तानाजी - इतिहासाचा रंजक अर्थ

>> Friday, January 10, 2020



इतिहासकार इ एच. कार म्हणतात, की ऐतिहासिक सत्य, ही काही कोळणीने आपल्या पाटीवर नीट मांडून ठेवलेल्या माशांसारखी नसतात, त्याऊलट ती एका कदाचित आपण पोचूही शकणार नाही अशा एका महासागरात सुळकन पोहणाऱ्या जिवंत माशांसारखी असतात. इतिहासकार कोणत्या सत्यापर्यंत पोचतो यात काही वेळा अपघाताचा भाग असू शकतो, पण बहुधा ते अवलंबून असतं, ते तो या महासागराच्या कोणत्या भागात गळ टाकायचं  ठरवतो, आणि त्यासाठी कोणती साधनं वापरतो यावर. या दोन्ही गोष्टी ठरतात, ते अर्थातच त्याला कशाचा शोध आहे यावरच. इतिहासकाराला जे हवं आहे, ते बहुधा त्याला मिळू शकतं, कारण शेवटी इतिहास म्हणजे काय, तर अन्वयार्थ.

तानाजी- द अनसंग वाॅरीअर चित्रपटाचं थोडंसं असच आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आणि पटकथाकार प्रकाश कापडिया ( ओम राऊत सह ) , यांनी तानाजीची कथा, ही इन्टरप्रिट केलेली आहे. त्याचा अर्थ, त्यांना उमजेल अशा, आणि प्रेक्षकांच्याही पचनी पडेल अशा पद्धतीने लावलेला आहे. ती प्रत्येक वेळी आपण ऐकलेल्या तानाजीच्या प्रसिद्ध कथेशी जुळते का, तर अर्थातच नाही. पण त्यातला बराच भाग ; म्हणजे प्रामुख्याने तानाजीचं व्यक्तीमत्व आणि ती ऐतिहासिक चढाई याबद्दलचा भाग, हा इतिहास आणि चित्रपटीय तर्कशास्त्र या दोन्हीच्या सामायिक चौकटीत पटण्याजोगा झालेला आहे. आणि मी म्हणेन की हेच चित्रपटाचं यश आहे.

मागे मी हिरकणी चित्रपटाबद्दल लिहिताना असं म्हणालो होतो, की मूळची आख्यायिका, ही चित्रपटाची पूर्ण लांबी भरण्यासाठी पुरेशी नाही, त्यामुळे तिला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती एक पटेलशी कथा रचणं आवश्यक होतं, किंवा त्या घटनेलाच तपशीलात रंगवून चित्रपट भरायला हवा होता. तानाजी काही प्रमाणात या दोन्ही गोष्टी करतो. आपण लहानपणी ऐकलेली कथा , ही प्रामुख्याने कोंढाणा परत मिळवण्याची निकड आणि चढाई, या दोन घटनांशी जोडलेली आहे, आणि या केवळ दोन घटना, चित्रपटाची लांबी भरण्यासाठी पुरेशा नाहीत. मग तानाजीच्या लहानपणचा थोडा ( पुढल्या महत्वाच्या भागाला फोरशॅडो करणारा ) प्रस्तावनापर भूतकाळ, किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीने असलेलं महत्व मांडणारा भाग, आणि मोठा, प्रत्यक्ष चढाईआधीचा भाग, असे भाग चित्रपटात तपशीलवार मांडण्यात आलेले आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष चढाईच्या प्रसंगावरही आवश्यक तो वेळ घालवून तो चांगला रंगवला आहे.  या मांडणीमुळे चित्रपट अजिबात रेंगाळत नाही. पटापट पुढे सरकतो.  या सगळ्या भागात स्वत: तानाजी ( देवगण ) आणि किल्लेदार उदयभान ( सैफ ) यांच्या व्यक्तीरेखा तपशीलात रंगवलेल्या आहेत. हे करताना शेलारमामाच्या मूळ कथेत महत्वाच्या असलेल्या शेलारमामा या व्यक्तीरेखेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालय. विशेषत: ती शशांक शेंडेसारखा ताकदीचा मराठी अभिनेता करत असल्याने ते फार जाणवतं, पण आधी म्हणाल्याप्रमाणे दिग्दर्शकाने टाकलेला गळ हा त्याला इतिहासाच्या समुद्रातून काय शोधायचय, यावर अवलंबून आहे. शरद केळकरचा शिवाजी, काजोलची सावित्री, या तशा पुरक भूमिका आहेत. त्यांची लांबी अनावश्यक वाढवलेली नाही, ही चांगलीच गोष्ट आहे.

तानाजी आणि उदयभान या  दोन व्यक्तीरेखांचा एक प्राॅब्लेम असा, की त्या वास्तववादी पद्धतीने रंगवलेल्या नाहीत, तर प्रामुख्याने पारंपरीक मसाला हिंदी चित्रपटातल्या नायक आणि खलनायकांच्या माॅडेलवर त्या  खूपच आधारलेल्या आहेत. तानाजीचा मूळ कथेतला भागही त्यात उतरल्याने, त्या व्यक्तीरेखेच्या बाबतीत हा बाॅलिवुड हिरोईझम थोडा लपतो. खलनायकासमोर नाच, टाॅर्चर सीक्वेन्स, अशा तो ढळढळीतपणे पुढे आणणाऱ्या जागा आहेत, पण त्याकडे आपण इतर भागामुळे दुर्लक्ष करु शकतो. उदयभान म्हणून सैफ मात्र सगळा वेळ ‘सायको खलनायक’ मोडमधेच आहे. हा एक बरा दिसणारा गब्बर सिंग वाटावा अशी ही व्यक्तीरेखा रचली आणि सादरही केलेली आहे. या दोन्ही भूमिका चांगल्या अभिनेत्यांनी साकारल्याने आणि कथेत तुल्यबल मांडणी असल्याने, तसच, तानाजीची वीरश्री या सर्वतून उत्तमरित्या अधोरेखित होत असल्याने याबद्दल आपल्या प्रेक्षकाला तक्रार असण्याचं कारण नाही. परंतु या भागात आपण इतिहासापेक्षा बाॅलिवुड लाॅजिकमधेच जातो हे नाकारण्यात काहीच मुद्दा नाही.

तानाजीवर केलेलं vfx चं काम, हा चित्रपटसंबंधातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि गेल्या काही वर्षांमधे, खासकरुन बाहुबलीपासून, आपली या क्षेत्रात कथित प्रगती सुरु असल्याने, त्याविषयी बोलणं आवश्यक आहे.व्हिजुअल इफेक्ट्सचं काम हे दोन प्रकारचं असतं, व्हिजुअलायजेशन आणि एक्झिक्यूशन. व्हिजुअलायजेशनच जर चांगलं नसेल, तर तांत्रिक काम कितीही चांगलं असेल तरी उपयोग नसतो, आणि तांत्रिक काम फसलं, तर व्हिजुअलायजेशनचा परिणाम कमी होतो. तरीही आपल्याकडे व्हिजुअलायजेशन अधिक सुधारणं, हे या घडीला आवश्यक आहे. तंत्रज्ञ आपल्याकडे आहेत, आणि वाटल्यास बाहेरुनही आणता येतात. हे काम कमी पडतं, ते मुख्यत: बजेट आणि आवश्यक त्या वेळाची कमतरता यामुळे. जे काही वर्षात आपोआप सुधारेल अशी शक्यता आहे. पण व्हिजुअलायजेशनचं  काय, जे संपूर्णपणे दिग्दर्शकाच्या कुवतीवर अवलंबून आहे, आणि त्यासाठी वेगळे पैसे पडत नाहीत ! तानाजीबद्दल एक समाधानकारक गोष्ट अशी म्हणावी लागेल, की त्यातला व्हिजुअलायजेशनचा भाग व्यवस्थित आहे. इफेक्ट्स साठी प्रसंगांची निवड ( बुद्धीबळ, तानाजीचा इन्ट्रो ) इथपासून त्यांचं स्टन्टबरोबरचं इन्टीग्रेशन , हे सगळं इथे  विचारपूर्वक आणलेलं आहे. तांत्रिक बाजूत मात्र ते अजूनही कमीच पडतात.

आता आपल्याकडे ‘भारतासाठी खूपच चांगलंय’ असं मानण्याची एक पद्धत आहे. शिवाय काही लोकांना अदृश्य vfx हा प्रकारच कळत नाही. त्यांना ते कळावेच लागतात. ते लक्षात आले, की मगच ‘ वा, काय काम केलय’ असं त्यांना वाटतं. या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. ज्याप्रमाणे चांगलं दिग्दर्शन हे दिग्दर्शक अदृश्य असण्यात आहे, तसेच चांगले vfx ते आहेत हेच ओळखू न येण्यात आहे. जे दिसतय ते आपल्याला खरच वाटायला हवं. ते तसं नसणार, हे मागाहून वाटायला हवं.

तानाजीचे पहिल्या भागातले इफेक्ट खूपच कळण्यासारखे आहेत. इतके, की ही काही परफाॅर्मन्सेस असलेली चांगली, पण ॲनिमेटेड फिल्म वाटावी. साध्या घोडदौडीसारख्या प्रसंगांपासून, स्थळं उभी करण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचा कधी आवश्यक, तर कधी उगाचच वापर आहे, आणि तुम्ही तरबेज प्रेक्षक असाल, तर प्रत्येक वेळी या जागा तुमच्या लक्षात येतील. एक चांगली गोष्ट म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या भागात इफेक्ट्सचा वापर वेगवेगळ्या प्रकारचा आहे. पहिला भाग अनेक गोष्टी एस्टॅब्लिश करत असल्याने, त्याला वाईड ॲंगल्स, लाॅंगशाॅट्स, स्थलदर्शन करणारी दृश्य, यांची अधिक गरज आहे. आपण जसे उत्तरार्धाकडे येतो, तसे आपण मानवी स्केलकडे येत जातो. चित्रपट अधिक इन्टीमेट होतो. स्टंट्सना, जे छान जमलेले आहेत ,  इफेक्ट्सहून अधिक महत्व येतं. लांबून पहाण्यापेक्षा, व्यक्तीरेखांचा आमनेसामने संघर्ष, अधिक दिसायला लागतो. आणि या जागी vfx जमून जातात. ते पहिल्या भागासारखे खटकत नाहीत. एकूण, हा चित्रपट या तंत्रज्ञानाकडे आशेने पहायला लावतो. पुढल्या काळात तंत्र आणि ते चांगल्या प्रकारे वापरणारे दिग्दर्शक, या दोन्हीकडून अपेक्षा ठेवावी असं वातावरण तयार करतो.

चित्रपटाने तुमच्यावर परिणाम केला का, हे ओळखण्याची साधी परीक्षा म्हणजे चित्रपट संपतेवेळी तुम्ही यातल्या प्रमुख व्यक्तीरेखेबरोबर कितपत आयडेन्टीफाय करु शकता, ही आहे. तुम्हाला होणारा आनंद, दु:ख, किंवा काहीच न वाटणं, यावरुन ते लक्षात येतं. तानाजी माझ्या मते त्या दृष्टीने यशस्वी आहे. ओम राऊतचा हा दिग्दर्शक म्हणून दुसराच सिनेमा आहे. लोकमान्य नंतरचा. आणि दोन चित्रपटांमधून दिसलेलं काम पाहिलं तर त्याला खूपच प्राॅमिसिंग दिग्दर्शक म्हणायला हरकत नाही. निव्वळ काम म्हणूनही, आणि पहिलं आणि दुसरं या दोन पावलात दिसलेल्या प्रगतीसाठीही. आता तिसरं पाऊल अधिक अवघड होणार हे झालच, पण त्याची प्रतिक्षा करायला हरकत नाही.

-  गणेश मतकरी

2 comments:

Ashish January 19, 2020 at 12:00 PM  

"ज्याप्रमाणे चांगलं दिग्दर्शन हे दिग्दर्शक अदृश्य असण्यात आहे, तसेच चांगले vfx ते आहेत हेच ओळखू न येण्यात आहे. जे दिसतय ते आपल्याला खरच वाटायला हवं. ते तसं नसणार, हे मागाहून वाटायला हवं."

अगदी खरं

Unknown February 15, 2020 at 10:28 AM  

एकदम बरोबर.... बरे वाटले review वाचून...
मला राहून राहून वाटत होते की VFX बाबतीत बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत किंवा चुकल्या आहेत...
मला एक गोष्टीची शंका आहे की पूर्ण movie
मध्ये vfx ्चा वापर करणे गरजेचे आहे का?
शेतमामधला सिन , तानाजीचे घर व परिसर, गडांवरच सिन हे प्रत्यक्षात चित्रित करता येऊ शकत होतं...
पण यामध्ये पण vfx चां वापर केला आहे...
आज काल लोक सर्रास हॉलिवुड पट पाहतात...त्यामुळे एक तर दर्जेदार vfx चां वापर करणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष लोकेशन वर शूट करावे असे वाटते...
सर आपण यावर मार्गदर्शन- आपला अभिप्राय द्यावा ही विनंती !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP