1917 - महायुद्धाचा साक्षीदार
>> Friday, January 24, 2020
जो साको या ग्राफिक नाॅव्हेलिस्टचं ‘द ग्रेट वाॅर’ नावाचं एक प्रसिद्ध नाॅव्हेल आहे, जे पहिल्या महायुद्धातल्या एका महत्वाच्या दिवसाचं चित्रण करतं. १ जुलै १९१६ हा तो दिवस, ज्या दिवशी फ्रान्समधे फ्रेंच आणि ब्रिटीश विरुद्ध जर्मन सैन्य यांच्यात साॅमच्या लढाईला सुरुवात झाली . खरंतर याला पारंपरिक अर्थाने ग्राफिक नाॅव्हेलही म्हणता येणार नाही कारण याला रुढार्थाने कथा नाही. ब्रिटीश सैन्याच्या बाजूने मांडलेलं हे युद्धाचं सलग चित्र आहे, जे सैनिकांच्या छावण्यांपासून सुरु होत पुढे सरकत युद्धभूमीपर्यंत जातं, बरोबर काळातला प्रवासही दाखवतं, वाचणाऱ्यालाही या रणधुमाळीत सामील करुन घेतं आणि युद्धात कामी आलेल्यांच्या शवांच्या दफनविधीशी येऊन थांबतं. या चित्रात खंड नाही, एकमेकांना जोडलेली ही एक फुटाची चोवीस पॅनल आहेत, जी आपण सलग उलगडून हे थरारक दृश्य पाहू शकतो. हे कथेबिगर पण प्रचंड तपशिलातलं पुढे सरकणारं लांबलचक चित्र आपल्याला युद्धाच्या कल्लोळात खेचून घेतं. सॅम मेन्डीसचा ‘1917’ पाहून मला पहिली आठवण या पुस्तकाची झाली.
हा सिनेमा आणि हे पुस्तक यांचा थेट संबंध नाही, पण कन्वेन्शनल कथेच्या आधाराशिवाय पहिल्या महायुद्धाचं अतिशय तपशिलात केलेलं चित्रण, आपण घटनेचे साक्षीदार असल्याचा प्रेक्षकावाचकाला अनुभव देणं, ही यांमधली जाणवण्यासारखी साम्यस्थळं आहेत.
चित्रपटातल्या घटना घडतात त्या ६ एप्रिल १९१७ या दिवशी, फ्रान्समधे . ब्रिटीश बटालिअनमधल्या ब्लेक ( डीन चार्ल्स चॅपमन ) आणि शोफील्ड ( जाॅर्ज मॅके ) या दोन सैनिकांवर एक कामगिरी सोपवली जाते. त्यांच्या छावणीपासून काही मैलांवर असलेल्या दोन ब्रिटीश तुकड्यांवर संकट आलय. १६०० सैनिकांसह या तुकड्यांनी ज्या जागेवर हल्ला करण्याची योजना आखलीय तो त्यांच्यासाठी रचलेला सापळा आहे, पण त्यांना याची कल्पना नाही. ब्लेक आणि शोफील्डनी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे अंतर पायी पार करुन तिथल्या सेनाप्रमुखाला चढाई रद्द करण्याची सूचना असलेलं पत्र पोचतं करायचं आहे. जर हल्ला झाला, तर मोठ्या संख्येने ब्रिटीश सैन्य कामी येईल हे निश्चित. ब्लेकचा भाऊ त्या तुकड्यांमधे आहे, आणि बातमी पोचली नाही, तर त्याचं भवितव्य अनिश्चित आहे. ब्लेक कामगिरी स्वीकारतो, आणि दोघांचा प्रवास सुरु होतो.
चित्रपट म्हंटलं तर सत्य घटनेवर आधारीत आहे, म्हंटलं तर नाही. कारण तुकड्यातुकड्यांमधे घडलेल्या अनेक घटना एकत्र सांधून चित्रपटाचं जुजबी कथानक तयार केलय. ट्रेन्च वाॅरफेअर, किंवा जमिनीत खोदलेल्या चरांमधे सैन्याने दडून युद्ध करणं हे फार प्रभावीपणे चित्रपटात दिसलेलं नाही. पण इथे ते दिसतं. इथल्या सैन्याची अवस्था, वातावरण 1917 च्या सुरुवातीच्या भागात येतं. आपण ब्लेक आणि शोफील्डबरोबर पुढे जात रहातो आणि रिकाम्या छावण्यांपासून प्रत्यक्ष युद्धभूमीपर्यंत अनेक जागांचे, घटनांचे साक्षीदार होतो. प्रत्यक्ष युद्धाचा भाग यात कमी आहे, पण केवळ युद्ध दाखवणं हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. चित्रपटाला समोर ठेवायचाय तो एक जिवंत अनुभव. शंभर वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका युद्धात सहभागी होण्याचा.
‘1917’ पहाताना शाॅटमधे, प्रसंगात खंड नाही. संपूर्ण कथानक एकच सलग प्रसंग असल्याचा आभास इथे तयार करण्यात आला आहे. अमेरिकन ब्युटी (१९९९) पासून स्कायफाॅल (२०१२) पर्यंत अनेक नावाजलेले चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सॅम मेन्डीसने वापरलेल्या या क्लुप्तीबद्दल प्रेक्षकांमधे मतभिन्नता आहे. कोणी म्हणतं ती अनावश्यक आहे, चित्रपटाच्या कथनाला त्यामुळे मर्यादा पडते, तर कोणी तिचं वारेमाप कौतुक करतं. व्यक्तीश: मला ही योजना अतिशय चपखल वाटते. ही मांडणी तरुण पिढीला आपली वाटेलशी आहे, कारण तिचं स्वरुप गेमिंगच्या खूप जवळ जाणारं आहे. फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन शूटर्समधे या प्रकारची कथनशैली सरसकट वापरली जाते. तिथे तुम्हीच कथेतलं एक पात्र बनता आणि खेळात मांडलेल्या अनुभवविश्वाला सामोरे जाता. तिथेही कॅमेरा तुमच्याबरोबर असतो. दृश्य खंडीत होत नाहीत, तर तुमचा प्रवास सलग चालू रहातो. ‘ काॅल ऑफ ड्यूटी’ सारख्या युद्धावर आधारीत खेळांमधेही ती वापरली गेली आहे. अर्थात , केवळ तरुणांना परिचित असणं, एवढाच या शैलीचा फायदा नाही. या प्रकारच्या कथनात एक अर्जन्सीदेखील आहे. सोपवलेलं काम पुरं होईपर्यंत वाढत जाणारा ताण आहे. हा ताण चित्रपट तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्ही त्या प्रवासाचा एक भाग बनता.
या दिग्दर्शकीय क्लुप्तीत तांत्रिक सफाई असली , तरी तंत्र नवीन म्हणता येणार नाही. मेन्डीसने अधिक लांबी असलेले वेगवेगळे शाॅट्स घेतले आहेत, आणि ते चटकन लक्षात येणार नाहीत अशा जागा पाहून एकमेकांना जोडून हा सलग कथनाचा परिणाम साधला आहे. आपण लक्ष देऊन पाहिलं तर या जोडकाम असलेल्या जागा लपणार नाहीत ( उदाहरणार्थ जाॅर्जची नदीत उडी ) पण त्या जागा लपवणं गरजेचं नाही. केवळ घटनेत एकसंधता आणणं हाच या युक्तीमागचा हेतू आहे, जो साध्य होतो. २०१४ च्या ‘बर्डमॅन’ चित्रपटासाठी अलेहान्द्रो इन्यारितूनेही सीन्स स्वतंत्र चित्रीत करुन जोडले होते आणि एका शाॅटमधेच चित्रपट उलगडल्याचा आभास आणला होता, पण तिथलं जोडकाम अदृश्य रहाणारं नाही. ते लक्षात आणून देणं हाच त्या चित्रपटाच्या गंमतीचा भाग आहे. मेन्डीसची योजना ही इन्यारितूच्या चित्रपटापेक्षा वेगळी आहे. आल्फ्रेड हिचकाॅकने १९४८ मधे जेव्हा ‘रोप’ हा आपला पहिला रंगीत चित्रपट केला त्याची आठवण करुन देणारी आहे. एका घरात घडणाऱ्या रहस्यनाट्याला चित्रीत करताना त्याला हा सलग चित्रणाचा परिणाम साधायचा होता. तेव्हा तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे त्याने दहा मिनिटांच्या लाॅंग टेक्समधे चित्रण करुन ते लक्षात येणार नाहीसं जोडलं. आज प्रत्यक्ष लांब टेक्स शक्य असले, तरीही ‘1917’ मधे हिचकाॅक स्ट्रॅटेजीचीच आवृत्ती वापरली आहे. यातल्या प्रवासात येणाऱ्या काळ आणि अंतर यातल्या उड्यांसाठी हे चित्रण प्रत्यक्षात सुटं असण्याची गरज आहे. हे सारं एकत्र सांधताना आणि युद्धचित्रणातही व्हिजुअल इफेक्ट्सचा मोठा वापर असणं साहजिक आहे. पण हा वापर अदृश्य आहे. पहाताना कुठेही काय चित्रीत केलय आणि काय डिजीटली उभं केलय हे लक्षात येत नाही, यातच या तंत्रज्ञानाचं यश आहे.
मी काही रिव्ह्यूजमधे असं वाचलं की चित्रपटाचं तांत्रिक अंग उत्तम आहे, पण चित्रपटातून फार काही हाती लागत नाही. काय हाती लागावं अशी आपली अपेक्षा आहे ? चित्रपट तुम्हाला देऊ करतोय तो एक अस्सल अनुभव आहे . तो तुम्हाला तुमच्या बसल्या जागेवरुन उचलून शंभर वर्षापूर्वी झालेल्या एका युद्धाच्या मध्यभागी नेऊन ठेवतो आहे, तिथल्या सैनिकांची मनस्थिती, त्यांचं जगणं दाखवतोय. हा अनुभव हे चित्रपटाचं उद्दीष्ट असू शकत नाही का ? त्याने दर खेपेला गोष्ट सांगायला हवी का ? संदेश द्यायला हवा का?
वाॅशिंग्टन डिसीला असलेल्या हाॅलोकाॅस्ट म्युझिअम मधे आपण गेलो, तर एका ठिकाणी बुटांचा खच पडलेला आपल्याला दिसतो.हे बूट छळछावण्यांमधे मारल्या गेलेल्यांच्या पायातले. दुसरीकडे एका पुलावरुन जाताना वरपासून खालपर्यंत लावलेले असंख्य फोटो आपल्यापुढे येतात. हेदेखील अन्यायाने मारल्या गेलेल्या ज्यूंचे. हे पाहून आपण म्हंटलं की बूट आणि फोटो कशाला दाखवले, त्यापेक्षा आम्हाला काय घडलं ही गोष्ट सांगितली तर पुरे आहे, तर ते योग्य ठरेल का ? ऐकीव माहितीपेक्षा अधिक परिणाम करण्याची ताकद त्या फोटोंमधे आणि त्या बुटांच्या ढिगाऱ्यातच आहे, कारण ते तुम्हाला साक्षीदार बनवतात. कधीकाळी अमुक अमुक घडलं, इतकं सांगून न थांबता जे घडलं त्याला तुमच्या अनुभवविश्वाचा थेट भाग बनवतात. 1917 आपल्याला एक शतक मागे टेलिपोर्ट करतो. ते सैनिक ज्या प्रसंगाला सामोरे गेले, तेच तुमच्यापुढे ठेवतो. तुम्हाला विश्वासात घेतो. तिथल्या चिखलाचा सडा, रिकामे ट्रेन्चेस, कुजणारी माणसांची, प्राण्यांची प्रेतं, गावांचे उध्वस्त अवशेष, यांमधूनच हा चित्रपट बोलतो. ते आपण ऐकू शकतो का , हा खरा प्रश्न आहे !
-- गणेश मतकरी Read more...