आजचा मराठी सिनेमा -१

>> Sunday, March 20, 2016





मध्यंतरी , काळा घोडा महोत्सवादरम्यान, मी एका चर्चेत भाग घेतला होता. विषय जनरल होता. चित्रपट समीक्षेत गेल्या काही वर्षात होत गेलेल बदल, या प्रकारचा. मात्र उपस्थित समीक्षकांपैकी अधिक जण वृत्तसमीक्षा, किंवा त्याला इक्वीवॅलन्ट म्हणावीशी आठवड्याला वेबसाईट्स/ ब्लाॅग या माध्यमातून लिहित असल्याने तिचं स्वरुप हे प्रामुख्याने त्या प्रकारच्या समीक्षेवर केंद्रीत राहिलं. मी सोडता बाकीचे बहुतेकजण हिंदी चित्रपटांवर लिहीणारे होते. मी मराठी चित्रपटांवरही गेली दोनेक वर्ष नेमाने लिहीत असल्याने सत्र संपल्यावर जी अमौपचारिक चर्चा झाली, त्यात मराठी चित्रपटांचा आवर्जून उल्लेख झाला. मराठी चित्रपटांत कसं काही नवीन घडतय, आणि एक्साईटमेन्टचं वातावरण आहे, वगैरे, बहुधा अमराठी लोकांकडून मराठी सिनेमाविषयी नित्य बोलले जाणारे मुद्दे त्यातही होतेच. मी अर्थातच त्यांना विरोध केला नाही, पण त्यानिमित्ताने नंतर थोडा विचार जरुर केला.

मराठी सिनेमामधे गेल्या काही वर्षात बदल झालाय का? झाला असल्यास किती? त्याबद्दल उत्साह वाटावा का ? पुढल्या काळाबद्दल काय वाटतं? हे आणि या प्रकारचे प्रश्न मला अनेक वेळा पडतात, काही वेळा विचारलेही जातात. त्यांची उत्तरं काही प्रमाणात स्पष्ट आणि काही प्रमाणात सकारात्मक आहेत. मात्र पूर्ण चित्र आशादायक आहे किंवा नाही, याबद्दल माझी उत्तरं बदलत राहिलेली आहेत.

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट बदललाय का ? याचं उत्तर खरं तर स्टॅटिस्टिक्सच देईल. २००० साली शून्यवत असलेल्या सिनेमात आज १५ वर्षात, श्वास हे ग्राउंड झीरो धरायचं तर खरं तर दहाच, निदान दहा बारा नावं घेण्यासारखे आणि काम लक्षात येण्याजोगे दिग्दर्शक सातत्याने काम करताना दिसतात, २००४ नंतर मिळालेल्या तीन सुवर्णकमळांसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार आपल्याकडे नेमाने येतायत, परभाषिक निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आपल्याकडे काम करु इच्छितात आणि आपल्या लोकांनाही बाहेर कामाची आमंत्रणं मिळणं रुटीन आहे. त्यामुळे परिस्थिती निश्चितच आधीपेक्षा बरी आहे. यात वादच नाही. बदलाचं प्रमाण, हा मात्र विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

आज आपल्याकडे वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट बनताना दिसतात. हा आकडा वरवर उत्साहवर्धक वाटला, तरी प्रत्यक्षात काळजी  वाटायला लावणारा आहे. कारण यातले किती चित्रपट चालतात आणि किती खरोखर दर्जेदार असतात हे पाहिलं तर लक्षात येईल, की हे प्रमाण दहा-पंधरा टक्क्यांहून अधिक नाही. त्याहूनही आपल्या प्रेक्षकांचा उत्साह , समज आणि वितरणव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेतल्यावर हेदेखील समजतं, की चालतो, तो साराच चित्रपट दर्जेदार नाही आणि दर्जेदार असलेला सर्वच चित्रपट चालतो असंही नाही. (आता इथे मी दर्जा, हा एलीटिस्ट दृष्टीने, समीक्षकाच्या चष्म्यातून पाहिलेला दर्जा म्हणत नाही, तर सर्वसाधारण प्रेक्षकाला आवडण्यासारखा चित्रपटही या कसोटीत धरलेला आहे.) तर असा चांगला आणि चाललेला चित्रपट शोधायचा तर मूळची दहा-पंधराची टक्केवारी किमान चारपाच टक्के तरी खाली घसरेल. त्यामुळे बिग पिक्चर पहायचं तर आठवड्याला निदान दोनतीन चित्रपट तरी प्रदर्शित करत असलेल्या या उद्योगात सर्व कसोट्यांना उतरणारे जेमतेम साताठ चित्रपट वर्षाकाठी तयार होताना दिसतात. दहा म्हणजे डोक्यावरुन पाणी. हे प्रमाण पुरेसं आहे का?

आता यावर एक चतुर उत्तर हे आहे, की त्यात काय ! कोणत्याही उद्योगात चांगले चित्रपट हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच असतात. हे खरं तर उत्तर नाही. कारण इतर ठिकाणी जे घडतं ते आपल्याकडेही घडण्याची काय गरज आहे? आपला उद्योग छोटा आहे, नुकताच त्याला एक पुनर्जन्म मिळालेला आहे, त्याची किर्तीही निदान देशभरात तरी चांगलीच आहे. काही प्रमाणात त्याला देशाबाहेरही मान आहे. मराठीला- महाराष्ट्राला कला, रंगभूमी, साहित्य यांची पार्श्वभूमी आहे. त्यांमधून चित्रपटात वैचारिक देवाणघेवाण शक्य आहे. काही प्रमाणात सुजाण प्रेक्षक आहे ( ज्याची क्षमता टिव्ही चॅनल्स पाहून दिवसेंदिवस अधिक घसरत चालली आहे, पण अजून परिस्थिती हाताबाहेर नाही.) हे सारं असलं, तरी मराठी सिनेमा अजून चिंतामुक्त नाही.

अाज काय प्रकारचा चित्रपट पहायला मिळतो याविषयी थोडं बोलणं गरजेचं आहे. या चित्रपटाचे काही निश्चित प्रकार आहेत. पहिला आहे तो मोठ्या मार्केटिंग आणि वितरणसंस्थांचा पाठिंबा असणारा, बहुधा नावाजलेल्या ( रीड व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी उदा - रवी जाधव, संजय जाधव ) दिग्दर्शकांनी केलेला सिनेमा. हा 'सेफ' सिनेमा असतो. त्यात सर्जनशीलतेचं प्रमाण निश्चित असतं, पण बऱ्याच हुशार लोकांचे व्यावसायिक आडाखे, महत्वाकांक्षी विषय, जोरदार स्टार्स ( वा विषयाला त्यांची गरज नसल्यास लक्षात येईलसा, पुरेसा वेगळ्या प्रकारचा विषय) समाधानकारक बजेट,  मार्केटींगसाठी स्ट्रॅटिजी आणि चित्रपटाहून अधिक बजेट, प्राॅडक्ट म्हणून तो लोकांच्या गळी उतवण्यासाठी लागणारा माध्यमांचा आधार, वितरणाच्या चांगल्या योजना, असं सगळं त्याच्याकडे असतं. आशय असो वा नसो, यांची निर्मितीमूल्य चांगली असतातच आणि हे सिनेमे नक्की चालतात. झीची निर्मिती वा वितरण असणारा गेल्या दोनेक वर्षातला (लोकमान्य पासून नटसम्राट पर्यंत) कोणताही सिनेमा याचं उदाहरण म्हणून घेता येईल.

दुसऱ्या प्रकारचा सिनेमा असतो, तो याचाच धाकटा भाऊ शोभावासा. याच्याकडे प्रेक्षकाला पसंत पडावेतसे अनेक गुणधर्म असतात, पण बहुधा दिग्दर्शक नवे असतात, विषय अपरिचित/अनपेक्षित असतात, नावं नवी असतात. यांना जर योग्य तो आधार मिळाला, आणि मार्केटींग जमलं तर हे चित्रपट उत्तम चालू शकतात. ते नाही मिळालं, तर मात्र त्यांची शाश्वती देता येत नाही. रवी जाधवने प्रेझेन्ट केलेले 'रेगे' ( दि. अभिजीत पानसे) किंवा 'काॅफी आणि बरच काही' ( दि. प्रकाश कुंटे) , किंवा झीने पुढे वितरणासाठी घेतलेला 'किल्ला' ( दि. अविनाश अरुण) , ही या प्रकारच्या नशीबवान सिनेमांची उदाहरणं, जे सुरु होताना त्यांचं भविष्य अनिश्चित असलं, तरी ते सुस्थळी पडले, आणि प्रेक्षकांपर्यंतही पोचले.

यानंतरचा प्रकार आहे, तो समांतर वळणाच्या सिनेमांचा. या चित्रपटांना आशय असतो, विचार असतो, मात्र दिग्दर्शकांना रस असतो, तो आपल्या दृष्टीला त्यातल्यात्यात शुध्द स्वरुपात पडद्यावर आणण्यात. त्यामुळे प्रेक्षकांचा विचारच इथे दुय्य्म ठरतो. चित्रपट चालला तर छानच, पण चालणं न चालणं, हा तो चित्रपट बनवण्याच्या गणिताचा भाग नसतो.  गेल्या वर्षभरातली अशी दोन उदाहरणं म्हणजे उमेश कुलकर्णीचा 'हायवे - एक सेल्फी आरपार' आणि चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट. यातला हायवे अजिबात चालला नाही, आणि कोर्ट सुवर्ण कमळ मिळाल्याने आणि महोत्सवांमधून झालेल्या नावाने काही प्रमाणात चालला. पण त्यालाही हिट म्हणता येणार नाही.

वरचे तिन्ही प्रकार ही रिस्पेक्टेबल मराठी चित्रपटांची उदाहरणं आहेत. या चित्रपटांचं नाव कधी त्यातल्या कलेसाठी होतं किंवा कधी प्रेक्षकप्रियतेसाठी , तर कधीकधी दोन्हीसाठीही. यातलेच काही बाॅक्स आॅफिस गाजवतात तर काही चित्रपट महोत्सव, काहींच्या कल्ट फिल्म्स होतात तर काही तेवढ्यापुरते गाजून विस्मृतीत जातात. काहींवर फेसबुक चर्चा घडतात. ते बरे, थोर का सामान्य यावर हिरीरीने बाजू घेतल्या जातात , आणि त्यातून त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं. तरीही, एकूण संख्या पहाता या तिन्ही प्रकारात मिळून वर्षाकाठी बारा पंधरा चित्रपट असतात , मग बाकीचे शंभरेक चित्रपट? त्यांचं काय?

बाकीच्या चित्रपटातही एक मोठी रेंज असते. चांगल्या दिग्दर्शका कलावंतांचे काही चित्रपट असतात, काही चांगल्या कल्पना घेउन आलेले असतात, तर काही एखाद्या लोकप्रिय विषयाचा आधार घेऊन पुढे आलेले चित्रपट असतात. पण यातही बहुसंख्य चित्रपट मध्यम ते कनिष्ठ दर्जाचे असतात. मराठीत सतत उतरणारे नवे निर्माते आणि नवे दिग्दर्शक, यांनी यातले बहुतेक चित्रपट बनवलेले असतात. आजकाल यात परभाषिक निर्माते, दिग्दर्शक यांचाही भरणा असतो. हे चित्रपट बनतात खरे, पण त्यांचं सांगण्यासारखं काहीही होत नाही. ते कधी येतात, जातात काही कळत नाही, अनेकदा तर ते का काढले असावेत यावर चर्चा करावी अशी परिस्थिती असते. प्रेक्षक यांच्या वाट्याला फार कमी प्रमाणात जातो. हे चित्रपट चॅनलवर दिसल्यावर पहाण्याची त्याची अधिक तयारी असते, पण चित्रपटगृहांपासून तो लांबच रहातो.

प्रेक्षकाचं गणित साधं असतं. त्याला चॅरिटीमधे रस नसतो. चित्रपटांनी पैसे वसूल रिझल्ट द्यावा अशी त्याची इच्छा असते. मराठीचा अभिमान वगैरे त्याला ( किमान या बाबतीत)  नसतोच. चित्रपट उद्योग तरावा, आपल्या चित्रपटांना देशोदेशी पाहिलं जावं, त्याला पुरस्कार मिळावेत, असं त्याला वाटलं, तरी तेवढ्यासाठी तो अधिक करमणुकीची शक्यता असणाऱ्या हिंदी चित्रपटाला बाजूला सारुन मराठीकडे येणार नसतो. त्याची तयारी ही आठवड्याला एक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहाण्याची तयारी असते. त्यामुळे मुळातच आठवड्याला एकापेक्षा  अधिक चांगले चित्रपट प्रदर्शित झालेले त्याला आवडत नाहीत. त्यामुळे मराठीतही, दोन तीन चित्रपटातल्या कोणातरी एकालाच अधिक प्रतिसाद मिळणार हे निश्चित असतं. त्याशिवाय दुसऱ्या - तिसऱ्या आठवड्यात चालू असलेले आधीचे चित्रपट, चांगले हिंदी/इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होतात ते आठवडे, परीक्षा सणवार यांचे भाकड आठवडे, अशा सर्वांशी स्पर्धा ही या सर्वसाधारण चित्रपटांना महागच ठरते. आपण जाहीरातीत ते प्रचंड गर्दीत चालल्याचं वाचत असलो, तरी प्रत्यक्षात ही गर्दी क्वचितच कुणाला मिळते.

आता या परिस्थितीत मराठी चित्रपटांनी टिकाव धरण्याची अपेक्षा आपण करु शकतो का?
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP