चौकटीबाहेरचा थ्रिलर

>> Tuesday, June 3, 2008

इ न्टरप्रिटेशन हा शब्द वरवर साधा आणि नेहमीच्या वापराचा असला तरी प्रत्यक्षात खूपच गुंतागुंतीचा आहे. डिक्शनरीत पाहायचं तर त्याचा अर्थ हा "अर्थ सांगणे' या सोप्या क्रियेपासून ते "दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे, विवरण करणे' यासारख्या थोड्या अधिक गंभीर गोष्टींना स्पर्श करत थेट एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने समजणे, अर्थ लावणे इथपर्यंत पोचतो. त्यामुळे महत्त्वाचा ठरतो तो संदर्भ. आपण हा शब्द वापरताना तो कोणत्या संदर्भात वापरतो त्यावरून या शब्दाचं, विषयापुरतं वजन ठरतं. सिडनी पोलाक दिग्दर्शित " इन्टरप्रिटर' हा चित्रपट या शब्दाच्या संदर्भासहित बदलत जाणाऱ्या अर्थाशी वेगवेगळ्या पद्धतीने खेळून आपलं नाव सार्थ ठरवतो. वरवर पाहता हे यातल्या नायिकेचं जॉब डिस्क्रिप्शन किंवा तिचा हुद्दा आहे. UN मध्ये किंवा संयुक्त राष्ट्रसंघात ती दुभाषाचं काम करते. मात्र चित्रपटातलं इन्टरप्रिटेशन तेवढ्यापुरतं सीमित नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाच्या अंतर्गत आणि वैश्विक पातळीवरच्या प्रश्नांकडे पाहिलं जातं तेव्हा असं लक्षात येतं, की त्या देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांचा अर्थ हा अनेक प्रकारे लावता येतो. या वेळी जागतिक महासत्तांनी किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या महासंस्थांनी लावलेला अर्थ, त्यांचं इन्टरप्रिटेशन हे जागतिक इतिहासालाच वेगळं वळण लावणारं असू शकतं. या परिस्थितीत या महासत्ता अन् महासंस्थाच इन्टरप्रिटर ठरतात. इथे नेते आणि जनता यांमधलं नातंही इन्टरप्रिटेशनसाठी अभिप्रेत आहे. या चित्रपटातल्या "मरोबो' काल्पनिक देशाचा हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष एडमन्ड झुवानी याच्या सत्तासंघर्षात अनेक निरपराध्यांचे बळी गेले आहेत. त्याचे समर्थक, विरोधक आणि जनता हाही "इन्टरप्रिटर'चा एक पैलू आहे आणि त्यांचे झुवानीकडे पाहण्याचे स्वतंत्र दृष्टिकोन हादेखील यातल्या इन्टरप्रिटेशनचा एक भाग आहे. अर्थात, एक लक्षात घ्यायला हवं, की इन्टरप्रिटरची पार्श्वभूमी, त्यातली राजकीय गुंतागुंत आणि विषयाची व्याप्ती हे सर्व गृहीत धरूनही हा चित्रपट मुळात एक थ्रिलरच आहे. मात्र त्याच्या काळाबरोबर असण्याने आणि रहस्यापलीकडे जाऊन विचार करण्याची त्याची तयारी असल्यामुळेही तो देत असलेला अनुभव हा अधिक परिपूर्ण आहे. इथली नायिका सिल्व्हिया (निकोल किडमन) ही मूळची आफ्रिकेतल्या मरोबो देशाची नागरिक आहे आणि तिचे आई-वडील अन् बहिणीच्या मृत्यूला मरोबोचा राष्ट्राध्यक्ष झुवानी हा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेला आहे. सध्या सिल्व्हिया संयुक्त राष्ट्रसंघात दुभाषाची नोकरी करते आणि तिच्या देशासारख्या भरकटलेल्या देशांना केवळ शांतिपूर्ण तडजोडींनीच योग्य मार्गावर आणता येईल हा तिचा ठाम विश्žवास आहे. झुवानीच्या कारकिर्दीत ओढवलेल्या मनुष्यहानीमुळे आता त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे, ज्यातून सुटण्याच्या आशेवर संयुक्त राष्ट्रसंघासमोर आपली बाजू मांडायला तो अमेरिकेत येणार आहे. एके रात्री आपलं सामान आणायला संघात परत गेलेल्या सिल्व्हियाच्या कानावर अपघाताने एक संभाषण पडतं, जो झुवानिच्या हत्येचा कट असतो. सहभागी व्यक्तींचे चेहरे पाहू शकत नाही, पण त्यांना मात्र तिचा छडा लगेचच लागतो. सिक्रेट सर्व्हिसच्या केलर (शॉन येन) या अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या तपासासाठी बोलावण्यात येतं, पण त्याचा सिल्व्हियावर विश्žवास बसत नाही. दिवस जातात तसा केलर सिल्व्हियाला समजून घ्यायला लागतो, पण सिल्व्हियानेही आपल्या जबाबात काही गोष्टी लपवलेल्या असतात, ज्या त्या दोघांनाही अनेकवार अडचणीत आणत राहतात. सध्या, म्हणजे खरं तर गेले बरेच दिवस चित्रपटातलं रहस्य हे केवळ धक्का देण्यासाठीच असल्याचा चित्रकर्त्यांचा समज झाला आहे. गुन्हेगारावर संशय येऊ न देणं हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाल्यामुळे अनेकदा चित्रपट त्याच्या कथेला पूर्ण न्याय देण्याऐवजी संशयितांमध्ये खो-खोचा खेळ करताना दिसतात. इंटरप्रिटर तसं करीत नाही. त्याच्या प्रवासात अनपेक्षित वळणं आहेत, पण केवळ धक्के देण्यावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तो पटकथा एका निश्चित आलेखात चढवत नेऊ शकतो. इंटरप्रिटर पाहताना अनेकांना 1998 मधल्या एडवर्ड झ्विक यांच्या "द सीज' या चित्रपटाची आठवण होणं शक्य आहे. सीज हादेखील पोलिटिकल थ्रिलर होता; पण त्यात रहस्याचा भाग हा इन्टरप्रिटरहून कमी होता आणि दहशतवादाच्या सार्वत्रिक परिणामांवर त्याचं लक्ष अधिक केंद्रित झालं होतं. या दोन्ही चित्रपटांत अनेक साम्यस्थळं आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवादाचा आसरा घेणाऱ्या राजकीय शक्ती, हतबल सरकारी यंत्रणा आणि अमेरिकेपर्यंत पोचलेले परकीय दहशतवादाचे पडसाद या गोष्टी दोन्ही चित्रपटांत आहेत; तरीही दोन लक्षणीय म्हणावेसे फरकही आहेत. "द सीज'ची रचना ही समाजाभिमुख आहे, तर "द इन्टरप्रिटर'ची व्यक्तिभिमुख. इन्टरप्रिटरमधली नायिका ही चित्रपटाचा जीव आहे. त्यातल्या सर्व वैचारिक प्रश्नांचा विचार हा प्रामुख्याने तिच्या दृष्टिकोनातून होतो आणि इतरांची कामं मोठी असली तरी दुय्यम राहतात. सीजमध्ये अनेकांचे समांतर दृष्टिकोन त्यातल्या घटना पुढे नेतात आणि पटकथा विविध पातळ्यांवर पुढे सरकते. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे सीज 9-11 च्या आधीचा होता, तर इन्टरप्रिटर नंतरचा आहे. हा फरक ढोबळ स्वरूपात जाणवत नाही, पण तपशिलात डोकावतो. अमेरिकेच्या परकीय धोरणाविषयीचे विचार, सुईसाईड बॉम्बर्सना थांबवण्यासाठी देण्यात येणारं प्रशिक्षण, चित्रपटातला सामोपचाराचा संदेश अशा अनेक ठिकाणी 9/11 चे पडसाद हलकेच उमटतात. आजकाल बहुसंख्य थ्रिलर्स हे एकप्रकारच्या निर्वातात घडताना दिसतात. त्यांना जगात काय चाललं आहे याचं भान नसतं. ना आपण चित्रपटातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दाखवत असलेल्या गोष्टींच्या प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाची फिकीर. त्यांच्या नायकांची ओळख त्यांच्या कमावलेल्या शरीरयष्टीपुरती असते आणि खलनायकांची त्यांच्या अद्ययावत शस्त्रसामग्रीपुरती. त्यांच्या चित्रपटातलं ना राजकारण योग्य असतं ना समाजकारण. अशा अनेक चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर "द इन्टरप्रिटर'सारख्या चित्रपटांचं यश हे अधिकच प्रशंसनीय वाटतं. कारण त्यांनी घेतलेली थ्रिलरची चौकट ही त्यांची मर्यादा ठरत नाही, केवळ आपली मतं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेली दिशा होऊन जाते.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP