नववेस्टर्नपट!

>> Saturday, January 21, 2017हरवलेल्या सिनेप्रकाराचे पुनरुज्जीवन सध्या  जगातील सगळ्याच चित्रपटसृष्टींत होत आहे. अमेरिकेसारख्या सिनेबलाढय़ राष्ट्रात व्यावसायिक चित्रपटांतील कलात्मक प्रयोग दर्शकांकडून वाखाणले जातात आणि प्रयोगांचा नवा ‘ट्रेण्ड’ सिनेमाचा विकास घडवितात. तो पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या सिनेजाणिवांतील वाढ ही त्या चित्रपटाची आणखी एक कामगिरी असते. पुनरुज्जीवनाच्या सध्याच्या चित्रप्रवाहात ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाने संगीतपटांबाबत जे केले, तेच ‘हेल ऑर हाय वॉटर’ने वेस्टर्न चित्रप्रकाराबाबत केल्याचे दिसून येते.
अमेरिकेतील मागास आणि हिंस्र असलेल्या पश्चिम प्रांतातील संघर्ष आणि शौर्यगाथा दर्शविणाऱ्या वेस्टर्न सिनेमांनी युद्धोत्तर १९५०-६० च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळविली. विस्तीर्ण प्रदेशातील काऊबॉय नायकांचा दुष्ट व्यक्ती आणि प्रवृत्तींविरोधातील लढा या एकाच संकल्पनेतील शेकडो कथा या चित्रप्रकारात झाल्या. जगभरात या सिनेप्रकाराचे अवतार झाले. यातल्या नायकांना अफाट स्टारपद मिळाले. याच सिनेमातला एक नायक अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंतही पोहोचला, तर लोकप्रियतेच्या निकषांवर अभिजात गणलेला भारतीय ‘शोले’ हा याच सिनेप्रकारातून अवतरला. १९८० नंतर आलेल्या डिजिटल युगात झपाटय़ाने हा चित्रप्रकार लोप पावू लागला. क्लींट ईस्टवूड, क्वेन्टीन टेरेन्टीनो, कोएन ब्रदर्स यांच्या मिश्रचित्रप्रकारी सिनेमांमध्ये तो सध्या शिल्लक होता. ‘नो कण्ट्री फॉर ओल्ड मेन’, ‘किल बिल’, ‘ट्र ग्रिट’सारख्या सिनेमांतून हा चित्रप्रकार पुन्हा डोकावू पाहत होता. ‘द हेटफूल एट’ किंवा ‘द रेव्हनाण्ट’ हे गेल्या वर्षी ऑस्करमध्ये मिरविणारे चित्रपटही वेस्टर्न होते.

यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत शिरण्याची पुरेपूर शक्यता असलेल्या ‘हेल ऑर हाय वॉटर’ने या चित्रप्रकाराच्या सर्वच जुन्या निकषांना आजच्या आर्थिक दुष्काळाशी एकरूप बनवून वापरले आहे. इथे सुरुवात होते, ती कारमधून लांबलचक प्रवास करणारे दोन मध्यमवयीन तरुण अत्यंत थंडपणे एका बँकेमध्ये दरोडा टाकताना. पहिला यशस्वी दरोडा पचवून ही दोघे त्याच बँकेच्या दुसऱ्या शहरातील शाखेतही आधीच्या प्रकाराची पुनरावृत्ती करतात. हा उद्योग पुढे थांबतो, तो त्या व्यक्ती दुष्ट नसून चित्रपटाचे नायक असल्याची जाणीव करून देत. यातले टोबी (ख्रिस पाइन) आणि टॅनर (बेन फॉस्टर) हे बंधू दिवंगत आई-वडिलांनी काढलेल्या कर्जाच्या वसुलीपोटी जप्ती होऊ घातलेले आपले शेतघर वाचविण्यासाठी एकत्र आलेले असतात. टॅनर हा उघडपणे गुन्हेगारीतून तुरुंगवारी करून आलेला उग्र हिंसावादी आहे. घटस्फोटित असूनही टोबी मात्र पापभीरू आणि कुटुंबमूल्यांची चाड असलेला दिसतो. जी बँक त्यांचे घर आणि शेत हिसकावून घेण्यासाठी सज्ज असते, त्या बँकेत दरोडे घालून त्या पैशांचे सफेदीकरण करून पुन्हा त्याच बँकेत पैसे भरण्याची या दोघांची योजना असते. या योजनेतील नियोजित टप्पे ते पार पाडत असतात. गुन्ह्य़ाचा कोणताही सुगावा लागू न देण्याची काळजी घेणारी ही दरोडामालिकेला थांबविण्यासाठी दुसऱ्या बाजूला हॅमिल्टन (जेफ ब्रिजेस) आणि अल्बटरे (जिल बर्मिगहॅम) ही पोलीस जोडगोळी सक्रिय होते. पैकी निवृत्तीचे काही क्षण उरलेल्या हॅमिल्टनला आपल्या नोकरीचा शेवट अचाट कामगिरीने करायचा असल्याने तो या दरोडासत्राला थांबविण्यासाठी अधिक उत्साही असतो. दुष्ट मार्गाचा अवलंब करणारे नायक दरोडेखोर आणि वाटेल त्या मार्गाने दरोडा थांबविण्यासाठी सज्ज झालेले पोलीस यांच्या आयुष्यातील अंतर्बाह्य़ गोष्ट ‘हेल ऑर हाय वॉटर’ दाखवून देतो.

चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील पात्रांभोवती असलेली अगतिकतेची पाश्र्वभूमी. मुर्दाड शहरांची लांबच लांब दृश्ये, हॉटेलातील वेट्रेसच्या मनोगतांपासून ते शहरातील कर्जवसुलीच्या बडय़ा पाटय़ांपर्यंत सारे घटक इथली नरकदायी आर्थिक स्थिती प्रगट करतात. एकीकडे हॅमिल्टनचे अनुभवातून गुन्हेगारांना पकडण्याचे मनसुबे आणि त्यांच्या वरताण टॅनर-टोबीचे धाडसी दरोडे प्रकार यांनी रंगत जाताना चित्रपट या सर्वाविषयी विलक्षण सहानुभूती निर्माण करतो. इथला विनोदही खूप गंभीररीत्या मांडला जातो. भिन्न स्वभावाचे दोन भाऊ आणि दोन पोलीस यांच्या माणूसपणाच्या छटा यांमध्ये प्रेक्षक हरखून जातो.
२००९च्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेत कर्ज-कर्जवसुली-जप्ती यांनी उद्ध्वस्त झालेल्या एका पिढीची दु:खी दास्तानच या चित्रपटात आली आहे. ‘ओशन’ मालिका किंवा टेरेन्टीनो-गाय रिचीच्या दरोडेपटांनी तयार केलेल्या स्मार्ट चित्रपटांशी याचे कोणतेही साधम्र्य नाही. जुन्या वेस्टर्न सिनेमाच्या निकषांना घासून-पुसून गोळीबंद पटकथेद्वारे दिग्दर्शक डेव्हिड मॅकेन्झी यांनी आजची आर्थिक अवघडलेली परिस्थिती सादर केली आहे. फक्त त्यासाठीच या नववेस्टर्नपटाची अनुभूती आवश्यक आहे.

- पंकज भोसले
(लोकसत्तामधून )

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP