जोरदार दंगल

>> Saturday, December 24, 2016




पोस्टरवरच्या टॅगलाईन्सनी चित्रपट काय आहे हे थोडक्यात मांडणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे क्वचितच तसं होताना दिसतं. बहुधा केवळ लोकगर्दीच्या अपेक्षेने काहीतरी ठोकून दिल्याची  उदाहरणच अधिक. दंगल हा अपवाद ! इथे प्रत्यक्ष संवादात येणारी एक ओळ' म्हारी छोरियाॅं छोरों से कम है के?' ही या चित्रपटाचं आशयसूत्र असल्यासारखी आहे, आणि ती पोस्टरवर वापरण्यावरुन हे लक्षात येतं की चित्रपटाला काय म्हणायचय याची पूर्ण जाण तो बनवणाऱ्याना आहे. ही कुस्ती या खेळासंबंधीची स्पोर्ट्स फिल्म आहे पण केवळ स्पोर्ट्स फिल्म असणं हा त्याचा स्ट्राॅंग पाॅइन्ट नाही. मुलीना मुलांच्या बरोबरीने वागवणं , स्त्री पुरुष समानता हा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. महिला हाॅकी संघावर आधारीत 'चक दे , इंडिआ' मधेही तो होता, पण दंगल ही एका कुटुंबाची गोष्ट असल्याने तो अधिक प्रखरपणे येतो.
दंगल हा डिस्नीनी प्रोड्यूस केलाय आणि त्याची एकूण वृत्तीही डिस्नीच्या तत्वांबरोबर चपखल जाणारी आहे. आता डिस्नीच्या सहभागामुळेच तो असा आहे, का तो तसा असणं हा हॅपी कोइन्सीडन्स आहे, हे कोणाला माहीत ?
डिस्नीच्या लोकप्रिय प्रिन्सेस स्टोरीज सारखी हीदेखील एका नायिकेची यशोगाथा आहे. आणि अलीकडच्या चित्रपटांमधून जशी नायिका अधिक सक्षम दाखवली जाते तशीच गीता फोगाट ( तसच बबिता ही उपनायिकाही ) आहे. पारंपारिक नायक इथे गैरहजर आहे, पण पुरुष प्रोटॅगनिस्ट म्हणून महावीर फोगाट हा त्या दोघींचा पिताच आहे. गीता आणि महावीर ही यातली प्रमुख पात्र . इतर अनेक लक्षात रहाणारी पात्र आहेत, पण चित्रपट प्रामुख्याने फिरतो तो या दोघांभोवती. चित्रपट घटनांभोवती अधिक गुंफलेला आहे आणि व्यक्तीगत तपशील ( पात्रांची मनोवस्था वगैरे ) त्यामानाने ठळक स्ट्रोक्समधे , फार खोलात नं जाता रंगवलाय. पण हे सारं एका योजनाबद्ध पद्धतीने केलय, यात चुकून काही झालेलं नाही.

आता कथानक काय आहे हे मी सांगत बसणार नाही. ते सर्वांना माहीतही आहे, आणि मुळात ही (बरीचशी) सत्यकथा असल्याने, त्याचा शेवटही आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे. तरीही, एक सूत्र सांगायचं तर एवढच म्हणेन, की कुस्तीमधे राष्ट्रीय पातळीवर नावाजूनही आर्थिक अडचणीमुळे बाहेर पडावं लागणाऱ्या महावीर सिंगाचा ( आमीर खान) , आपल्या होणाऱ्या मुलाला तरी  भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता बनवण्याचा निश्चय, मुलाएेवजी चारी मुलीच झाल्याने  त्याने आधी निराश होणं , पण मग त्या मुलींनाच या खेळात पारंगत बनवून त्यांच्याकरवी आपलं स्वप्न पूर्ण करणं असा हा प्रवास आहे. मध्यंतर जरी गीता - बबिता मोठ्या झाल्यावर येत असलं, तरी बालपणीचा काळ आधी आणि मोठेपणीचा नंतर, असं हे पूर्वार्ध - उत्तरार्धाचं ढोबळ विभाजन आहे, त्यामुळे लक्षवेधी काम करण्याची संधी गीता ( लहान- झायरा वसीम, मोठी - फातीमा सना शेख) आणि बबिता ( लहान- सुहानी भटनागर, मोठी - सान्या मल्होत्रा ) च्या भूमिकातल्या चारी गुणी अभिनेत्रींना यथायोग्य मिळाली आहे. लहान मुलींचं कौतुक अधिक वाटतं आणि ते केवळ त्या लहान आहेत म्हणून नाही , तर त्यांना साध्यासुध्या मुलींचं मल्ल बनणं , हा बदल, हे ट्रान्स्फाॅर्मेशन दाखवायचय म्हणून. बाॅडी लॅन्ग्वेजपासून व्यक्तीमत्व बदलापर्यंत त्या हा बदल यथायोग्य दाखवतात. मोठ्यांपुढे आव्हान आहे, ते आधीच्या अभिनेत्रींचं काम सहजपणे  पुढे नेणं आणि चित्रपटातल्या नाट्यपूर्ण , भावपूर्ण भागाला पेलणं.

दंगल सर्वात यशस्वी ठरतो तो मध्यंतरा आधीच्या भागात. यातलं नाट्य या मुलींमधल्या बदलात आणि त्यांनी दाखवलेल्या कर्तुत्वात आहे आणि ते अतिशय स्वाभाविकपणे, कुठेही कृत्रिम नं होता येतं. गाणी बिणीही जोरदार आणि प्रसंगानुरुप आहेत, हा भाग सर्वच बाबतीत जमलेला आहे.

उत्तरार्धाचा प्राॅब्लेम हा, की मूळ घटनांमधे पुरेसं नाट्य नाही. गीताने सरकारी प्रशिक्षणासाठी भरती झाल्यावर तिला काॅमनवेल्थ गेम्समधे पदक मिळेपर्यंतच्या भागात ( चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसं) फार  काही घडत नाही. त्यातल्यात्यात गीताचा परफाॅर्मन्स घसरणं एवढाच भाग आहे. इथे नसलेलं नाट्य चित्रपट तयार करायला जातो ते कोच कदम ( गिरीश कुलकर्णी) या पात्रामार्फत, त्याच्या गीता आणि महावीर यांच्याशी होणाऱ्या संघर्षामधून. दुर्दैवाने हे पात्र मात्र खूपच कचकड्याचं ( डिस्नी व्हिलन?) वाटतं.

गंमत अशी की या कोचचा मुद्दा योग्य आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला जे जमेल तसं ट्रेनिंग मिळालय ते विसरायला लावून त्यांना नव्याने घडवणं हा त्याचा गेमप्लान आहे. यात गैर काही नाही. सर्व क्षेत्रात ( नाट्य क्षेत्रातही ) या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कोणी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाला गेल्यावर तिथल्या थोरामोठ्यांनी सांगितलेलं नं एेकता आमच्या गावच्या ग्रुपमधे असच सांगायचे म्हणून भडक अभिनयच करत राहिला तर कसं होईल, त्याप्रकारची इथली गीताची परिस्थिती आहे. पण कोचचा युक्तीवाद पटू नये आणि सहानुभूती गीता- महावीर कडे जावी , तसच गीताच्या हरण्याचं बिलही कोचवर फाडता यावं , म्हणून ही कदमची व्यक्तिरेखा अतिशय वरवरची आणि मुद्दाम खलनायकी लिहिली आहे, जी बाकी साऱ्या खऱ्या प्रसंगांच्या तुलनेत बिल्कुल नकली वाटते. ही खोटी वाटण्यात गिरीश कुलकर्णीचा दोष नसावा कारण लेखन आणि दिग्दर्शन हे याला प्रामुख्याने  जबाबदार आहेत. त्या भूमिकेला अधिक प्रसंग मिळते, तर ती हळूहळू घडवता आली असती पण ते कमी असल्याने ही भूमिका कृत्रिम होते. शेवटच्या भागात तर हे खलनायकी वागणं फार टोकाला पोचतं . असं काही गीताच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलं असेलसं वाटत नाही, किंवा असलं तरी ही गीताची बाजू झाली. कोचला त्याची बाजू विचारली गेली असेलसं वाटत नाही. आणि तसं नसेल तर मग हा केवळ नाट्यपूर्णता वाढवण्याचाच प्रयत्न म्हणून उरतो. चित्रपटासाठी तो खरा वाटणं आवश्यक होतं जे होत नाही. हा दंगलमधला सर्वात मोठा गोंधळ. पण या भागातही, सर्वजण कामं छान करतात आणि निवेदनाची गती रहाते ,सर्व मॅचेस पकड घेतात त्यामुळे आपण या दोषाकडे डोळेझाक करु शकतो.

कुस्तीच्या मॅचेसचं दंगलमधलं  चित्रण फार छान आहे आणि रेसलिंग मॅचेस खऱ्याच कमी वेळाच्या असल्याने चित्रपटात पुरेसा वेळ देत त्या रंगवता आल्या आहेत. चक दे मधे बऱ्याच मॅचेस उरकल्यासारख्या होत्या आणि खूप व्यक्तिरेखांमुळे चित्रपटही मधेमधे ड्रॅग व्हायचा. इथे तसं होत नाही. एका शब्दात सांगायचं तर या मॅचेसची कोरिओग्रफी आणि छायाचित्रण ( सेतू श्रीराम) ' रोमहर्षक ' झालेलं आहे. आता मॅचेसचा निकाल प्रेडीक्टेबल आहे का, तर आहे. गोष्ट लक्षात आली तर गीता कोणती मॅच जिंकणार- कोणती हरणार हे तुम्ही अचूक सांगू शकता, पण  हरकत नाही , पडद्यावर पहाताना आपण गुंतून जातो हे खरं, आणि ते पुरेसं आहे.

मागे आशुतोष गोवारीकरने बाजी, पहला नशा अशा सामान्य चित्रपटांनंतर एकदम लगान केला आणि त्याची गणना ए लिस्टर्समधे व्हायला लागली, तसच काहीसं चिल्लर पार्टी , भूतनाथ नंतर दंगल केलेल्या नितेश तिवारीचं होणार यात शंका नाही. आमीर खान असलेले स्पोर्ट्स थीम्ड चित्रपट दिग्दर्शकासाठी लकी ठरतात असं दिसतय. पण हा केवळ नशीबाचाच प्रश्न नाही. त्याने केलेलं काम हे त्याची लायकी सिद्ध करणारं आहे. नेहमीप्रमाणे आमीरच्या घोस्ट डिरेक्शनची चर्चा इथेही होईल, पण आपण नाव लागलेल्या दिग्दर्शकालाच मानून चालू. अर्थात लगानप्रमाणेच इथेही स्वत: आमीर खानने निर्मिती आणि व्यक्तीरेखा या दोन्ही बाबीत प्रचंड मेहनत घेतलेली आहे.

मी अनेकदा असं म्हंटलय, की अभिनेता म्हणून आमीर खान मला फार आवडत नाही कारण त्याची सारी वेषांतरं समोर असतानाही त्यामागे दडलेला आमीर खान सतत दिसत रहातो. इथे महावीर फोगाट उभा करताना दिसण्याबरोबर त्याने फिजिकल परीवर्तनही केलय. तरुण रेसलर पासून साठीच्या आसपासपर्यंत वयातला फरकही आहे, आणि आमीर खानने तो उत्तम रितीने पडद्यावर आणला आहे. यात अनेकदा अशा जागा आहेत ज्यात आपण आमीर खानला विसरुन व्यक्तीरेखेला दाद देतो. उदाहरणादाखल एक प्रसंग घ्यायचा  , तर गीता प्रशिक्षण घेत असताना गावी येते आणि बबिता आणि इतरांना काही नवे डावपेच शिकवू पहाते तो घेता येईल . गीताची लुडबुड पाहून चिडलेल्या महावीरने तिला दिलेलं आव्हान आणि पुढे येणारं कुस्तीचं दृश्य हा चित्रपटाचा एक हायलाईट आहे . भावपूर्ण तरीही अटीतटीचा आणि पुढे काय होईल याबद्दल प्रेक्षकाला संभ्रमात ठेवणारा प्रसंग. दंगल मधे अशी ही एकमेव जागा  नाही. इतरही आहेत. पण कोणत्या ते सांगण्यात मजा नाही. ते पहायलाच हवं.

गेल्या काही दिवसात डिमाॅनिटायजेशनच्या दणक्याने चित्रपटगृहांपासून प्रेक्षक काहीसा दूर गेलेला आहे. त्याला परत फिरवायला दंगलसारख्याच एखाद्या जोरदार चित्रपटाची गरज होती. दंगल हे करुन दाखवेल असा विश्वास वाटतो.
  - गणेश मतकरी

1 comments:

Ajit June 15, 2017 at 12:26 AM  


दंगल, अपेक्षा आणि आमीर


दंगल पाहिला. आमीरने नेहमीप्रमाणे भरपूर कष्ट घेतलय सिनेमासाठी. एकदा तरी पाहण्यासारखा आहे हे नक्की. दंगलमधे डिटेलिंगवर लक्ष दिलेले दिसते. हरयाणवी हेलवर काम केलेले दिसत असले तरी जेव्हा साक्षी विचारते 'पैसे कहां से आएेंगे' तेव्हा तो जे 'पता नही' म्हणतो ते 'पता नही' हिंदी 'पता नही' आहे हरयाणवी नाही. कुस्तीसारखा खेळ अन् तो खेळ खेळणारे खेळाडू फारच स्वच्छ अाणि हायजेनिक दाखवलेत. फक्त महावीर फोगटला कोंडून ठेवण्याचे बॉलीवूडायजेशन टाळायला हवे होते. तात्विक व्हिलन न उभारता येणे हे बॉलीवूडचे मोठे अपयश आहे. त्यामुळेच बॉलीवूडचे व्हीलन आई-बाबा-हिरॉईन यांना कोंडणे असली चिंधीगिरी करताना दिसतात. आमीरचा सिनेमा असल्यानेच हे अपेक्षित आहे. कारण तो सध्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर उभा आहे कि प्रेक्षकांना साक्षर करणारे सिनेमे सादर करण्याची जोखीम तो घेऊ शकतो. लगाननंतर तो ते करत आला आहे. आमीरची १ खासीयत आहे कि बर्याच चित्रपटात (लगाननंतरच्या)आमीर आमीर वाटत नाही. तो अजय राठोड, भुवन, निकुंभ सर किंवा महावीर फोगट वाटतो. अभिनेत्रींमधे ही ताकद कमावण्याचा मान आधी स्रीदेवी व नंतर मनिशा व काजोलकडे जातो. सध्या हे पेटंट विद्या बालनकडे आहे. माधुरीवर माझे प्रेम असले तरी मला हे मान्य करावे लागते (लय त्रास होतो हे मान्य करताना) कि माधुरीला बर्याच व्यक्तिरेखा साकारताना तिचे माधुरी असणे बाजूला ठेवणे जमतंच असे नाही. सुरुवातीचा आमीर मात्र मला अजूनही आवडतो कारण त्या आमीरच्या अॅक्टिंगमधे सहजता असायची. लगानपूर्वीचा आमीर हा स्पॉन्टेनियस आमीर वाटतो... (आठवा गुलाम,रंगीला, मन, राजा हिंदुस्तानी,इ. पिच्चर म्हणून यातले काही पिच्चर टुकार असले तरी विशय त्याच्या परफॉर्मंसचा आहे).
लगाननंतर तो बराचसा बदललाय. तो बदल जाणीवपूर्वकही असेल पण बदललाय हे नक्की. लगाननंतरचा आमीर हा प्लॅन्ड आमीर वाटतो. वर्षाला १ च पिच्चर करणारा, त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट घेणारा, स्क्रिप्टच (धूम३ आपवाद) अशी दमदार निवडणारा कि निम्मे काम तिथेच झाले पाहिजे. त्यामुळे बर्याचदा आमीरचे सिनेमे हे चाऱाण्याची कोंबडी न् बाराण्याचा मसाला होतात.(ऍक्टिंगच्या स्केलवर तो अॅव्हरेज आहे असे माझे मत आहे (माझे आहे याचाच अर्थ वैयक्तिक अाहे कारण अजून मी कुठल्या पक्षाचा घोषित/अघोषित प्रवक्ता नाही)अन् मी भक्त नाही) परिणामी त्याच्या ऍक्टिंगपेक्षा त्याच्या हेअरस्टाईल, बॉडी इ. चर्चा जास्त होते. विशेशतः हे लगाननंतर जास्त जाणवते. लगाननंतरचा आमीर म्हणजे ऍक्टिंग न करण्याची ऍक्टिंग करुन आपली ऍक्टिंग ही नॅचरल आहे हे दाखवणारा आहे म्हणून हा आमीर मला भावत नाही. सार्वजनिक जीवनात वावरतानासुध्दा त्याने एक 'वेगळपणा' जपलाय. भारतात मेनस्ट्रीम सिनेमात ऍक्टिंग करणार्या लोकांकडून इंटेलेक्चुअल असण्याची अपेक्षा केली जात नाही. तरी त्याने तो वेगळपणा (इंटेलेक्चुअल आहे हे दाखवण्याचा) जपलाय. (बाय द वे आमीर मला कायम आयन रॅंडच्या एल्सवर्थ टूहीची आठवण करुन देतो त्याबद्दल नंतर कधीतरी) अर्थात हे त्याने जाणीवपूर्वक (मार्केट ड्रिव्हन) केलय. (सलमानने देखिल बॅड बॉयची इमेज बदलायला सामाजिक उपक्रमांचे रजनीकांत मॉडेल असे राबवलय कि तो करतो त्याला ऍक्टिंग म्हणायची वेळ आणलीय.) आज बराच मोठा वर्ग असा आहे ज्याच्यासाठी आमीरच्या सिनेमाला जाणे ( व शाहरुख सलमानच्या सिनेमाला न जाणे) स्टेटस सिंबॉल आहे. त्याचे कारण आहे त्याने जाणीवपूर्वक बनवलेली छबी...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP