मुन्ना आणि गांधीवाद

>> Wednesday, October 1, 2008


मुन्नाभाईतल्या चित्रणाहून खरा समाज हा अधिक बेपर्वा आहे आणि गांधीवादाला फारच आयडियलिस्टिक समजून त्याला तो विसरूनही गेला आहे. आज केलेले सत्याचे प्रयोग हे आपल्याला मुन्नाइतकं यश मिळवून देतीलसं नाही. पण तरीही हे विचार ज्या मूलभूत पातळीवर आपल्याला पटतात, ती पातळी महत्त्वाची आहे. आपला वारसा आणि आपल्या माणूसपणाची आठवण करून देणारा आहे.
"मुन्नाभाई एम. बी. बी. एस.'च्या यशानंतर दिग्दर्शक हिरानी आणि निर्माता विधुविनोद चोप्रा यांनी "मुन्नाभाई एल. एल. बी.' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि आम जनता खूष झाली. ज्याप्रमाणे मुन्नाने वैद्यकीय महाविद्यालयात धमाल उडवली तशीच तो आता कायदेशास्त्रात उडवणार अशी चिन्हं दिसायला लागली. पण प्रश्न हा होता, की जर केवळ क्षेत्रं बदललं, तर या नव्या चित्रपटात खूपच तोचतोचपणा येईल का? अर्थात सीक्वल म्हटलं, की तोचतोचपणा येतो, नव्हे काही प्रमाणात तो आवश्यकही असतो. पण मूळ चित्रपटाचा बाज आणि नव्या चित्रपटातलं नावीन्य यांचा तोल जमणं आवश्यक असतं आणि तो कितपत जमतो, यावर हा चित्रपट तरतो का बुडतो हे अवलंबून राहातं. कदाचित "एलएलबी'मध्ये हा तोल राखणं शक्य झालं नसावं किंवा काही इतर कारणंही असतील, पण लवकरच वकिली पेशाला बाद करून मुन्नाला महात्मा गांधींना भेटवण्याचा घाट घातला गेला.
आजच्या काळातला मुन्ना महात्मा गांधींना कसा भेटणार, हे कोडं इतरांप्रमाणंच मलाही पडलं आणि त्यानंतर चित्रपटाबद्दल ऐकू आलेल्या उलटसुलट बातम्यांमुळे हा चित्रपट कागदावरच राहणार असंही वाटायला लागलं. सुदैवानं तसं झालं नाही. हीच कल्पना कायम ठेवून मुन्नाभाई आला आणि त्यानं सर्वांच्या अपेक्षा दामदुपटीनं पूर्णही केल्या. "लगे रहो मुन्नाभाई'ला खरंतर "मुन्नाभाई एम. बी. बी. एस.'चं सिक्वल म्हणता येणार नाही. जरी तो त्या मुन्नाभाईमधल्या अनेक व्यक्तिरेखांना (सगळ्याच नाही) पुन्हा पडद्यावर आणत असला, तरी पहिल्या चित्रपटातल्या घटनांना तो कथेच्या दृष्टिकोनात नंतर पूर्णपणे विसरतोच. बरं, ही त्याच्या आयुष्यात पुढं घडणारी घटना म्हणायचं, तरी ती "एम. बी. बी. एस.'मध्ये सांगितलेल्या मुन्नाच्या कल्पित भविष्यकाळाबरोबर जुळत नाही. थोडक्यात लगे रहो हा मुन्नाभाई मालिकेचा भाग असला तरी त्यापलीकडे तो एक स्वतंत्र चित्रपट आहे, ज्याचा आधीच्या भागाशी काही संबंध नाही. असं असूनही एक मान्य करता येईल, की पहिल्या भागात मुन्नाभाई या सद् वर्तनी गुंडाशी आणि सर्किट या त्याच्या गंमतीदार सुस्वभावी हरकाम्याशी आपली जी ओळख होते, त्याचा इथे फायदा होतो. "लगे रहो...' पुन्हा ही ओळख करून देण्यावर वेळ न काढता लगेच कथानकाला हात घालतो.
मुन्ना (अर्थात संजय दत्त) या वेळी कथेच्या सुरवातीलाच प्रेमात पडलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच गुंडगिरीकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रेयसीची चित्रं मनात रंगवतो आहे. मनात अशासाठी, की जान्हवीशी (विद्या बालन) त्याची अजून भेट झालेली नाही. तो केवळ तिचा आवाज रेडिओवर ऐकतो आहे. गांधीजयंतीनिमित्ताने घेतलेल्या एका क्विझमुळे त्याची जान्हवीशी भेट होते आणि मुन्ना ऊर्फ मुरलीप्रसाद शर्मा तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी आपण गांधीवादी प्रोफेसर असल्याचा आव आणतो. जान्हवीच्या सांगण्यावरून तो चार-पाच दिवसांत गांधीजींवर एक भाषण देण्याचंही मान्य करतो आणि क्रॅश कोर्स म्हणून दिवस-रात्र गांधीमय होतो. गांधीविषयक पुस्तकात तो रमला असताना त्याची प्रत्यक्ष गाधींजींशीच (दिलीप प्रभावळकर) भेट होते आणि हे प्रकरण केवळ जान्हवीसंबंधातलं उरत नाही. गांधीवादाचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करायला लागलेल्या मुन्नाला एक आव्हान मिळतं, ते लकी सिंगच्या (बोमन इरानी) जोरावर. लकी सर्किटलाच वापरून मुन्नाच्या नळकत जान्हवी राहात असलेल्या किंचीत वृद्धाश्रमाच्या वास्तूवर कब्जा करतो. आणि सत्य/अहिंसा आजच्या काळातही पूर्वीइतकीच प्रभावी ठरतील का, हे पाहण्याची संधी मुन्नाला मिळते.
या चित्रपटाचा विशेष आहे, तो त्याचा साधेपणा. कोणत्याही प्रकारचा आव न घेता त्याने आजच्या काळाबरोबर गांधीवादी विचारांना आणून जोडलं आहे. ही मूल्य अतिशय महत्त्वाची असून, आज हरवत चालली आहेत. आणि त्यांचा ऱ्हास न होऊ देता समाजाच्या सर्व घटकांनी ती अंगी बाळगणं आवश्यक आहे, हे या चित्रपटाचं सूत्र तो लोकांना यथेच्छ हसवत, त्यांना कळेलशा भाषेत पण प्रवचन न करता सांगतो. चित्रकर्त्यांनीच चिकार बोलबाला केलेल्या "मैने गॉंधी को नही मारा' चित्रपटाचा संदर्भ इथं आठवणं साहजिक आहे. खरं तर त्याचा गांधीवादाशी फार संबंध नव्हता आणि जो होता, तो सेन्सेशनल नाव आणि अनुपम खेरच्या तोंडी असणारं चिकटवलेलं भाषण यापुरता होता. मुळात भ्रमिष्ट होत जाणारा बाप आणि त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करणारी मुलगी एवढीच खरी गोष्ट होती. तरीही त्यांनी आपण गांधीच्या विचारांसंबंधित काही करत असल्याची जी पोज घेतली होती, तिला तोड नाही. "लगे रहो'त तो या प्रकारच्या युक्त्या करत नाही. त्याला तशी गरजही नाही. उलट तो मूळ गांधी प्रकरण जाहिरातीपासून लांब ठेवून अंडर प्ले करतो. इथे नावात गांधी नाहीत. जाहिरातीत आहे, ते आकाशात ढगांनी बनवलेलं अस्पष्ट रेखाचित्र. अशीही शक्यता आहे, की चित्रपट विनोदी आणि प्रेक्षक हा पहिल्या चित्रपटाच्या चाहत्यांचा असल्याने कोणत्याही प्रकारचं विषयातलं गांभीर्य सुरवातीपासून अधोरेखित होऊ नये असा संबंधितांचा प्रयत्न असावा. काही असो, ही स्ट्रॅटेजी योग्य असल्याचं सिद्ध झालेलं आहे.

मूळच्या मुन्नाभाईवर पॅच ऍडम्स चित्रपटाचा थोडा प्रभाव होता, तर या चित्रपटावर ब्युटीफूल माइंडची छाया आहे. मात्र, ही छाया अतिशय पुसट आहे आणि तिचं असणं हे शेवटाकडं येणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सच्या प्रसंगात निश्चित होतं. त्यापलीकडं चित्रपट हा स्वतंत्र तर आहेच. वर त्याची पटकथा खात्रीनं कौतुकास्पद आहे. मुळात गंभीर विचार आणि विनोदी सादरीकरण यांची सांगड घालणं हेच कठीण आहे. त्याशिवाय मुन्नाच्या भूमिकेला पटण्याजोगा आलेख उभा करणं वर्तमानातील कथेमध्ये प्रत्यक्ष गांधीजींना (कोणतेही वाद उपस्थित न करता) आणणं, त्यांच्या असण्याला योग्य तो स्पष्टीकरण देणं, प्रमुख पात्रांबरोबर अनेक पात्रांना थोडक्या प्रसंगात (हेमचंद्र अधिकारींसारख्यांना तर एका प्रसंगामध्येच) रेडिओ शोची गरज म्हणून उभं करणं, खलनायकाला माणसाळवणं आणि प्रेक्षकाला विचार करायला लावतोय असं न भासवता तो करायला भाग पाडणं या सर्वच गोष्टी आव्हानात्मक आहेत. ज्या इथं फार कौशल्यानं रचलेल्या आहेत. मध्यंतराआधीचा मुन्नाने सर्किटची माफी मागण्याचा प्रसंग आणि शेवटाकडचा लग्न एपिसोड हे विशेष जमलेलं.
या प्रकारचे वैचारिक खेळ असणारे चित्रपट दिग्दर्शकाच्या दृष्टीनंही कसरत असते आणि राजकुमार हिरानीनं आपल्या या दुसऱ्या चित्रपटात आपली ताकद उत्तम रीतीनं सिद्ध केली आहे. मूळ मुन्नाभाईतली अनेक पात्रं (उदा. विद्यार्थी, हॉस्पिटलमधला झाडूवाला, पेशंट् स, प्रोफेसर्स) इथे वेगळ्या छोट्या भूमिकांत चमकवणं हे गमतीदार आहे. बोमन इरानी आणि जिमी शेरगिललाही वेगळी पात्रं म्हणून आणणं स्वागतार्ह आहे. पण मग ग्रेसी सिंगनंच काय घोडं मारलं? हे मान्य, की इथे नायिका वेगळी असणं आवश्यक होतं, पण इतर पात्रं होतीच की. असो! लगान, मुन्नाभाई आणि गंगाजल या तीनही यशस्वी चित्रपटांत काम करूनही दुर्लक्षित असणाऱ्या ग्रेसीच्या अदृश्य असण्यामागं काहीतरी उघड न कळणारं कारण जरूर असावं.
मुन्नाभाईच्या दोन्ही चित्रपटांच्या आकारात एक लक्षात येईलसं साम्यस्थळ आहे. दोन्ही चित्रपटांत तो त्याला मनापासून पटणाऱ्या एका विचाराचा पाठपुरावा करतो. एका क्षणी त्याच्या लक्षात येतं. की आजचं जग त्याच्या कल्पनेपलीकडं निष्ठुर आहे आणि ते या विचाराला तग देणार नाही, या निराशेनं तो या विचाराचा नाद सोडणार एवढ्यात काही तरी घडतं आणि त्यानं निवडलेला मार्गच योग्य अल्याचं सिद्ध होतं. पहिल्या भागात त्याला पटणारा विचार होता तो वैद्यकशास्त्राला अधिक मानवतावादी करण्याचा, तर इथं आहे गांधीवाद. हे उघड आहे, की दुसऱ्या चित्रपटातला विषय अधिक महत्त्वाकांक्षी आणि आपल्या समाजाशी खास जवळीक असणारा आहे. त्यामुळेच हा चित्रपटही अधिक मोठा आहे. आपल्याला मनापासून पटणारा आहे.
अर्थात मुन्नाभाईतल्या चित्रणाहून खरा समाज हा अधिक बेपर्वा आहे आणि गांधीवादाला फारच आयडियलिस्टिक समजून त्याला तो विसरूनही गेला आहे. आज केलेले सत्याचे प्रयोग हे आपल्याला मुन्नाइतकं यश मिळवून देतीलसं नाही. पण तरीही हे विचार ज्या मूलभूत पातळीवर आपल्याला पटतात, ती पातळी महत्त्वाची आहे. आपला वारसा आणि आपल्या माणूसपणाची आठवण करून देणारा आहे. न जाणो ही आठवणही कदाचित आपल्याला अधिक सकारात्मक बनवायला पुरेशी ठरेल.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP