भयोमर्यादा

>> Saturday, March 12, 2016


भयपट, हा एक अतिशय कठीण चित्रप्रकार आहे, असं म्हंटलं तर विश्वास बसणं कठीण. कारण गेली बरीच वर्ष सोप्या आणि मध्यम ताकदीच्या भयपटांची रेलचेल झालेली आहे. पण चांगला भयपट करणं कठीणच असतं. आता इथे मला जी भीती अपेक्षित आहे, ती रक्तामांसाचा चिखल दाखवून किळस वाटायला लावणारी, वा तर्काला सोडून केवळ व्हिजुअल इफेक्ट्सच्या जोरावर बाजी मारणारी, किंवा दचकवणाऱ्या जागा शोधत कॅमेरा तंत्राचा जोर लावणारी भीती नाही, तर काही खरेखुरे प्रश्न उत्पन्न करणारी , आपल्या भोवतालच्या वास्तवाच्या पलीकडे असणारं- नजरेच्या कोपऱ्यातून डोकावणारं काही वेगळच जग तर अस्तित्वात नाही ना, असा प्रश्न विचारायला लावणारी भीती मला अपेक्षित आहे. अशी भीती कधीमधी साहित्यात दिसते. शर्ली जॅक्सनच्या द लाॅटरी मधलं वरवर नाॅर्मल वाटणारं पण एका अघोरी प्रथेला पाळणारं गाव, ब्रॅडबरीच्या फेल्ट मधली आधुनिक तंत्रज्ञानाच्या करामतीपुढे पालकांना अनावश्यक समजणारी मुलं, विल्यम पीटर ब्लॅटीच्या द एक्झाॅर्सिस्टमधे पछाडण्याच्या घटनेचं त्रयस्थपणे केलेलं चित्रण, आयरा लेविनच्या रोजमेरीज बेबीमधलं एरवी आनंददायी मानल्या जाणाऱ्या गरोदर मातेच्या मनस्थितीचं अस्वस्थ करणारं चित्रण आणि लास्ट बट नाॅट द लीस्ट, एच पी लवक्राफ्टच्या विज्ञान आणि भयकथेच्या सीमेवरल्या साहित्यातली अनाकलनीय भीती अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील.
चित्रपटीय भय हे बरचसं या कथा/कादंबऱ्यांमधल्या आशयातल्या विदारक सूचकतेला आणि तिच्या अनेक पातळ्यांवर दिसणाऱ्या अर्थपूर्णतेला बाजूला टाकणारं राहिलं आहे. धक्का, हाच त्याचा फोकस राहिला आणि इतर गोष्टी दुय्यम ठरल्या. वर सांगितलेल्या काही साहित्यकृतींची चांगली चित्रपट रुपांतरं झाली पण सगळ्याच नाही. संयत हाताळणी आणि मोजक्या धक्क्यांच्या सहाय्याने केलेले काही चित्रपट आठवता येतील. लाॅटरी नाही, पण शर्ली जॅक्सनच्याच हाॅन्टींग आॅफ द हिल हाऊस वर राॅबर्ट वाईजने केलेला 'द हाॅन्टींग' (१९६३) हे असंच एक उदाहरण, ज्यात प्रेक्षकाला गोष्टी प्रत्यक्ष न दाखवता केवळ सुचवून त्या त्याच्या कल्पनेत घडवण्यावर भर होता. १९९९ मधला हाॅन्टींगचा रीमेक फसला तो तांत्रिक चमत्कारांमुळेच. आम्ही कायकाय दाखवू शकतो पहा, हा उत्साह त्या चित्रपटाला नडला. समोर दिसणारं काहीही हे आपल्या कल्पनेतल्या भयापेक्षा कमी घाबरवतं. हेच का? आम्हाला वाटलं याहून अधिक भयंकर काही असेल, असं आपल्याला हमखास वाटतं. पोलान्स्कीचा 'रोजमेरीज बेबी' याच मनातली भीती जागवण्याच्या प्रकारातला होता. इतरही काही उदाहरणं आहेत. अपेक्षेप्रमाणेच, आपली तंत्र आणि तंत्रज्ञान यांवरची पकड जशी वाढतेय, तशी ही उदाहरणं अधिकाधिक दुर्मिळ होतायत. अगदी कालपरवाच, मी या प्रकारचे जमलेले दोन चित्रपट पाहिले. एक होता टाय वेस्टचा २०११ मधे केलेला 'द इनकीपर्स', तर दुसरं होतं एच पी लवक्राफ्टच्या ' द काॅल आॅफ कथुलू' या सुप्रसिध्द कथेचं अॅन्ड्रू लेमान ने त्याच नावाने केलेलं रुपांतर. दोघांचा प्रकार अगदीच वेगळा होता, पण दोघांनीही आपल्याला कथानक अधिकाधिक प्रभावी पध्दतीने, आणि नेहमीच्या दृश्य सापळ्यात नं अडकता कसं मांडता येईल याचा पूर्ण विचार केला होता.
इनकीपर्सचा विषय पारंपारिक वळणाचा आहे. म्हणजे झपाटलेलं होटेल, आणि तिथल्या लोकांना येणारे अनुभव वगैरे. त्यात भूतंही खरीखुरीच आहेत, पण त्याचा वेगळेपणा हा प्रामुख्याने दोन गोष्टीत आहे. पहिली म्हणजे, तो भूतांना कसा वापरतो ही. यातली भूतं काय करतात वा करत नाहीत, याकडे आपण दोन पध्दतीने पाहू शकतो. यात दोन वेगळे दृष्टीकोन आहेत. एक आहे तो या बंद पडायच्या बेतात असलेल्या होटेलमधे रिसेप्शनवर काम करणाऱ्या क्लेअरचा( केली मॅकगिलीस) ,तर दुसरा तिचा सहकारी लूक ( पॅट हिली) अाणि इतरांचा. फार वर्षांपूर्वी एका मुलीने या होटेलमध्ये आत्महत्या केली होती आणि ती अजून दिसते असं म्हंटलं जातं. पॅट आणि क्लेअरला या प्रकरणाचा छडा लावण्यात रस आहे. पण अखेर शेवटी जे घडतं, त्याला दोन अर्थ असू शकतात. एक अर्थ त्यातल्या भीतीचं प्रमाण वाढवतो, तर दुसरा झाल्या प्रकाराकडे अधिक सहानुभूतीपूर्वक पहातो.
वेगळेपणा दाखवणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या व्यक्तिरेखांचं अस्सल आणि तपशिलवार चित्रण. सामान्यत: हाॅरर चित्रप्रकारातल्या व्यक्तिरेखा या बळींची संख्या वाढवण्याकरता भरती केलेल्या असतात. त्यांना रंगवलं जातं, ते चमकदार पण ब्राॅड स्ट्रोक्समधे. एकदा ही माफक रंगरंगोटी झाली, की पात्रं जी कमी कमी व्हायला लागतात, ती शेवटी एखादं नायिकेचं पात्रं सोडता बाकी सारे खलास होईपर्यंत. इनकीपर्स मधले क्लेअर आणि पॅट हे शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात, त्यांना केवळ सोप्या छटांमधे नाही , तर अस्सल वाटतीलसं उभं केलं जातं,आणि त्यामुळेच जे घडतं, ते खरोखरच त्रास देणारं असतं.
इनकीपर्सचं मला कौतुक वाटलं, पण काॅल आॅफ कथुलू हून किंचित कमीच. याला कारण आहे. इनकीपर्स मधली कल्पना तशी परीचयाची , दृश्यात मांडण्याजोगी आहे. कथुलू हा आताआता पर्यंत अनफिल्मेबल मानला जायचा. एच पी लवक्राफ्टच्या कामावर अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्याच्या कल्पनाशक्तीला न्याय देणारे फार कमी अाहेत. बहुतेक चित्रपटांनी त्याने संदिग्ध ठेवलेल्या गोष्टींना आपापल्या परीने भडक आणि ढोबळ पध्दतीने मांडलं, आणि त्यांचा प्रभाव कमी केला. त्या पार्श्वभूमीवर हे नवीन प्रकरण खास वाटतं हे नक्की.
लवक्राफ्ट प्रामुख्याने ओळखला जातो, तो कथुलू मायथोजसाठी. त्याच्या एकूण साहित्यामागची कल्पना ही माणसाला क्षुद्र भासवणाऱ्या दैत्यवजा दैवतांनी ( एल्डर गाॅड्जनी) व्यापलेल्या विश्वाची आहे. हे जीव पृथ्वीबाहेरून वा दुसऱ्या एखाद्या मितीमधून आलेले आहेत ,अन कदाचित एखाद्या वैश्विक युध्दाचा ते भाग असावेत. त्यांच्या दृष्टीने आपण किडामुंगीसारखे. लवक्राफ्ट म्हणतो, की आजही त्यातले काही पृथ्वीवरच वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी निद्रिस्तावस्थेत आहेत. कथुलू हे त्यातलच एक भयंकर दैवत.  त्याला येणारी जाग आणि त्याबरोबर ओढवणारा मानवजातीचा विनाश हे सूत्र लवक्राफ्टच्या एकूण साहित्याशीच जोडलेलं आहे. 
या कथा लिहीताना लवक्राफ्टने खूप सूचक निवेदन वापरुन घटनांचा पूर्ण अवाका आपल्यापासून कायमच लपवून ठेवलेला दिसतो. आपल्याला दिसतं ते हिमनगाचं वरचं टोक. त्यापलीकडल्या त्याच्या विस्ताराची कल्पना करणं लवक्राफ्ट आपल्यावरच सोडतो. आता हे साहित्यात ठीक आहे, चित्रपटात सारं स्पष्ट करणं अपेक्षित असल्याने जमणं कठीण. लवक्राफ्टचे चित्रपट फसतात ते सारं काही दाखवायला लागल्यानेच. द काॅल आॅफ कथुलू ते टाळतो. तेही एक म्हंटली तर सोपी युक्ती वापरुन.
मायथोजमधली सर्वात महत्वाची मानली जाणारी 'द काॅल आॅफ कथुलू' ही कथा लिहीली गेली १९२० च्या आसपास. दिग्दर्शक लेमान कल्पना करतो, ती या चित्रपटाची निर्मितीही त्या सुमारासच , मूकपटांच्या काळात झाली असावी, अशी, आणि चित्रपट बेमालूम तसाच सजवतो. अर्थात ब्लॅक अॅन्ड व्हाईट. या काळात तंत्रज्ञान  बरचसं मागे होतं. काय दाखवता येईल याला मर्यादा होत्या. या सगळ्या काळाच्या अन तंत्राच्या  मर्यादाच, दिग्दर्शक दृश्य भागाला एक नवं टेक्श्चर देण्यासाठी वापरतो.
द काॅल आॅफ कथुलू ची गोष्ट तशी तुकड्यातुकड्यात आणि नायकविरहीत आहे. कथुलू जागा होऊन मानवजातीचा विनाश जवळ येईल की काय अशी परिस्थिती तयार होणं हीच त्याच्या  केंद्रस्थानी असलेली कल्पना. काही जुन्या कागदपत्रांमधून मिळालेली माहिती, कोणा इन्स्पेक्टरची साक्ष, कोणाला पडणारी स्वप्न, एका बोटीवरल्या लोकांना आलेला भयानक अनुभव अशा सुट्या गोष्टी जोडत हे कथानक तयार होतं. जेमतेम तासाभराच्या या चित्रपटाला ते पुरेसंही आहे.
हे सारं शब्दश: दाखवायचं तर प्रचंड बजेट तर लागेलच, वर तरीही ते हास्यास्पद होण्याची भीती. चित्रपटात ते होत नाही कारण ज्याप्रमाणे स्वत: लवक्राफ्ट सूचक शब्द वापरून डोकं लढवणं वाचकांवर सोडायचा, तसाच इथला दिग्दर्शक जुन्या शैलीत पण आधुनिक दृष्टी वापरुन सूचक नेपथ्याचा वापर करतो आणि तपशील प्रेक्षकांवर सोडतो. आपण चित्रपट जुन्या काळचा मूकपट म्हणूनच पहात असल्याने, जे दिसतं ते आपल्याला खटकत नाही, उलट आपल्या विचाराला चालना देण्यासाठीच आपण या दृश्यांना वापरतो.
मध्यंतरी दिग्दर्शक  गिआर्मो डेल टोरो (पॅन्स लॅबिरिन्थ, हेलबाॅय) लवक्राफ्टच्या दुसऱ्या एका महत्वाच्या कथेवर, 'अॅट द माऊन्टन्स आॅफ मॅडनेस' वर चित्रपट काढणार अशी हवा होती. ते जर झालं, तर खरोखरच आपल्याला डेफिनिटीव लवक्राफ्ट म्हणण्याजोगा बिग बजेट चित्रपट पहायला मिळेल. पण जोपर्यंत ते होत नाही, तोवर त्याच्या साहित्यावर कमी बजेटचे का होईना, पण चांगल्या कल्पना लढवत केलेले इतरही चित्रपट बनावेत. तरच या भयसाहित्यातल्या मोठ्या लेखकाला अधिक लोकांपर्यंत पोचता येईल. १५ मार्च या त्याच्या मृत्यूदिनानिमित्ताने आपण एवढी इच्छा तरी नक्कीच व्यक्त करु शकतो.

-  गणेश मतकरी

2 comments:

Ayub Attar March 13, 2016 at 6:19 AM  

lot of thanks foe reguler posting....

Kapil February 18, 2020 at 5:29 AM  

Thank you Sir for introducing me to the works of HP Lovecraft. It is interesting to learn about the variety of literary references and related subjects that you provide in your blog posts. Like, it is very essential to know 'what to read'; I feel it is equally important to learn 'What to watch and what to take from moview'. And, I truly admire your work that educate enthusiasts like me who always look out for good references.

Regards,
Kapil

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP