वरल्या हुकुमाचे ताबेदार

>> Saturday, February 13, 2016

भयपटाची व्याख्या काय?
   भुताखेतांचा सिनेमा? अंधाऱ्या रात्री, मुखवटाधारी माथेफिरू, झपाटलेली घरं, बेताची बुध्दी असणारी कॉलेजवयीन मुलं, मोक्याच्या वेळी बंद पडणाऱ्या गाड्या, आणि प्रेक्षकाला घाबरवण्यासाठी  काळजीपूर्वक रचलेल्या बू मोमेन्ट्सची मालिका, म्हणजे भयपट नाही. संकेतांभोवतीच फिरायचं, तर तशी व्याख्याही करता येईल, पण ती अगदीच बाळबोध ठरेल. मला वाटतं पहाणाऱ्याच्या मनात भीती उत्पन्न करणारा कोणताही सिनेमा हा भयपट गणता आला पाहिजे, त्यासाठी त्याला स्थलकालघटनांचे नियम नकोत. किंवा रुढार्थाने एखाद्या वेगळ्या चित्रप्रकारातला त्या चित्रपटाचा समावेशही आपल्याला चालवून घेता आला पाहिजे. असं झालं, तर तो भयपट निर्मनुष्य रानात, किंवा जुन्या पुराण्या वास्तूमधे न घडता भरवस्तीतल्या एखाद्या फास्ट फूड चेनमधेही घडू शकेल. आणि त्यातल्या माथेफिरुच्या हातात चाकूसारखं उघड शस्त्र असण्याचीही गरज नाही, आजच्या काळातलं, फोनसारखं प्रभावी अस्त्रही त्यासाठी पुरेसे आहे.
  या कारणासाठीच मी क्रेग झोबेलच्या कम्प्लायन्स (२०१२) ला भयपट म्हणेन. भले त्यात खून पडत नसतील, किंवा अतिमानवी शक्तींचा संचार नसेल, तरीही त्यातली भीती अधिक अंगावर येते. कारण बाकीच्या चित्रपटांना पाहतांना आपल्याला हे सगळं खोटं खोटं, आपल्याला घाबरवण्यापुरतं घडवलय हे ठाऊक असतं. याउलट कम्प्लायन्स पाहाताना आपल्याला केवळ हे शक्य कोटीतलं आहे इतकंच जाणवत नाही, तर ते प्रत्यक्षात घडून गेल्याचंही चित्रपट सांगतो.
 कम्प्लायन्स घडतो, तो चिकविच या फास्टफूड चेनमधल्या एका आऊटलेटमधे. अशी आउटलेट्स आता मॅकडोनल्ड्स, बर्गर किंग वगैरेमुळे आपल्याही परिचयाची झालेली. हे त्यातलच एक. मध्यमवयीन सॅंड्रा ( अॅन डोड) इथली मॅनेजर, तिच्या हाताखाली काही तरुण मुलंमुली. बेकी ( ड्रीमा वाॅकर) त्यातीलच एक. थोडी बेशिस्त, पण प्रामाणिक. आउटलेटमधलं वातावरण एरवी तसं प्लेझन्ट पण या विशिष्ट दिवशी थोडा ताण आहे. एकतर आदल्या रात्री फ्रीझर उघडला राहिल्याने काही गोष्टी खराब झाल्यात, त्यामुळे असलेला साठा काळजीपूर्वक वापरावर लागणार आहे. त्याशिवाय मॅनेजमेन्टचं कोणीतरी गुप्तपणे इन्स्पेक्शनला येणार असल्याचा निरोपही सॅंड्राला मिळालाय. त्यामुळे एकंदरीत वातावरण तापलेलं आहे. सॅंड्रा सर्वांना काळजीपूर्वक काम करायला सांगते, आणि दिवसाची सुरुवात होते. काही वेळ सारं सुरळीत चालू राहतं , आणि सॅंड्राच्या नावाने एक फोन येतो. पोलिसातून आहेसं कळतं. फोनवरचा माणूस (पॅट हीली) आपलं नाव आॅफीसर डॅनिअल्स असल्याचं सांगून तिथे बेकीच्या वर्णनाची कोणी मुलगी काम करते का असं विचारतो. करतेसं कळल्यावर तिच्यावर चोरीचा आरोप असल्याचं सांगून डॅनिअल्स तिला मागच्या आॅफिसमधे बोलवून घ्यायला लावतो, आणि घटनांना वेगळं वळण मिळतं.

  खरं तर कथानक म्हणून कम्प्लायन्समधे फार रहस्य नाही. तो कशाविषयी आहे, ही माहिती नेटवर सहज उपलब्ध आहे, इतकंच नाही, तर तो ज्या विशिष्ट घटनेला जसंच्या तसं आपल्यापुढे मांडतोय, तिचं प्रत्यक्ष फूटेजही नेटवर उपलब्ध आहे. शिवाय ज्या मुद्द्यावर बोलायचं तो काढायचा, तर पुढलं वळण काही एका प्रमाणात सांगणंही आवश्यक आहे. तरीही, जर कोणाला तपशिलात जायचं नसेल, तर त्यांनी पुढे नं वाचलेलं बरं.
 डॅनिअल्स हा नुसता फोनवरचा आवाज आहे,तो प्रत्यक्ष तिथे नाही, मात्र तो एक पोलिस म्हणून सॅंड्राशी बोलतोय. एक आॅथाॅरिटी फिगर म्हणून तिला विश्वासात घेतोय. बेकीशी तो चोरीविषयी बोलतो, पण ती कबूल करत नाही असं म्हंटल्यावर तो सॅंड्राला चोरीचे पैसे शोधायला सांगतो. सुरुवात साध्या गोष्टींनी होते. बेकीचे खिसे तपास. पर्स तपास. त्यात पैसे अर्थातच सापडत नाहीत. मग स्ट्रिप सर्च. कपडे काढून झडती घेणं या गोष्टीला आधी कोणीच तयार होतं नाही. पण बेकीला मारुन मुटकून तयार केले जातं. अर्थात, झडतीनंतरही डॅनिएल्सचं समाधान होतं नाही. तो गोष्टी लवकरच आणखी पुढच्या थराला नेतो. एका निरपराध मुलीपासून काही फुटांवर तिचे सहकारी असताना, एका खोलीपलीकडे खेळीमेळीने खाण्याचा आस्वाद घेणारे लोक असताना, बेकीशी ज्या प्रकारचा मनस्ताप, मानसिक आणि शारीरीक छळ सोसावा लागतो, ते अंगावर काचांमधून आणणारं आहे.
  कम्प्लायन्स हा भीती निर्माण करतो त्यामागे कारण आहे. तो हे दाखवून देतो की कदाचित माणसं ही मुळातच अन्यायाची चाड बाळगत नसावीत. ती फक्त कसलीही जबाबदारी घ्यायला घाबरतात. जर त्यांना कोणी ठणकावून एखादी भयंकर गोष्ट करायला सांगितली, आणि त्याचं जे निष्पन्न होईल त्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही, असं सांगितलं, तर ती कोणत्याही थराला जायला मागेपुढे पहाणार नाहीत. फिल्ममधली सॅंड्रा काय किंवा ती ज्यांना आपल्यात सामील करुन घेते ते लोक काय, हे काही मुळचे क्रूर, विकृत नाहीत. मात्र आॅथाॅरिटीला ते उलट प्रश्न करु शकतं नाहीत. ते करण्याची त्यांच्यात हिंमतच नाही.मग ते हा विचार करत नाहीत, की हा डॅनिअल्स म्हणतोय ते खरं का खोटं? किंवा तो खरा पोलिस आहे का? किंवा आपण अत्याचार करण्याआधी इतर कोणाला कळवावं का, निदान बेकीच्या घरी तरी फोन करावा का? त्यांच्याबरोबर रोज काम करणारी बेकी, आणि केवळ हुद्दा असल्याचं सांगणारा एक फोनवरचा आवाज, यात त्यांना कोण अधिक भरवशाचे वाटतं, तर फोनवरचा आवाज !
  कम्प्लायन्सवर काही प्रमाणात टिका झाली, पण ती सर्वसाधारण प्रेक्षकाकडून.अगदी सनडान्स सारख्या महत्त्वाच्या महोत्सवातही चित्रपटावर चिडणारे लोक होते. ते म्हणाले हे कसं शक्य आहे? असं कसं घडू शकतं ? कोणीतरी फोनवरुन सांगितलं म्हणून लोक थोडेच असं भयंकर वागतील? पण तसं लोक वागले. एक दोन नाही, तर या प्रकारच्या सत्तरच्या वर घटना, दहा वर्षांच्या कालावधीत घडल्या. त्यांना जबाबदार असणाऱ्या डेविड रिचर्ड स्टुअर्ट या प्रॅन्क काॅलरला २००४ मधे अटक झाली तेव्हा हे प्रकरण थांबलं. हे का होऊ शकलं याचा विचार करायचा, तर आपल्याला १९६१ मधे स्टॅनली मिलग्रमने समाज मानसशास्त्रासंबंधात केलेल्या काही प्रयोगांपर्यंत जावं लागेल. ज्यांना या प्रयोगांबद्दल माहिती नसेल, पण करुन घेण्याची इच्छा असेल, त्यांनी गेल्या वर्षीच मिलग्रमच्या आयुष्यावर आलेला मायकल अॅल्मरेडा दिग्दर्शीत चित्रपट एक्स्परीमेन्टर जरुर पहावा, त्यात मिलग्रम एक्सपरीमेन्ट्सचा बराच विचार तर आहेच, वर एक चित्रपट म्हणूनही तो उत्तम आहे.
  मिलग्रम हा न्यू यॅार्कमधेच पण ज्यूइश कुटुंबात जन्मलेला, त्यामुळे नाझी राजवटीत ज्यूंवर जे अत्याचार झाले ते कसे होऊ शकले, याचा तो विचार करत असे. माणसांसारखी माणसं, एका हुकूमशहाच्या सांगण्यावरुन विरोधाचा शब्दही न काढता तो म्हणेल त्या भयानक गोष्टी करायला तयार कसे होतात याचा तपास करताना, त्याला आॅथाॅरिटी या शब्दामागच्या भयंकर ताकदीची कल्पना आली. ती पडताळून पहाण्यासाठी त्याने एक प्रयोग करायचं ठरवलं.

  त्यावेळी मिलग्रमवर टिका झाली, पण त्याने काढलेले निष्कर्ष किती योग्य होते, हे आज दिसणाऱ्या कम्प्लायस मधल्यासारख्या केसेसवरुन दिसून येतं. अर्थात, याचे अधिक थेट पुरावेही आपल्या आजूबाजूलाच असतात. बाबरी मशीद प्रकरण, गुजरात दंगलीच्या दिवसात दिसलेलं सामान्य माणसांमधलं क्रौर्य, हेदेखील शेवटी अशाच एखाद्या वरुन येणाऱ्या आवाजाला प्रतिसाद म्हणून आलं, नाही का?

मिलग्रमने  पसरवलं, की स्मरणशक्ती आणि ती वाढवणं शक्य आहे का, यावर आपण प्रयोग करतोय. आलेल्या व्हाॅलन्टीअर्सपैकी एकाची निवड शिक्षक म्हणून केली जाइ, तर दुसऱ्याची शिकणारा म्हणून. दोघांनीही वेगवेगळ्या खोल्यांमधे बसवलं जाइ. शिक्षकाने शिकणाऱ्याला स्मरणशक्ती तपासून पाहणारे  प्रश्न विचारायचे. चुकीचं उत्तर आलं, तर शिक्षक एक बटन दाबून शिकणाऱ्याला एक माइल्ड शाॅक देई. दर उत्तरागणिक शाॅकचं प्रमाण वाढे. शिकणारा दिसत नसला तरी त्याचे विव्हळण्याचे, थांबायला सांगण्याचे आवाज शिक्षकाला एेकू येत. पण समोर उपस्थित असलेला मिलग्रमचा माणूस त्याला ठामपणे सांगत असे की थांबणं हा पर्यायच नाही. प्रयोग सुरु रहायलाच हवा. जे होईल त्याची जबाबदारी तो स्वत: घेईल, ती शाॅक देणाऱ्यावर नसेल. एकदा का शिक्षकांची या जबाबदारीतून सुटका झाली, की बहुतेकांना परिणामाचा विचार न करता शाॅकच्या सर्वोच्च पातळीपर्यंत जायला काही वाटत नसे, असं या प्रयोगातल्या निरीक्षणावरुन दिसून आलं. शिकणारा म्हणून नेमलेला माणूसही मिलग्रमचाच असायचा, आणि त्याला खरे शाॅक दिले जात नसत हे उघड आहे, पण हे शाॅक देणाऱ्यांना माहीत नव्हतं.  साधी सर्वसामान्य माणसं वरुन आलेली आज्ञा ( केवळ ती वरुन आली आहे म्हणून)  किती आंधळेपणाने आणि बिनदिक्कतपणे पाळतात, याचाच हा पुरावा होता.
त्यावेळी मिलग्रमवर टिका झाली, पण त्याने काढलेले निष्कर्ष किती योग्य होते, हे आज दिसणाऱ्या कम्प्लायस मधल्यासारख्या केसेसवरुन दिसून येतं. अर्थात, याचे अधिक थेट पुरावेही आपल्या आजूबाजूलाच असतात. बाबरी मशीद प्रकरण, गुजरात दंगलीच्या दिवसात दिसलेलं सामान्य माणसांमधलं क्रौर्य, हेदेखील शेवटी अशाच एखाद्या वरुन येणाऱ्या आवाजाला प्रतिसाद म्हणून आलं, नाही का?

 -   गणेश मतकरी
 

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP