स्टेज्ड - क्रायसिसमधला विनोद

>> Sunday, July 19, 2020







मी शाळेत असताना छबिलदासला पिरान्देलोच्या ‘सिक्स कॅरेक्टर्स इन सर्च ऑफ ॲन ऑथर’ या नाटकाचं मराठी रुपांतर, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ पाहिलं होतं.मूळ नाटक १९२१ सालचं . नाटक सुरु होतं तेच एका नाटकाच्या तालमीत.  तालीम सुरु होत असताना सहा माणसं तिथे येऊन हजर होतात. चौकशी केल्यावर कळतं की ती नाटककाराने लिहिलेली पण अपूर्ण सोडलेली पात्र आहेत आणि त्यांना पूर्ण करु शकेल अशा एखाद्या नाटककाराचा त्यांना शोध आहे. वास्तव आणि फॅन्टसी यांची सरमिसळ करणारी यातली ही मुख्य कल्पना प्रेक्षकाला संभ्रमात पाडणारी. काय खरं आणि काय खोटं, कल्पित कुठे संपतं आणि वास्तव कुठे सुरु होतं, याबद्दल प्रश्न तयार करणारी.


‘स्टेज्ड’ या बीबीसी वनच्या सिरीजमधे डेव्हिड टेनन्ट ( ब्राॅडचर्च, गुड ओमेन्स, ) आणि मायकेल शीन ( द गुड फाईट , गुड ओमेन्स ) या दोन प्रख्यात अभिनेत्यांना घेऊन दिग्दर्शक सायमन इवन्स याच नाटकाच्या तालमी सुरु करण्याचा प्रयत्न करतो. यातली नाटकाची निवड, हा  योगायोग नसावा. तालमी सुरु असताना घडणारं नाट्य, दिसतय ती सत्य आणि कल्पनेची सरमिसळ असणं, अशा अनेक गोष्टींमधे आपण स्टेज्डचं मूळ नाटकाशी थीमॅटीक साम्य शोधू शकतो. इथल्या तालमी सुरु आहेत त्या अर्थात झूम ॲपच्या मदतीने. सगळ्या जगाप्रमाणे इंग्लंडही कडी कुलुपात बंद आहे. कलाकार , दिग्दर्शक बिनकामाचे आपापल्या घरी बसून आहेत. आता झूमवर तालमी तरी होऊन होऊन काय होणार, पण काही भाग बसला तरी वेळ वाचेल, थिएटर्स उघडली की वेस्ट एन्डला नाटक लवकर आणता येईल, असा मनसुबा आहे. पण थिएटर्स उघडतील? लाॅकडाऊन संपेल? का आपण असे कायम अडकून रहाणार ? मग आपल्या कलेचं काय ? आपल्या जगाचं काय ? हे प्रश्न या परफाॅर्मर्सना पडतायत. सायमन इथे या दोन विक्षिप्त ब्रिटीश स्टार्स बरोबर ‘ सिक्स कॅरेक्टर्स’ बसवण्यासाठी धडपडणारा मालिकेतला दिग्दर्शक आहे, तसाच तो प्रत्यक्षात ‘स्टेज्ड’ सिरीजचाही लेखक, दिग्दर्शक आहे. इथली लेखन प्रक्रिया थोडीशी सैल असावी असं मानायला जागा आहे, कारण बरेच प्रसंग इम्प्रोवाईज्ड असण्याचीही शक्यता दिसते.


या मालिकेत तीन प्रकारच्या दृश्य योजना आहेत. आपल्याला बराच भाग दिसतो तो झूम स्क्रीन आणि त्यावरच्या मिटींग्जमधून, अगदी आपण या प्रक्रियेत सामील असल्यासारखा. हे चित्रण सरळ व्हिडीओ काॅन्फरन्सिंग तंत्रज्ञान वापरुनच करण्यात आलेलं आहे. याखेरीज काही वेळा कथा पुढे जाण्यासाठी घेतलेली साधी दृश्य आहेत. ही झूमवरची नाहीत पण कोणत्याही चमत्कृतीशिवाय घेतलेली मात्र आहेत.  ही दृश्य व्यक्तीरेखांच्या घरातला भाग मांडतात, तर इतर वेळा लाॅकडाऊनमधलं इंग्लंड दिसतं. माणसांशिवायचं. रिकामं.  या तीन दृश्ययोजना, या जीवनाचे तीन पैलू असल्यासारख्याच आहेत. काम- कौटुंबिक आयुष्य - समाज, या सर्व आघाड्यांवर त्यांची आणि अप्रत्यक्षपणे आपली आयुष्यही कशी चालली आहेत याचं पूर्ण चित्र यातून उभं रहातं. यातल्या व्यक्तीरेखाही तीन प्रकारात मोडतात. पहिला संच आहे तो खऱ्या व्यक्तींचा, ज्या या मालिकेपुरतं फिक्शनल आयुष्य जगतायत. यात मायकल, डेव्हीड आणि सायमन, तसच मायकलची मैत्रीण ॲना, डेव्हिडची पत्नी जाॅर्जिआ आणि सायमनची बहीण लुसी , हे देखील आले. त्याखेरीज सॅम्युएल एल जॅक्सन, डेम जुडी डेंच, अशा काही कलाकारांचे कॅमिओजही, ते स्वत: म्हणूनच आहेत. याबरोबर दुसरा संच आहे तो कल्पित व्यक्तीरेखांचा. यात जो ( निना शोसान्या) ही निर्माती / फिनान्सर आणि तिची असिस्टन्ट ( रिबेका गेज ) येतात. रिबेका आपल्याला दिसत नाही, तिचा फक्त आवाज ऐकू येतो. पण तेवढ्यावरही लाॅकडाउन दरम्यानही जोकडे राबायला लागलेली रिबेका छान उभी रहाते. तिसरा संच आहे, तो आपल्या नजरेपलीकडल्या जगातल्या काही व्यक्तीरेखांचा, ज्यात सर्वात महत्वाची आहेत, ती घरांमधली लहान मुलं आणि मायकलच्या घरासमोर रहाणारी वृद्ध हॅना. हॅनाचा संपूर्ण ट्रॅक, तिला अजिबात न दाखवता काळजीपूर्वक रचला जातो, ज्यात तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू येतात आणि त्याबरोबरच सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना ज्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतय तेही येतं. विनोदापासून कारुण्यापर्यंत अनेक शेड्स या भागात येतात.


मालिका अतिशय विनोदी आहे, पण हा विनोद सत्याच्या खूप जवळचा आणि अनेकदा आपल्याला अनकम्फर्टेबल करणाराही आहे. सगळा समाजच एका एक्झिस्टेन्शिअल क्रायसिसमधून जातोय, आणि हे होत असताना डोकं जागेवर कसं ठेवायचं, काम करत कसं रहायचं, उद्या काय होणार आहे, आपण आजवर मिळवलेली ओळख पुढे तशीच राहील का, नव्या जगात आपल्याला कोणती भूमिका निभवावी लागेल, यासंबंधातली असुरक्षितता आणि त्यावरची या व्यक्तीरेखांची प्रतिक्रिया यांमधून हा विनोद उभा रहातो. प्रत्यक्षात डेव्हिड आणि मायकेल यात दिसतात तसेच घरगुती आयुष्यातही वागत असतील का, हे खात्रीने  सांगता यायचं नाही, पण त्यांच्या लोकांसमोर असलेल्या प्रतिमेचंच यात दिसणाऱ्या व्यक्तीरेखा, हे एक्स्टेन्शन आहे. त्यांचं चलाख असणं, रागावणं, वेळप्रसंगी केलेला खोटारडेपणा, चिडचीड, पण त्याचवेळी त्यांचं कलाकार असणं, भासणारी स्वनिर्मितीची गरज हा त्यांच्या जगण्याचा भाग असणं, हे सारं त्यांच्या परफाॅर्मन्सेसमधून उभं रहातं. हे आपल्या माहितीचे डेव्हिड आणि मायकेल आहेत याबद्दल आपल्या मनात कुठेही शंका तयार होत नाही. स्पाईक जोन्ज दिग्दर्शित आणि चार्ली काॅफमन लिखित ‘बिईंग जाॅन मालकोविच’ चित्रपटात जसं मालकोविचने स्वत:लाच आपल्या पब्लिक इमेजसह रंगवलं होतं त्यातलाच हा प्रकार आहे. इथली पार्श्वभूमी अधिक वास्तव आहे, हा (मोठाच) फरक.


‘स्टेज्ड’ कुठेही सामान्य पातळीवर येत नाही. मालिकेत दिसणारा विनोद सतत गुंतवणारा आणि तरीही वास्तवात एक पाय असणारा आहे. केवळ लाॅकडाऊनचा फायदा घेत चार पैसे मिळवण्यासाठी ही मालिका केलेली नाही. तर ती करणं, हे या सर्जनशील कलावंतांसाठी एक तर्कशुद्ध पाऊल आहे. केवळ अभिनेते घरात आहेत, आणि प्रेक्षक काय वाटेल ते पहातात म्हणून ती पाल्हाळ लावत नाही यातही तिची प्रिसीजन दिसून येते. ती छोटीशी आहे. केवळ सहा भागांची आणि हे भागही वीसेक मिनिटांच्या आसपास. मी ती पहायला बसलो, तो ती संपल्यावरच उठलो. ती आपल्याला गुंतवते. एरवीच्या चार मालिकांसारखी ती आपल्याला वेगळ्या जगात नेऊन आपलं मन रमवत नाही, तर आपल्या आजूबाजूला जे चाललय त्याकडे नव्याने पहाण्याची गरज आपल्या मनात तयार करते. तिच्या या सोप्या पण अचूक दृष्टीकोनातच तिचं यश दडलेलं आहे.

- गणेश मतकरी

2 comments:

Unknown September 16, 2020 at 10:54 PM  

या चित्रपटाबद्दल नाही पण marvel cinematic universe बद्दल बोलायचे होते !
पूर्ण मलिकेबद्दल आपले काहीच समीक्षण नाही !
त्याचबरोबर dc fandome बद्दलपण आपले विचार मांडावेत !

PATIL October 20, 2020 at 9:23 AM  

खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉग ला पन नक्की भेट द्या.
JIo Marathi

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP