नवी "पहेली'
>> Wednesday, January 7, 2009
यशराज बॅनर, आदित्य चोप्राचं दिग्दर्शन, शाहरुख खानची प्रमुख भूमिका आणि प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या जाहिराती यामुळे "रब ने बना दी जोडी' हमखास यशस्वी शेवटाकडे जातो, यात कसलंच आश्चर्य नाही. पण दुर्दैवाने चित्रपटातल्या अनेक शक्यता दुर्लक्षित राहतात. त्यामुळे हॅपी एंडिंगच्या मोहात अर्थपूर्ण ठरू पाहणारा चित्रपट ओळखीच्या रस्त्यावर येतो.
सुखांतिकेचा मोह फार वाईट! बहुतेकदा अर्थपूर्ण होऊ शकणाऱ्या चित्रपटांनाही तो ओळखीच्या रस्त्यावर आणून सोडतो आणि नेहमीच्याच यशस्वी फॉर्म्युलाची एक सुरक्षित, परिचित मेजवानी प्रेक्षकांसमोर मांडतो. निर्मात्यांच्या दृष्टीने पाहायचं तर हा सौदा फायद्याचा आहे. प्रेक्षक हा निर्मितिसंस्था/ दिग्दर्शक/ कलाकार आणि जाहिरातींच्या स्वरूपाकडे पाहून ज्या अपेक्षा ठेवतो त्या पुऱ्या करण्यामध्ये त्याला हातखंडा नफा मिळेल, यात शंका नाही. याउलट प्रामाणिकपणे केवळ मनाला पटेलसा निर्णय घेण्यात धोका अधिक (आठवा - करण जोहर आणि "कभी अलविदा ना कहना'ला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद). त्यामुळे यशराज बॅनर, आदित्य चोप्राचं दिग्दर्शन, शाहरुख खानची प्रमुख भूमिका आणि प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या जाहिराती पाहता "रब ने बना दी जोडी' हमखास यशस्वी शेवटाकडे जाऊ पाहतो, यात कसलंच आश्चर्य नाही. मात्र वाईट याचं वाटतं, की चित्रपटात शक्यता होत्या. दिग्दर्शक/ नटात त्या पडताळून पाहण्याची कुवतदेखील होती. तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आणि प्रेक्षक विचार करायला न लागल्याच्या आनंदात चित्रपटगृहाबाहेर पडला.
एक नायक, एक नायिका; दोन व्यक्तिमत्त्वं. एक गंभीर, तर दुसरं उडाणटप्पू. एक मिशीधारी तर दुसरं विरहित. पेचप्रसंग, विनोद इत्यादी इत्यादी. हे वर्णन ऐकताच "गोलमाल' हा आजही ताजा वाटणारा अभिजात विनोदपट आठवला तर नवल नाही. त्यातली पालेकरांची भूमिका मला वाटतं हिंदी चित्रपटांत आढळणाऱ्या मोजक्या संस्मरणीय भूमिकांत गणली जावी. "रब ने बना दी जोडी'मध्ये हा ओळखीचा मसाला गोलमालची आठवण करून देणारा असला, तरी त्याची वृत्ती ही गोलमालच्या प्रकारची नाही. गोलमाल हा फार्स होता. त्या दृष्टीने त्याची रचना केलेली होती. वाढत जाणारे गोंधळ, टिपेला जाणारे पेच, खो खो हसायला लावणारे विनोद यासाठी गोलमालचं नाव घेता येतं. त्यातलं इथे काही नाही (नाही म्हणायला विनय पाठकची देवेन वर्मासदृश भूमिका जरूर आहे). याउलट अमोल पालेकरांच्याच दुसऱ्या एका चित्रपटाशी "रब ने...'चं खूप साम्य आहे, त्यांनी अभिनय केलेला नाही, तर दिग्दर्शित केलेला. तो चित्रपट म्हणजे मणी कौलच्या "दुविधा'चा रिमेक. "पहेली'- ज्यात दुहेरी प्रमुख भूमिकेतही शाहरुख खानच होता. फरक इतकाच, की पहेलीमधला पेच हा स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून होता. इथला पेच हा बॉलिवूडच्या मेल शॉविनीस्टीक परंपरेला साजणारा, पुरुषाला महत्त्व देणारा आहे.
रब ने बना दी जोडीचा नायक आहे सुरिंदर अर्थात सुरी (शाहरुख खान). अमृतसरमध्ये राहणारा, पंजाब पावरमध्ये काम करणारा. सरळमार्गी, सभ्य, सज्जन. या सुरीचं लग्न (एका अतिशय पराकोटीच्या म्हणजे राजश्री प्रॉडक्शन्सच्या चित्रपटात चालण्याइतपत योगायोगाने) अचानक होतं ते तानी (अनुष्का शर्मा) या त्याच्याहून वयाने थोड्या लहान, स्पिरिटेड मुलीशी. सध्या मात्र ती फारशी स्पिरिटेड उरलेली नाही. कारण लग्न थोडं नाइलाजाने झालेलं. तिची यःकश्चित सुरी सोडा, पण कोणावरच प्रेम करण्याची तयारी नाही. या परिस्थितीतही ती टेक्स्टबुक वाइफ बनण्याचा प्रयत्न करते. (मात्र हिंदी चित्रपटांमधल्या समस्त अंधश्रद्धांना स्मरून शरीरसंबंध मात्र ठेवत नाही.) सुरी आपल्या परीने चांगलं वागत राहतो आणि तिचं मन राखण्यासाठी एका तथाकथित डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठीही परवानगी देतो. पुन्हा काही योगायोगानंतर (हे मात्र राजश्रीएवढे टोकाचे नाहीत, यशराजमध्ये चालतीलसे) तो स्वतःच तिचा डान्स पार्टनर बनतो. या वेळी नव्या रूपात. मिशीविरहित, टाइट फिटिंग, ट्रेंडी पेहराव करणारा राज म्हणून. बॉलिवूडच्या नियमांचं यथायोग्य पालन करणारी तानी आपल्या नवऱ्याला ओळखत नाही आणि सुरी, तानी आणि राज हा प्रेमाचा खोटा खोटा त्रिकोण सुरू होतो.
या त्रिकोणामागच्या तर्कशास्त्रात गोंधळ आहे, आणि तो आहे हे चित्रकर्त्यांना निश्चित माहीत आहे. कारण ते अधेमधे तसं सुचवून संघर्ष गहिरा करू पाहतात. मात्र तो असण्याला काही निश्चित कारण देणं टाळतात. कोणताही नवरा, मग सुरीसारखा सांकेतिक नवरा तर सोडाच, आपल्या पत्नीसमोर तिला आकर्षक वाटेलसा परपुरुष (मग तो स्वतःच का असेना) का उभा करेल आणि केलाच तर तिने त्याच्याकडे आकर्षित न होता साध्वी बनून राहण्याची अपेक्षा कशी ठेवेल? असं करताना तो स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारत नाही का? त्यातून या परिस्थितीत जर परपुरुष हा उघडच अधिक आकर्षक असेल आणि तानी जर त्याच्या प्रेमात पडली तर हा सगळा दोष तिचाच कसा होऊ शकतो?
या कथानकाची रूपरेषा पाहता व्यक्तिरेखा दोन प्रकारे इंटरप्रिट करणं शक्य आहे. पहिली म्हणजे सुरीची भूमिका ही नकारात्मक आहे. आपल्या पत्नीला नादी लावणे आणि ती नादी लागल्यावर ती अपराधी असल्याच्या भावेनेने पाहणे, हे डोक्यात बिघाड असल्याचं लक्षण आहे. हा बिघाड नकारात्मक छटांमधून दिसायला हवा. काही प्रसंगांत (उदाहरणार्थ- सुरी राजची चौकशी करताना) तो हलकेच सुचवला जातो; पण मग ताबडतोब सुरीच्या व्यक्तिरेखेला रंगसफेती केली जाते. (अखेर तो चित्रपटाचा नायक आहे!) आणि हे इंटरप्रिटेशन अर्धवट राहतं. जर भूमिकेची ही उकल ग्राह्य मानायची तर ज्या क्षणी नायिका प्रियकरासाठी पतीला सोडण्याची इच्छा प्रदर्शित करते तिथे चित्रपट संपतो. (मला वैयक्तिकपणे हाच शेवट पटला.) मात्र हॅपी एंडिंगचा सोस असल्याने चित्रपट काही खरोखरच इथे संपत नाही; तो बापडा सुरूच राहतो.
दुसरं इंटरप्रिटेशन अधिक प्रतीकात्मक आहे. ते म्हणजे नायक अबोल आहे आणि स्वतःला व्यक्त करू शकत नाही. राजचा मुखवटा हा त्याचा व्यक्त होण्याचा मार्ग आहे- चित्रपटाने दृश्यरूप दिलेला. ही उकल शेवटाकडे पाहता अधिक पटण्यासारखी आहे. (पहेली चित्रपटातल्या दुहेरी नायकांनाही ही उकल लागू शकते.) मात्र, हे स्पष्टीकरण सर्व टप्प्यांवर लागू शकत नाही. कधी ते योग्य वाटतं, तर कधी नाही. तपशिलात गेल्यावर तर ते अगदीच थातूरमातूर वाटतं.
रब ने बना दी जोडीचा सर्वांत खटकणारा भाग हा, की व्यक्तिरेखांना कोणतंही स्पष्टीकरण लावूनही तो नायिकेला बाजूला करून नायकापुढच्या दुविधेला अधिक महत्त्व देतो. तानी असं विचारत नाही, की मला अशा प्रकारे फसवण्याचा अन् अप्रत्यक्षपणे माझ्या चारित्र्याची परीक्षा घेण्याचा हक्क सुरीला कोणी दिला? कोणतीही स्वाभिमानी मुलगी स्वतःला अशा अडचणीत आणणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणार नाही का? या प्रकारे तानीचा झालेला भ्रमनिरास तिला सुरीपासूनही तोडणार नाही का? मात्र ती हे विचारत नाही. बहुधा युद्ध आणि प्रेमाप्रमाणेच हिंदी चित्रपटातही सारं काही चालत असल्याचं तिला माहीत असावं.
"पहेली'शी मघाशी केलेली तुलना अनाठायी नाही. ज्यांना तो चित्रपट आठवत असेल त्यांच्या हे जरूर लक्षात येईल. नुकताच विवाह झाल्यावर वरवर अन्रोमॅंटिक, व्यवहारी वाटणाऱ्या नवऱ्याला दूरदेशी जावं लागणं अन् त्याजागी त्याच्याच सारखं दिसणारं, मात्र पत्नीवर झोकून देऊन प्रेम करणारं भूत येणं, हा तिथला संघर्ष होता. इथे नवरा कायम दूरदेशी न जाता रोजच्या रोज नोकरीनिमित्त बाहेर असतो इतकंच. शिवाय इथे प्रत्यक्ष दोन व्यक्तिरेखा नसल्या तरी पत्नीने कोणाची निवड करावी, हा मूलभूत प्रश्न इथेही आहेच. माझ्या कल्पनेप्रमाणे "रब ने बना दी जोडी' हे अधिक स्वैर असणारं अन् दृष्टिकोन बदलणारं दुविधाचंच रिवर्किंग आहे. त्यातली प्रेमाची रूपं, चारित्र्याचा प्रश्न, व्यक्तिरेखांचे आलेख हेच सांगतात. मात्र, दुविधा किंवा पहेलीचा फॉर्म हा लोककथेचा असल्याने त्यात प्रश्नाकडे ज्या मोकळेपणाने पाहणं शक्य होतं, तितकं रब दे... मध्ये शक्य झालेलं नाही. शिवाय लोककथेतल्या गोष्टींचे शेवट व्यवहारात चालू शकत नाहीत. मग त्यावर तोडगा काय?
चोप्रांचा तोडगा फारच सोपा आहे. सर्वांना हॅपीली एव्हर आफ्टर ठेवणारा, न पटणारा, पण सोपा, ओळखीचा. प्रेक्षकांना आनंदी करणारा, विचार करायला न लावणारा. अर्थपूर्ण होऊ शकणाऱ्या चित्रपटाला ओळखीच्या रस्त्यावर आणणारा. मी सुरवातीलाच म्हणालो ना, हॅपी एंडिंगचा मोह फार वाईट!
-गणेश मतकरी
3 comments:
लयच बेक्कार पिक्चर आहे राव, शेवट तानीला राग यायला पाहिजे होता, तिच्या भावनांशी असे खेळला म्हणून [बहुतेक अपराधीपणा एवढा असावा की राग आला नाही]
तात्पर्य हे काढले की, आठवड्यातून एकदा बायकोला देवळात न्यावे, संसार सुखाचा होईल :)
thats a good one.chopra johar films seem to be a genre in itself where the real world rules dont apply.even when they entertain, they sort of remain in a fantastic parallel universe.
Tumhi parikshan ekdam chan lihita..
te vachun picture baghayachi sudhha garaj vatat nahi itaka dolyasamor ubha rahato...
pan ekach vinanti ahe. tumhi please tumachya profile ch layout badalu shakal ka? (Black screen and white letters) vachatana dolyala khup tras hoto.
Tyamule jar shakya asel tar krupaya yachi nond ghyavi
Post a Comment