चित्रपट न आवडणा-यांसाठी भाग -२
>> Sunday, January 25, 2009
नवे विषय, नवे चेहरे, अर्थकारण बदलणारं बॉलिवूड
बॉलिवूड आज आपल्या स्वतःच्या ठराविक साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कथा, व्यक्तिरेखा, चित्रपटातील तंत्रज्ञान यांच्या जोडीला एकूणच निर्मितीप्रक्रिया, बॉलिवूडचे अर्थकारण बदलत आहे. मल्टिप्लेक्स आणि कॉर्पोरेट संस्कृतीने तर चित्रपट निर्मितीमागच्या उद्दिष्टांपासून प्रेक्षकांच्या अपेक्षांपर्यंत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. या नव्या बदलाचे चांगले व वाईट दोन्ही परिणाम बॉलिवूडवर झालेले दिसतात. चित्रपटाच्या दर्जापेक्षा नफ्याशी संबंधित संख्याशास्त्रावर बॉलिवूडमध्ये आता अधिक भर दिसतो. त्याच वेळी साचेबद्ध फॉर्म्युलातून बाहेर पडून निश्चित आशयाला वाहिलेले, विशिष्ट प्रेक्षक वर्गासाठी तयार केलेले चित्रपटही बनताना दिसतात. अशा काही प्रयत्नांतून बॉलिवूड अधिक तरुण होतंय. काही चांगलं, काही वाईट पण बॉलिवूड बदलतंय हे मात्र नक्की !
डग्लस ऍडम्सच्या "ट्रायलॉजी इन फाइव्ह पार्टस' या चमत्कारिक वर्णनाला जगणाऱ्या "हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी' या अद्भुत आणि भयंकर विनोदी सायन्स फिक्शन कादंबरी मालिकेच्या चाहत्यांना "टोटल परस्पेक्टिव्ह व्होर्टेक्स' म्हणजे काय हे वेगळं सांगायला नको. हिचहायकर्समधलं विज्ञान हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण सध्या इतकंच सांगतो, की त्याला स्वतःचं असं एक विक्षिप्त तर्कशास्त्र आहे. त्यातल्या कल्पना विनोदी जरूर आहेत, पण त्यांना एक कॉमन सेन्सचा पाया आहे.
"टोटल परफेक्टीव व्होर्टेक्स' हे माणसांना टॉर्चर करण्याचं यंत्र आहे. अभिमानी व्यक्तीला बुद्धी भ्रष्ट करण्याची ताकद या यंत्रात आहे. या यंत्रात पाय ठेवलेल्या माणसाचं डोकं जागेवर राहण्याची शक्यताच नाही. आता या यंत्रामागची संकल्पना पाहा. अगदी सोपी आहे. यंत्रात पाय ठेवलेल्या व्यक्तीला दाखवली जाते ती चराचर व्यापून राहिलेल्या महाकाय विश्वाची झलक, आणि नंतर तुलनेने त्याची स्वतःची जागा एका "यू आर हिअर' अशी खूण केलेल्या छोट्याशा ठिपक्याने दाखवून दिली जाते. स्वतःला कोणी खास समजणाऱ्या माणसाला आपलं विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यातलं कस्पटासमान स्थान दिसणं, हेच त्याचं डोकं फिरवायला पुरे असतं.
मी जेव्हापासून फिल्म फेस्टिव्हल्सना जायला लागलो, तेव्हापासून मला नेहमी वाटत आलंय, की ही फेस्टिव्हल्स म्हणजे एक प्रकारची टोटल परस्पेक्टिव्ह व्होर्टेक्सेस आहेत चित्रसृष्टीसंबंधातली. म्हणजे पाहा, आपण नेहमी आपल्या चित्रपटांबद्दल एक प्रकारचा अभिमान बाळगतो, त्यांची प्रचंड संख्या, त्यातले सुपरस्टार्स, त्यांची फुगणारी बजेट्स, सेट्स, ऍक्शन याबद्दल एक कौतुक मनात ठेवतो. मात्र फेस्टिवलमध्ये जाताक्षणी जगभरचा अवाढव्य चित्रखजिना आपल्यापुढे खुला होतो. चित्रपटात येणारे वेगवेगळे विषय / प्रयोग ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. छोट्या-छोट्या देशांनी गंभीरपणे पेललेली नवी आव्हान, अभिजात, चित्रपटांचे सेक्शन्स, आणि आशयाच्या दर्जाबाबत शंकाही राहू नये अशी नवनिर्मिती, यांनी आपण इतके थक्क होतो, की आपण नक्की कोणत्या छोट्याशा पायरीवर आहोत, प्रेक्षकशरण या एकाच शब्दात वर्णन होणारा आपला चित्रपट किती फिका आहे, याचं ज्ञान आपल्याला लगेचच होतं. आपल्या अभिमानाच्या ठिकऱ्या उडतात. कल्पना करा, केवळ माझ्यासारख्या रसिकाची जर ही अवस्था असेल, तर प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांचं, त्यांच्या निर्मात्या दिग्दर्शकांचं काय होत असेल? चित्रपट महोत्सवात उद्घाटन प्रसंगी (आणि समारोपला) मिरवण्याखेरीज ही मंडळी दिसत नाहीत, यात कसलंच आश्चर्य नाही. हे अगदी स्वाभाविक आहे.
केबलक्रांतीने बदलली सुरवात
अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती थोडीफार बदलली असं म्हणायला जागा आहे. निदान उघड तुलना हेच दाखवून देते. भारताचा लोकप्रिय सिनेमा, किंवा तथाकथित बॉलिवूड आज आपल्या स्वतःच्या साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांच्या बदलाचा वेग हा एक्पोनोन्शिअल आहे. काळाच्या प्रमाणात न राहता, कितीतरी अधिक प्रमाणात होणारा, मात्र जोपर्यंत त्याची कारणं किंवा त्यामागच्या प्रेरणा स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत त्याची दिशादेखील स्पष्ट होणार नाही.
वरवरचे बदल स्पष्ट आहेत. म्हणजे एके काळी नाचगाणी, मसाला आणि एक प्रकारचं उत्सवी वातावरण या तीन घटकांनी बॉलिवूड चित्रपट ओळखता येत असत. नायक / खलनायक यांच्या पुस्तकी व्याख्या असत. आणि सर्व कारभार हा काळ्या पांढऱ्या छटांचा असे. वेळोवेळी हा आकार तोडण्याचे प्रयत्न झाले. हृषीकेश मुखर्जीसारख्या दिग्दर्शकाने व्यवसाय आणि कला यांच्या सीमेवरचे चित्रपट करून पाहिले. कलात्मक सिनेमाच्या नावाखाली बेनेगल, निहलानीसारख्या दिग्दर्शकांनी कंबर कसली, आणि पुढे तद्दन व्यावसायिकतेच्या आवरणातही महेश भट्टने काही रिऍलिटी चेक देऊन पाहिले. मात्र हे प्रयत्न मर्यादित व्यक्तींनी, मर्यादित प्रमाणात केले आणि त्यांना मिळालेलं यशही एका मर्यादेत होतं. मोठ्या प्रमाणात पाहिलं, तर बॉलिवूड अनेक वर्ष स्वतःच्या धुंदीत, फॉर्म्युला चित्रपटांच्या निर्मितीत आनंद मानत राहिलं. त्यांना मोठा प्रेक्षक असल्याने अन् आर्थिक सुस्थिती असल्याने जागतिक चित्रपट कुठे चालला आहे हे पाहण्याची त्यांना ना गरज वाटली, ना इच्छा. याला पहिला मोठा धक्का मिळाला तो केबल टीहीनं घडवून आणलेल्या क्रांतीमुळे. अन् मग सावकाश बदलाची चक्रं फिरायला लागली.
आपल्याकडे चित्रपट बदलत नव्हता याचं एक प्रमुख कारण म्हणजे, प्रेक्षक बदलत नव्हता अन् प्रेक्षक बदलावा म्हणून काही सकारात्मक प्रयत्न करण्यापेक्षा जे चाललंय ते चालू द्यावं, हे बॉलिवूडचं सोपं गणित होतं. प्रेक्षकांची आवड बदलण्याचं महत्त्वाचं काम केबल क्रांतीनं सुरू केलं. त्याआधी व्हिडिओ लायब्रऱ्या होत्या, मात्र चित्रपटांची उपलब्धता आणि प्रेक्षकांची निवडक्षमता याला मर्यादा होत्या. केबलनं चित्रपट घरातच आणल्यावर ते आपोआप अधिक प्रमाणात पाहिले जायला लागले.
केबलचा प्रवेश हा समांतर ठरला. तो चित्रपटांमध्ये येणाऱ्या नव्या पिढीच्या आगमनाबरोबर रामगोपाल वर्माचं नव्यानं बसणारं बस्तान, बडजात्या, चोप्रा, जोहर (करन जोहरचा प्रवेश आदित्य चोप्राचा सहायक दिग्दर्शक म्हणून "दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'च्या वेळीच झाला, जरी त्याचा कुछ कुछ होता है, नंतर पडद्यावर आला) यांच्या मुलांनी आपली नवी खेळी सुरू केली. खान मंडळी आणि त्यांच्यापुढे टिकून राहिलेल्या काजोल, राणी मुखर्जीसारख्या नायिका आल्या आणि एक माफक उत्साहाचं वातावरण पसरलं. एक लक्षात घेतलं पाहिजे, की चित्रपटात ताजेपणा येऊनही या टप्प्यावर स्वरूपात काही निश्चित बदल झाले नव्हते. दृश्य भाग मात्र अधिक सुधारायला लागला होता.
मल्टिप्लेक्सचं आगमन
स्वरूपाला दुसरा मोठा धक्का बसण्याचं खरं कारण हे दुहेरी होतं. प्रेक्षकांच्या नजरेतला बदल आणि मल्टिप्लेक्सचं आगमन यांनी तो घडवून आणला.
सुरवातीला हे लक्षात आलं नाही तरी आता मागं पाहिल्यावर दिसून येतं, की चित्रपट निर्मितीमागल्या उद्दिष्टांपासून ते प्रेक्षकांनी त्यापासून ठेवलेल्या अपेक्षापर्यंत अनेक बाबतींत मल्टिप्लेक्सनी आमूलाग्र बदल घडवून आणला, अन् त्याचा दूरगामी परिणाम हा चित्रपटाच्या अर्थकारणावरदेखील झाला. पूर्वी येणारे चित्रपट हे जरी फॉर्म्युला फिल्म्स म्हणण्याजोगे असले, तरी चित्रकर्त्यांनी आपल्या परीने पूर्ण जोर लावल्याचं त्यात स्पष्टपणे दिसून येई. निर्मिती खर्च भरपूर असे. आणि पैसे वसूल होण्यासाठी जितक्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करता येईल, तितक्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न असे. चित्रपटगृह मोजकी असत आणि खेळांची संख्या प्रत्येकी तीन किंवा फार तर चारच्या पलीकडे जात नसे. प्रेक्षक हा जाहिरातींमधून आपण कोणता चित्रपट पाहावा हे नीट ठरवून जात असल्याने चित्रपटांमध्येच ही आकर्षित करण्याची ताकद असावी लागे. विषयापासून प्रत्येक गोष्ट ही या प्रेक्षकाला खूष करण्यासाठी केली जाई. हे सगळं चित्रं कशा प्रकारे बदललं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. या बदलाचे तोटे झाले तसेच फायदे.
पहिली गोष्ट झाली, ती चित्रपटगृहांमध्ये अमुक चित्रपट पाहायला जाणं या संकल्पनेलाच तडा गेला. पूर्वी जाहिराती पाहून, मित्रांशी बोलून, गाणी ऐकून आणि परीक्षणं वाचून चित्रपटाला जाणारा प्रेक्षक आज अमुक चित्रपटाला नव्हे, तर मल्टिप्लेक्सला जायचं ठरवून बाहेर पडायला लागला. मल्टिप्लेक्स ही तिथल्या वातावरणामुळे आणि बहुतेक वेळा त्यांच्या मॉल्सशी जोडलेलं असल्याने कुटुंबासहित वेळ घालवण्याच्या जागा ठरल्या आणि चित्रपट हे अनेक आकर्षणांमधलं एक बनलं. त्याचबरोबर पूर्वी एका चित्रपटगृहात चार खेळ लागण्याऐवजी एका मल्टिप्लेक्समध्ये तीसच्या वर खेळ लागायला लागले, तेही चार-पाच वेगवेगळ्या चित्रपटांचे. त्यामुळे प्रेक्षकांची मानसिकता, ही विशिष्ट चित्रपट पाहण्याऐवजी "हा नाही तर तो पाहू' या प्रकारची बनायला लागली. साहजिकच ज्या चित्रपटाचे अधिक खेळ, तो चालण्याची अधिक शक्यता, असं गणित तयार होऊ लागलं, ज्याचा चित्रपटाच्या दर्जापेक्षा अधिक संबंध हा संख्याशास्त्राशी होता.
दुसरी उघड गोष्ट म्हणजे, पूर्वी जिथे एका वेळी चार चांगले चित्रपट धंदा चालण्यासाठी पुरे असत, तिथे आज भराभर चित्रपटांची गरज भासायला लागली- जे मल्टिप्लेक्स रिकामी राहू देणार नाहीत आणि प्रेक्षकाला निवडीचं स्वातंत्र्य किंवा किमान ते असल्याचा आभास निर्माण करतील.
प्रेक्षकांच्या आग्रहीपणात झालेली घट आणि चित्रपटांची अधिक प्रमाणात गरज याचा उघड साईडइफेक्ट होता तो. चित्रपटांना एखाद्या उत्पादनाचा आणि व्यवसायाच्या फॅक्टरीचं स्वरूप येण्याचा. मागणी तसा पुरवठा मग मागणी असेल तर पुरवठा करायलाच हवा. शिवाय दर्जाबद्दल आग्रह नसेल तर आनंदच आहे, असा एक मतप्रवाह चित्रकर्त्यांमध्ये दिसायला लागला.
आता प्रत्येक सर्जनशील कलावंत हा दर्जा राखून किती चित्रपट बनवू शकेल याला मर्यादा आहेत. मग त्याच्याकडून कितीतरी अधिक प्रमाणात चित्रपटांची अपेक्षा केली तर तो ती पुरी करू शकणार नाही. हे सांगायला कोणी तज्ज्ञ हवा अशातला भाग नाही. चित्रपटांची मागणी वाढली तसं निर्मात्यांनी मिळतील त्या दिग्दर्शकांना आणि दिग्दर्शकांनी आपल्या सहायकांना हाताशी धरायला सुरुवा केली. आणि फॅक्टरी सुरू झाली. (राम गोपाल वर्माने केवळ विनोदाने आपल्या कंपनीचं नाव फॅक्टरी दिलं तरी त्याचाही सिनेमा या प्रवाहाचा बळी ठरला हे आपण जाणतोच.) ज्याने त्याने नव्या लोकांना ब्रेक द्यायला सुरुवात केली, आपापली प्रॉडक्शन हाऊसेस काढली आणि उत्पादनात वाढ कशी करता येईल याचा सगळेच विचार करायला लागले. हा विचार आणि मध्यंतरीच्या काळात प्रेक्षकांच्या नजरेत होणारा बदल यांनी एक नवा चित्रपट आकाराला येण्याची शक्यता तयार झाली. मल्टिप्लेक्स संस्कृती आपल्याकडे रुढ व्हायला लागल्यावर चित्रपटातले बरे वाईट प्रवाह दिसायला लागले. आता येणारा चित्रट हा दोन प्रमुख प्रकारातला होता. पहिला बिग किंवा बिगर बजेट, ज्याला आजवर आशा होती, की पूर्वीप्रमाणेच प्रॉडक्शन बॅनर किंवा स्टार पॉवर प्रेक्षकाला खेचू शकेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक हे जुने आणि जाणते (?) होते. मात्र त्यांनी फॉर्म्यूलात मूळापासून बदल करणं नाकारलं. केवळ चित्रपटात अधिक भव्यता आणून, मसाल्याचा जरा अधिक वापर करून स्टार्सना अधिक पैसे देऊन आपले चित्रपट चालतील या भ्रमात ते राहिले. यश चोप्रा कॅम्पसारख्यांनी तर नव्या दिग्दर्शकांचे चित्रपटही काढले. पण त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून चालणारे. एखादा चक दे इंडिया सोडला तर गेल्या दोनेक वर्षात त्यांच्या एकाही चित्रपटाने चांगला धंदा केला नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
या बिग बजेट चित्रपटांनी आपली चुकार कामगिरी सावरण्याचा प्रयत्न केला तोही दर्जा सुधारून किंवा वेगळे प्रयोग करून नव्हे, तर असलेल्या आर्थिक पाठबळाचा उपयोग स्टॅटिस्टिक्सचे नियम वाकवण्यासाठी करून. २००५मध्ये आमिर खान अन् एके काळी चांगला दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा केतन मेहता या दोन हुशार कलावंतांनी एकत्र येऊन मंगल पांडे द रायझिंग हा सुमार चित्रपट केला. ज्याच्या वितरणाच्यावेळी हे गणित स्पष्ट झालं. मंगल पांडे चालला नाही. यात आश्चर्य नाही. त्यामुळे चित्रकर्त्यांनाही तो माहिती असल्यास नवल नाही. मग निर्मात्यांनी उपाय काढला तो अधिकाधिक प्रिंट काढून अधिकाधिक ठिकाणी त्या प्रदर्शित करण्याचा. कल्पना अशी होती की समीक्षण अन् माऊथ पब्लीसिटीवरून लोकांना चित्रपटाचा दर्जा कळायच्या आतच चित्रपट इतक्या लोकांकडून पाहिला जावा, की पैसे वसूल होऊन नफा व्हावा. प्रत्यक्ष हा नफा झाला की नाही ते माहिती नाही, पण गणितानुसार चार दिवस थिएटर्स पूर्ण भरणं, हे तो चालण्यासाठी आवश्यक होतं.
मंगल पांडेनंतर हा जणू पायंडाच पडला. आताही नवा बिग बजेट चित्रपट प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये दिवसागणिक बारा, पंधरा खेळ सहज करतो आणि त्यात कोणाला आश्चर्य वाटत नाही. ते सगळे भरतात अशातला भाग नाही, तशी अपेक्षाही नाही. अपेक्षा आहे ती पहिल्या काही दिवसांत होईल तितका नफा मिळविण्याची. उद्याचं कोणी सांगितलंय ?
मल्टिप्लेक्स संस्कृतीने पुढे आणलेल्या दुस-या प्रकारचा चित्रपट होता, तरुण रक्ताचा आणि लो बजेट. याच्या निर्मितीची प्रमुख गरज ही स्वस्त उत्पादनखर्च आणि पुरवठ्याला त्यातून होणारी मदत हीच आहे. पण आशेला खरी जागा, खरा सकारात्मक बदल इथेच दिसून येतो.
चित्रपट जेव्हा मोठ्या बजेटचे असतात, तेव्हा तो सर्व खर्च भरून येण्याकरीता गरज तयार होते, ती तो अधिकाधिक लोकांनी पाहण्याची. आता लोक पाहणार कधी, तर जेव्हा त्यांना आपल्या आवडीचं काही त्यात पाहायला मिळेल. आता सर्व थरातल्या, म्हणजे अक्षरशः बुद्धिमत्तेपासून ते जातीधर्मापर्यंत अन् व्यवसायापासून ते ग्रामीण/शहरी पार्श्वभूमीपर्यंत सर्व प्रकारात येणा-या प्रेक्षकांची आवड ही एकच कशी असणार ? मग सर्वांच्या आवडीचा ल.सा.वि काढून केलेला चित्रपट परिणामात पसरट होतो, त्यात नवल ते काय ? चित्रपटाचं बजेट जेव्हा कमी होतं तेव्हा मिळणारा प्रतिसाद तुलनेने कमी असला तरी चालतो, त्यामुळे वेगवेगळ्या वर्गातला प्रेक्षकवर्ग टारगेट करण्याची शक्यता तयार होते. सबब फॉर्म्यूलांमधून बाहेर पडून स्पेशलाईज्ड वर्गासाठी चित्रपट होण्याची शक्यता तयार होते. सबब प्रेमकथा किंवा सूडकथा अशी ढोबळ वर्गवारी सोडून काही निश्चित आशयाला वाहिलेले चित्रपट बनू शकतात. हा गेल्या काही वर्षातला सर्वात महत्त्वाचा नसेल कदाचित, पण सर्वात समाधानकारक बदल.
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा हॉलीवूडमधली स्टुडियो सिस्टिम मोडकळीला यायला लागली होती, तेव्हा त्यांच्याकडे बजेट सांभाळण्याची गरज निर्माण झाली होती.
त्यावर त्यांचा एक तोडगा होता तो संकलकांना दिग्दर्शन करू देण्याचा. कल्पना अशी, की संकलनाच्या सवयीने दिग्दर्शक जरूर तितकंच चित्रण करील अन् छायाचित्रणाला लगेचच्या दिवसांपासून ते फिल्म स्टॉकपर्यंत सर्व बाबतीत बचत होईल. या कल्पनेने अनेक नव्या मंडळींना संधी मिळाली अन् डॉन सिगेलसारखे दिग्दर्शक पुढे आले.
आज चित्रपटाचा अचूक अंदाज यायला तुम्ही संकलक असण्याची गरज नाही. (खरं तर तेव्हाही नव्हती. चांगले दिग्दर्शक हे अनेकदा संकलनाची बाजू डोक्यात ठेवूनच विचार करत.) आज माध्यम खूपच परिचयाचं झालं आहे. मात्र नव्या दिग्दर्शकांना संधी देणं आणि त्यांची पुरेशी पूर्वतयारी करून घेऊन त्यांचा खर्च आटोक्यात राहील असं पाहाणं हा एक नेहमीचा तोडगा बनला आहे. या वाटेने येणारे दिग्दर्शक तरुण आहेत, नव्या कल्पना घेऊन येणारे आहेत, यातल्या अनेकांचा जगभरच्या चित्रपटांचा, त्यात वापरण्यात आलेल्या नव्या संकल्पनांचा अभ्यास आहे. आणि त्या वापरून पाहण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना संधी देणं, हे चित्रपटाला अधिक तरुण करणारं आहे, जुनं पाहून विटलेल्यांना नव्याने या माध्यमाकडे वळवणारं.
गेल्या दोन तीन वर्षात आपल्याकडे लक्षवेधी ठरलेले चित्रपट अशा अनेक नव्या शिलेदारांकडून आले आहेत. दिवाकर बॅनर्जीने २००६मध्ये खोसला का घोसला केला आणि यंदा ओय लक्की, लक्की ओय केला. हे दोन्ही चित्रपट स्टार पॉवर्ड नव्हते. लांडी-लबाडी हाच जरी दोन्ही चित्रपटांचा विषय असला तरी कोणत्याही सिद्ध हिंदी फॉर्म्यूलांचा त्यांना आधार नव्हता. खोसलाला निदान एक बंदिस्त कथानक होतं. लक्की तर चोरीच्या घटनांची एक मालिका होती, बरीचशी वास्तववादी पद्धतीने सांगितलेली, आपल्या नायकाला (अभय देओल) कोणत्याही प्रकारे ग्लॅमराईज करणं टाळून.
२००७ चे एक चालीस की लास्ट लोकल (दिग्दर्शक संजय खांदूरी) आणि जॉनी गद्दार (दिग्दर्शक श्रीराम राघवन) हे फिल्म न्वार पद्धतीच्या गुन्हेगारपटाशी नातं सांगणारे चित्रपट किंवा त्याच वर्षीचे अनुराग बसू आणि कश्यप .यांचे लाईफ इन मेट्रो आणि नो स्मोकिंग (हा लक्षवेधी जरूर होता, बरा मात्र फारसा नव्हता.) देखील याच प्रकारच्या वेगळ्या प्रयत्नांची उदाहरणं म्हणावी लागतील.
उत्पादन आलं की उत्पादक हे आलेच, आणि व्यवसाय जितका मोठा, नफ्याची शक्यता जितकी अधिक, तितकी मोठ्या ताकदीच्या उत्पादकांची त्याकडे नजर वळण्याची शक्यता. मल्टिप्लेक्सनी सिनेमाला प्रॉडक्ट म्हणून पुढे केल्यावर मॅन्यूफॅक्चर्स पुढे आले तर समजण्यासारखं आहे. इथे मॅन्यूफॅक्चरर्स आहेत कॉर्पोरेट संस्था, ज्यांनी चित्रपटांना एक धंदा म्हणून आपलंसं करण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. रिलायन्स सहारासारख्या मोठमोठ्या कंपन्या हा उद्योग काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स, यशराज फिल्म्स वगैरे मंडळींनीही मोठ्या प्रमाणात चित्रपट काढण्याचा (खरं तर पाडण्याचा) सपाटा लावला आहे. मात्र त्यांच्या दृष्टीकोनातच काही घोळ आहे.
यशराज किंवा राजश्री सारखी जुनी प्रॉडक्शन हाऊसेस जरी आज (अजून) शाबूत असली तरी त्यांची आपल्या पद्धती बदलण्याची तयारी दिसत नाही. जी गोष्ट गेली तीस चाळीस वर्षे खपते, ती आज तशीच त्याच प्रमाणात खपेल ही शाश्वती त्यांना कसल्या जोरावर वाटते ? आपला कोष सोडून ही मंडळी बाहेर आली, तर त्यांना दिसेल की आजचा प्रेक्षक पूर्वीसारखा केवळ हिंदी चित्रपटांवर पोसत नाहीय, आणि केबल टीव्ही आणि डीव्हीडी सारख्या छुप्या मार्गांद्वारे त्याच्यासमोर जागतिक चित्रपटांचे दरवाजे खुले झाले आहेत. हा बदल जर आपण लक्षात घेतला नाही तर पुढच्या काळात आपलं भविष्य फार उज्ज्वल नाही.
जुन्या संस्थांची ही गत तर कॉर्पोरेटांची दुसरी. यांचा कारभार हा एखादा साधा व्यवसाय चालवल्यासारखा. यातल्या कलात्मक दृष्टिकोनाची,सर्जनशीलतेची त्यांना समज तरी नसावी किंवा त्याचे या उद्योगाबद्दल घोर गैरसमज असावेत. केवळ एखाद्या लोकप्रिय किंवा राम गोपाल वर्मासारख्या एकेकाळच्या लोकप्रिय दिग्दर्शकाला कंत्राट दिलं की आपण बसून नफा मोजायचा असा काहीसा त्यांचा विचार दिसतो. मात्र तो किती बेभरवशाचा विचार आहे, हे गेल्या काही दिवसात सिद्ध झालेलंच आहे.
सध्याच्या या बिकट परिस्थितीत एकच संस्था सातत्याने योग्य निर्णय घेताना दिसते आहे. आणि ती म्हणजे यु.टी.व्ही. रंग दे बसंतीसारख्या महत्त्वाच्या अन् सामाजिक संदर्भ असणा-या व्यावसायिक चित्रपटापासून ते नुकत्याच आलेल्या आमीर/मुंबई मेरी जान/ ए वेन्सडे या दहशतवादावर आधारित चित्रत्रयीपर्यंत अनेक महत्त्वाचे चित्रपट तर त्यांच्याच खात्यावर आहेतच, वर हॉलीवूडमध्ये स्वतंत्र निर्मितीचा प्रयत्न, आपल्याकडे चांगल्या अँनिमेशनपटांचा प्रयत्न असे त्यांचे इतर प्रयोगही सुरू आहेत. त्यातल्या अनेक बाबतीत ते यशस्वी ठरण्याचीही शक्यता आहे, त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून ते काय प्रकारे विचार करताहेत हे पाहून जर इतर निर्मिती संस्थांनी पुढला मार्ग ठरवला तर मला वाटतं आपल्या चित्रपटांसाठी ते हिताचं ठरेल.
थोडक्यात पाहिलं, तर आजचं हिंदी चित्रपटाचं रूप हे वेगळं जरूर आहे, पण फार आशादायक आहे, असं नाही किंवा निराशाजनक आहे. असंही नाही. काही प्रमाणात प्रयत्न आहेत, काही प्रमाणात आळस अन् काही प्रमाणात सांकेतिक मार्गावरला नको इतका विश्वास.
मघा मी चित्रपट महोत्सवांना टोटल परस्पेक्टिव्ह व्होर्टेक्सची उपमा दिली होती. आज ही व्होर्टेक्स अधिक मोठं रूप धारण करतेय. पूर्वी महोत्सवात अन् मग पायरेटेड डीव्हीडीवर असणारा जागतिक चित्रपट आज लुमिये, पॅलेडोर, युटीव्हीसारख्या वितरकांकडून आँफिशियल मार्केटमध्ये आणि केबल चैनल्सवर पोहोचतो आहे. घराघरात चो पाहायची सवय व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्याशी टक्कर घ्यायची तर वेळीच कंबर कसायला हवी. अगदी ताबडतोब.
-गणेश मतकरी
2 comments:
हा सही लेख आहे! मागचा लेख फारच स्वप्नाळू वगैरे वाटला होता. इथे हा लेख ’follow the money' प्रकारचा वाटला. मागच्या १०-१२ वर्षात पिक्चर नाही, पण पिक्चर बघण्याच्या पद्धती बऱ्याच बदलल्या, आणि त्यामुळे indirectly थोडे फार पिक्चर बदलले. हे झालं चुकुन. I dont think केबलवाल्यांनी चला आपण सर्जनशील पिक्चर दाखवू असा विचार केला! त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तु उल्लेख केलेले दर्जेदार भारतीय पिक्चर.
अचानक असे उत्तमोत्तम पिक्चर ओळीने येण्याची समर्पक कारणं सांगणारा लेख म्हणुनच आवडला.
I think हाच trend continue होईल. प्रेक्षकवर्गावर - तो ही specific - लक्ष ठेऊन पिक्चर बनवले जातील. अर्थात शाहरुख, आमीर, सलमान, अमिताभ आणि गेला बाजार गोविंदा वगैरे लोकांनी गोट्या जरी खेळल्या तरी त्या कौतुकाने बघणारा पेक्षकवर्ग आहेच आणि तो राहीलच. त्यांना cater करणारे पिक्चर बनत राहतील आणि निर्माते ते बनवत राहतील. And isnt that the real identity of bollywood? I dont think it will ever change, and I am not sure if I even want it to change!!
thanks...focus is diffrent here ,though some points had to be repeated.
Post a Comment