नेटफ्लिक्स आणि आजचा प्रेक्षक

>> Friday, February 12, 2016


आज सकाळीच, मी माझ्या एका मित्राला मेसेज केला, की' तुझ्याकडे वायफाय कनेक्शन काय स्पीडचं आहे, आणि तू नेटफ्लिक्स घेतलस का?'
त्यावर त्याचं उत्तर होतं, 'वायफायचा स्पीड बरा आहे, पण नेटफ्लिक्स म्हणजे काय?'
माझा त्यावरचा प्रतिसाद लेखात छापण्याजोगा नाही, पण त्यावरुन माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे 'नेटफ्लिक्स' म्हणताच समोरच्याला सारं काही कळेल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
थोडक्यात सांगायचं, तर नेटफ्लिक्स ही ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हीस आहे, जी तुम्हाला हवे ते चित्रपट/ टिव्ही मालिका ( अधिकृतपणे आणि उत्तम तांत्रिक दर्जा सांभाळून) घरबसल्या दाखवू शकते. म्हणजे  खऱ्या लायब्ररीशी संबंधित डिव्हीडी आणायला जाण्यापासून ते सिनेमा परत करायला झालेल्या उशीराबद्दल आकारल्या जाणाऱ्या लेट फी पर्यंत, साऱ्या कटकटी मुळातच बाद करणारी व्हर्चुअल लायब्ररीच. प्रत्यक्षात अमेरिकेतली नेटफ्लिक्सची सुरुवात प्रत्यक्ष डिव्हीडींची देवाणघेवाण करणाऱ्या मेल ऑर्डर लायब्ररीपासूनच झाली, आणि आजही त्यांची एक शाखा हा उद्योग करतेच. पण जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या प्रेक्षकवर्गासाठी स्ट्रीमिंग, हे नेटफ्लिक्सचं प्रमुख काम. आपल्यासाठीही त्यांची ओळख तीच.
आपल्याकडे टिव्ही पहाणारा प्रेक्षकवर्ग हा दोन गटात विभागला गेलाय असं स्पष्ट दिसतं.किंवा आतापर्यंत होता. आपला टेलिव्हिजन दाखवेल ते मुकाट्याने पहाणारा पहिला वर्ग आणि त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारा दुसरा वर्ग. पहिला वर्ग, हा प्रामुख्याने घरोघरच्या महिला वर्गाला प्राधान्य देऊन केलेल्या मालिकांच्या प्रसार आणि अंधानुकरणातून तयार होत गेलेला. रात्री नऊला दिसणारा चित्रपट / किंवा त्याच सुमारास दिसणारी एखादी वेगळ्या प्रकारची मालिका, आणि नोकरदार पुरुष मंडळी हमखास घरी सापडण्याच्या काही इतर वेळा सोडल्या,तर घरचा टिव्ही हा गृहिणींच्या ताब्यात.त्यामुळे त्यांना काय आवडेल याभोवती आपला बराचसा टिव्ही फोकस होतो. गेली कित्येक वर्ष यावर सास बहु मालिकांची सत्ता आहे. आपल्या हातातला चॅनल आणि त्याचा हक्काचा प्रेक्षकवर्ग असतानाही, या चॅनल्सनी नवं काही करण्याचे प्रयत्न न करता एकाच वर्तुळात फिरत रहाणं पसंत केलय.

मला काही वेळा असं का , हा प्रश्न पडतो. कारण अमेरिकेची नक्कल आपल्याकडे करण्याची प्रथाच आहे. मग तिथल्या आणि इंग्लंडमधल्या मालिका या इतक्या उत्तम प्रतीच्या असताना आपण तेच जुनं दळण का घेऊन बसलोय? म्हणजे एकीकडे त्यांच्या मालिका हळूहळू सिनेमाच्या जवळ चालल्यात, आणि आपण मात्र दूरदर्शनवर तेरा भागांच्या मालिकांची सद्दी असताना जो दर्जा होता तेवढाही आज ठेवू शकत नाही.

मघा म्हटलेल्यातला जो दुसरा वर्ग आहे, तो फक्त या देशा बाहेरच्या मालिका वा चित्रपट पहातो. त्याला बहुधा बाकी मराठी -हिंदी टिव्हीवरचा खपाऊ माल सहन होत नाही आणि मग तो एखादा इंग्रजी चॅनल पहायला लागतो.कालांतराने  जाहिरातीचा मारा आणि आठवड्याने येणाऱ्या भागातल्या घडामोडींना कथानकातल्या पुढल्या संदर्भासाठी लक्षात ठेवण्याचा त्रास टाळण्यासाठी तो या पहाणं बंद तरी करतो, किंवा टॉरन्ट्स सारख्या मार्गाने हे बाहेरचं सारं डाऊनलोड करुन पहायला लागतो, ज्यामुळे त्याला दर भागानंतर पुढल्या कथानकासाठी आठवडाभर थांबावं लागणार नाही, अनेक भाग सलग पहाता येतील.
थोडक्यात काय, तर वाईट टिव्हीवर समाधानी असणारे, आणि चांगल्या टिव्हीच्या प्रतिक्षेत असूनही पायरसी वाचून समाधानकारक पर्याय न उपलब्ध झालेले, असे दोन्ही प्रकारचे मुबलक प्रेक्षक आज अस्तित्वात आहेत.भारतातलं नेटफ्लिक्सचं आगमन हे चांगल्या वेळी झालेलं आहे. चांगल्या टिव्हीच्या प्रसारातून, तो पहिल्या वर्गाच्या प्रेक्षकाचं प्रमाण कमी करु शकतो का, आणि अप्रत्यक्षपणे लोकल टिव्ही मधे काही सुधारणा घडवून आणू शकतो का,  हा खरा प्रश्न आहे.
पायरसीला मी सपोर्ट करणार नाही, पण तरीही एक लक्षात घ्यायला हवं, की जागतिक चित्रपटातला उत्तमोत्तम सिनेमा आपल्याकडे पोचवण्यात आणि तरुण पिढीतल्या अनेकांना त्याची गोडी लावण्यात डिव्हिडी पायरसी आणि टॉरन्ट्स, या दोन्हीचा महत्वाचा हात आहे. आता ही पायरसी म्हणजे शुक्रवारी थिएटरमधे लागलेला नवा बॉलिवुड सिनेमा शनिवारी रस्त्यावर विकायला ठेवणारी, किंवा चित्रपट महोत्सवांमधे सिलेक्शनसाठी पाठवलेल्या कॉप्या अपलोड करणारी पायरसी नाही. ती कधीही निषिध्दच मानायला हवी, मात्र ज्या पायरसीने आपल्याकडे उपलब्धच नं होणारं चांगलं काही आपल्यापर्यंत पोचवलं असेल , ती कायद्याने गैर असूनही लोकशिक्षण घडवणारी होती , असं म्हणायला मला काही वाटणार नाही. आता नवा पेच हा, की गेली काही वर्ष नेटवर फुकटात ( म्हणजे नेटपॅकची किंमत सोडता) उपलब्ध असणारा उत्तम चित्रपट, परदेशी मालिका, यांचा प्रचंड मोठा साठा नेटफ्लिक्स ने आपल्यासमोर ठेवलाय, पण एका विशिष्ट किंमतीत. मग त्यासाठी आपण पैसे मोजायला तयार आहोत, का अजूनही हे पैसे वाचवत आपण पायरसीच्याच मागे धावणार?

माझ्या मते हा प्रश्न नो ब्रेनर आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला योग्य, परवडण्याजोग्या किंमतीत उपलब्ध होत असेल, तर ती फुकटात मिळवण्याच्या नादी लागू नये. यात मूळ आणि पायरेटेड यांच्या दर्जांमधला फरक  वगैरे तांत्रिक बाबी सोडूनही एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे कलावंतांपर्यंत त्यांच्या कामाचा मोबदला पोचायलाच हवा. एखादी गोष्ट जेव्हा वैध मार्गाने उपलब्ध असते, तेव्हा तिचा काही एक भाग हा त्या चित्रपटाच्या निर्मात्यांपर्यंत पोचत असतो. ज्या क्षणी पायरसी होते, त्या क्षणी संबंधित निर्मात्याचं उत्पन्न बंद होतं. जर हे सातत्याने होत राहिलं, तर त्या व्यक्तीकडून होणारी निर्मिती घटत जाणार हे स्पष्ट आहे.हे लगेच जाणवणार नाही पण काही वर्षांनी त्याचे परिणाम दिसायला लागतील. ( हेच काही प्रमाणात साहित्यालाही लागू आहे. पुस्तकांची पायरसी झाली तर लेखकाचं मानधन येणार कुठून? आणि तो पुढे लिहिता रहाणार कसा? ) त्यामुळे इन्टरनेटवर सारं मोफत उपलब्ध असतानाही जर कायदेशीर मार्ग उपलब्ध असेल तर तो जरुर स्वीकारावा.विदेशी मालाच्या चाहत्या प्रेक्षकाने डाऊनलोडींग कमी करुन नेटफ्लिक्सकडे का वळावं याचं हे एक चांगलं कारण मानता येईल.
आता सामान्य ग्राहक जेव्हा नेटफ्लिक्स कडे वळतो, तेव्हा त्याच्यापुढे बारीकसारीक प्रश्न खूप असतात, म्हणजे स्ट्रीमिंगसाठी किती स्पीड आवश्यक आहे इथपासून ते अमेरिकेच्या तुलनेत भारतात कमी मटेरिअल का उपलब्ध आहे, इथपर्यंत.पण मी इतकच म्हणेन की ते सोडवणं फारसं कठीण नाही. गुगलवरही आपल्याला त्याची उत्तरं मिळू शकतील. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे ,की नेटफ्लिक्समुळे आपल्या प्रेक्षकाच्या पहाण्याच्या पध्दतीत वा आवडीनिवडीत बदल संभवतो का?
जे ऑलरेडी भारतीय टिव्हीकडे ( न्यूज चॅनेल्स सोडून ) दुर्लक्ष करतात, उदाहरणार्थ मी स्वत:, त्यांच्यासाठी तर हे जवळपास वरदान म्हणायला हरकत नाही. कारण अजूनपर्यंत आपल्याकडे नेटफ्लिक्सचं संपूर्ण कलेक्शन उपलब्ध नसलं, तरीही जे आहे, ते खूपच आहे, आणि असा सहज उपलब्ध होणारा ,जाहिरातीविना पहायला मिळणारा साठा मिळाला , तर कोणाला नकोय? ( असं एेकतो, की अशा काही चोरवाटा आहेत ज्यांच्यावाटे तुम्ही भारतात रजिस्ट्रेशन करुनही नेटफ्लिक्सच्या संपूर्ण साठ्यापर्यंत पोचू शकता. नेटफ्लिक्सला अर्थातच या वाटा मान्य नाहीत, आणि त्या बंद व्हाव्यात यासाठी त्यांनी कंबर कसलीय.त्यांना ते कितपत जमतय, हे पहाणंही मनोरंजक ठरावं.) पण हे थोडं कन्विन्सिंग द कन्विन्स्ड सारखं आहे. ज्यांना मुळातच आपला टिव्ही टाकाउ असल्याचं माहिती आहे, त्यांनी या नव्या पर्यायाकडे वळणं, हे फार आश्चर्यकारक नाही.इतरांचं काय?

मला वाटतं आपल्या मालिकांनी लोकांना लावलेली सर्वात वाईट सवय म्हणजे डेली सोप्सचा अतिरेक. पूर्वी प्रेक्षकाला आठवड्याच्या उडीनंतर कथानक लक्षात ठेवायची सवय होती . आता मात्र एखाद्या ड्रगसारखी रोज ती विशिष्ट  वेळ झाली की त्याला ती अमुक मालिका पहायला लागते. ती नसली तर तो प्रेक्षक बेचैन होऊन जातो. त्यात मुळातच यातल्या बऱ्याच मालिकांना धड कथानक नाही. (मराठीत अजिबातच नाही, हिंदीत क्वचित असणाऱ्या क्राईम, हॉरर वगैरे मालिकांना माफक कथानक असू शकतं.) त्यामुळे त्याच त्या कलावंतानी, तसाच मेलोड्रामा करताना पहाणं हा या प्रेक्षकाचा डेली फिक्स झालेला आहे. (दर्जा नसणं, यात आपल्या मालिका करणाऱ्यांचीही फार चूक नाही. परदेशी मालिकांचा एक सीझन, वर्षभरातले भाग , हे साधारण १० ते २४ असतात. आपल्याकडे तेच जर २०० च्या वर करावे लागले तर कसली सर्जनशीलता, न काय ! वेठबिगारीच ही. ) मला वाटलं होतं, की अनिल कपूरने जेव्हा २४ सारखी उत्तम मालिका हिंदीत आणली, आणि बऱ्यापैकी दर्जा सांभाळून आणली, तेव्हा तरी या प्रकारचे अधिक प्रयत्न दिसायला लागतील, पण तेव्हा काही हे झालं नाही. प्रतिसाद तेवढ्यापुरता राहिला , आणि भागांमधल्या अंतराने तो पुढे थोडाफार कमीच झाला. जर या प्रेक्षकांना खरच काही उत्कंठावर्धक पहायचं असेल आणि भागांमधली गॅप टाळून, सलग कथानक म्हणून पहायचं असेल, तर नेटफ्लिक्स हा चांगला पर्याय आहे. कारण इथे संपूर्ण सीझन,झालेले सर्व भाग एकत्र दिसत असल्याने पहाण्याचा अनुभव अधिक प्रभावी आहे.

मला वाटतं आठवड्याच्या अंतराचा प्रश्न हा काहीसा युनिवर्सल असावा.इतर ठिकाणच्या मालिका दाखवण्याबरोबर जेव्हा नेटफ्लिक्सने आपलं नवं प्रोग्रॅमिंग बनवायला सुरुवात केली तेव्हा यावर चांगला उपाय शोधला. २०१३ मधली दिग्दर्शक डेव्हिड फिंचरची निर्मिती असणारी , आणि प्रमुख भूमिकेत केविन स्पेसी सारखा मोठा नट असणारी 'हाऊस ऑफ कार्ड्स ' मालिका जेव्हा नेटफ्लिक्स वर दिसली, तेव्हा त्यांनी नॉर्मल टिव्ही प्रमाणे आठवड्याला एक भाग रिलीज न करता आपल्या नेहमीच्या पूर्ण सीझन टाकण्याच्या पध्दतीला अनुसरुन त्यातले सर्व, म्हणजे १३ भाग एकदम उपलब्ध करुन दिले. नव्या निर्मितीसाठी हे काहीतरी अजब होतं, पण त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. ही सलग कथानक पहायला मिळण्याची सवय देखील अॅडिक्टीवच आहे, पण चांगल्या अर्थाने. अतिशय उत्तम दर्जा आणि सतत काही ना काही नवं, मधे वाट पहायला न लागता दिसलं, तर टिव्हीकडून इतर कसली अपेक्षा ठेवायची ! ही सवय जर आपल्या मालिकाप्रेमी लोकांमधेही पसरली, तर बदल नक्कीच संभवतो. असं झालं तर मग आपला आजचा टिव्हीही चाचपडताना आणि अखेर स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी तरी  त्याच त्या गोष्टी दाखवण्याच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसायला लागेल.

त्यादिवशी कोणीतरी म्हणालं की नेटफ्लिक्स एका विशिष्ट वर्गासाठी आहे, पण त्यात मला काही तथ्य दिसत नाही. अमेरिकेत आणि जगभरातही त्यांचा ज्या प्रकारे सर्वत्र पसरलेला प्रेक्षकवर्ग आहे त्यावरुनही हे सिध्द होतं. सध्या मोठ्या प्रमाणात त्यावर असणारी इंग्रजी फिल्म्स-मालिकांची यादी पाहून कदाचित असं वाटत असेल इतकच. आताही नेटफ्लिक्सवर हिंदी- मराठी चित्रपट काही प्रमाणात आहेत. कालांतराने हे प्रमाण कमी न होता वाढत जाईल, आणि सर्व प्रकारचा प्रेक्षक त्याकडे आकर्षित होईल. आशा एवढीच आहे, की जेव्हा भारतीयांसाठी ओरिजिनल प्रोग्रॅमिंग करायची वेळ येईल, तेव्हा नेटफ्लिक्सच्या डोळ्यासमोर आपल्या आजच्या मालिकांचा आदर्श नसेल !

गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP