सर्वांना आवडतील असं नाही.  शक्यता आहे, की त्यात काही थेट पोचणारा आशय असेल, तर तो सर्वाना अमुक एका पातळीवर तरी सहजपणे कळू शकेल. म्हणजे सिस्टीन चॅपलचं छत, हे मिकॅलेन्जेलोच्या चित्रांच्या थेट दिसणाऱ्या सौंदर्यामुळे आपलसं वाटेल, किंवा बॅन्क्सीची ग्राफिटी त्यातल्या उर्मट बंडखोर संदेशांमुळे. मात्र पिकासोचा क्युबिस्ट पिरीअड किंवा अॅन्डी वॉरहॉलचे प्रिन्ट्स सर्वाना त्याच सुलभपणे पोचतील असं नाही. तरीही, या गोष्टी पाहून पाहूनच कळतात, त्यांची सवय होते, काय म्हणायचय ते हळूहळू जाणवायला लागतं, त्यामुळे कला कळली न कळली, आर्ट गॅलऱ्या आणि म्युझियमना गर्दी जरुर व्हावी. आज काही न कळणारा, हा उद्याचा चांगला रसिक असू शकतो. हाच न्याय चित्रपटांना आणि खासकरुन  कोर्टसारख्या सिनेमाला लावायला हवा आणि तो पहावा हा आग्रह आहे तो त्यासाठी. चैतन्य ताम्हाणेचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे आत्ताच त्याच्यापुढे दंडवत घालण्याची गरज नाही. पण एक चांगली, किंवा उत्तम सुरुवात म्हणून त्याच्या या फिल्मकडे निश्चित पहाता येईल.

आता राहिला प्रश्न , तो 'कोर्ट हा केवळ महोत्सवांसाठी केलेला फॉर्म्युला आहे का?' हा.  नुकताच त्या पध्दतीचा युक्तीवाद एका इंग्रजी ब्लॉगवर आढळला. मी म्हणेन की जर असा फॉर्म्युला वापरणं इतकं सोपं असेल, आणि त्यानी अमुक एक गुणवत्ता असणारी कलाकृती तयार होत असेल, तर का नाही ? मिळवा ना देशोदेशीचे पुरस्कार दरवर्षी. मराठी चित्रपटाचं ऑस्करही त्यामुळे अधिक जवळ येईल !  पण मला विचाराल, तर हे सारं एवढं सोपं नाही. कोणी व्हेनिसला बेस्ट फिल्म मिळवायचं किंवा सुवर्ण कमळ मिळवायचं म्हणून ठरवून मास्टरपीस बनवू शकत नाही. त्यामागे काही प्रेरणा असू शकतात, काही दिग्दर्शक, काही चित्रपट यांचा प्रभाव असू शकतो, पण या प्रकारे इतक्या सुजाण प्रेक्षकांना कह्यात घेणाऱ्या कलाकृतीत काहीतरी स्वत:चं, काहीतरी ओरिजीनल असावंच लागतं. आणि कोर्टमधे ते आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
- ganesh matkari 

12 comments:

Vivek Kulkarni April 20, 2015 at 10:25 AM  

नामदेव कांबळे नाही तर नारायण कांबळे.

Unknown April 20, 2015 at 10:53 AM  

Good piece of writing. Echo of my own sentiments.
Yes , indeed a marvelous film. I saw it twice. Geetanjali Kulkarni superbly executed the public prosecutor's role. I do not however think that her character was negative or intended to be negative. She is a smart lawyer knowing fully well that the judge must abide by the statute as it exists. On the other hand, the human rights lawyer argues his case relying on the absurdities of the law. He is also not the militant type and does not pursue his case with any visible vigour. He is a loner, perhaps past his prime. Narayan Kamble, can hardly be said to be the protagonist. Though steadfast in his commitment to his ideology, he is passive, easily and overtly acquiesces to the system. The film yet holds your attention in a sort of eye-opening way because of its sober but stark portrayal of the legal system. The system is the real villain of the piece and is so overpowering, that the characters of the film as well as the audience are totally prostrated before it. The film very effectively puts across the dull, stubborn insensitivity of the system and the banality of the players. It takes some nice digs at the press-club and Raj Thakre. By hind sight one can say that those were not necessary for the film and that the director simply could not avoid the temptation to let those pass.

I also noticed the mixed reaction of the audience; extremely appreciative on the one hand and disinterested or unaffected on the other. It was not clear to the audience about who exactly plotted against Narayan Kamble. The police acted at whose behest was the unanswered question. The director probably wants to suggest that the system suo moto behaves in this fashion - an inference hard to digest. One reaction I heard was "the film was abruptly stopped by the theater people"! I think the more effective closure for the film would have been when the court closes for the vacation. The plot could have been easily worked around to include the part relating to the commonplace mediocrity of the judge. I think that is where the film lost part of its audience. The other part was so impressed with the presentation that it was willing to ignore some excesses. I too fall in the second part.
I think Court and Ek Hazarachi Note are two extremities of the same theme. The former treats system as the main culprit, the latter places individuals in power as the villains of the piece. All other parties are at the mercy and pleasure of the common folk.
Mr. Matkari has made a very important point about "regionality" of cimema. Marathi film makers must try and rise above the "regional" stamp and address global or universal audiences. That does not mean that films be made only for the elite. All it means that a film should be such that would touch the heart and intellect of any person anywhere in the world. The language of cinema is universal and good sub-totling adds to the pleasure and imaginative power of the audience who do not speak the language spoken in the film. A film should not be judged on the basis of likes and dislikes but on the basis of what it wants to say, and, how effectively it says what it wants to say.
My compliments, both to Mr. Tamhane for the film and to Mr. Matkari for a wonderful review.

Digamber Kokitkar April 20, 2015 at 8:14 PM  

एक उत्तम सिनेमा लोकांपर्यंत पोहोच्न्या साठी उत्तम परिक्षणा ची देखिल गरज असते.
Ship of Theaues च्या वेळी तुम्ही खुप काही वेगळ्या गोष्टी ज्या आमच्या सारख्या रसिकाना कळल्या वा दिसल्या नाहीत त्या तुम्ही दाखवल्या.
Court पाहिला आणि आवडला सुद्धा पण वरील परिक्षण वाचून अजुन समजला अर्थातच अजुन 1 वेळा पाहून अजुन काही गोष्ठी समजतील.
धन्यवाद.

Ayub Attar April 20, 2015 at 8:48 PM  

कोर्ट , पाहायचा आहे . तुमचा लेख सुद्धा सुरवात आणि शेवट वाचला . कोर्ट पहिल्या नन्तर वाचीन . तुम्ही लिहिल्या प्रमाणे बराच संथ असणार आहे . पेशन ठेउन पहावा लागणार

joman darlekar April 20, 2015 at 11:59 PM  

काल दुपारी कोर्ट थिएटरला जाऊन पाहिला. फेस्टिवलमध्ये दोन वेळा पाहून आवडल्याने परत पाहण्यासाठी आलेला नाटक ग्रुपचा मित्र बरोबर होता. कल्पना असूनही सिनेमाची संथ लय पचनी पडायला जरा वेळ लागला. कोर्टातली दृष्ये फार छान जमून आलेली आहेत. पुन्हा पुन्हा तारखा पडताना मनस्ताप वाढायला लागला. पोस्ट मॉर्टेम्चा रिपोर्ट कोर्टापर्यन्त पोचायला इतक्या तारखा मध्ये जाव्या लागतात? आरोपीचा वकीलहि निवान्तपणे तारखा स्वीकारत असतो, त्यानं काहीतरी प्रयत्न करावा असे वाटते पण सगळे मुर्दाडासारखे निवान्त आणि मग कोर्टाला सुट्टी ....
यात व्हिलन कोणी नाही, खोट्या साक्षी देणारे आणणारा पोलीस इन्स्पे विलन नाही. ... " जाउद्या लवकर वीस वर्षे शिक्षा देऊन टाकायची" असा कॅजुअल रीमार्क मारणारी सरकारी वकिलीण बाई व्हिलन नाही... मग ही सगळी सिस्टीम त्या बापड्या म्हातार्‍या लोकशाहिराच्या मागे हात धुऊन का बरं लागलीय? कोणास ठाऊक?

कोर्ट बन्द होतानाचं दृश्य आवडलं... शेवटी "न्यायदेवता झोपली आहे आणि ती भलत्यालाच फटके मारून मोकळी होते" असं एक त्यातल्या त्यात ढोबळ इन्टरप्रीटेशन मी माझं केलं... सिनेमा आवडला मला... पण इतका भयाण सन्थ नसता तर अजून आवडला असता.

करमणुकीच्या आशेनं आलेला एक तरूण प्रेक्षक कंटाळून निघताना आपल्या मित्राला म्हणाला," ते कोर्ट सिनेमाला आलोय- असं फेसबुक अपडेट काढ बरंका, लोक हस्तील"

aso... काहीही असलं तरी पहिल्या प्रयत्नांत विविध फेस्टिवल्समध्ये बक्षीस मिळवणारा हा मराठी सिनेमा सर्वांनी पहावा, असे वाटते आहेच. त्यातल्या आवडलेल्या / न आवडलेल्या गोष्टींची सर्वांनी चर्चा करावी असेही वाटते आहेच.
....

Mandar Joglekar

Unknown April 21, 2015 at 1:38 AM  

समिक्षा पुर्णत: पेलवली आहे कारण हे काम अत्यंत गुंतागुंतीच होतं.

awdhooot April 22, 2015 at 1:55 AM  

Hats off to you, Ganesh, for this intelligent write up.

Unknown April 27, 2015 at 11:14 PM  

Excellent criticism, with precised points... I got answers of two of my questions... Thank you... :)

Ayub Attar April 28, 2015 at 8:32 PM  
This comment has been removed by the author.
Ayub Attar April 28, 2015 at 8:36 PM  

काल रात्री पाहिला . जाम आवडला . इतके नैसर्गिक संवाद ,लोकेशेन ,अभिनय मराठीत कमी असतात ( अभिनय लावुड असतो ,बहुतेक ) .
मला सगळ्यात जास्त आवडलेले दृश्य म्हणजे कोर्ट बंद होतानाचे . अनामिक भीती पसरते मनात . मुर्दाड सिस्टीम विषयी राग येतो मनात . सिस्टीम चालावानार्यांच मस्त चालले आस्ते . मारणार मरत असतो . सरकारी कार्यालयात आसा अनुभव येतो .
आणखी एक . हा चित्रपट सर्वांसाठी नाही . प्रत्येका चा अनुभव , समज वेगळी असते

HaRsHaD May 24, 2015 at 3:59 AM  

सिनेमा खूपच संथ आहे .वायफळ प्रसंग बरेच आहेत . कथानकात detailing फार कमी आहे. court scene उत्तम जमले आहेत.फिल्म सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही .सिनेमाचा शेवट absurd वाटला. दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते पोहचतच नाही.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP