चित्रपट न आवडणा-यांसाठी फक्त !
>> Wednesday, January 21, 2009
चित्रपटांबाबत प्रेक्षकांनी आता अधिक चोखंदळ होण्याची गरज आहे. आपण कोणते चित्रपट पाहतो, हेच का पाहतो, आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं? हे तीन प्रश्न फार महत्त्वाचे असून ते स्वतःला विचारायला हवेत. प्रत्येकानेच आपला निर्विकारपणा सोडून सतर्क होण्याची गरज आहे....
आपला सिनेमास्कोप ब्लॉग एक वर्षापूर्वी याच दिवशी सुरु करण्यात आला होता. त्यातून फारशी चर्चा झाली नसली तरी अनेकांना हा ब्लॉग आवडतो हे नक्की. या ब्लॉगमधून चित्रपट प्रेमींना फार नवं मिळालं नसेल कदाचित. पण चित्रपट न आवडणाऱयां थोड्या लोकांमध्ये जर सिनेमाची आवड निर्माण करता आली असेल, तर ब्लॉगने बरंच काही मिळवलं असं म्हणता येईल. वाढदिवस, वर्षपूर्ती हे शब्द हास्यास्पद वाटतात. पण तरीही यानिमित्ताने दोन, तीन वेगळ्या पोस्ट यापुढे असतील. नेहमीच्या वाचकांव्यतिरिक्त (कमेंट करणाऱया) अधिक वाचक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
चित्रपट आणि आपण
"ए क्साईटमेंट' हा शब्द आजच्या चित्रपट प्रेक्षकांच्या शब्दकोशातून हळूहळू पुसट व्हायला लागलाय असं मला बरेचदा वाटतं. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून आकार घ्यायला लागून आज एका निश्चित स्वरूपात आपल्यापुढे असलेल्या, या तुलनेने नव्या माध्यमाविषयीचं कुतूहल विरून त्याची जागा एका निर्विकारपणाने घेतलेली दिसते आहे. पूर्वी चित्रपटाला जाणाऱ्या प्रेक्षकांत जो उत्साह पाहायला मिळत असे, तो आज तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. खरं तर असं होऊ नये. आज चित्रपटांची तांत्रिक मूल्ये कितीतरी सुधारली आहेत. ते पाहण्याच्या सोयीदेखील अधिक प्रमाणात आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी मोजक्या चित्रपटगृहांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विशिष्ट चित्रपटांच्याच खेळाला जायला आपण बांधील नाही. मल्टिप्लेक्सने आपल्याला एकाच जागी अनेक चित्रपट उपलब्ध करून निवडीचं स्वातंत्र्य दिलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट टी. व्ही.च्या काळासारखी, रविवारच्या एकुलत्या एका चित्रपटासाठी वाट पाहायला न लागता आज केबल टी. व्ही.ने दिवसभरात अनेक चित्रपटांचा रतीब घालून रसिकांची सोय केली आहे. झालंच तर व्हिडिओ लायब्ररी, डी. व्ही. डी. पायरसी यांसारख्या गोष्टींनीही प्रेक्षकांची अपरिमित सोय केली आहे; पण या सगळ्यांचा परिणाम एक प्रकारे उलटा झालाय असं म्हटलं तरी चालेल. या माध्यमाचं कौतुक नाहीसं होऊन आपल्याला आज त्यांची नको इतकी सवय झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दर्जाबद्दल किंवा क्षमतेबद्दल आपण आज कोणतीही भूमिका घेऊ इच्छित नाही. जे आहे ते ठीक आहे, असाच एक सार्वत्रिक समज पसरून राहिला आहे आणि आपल्या या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षा घटत चालल्या आहेत.
केवळ भारतीय प्रेक्षकांपुरतं बोलायचं, तर आपल्यासाठी चित्रपट ही आज केवळ करमणूक आणि तीही साचेबद्ध करमणूक आहे. प्रभातच्या सुवर्णकाळात सुरू झालेला या माध्यमाचा प्रबोधनाचं साधन म्हणून वापर कधीच लयाला गेला आहे. याची सुरवात फार पूर्वीच झाली. ज्या सुमारास उत्तर भारतातून आलेल्या हिंदी भाषिकांनी मुंबईला भारतीय चित्रपट व्यवसायाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक बनवलं आणि विचारांना मागे टाकून मनोरंजनाच्या यशस्वी फॉर्म्युल्याच्या शोधाला सुरवात झाली, तेव्हाच या प्रकाराला खरी सुरवात झाली. यथावकाश फॉर्म्युला सापडला. त्या चौकटीत राहून हिंदी व्यावसायिकांनी तीन-चार हमखास प्रेक्षकप्रिय कथासूत्रं शोधली आणि आपला जम बसवला. कालांतराने हा हिंदी व्यावसायिक चित्रपट भारतभर लोकप्रिय झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारतीय चित्रपट म्हणजे हाच अशी ओळख बनली.
त्यातल्या त्यात ज्या दिग्दर्शकांना काही प्रमाणात वैचारिक चित्रपट बनवण्यात रस होता. त्यांनी कालांतराने आपली वेगळी चूल मांडली आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटांबरोबरच कलात्मक किंवा समांतर चित्रपटांनाही स्वतःचं स्थान मिळालं. या सुमारास प्रादेशिक चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात बदल होत होता.
महाराष्ट्रात प्रादेशिक चित्रपटांना आधीपासूनच महत्त्व होतं आणि प्रभातसारख्या संस्थेनं ते खूप वाढवत नेलं होतं. त्यामुळे उच्चशिक्षित शहरीवर्गाने त्याला आसरा दिला होता; मात्र त्यासाठी मराठी चित्रपटाने ग्रामीण चित्रपटांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं, तर चांगल्या संस्था या सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट काढत असत; मात्र काही वर्षांत असं चित्र दिसायला लागलं, की महाराष्ट्रातला शहरी प्रेक्षक हा हिंदी चित्रपट आणि नाटकं पाहणं अधिक पसंत करू लागला आणि मराठी चित्रपटांच्या प्रेक्षक वर्गाची गणितं बदलायला लागली.
दाक्षिणात्य चित्रपटांना त्यांच्या प्रेक्षकांनी खंदा आधार दिल्याचं दिसत असूनही आपल्याकडे ते होऊ शकलं नाही. याला कारणं अनेक. एक तर दक्षिणेत हिंदी भाषा जितकी परकी वाटणारी होती, तितकी महाराष्ट्रात नव्हती. मुंबईसारख्या शहराने तर तिला खास आपल्या पठडीत बदलून घेतलेली होती. शिवाय हिंदी चित्रपट व्यवसायाचं केंद्रच मुंबई असल्याने या चित्रपटांबद्दल आपल्याकडे आपुलकी होती. तसंच हिंदी चित्रपटांत दिवसागणिक होणारे बदल, हे दर्जा (आशयाचा नव्हे) वाढवण्याकडे लक्ष देणारे होते. या उलट मराठी चित्रपटांत फार प्रगती दिसत नव्हती. ना आशयात, ना निर्मितीमूल्यांत. शहरी प्रेक्षकांचा कल आपल्यापासून दूर झुकतोय हे पाहताच मात्र ते सावध झाले आणि आपला गेलेला प्रेक्षक मिळवण्याऐवजी ग्रामीण प्रेक्षकांची संख्या वाढवून नफा शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करायला लागले. हे पाऊल चुकीचं ठरलं. कारण ही मराठी चित्रपटांच्या अधोगतीची सुरवात ठरली. इथे प्रेक्षक वर्गात घडून आलेला बदल हा अंतिमतः चित्रपटांच्या दर्जात पडणारा फरक ठरला. यानंतर तमाशापटांचं राज्य आलं आणि मराठी चित्रपट आपलं वैचारिक रूप पूर्णपणे हरवून बसला.
चित्रपटगृहांची चित्रपटांवरची सद्दी संपली, तेव्हा परिस्थिती होती, ती साधारण अशी. हिंदी चित्रपटांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं, मराठी चित्रपट शहरी धंद्याहून अधिक धंदा गावात खेचण्याचा प्रयत्न करत होता. काही प्रमाणात विदेशी चित्रपट (आपल्या वितरकांच्या नजरेत विदेशी म्हणजे हॉलिवूडपट. त्यापलीकडे आपली पोच नाही.) होते; पण ते विदेशी बाजारपेठांमध्ये चांगले जुने होऊन आलेले. नवा इंग्रजी चित्रपट पाहायला मिळणं दुर्मिळ.
अशा वातावरणात प्रेक्षकांना इतरत्र चित्रपट पाहण्याची संधी सर्वप्रथम उपलब्ध करून दिली, ती दूरदर्शनने. हा टेलिव्हिजन आजच्या मनोरंजन कारखान्याच्या तुलनेत नगण्य असला तरी तेव्हाही प्रेक्षकांना त्याने जरूर फितवलं. शहरांत या नव्या माध्यमाने थेट स्पर्धा निर्माण केली आणि गावांमधूनही टी.व्ही.चं प्रमाण वाढायला लागलं. सामान्य प्रेक्षक यामुळे खूश झाला. फिल्म सोसायट्यांसारख्या चित्रपटविषयक चळवळींवर काही प्रमाणात विपरित परिणाम जरूर झाला; पण या नव्या माध्यमाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे आवश्यक होतं. अर्थात माध्यमांमधलं वैर फार काळ टिकलं नाही. लवकरच एकमेकांकडून असलेले फायदे त्यांच्या लक्षात आले आणि चित्रपट टी. व्ही.चा उपयोग उद्योगाच्या जाहिरातींसाठी करायला लागला, तर टी. व्ही. चित्रपटांचा उपयोग स्वस्तात दर्जेदार कार्यक्रम पदरात पाडून घेण्यासाठी.
काही दिवसांनी मात्र टी. व्ही. रंगीत झाला आणि सर्व गणितं पुन्हा बदलली. लगोलग व्हिडिओ मार्केट प्रस्थापित झालं, व्हिडिओ पायरसीला जोर आला. व्हिडिओ लायब्रऱ्या उघडण्याचा काळ हा आपल्याकडच्या जागरूक प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा आहे. कारण आता पहिल्या प्रथम जागतिक चित्रपटांचं दालन त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात खुलं झालं. यात हॉलिवूडचे नवे-जुने चित्रपट तर होतेच, वर बिगर इंग्रजी चित्रपटांचंही मोठं पीक होतं. (अर्थात मी चांगल्या लायब्ररीविषयी बोलतो आहे. गल्लोगल्ली निघालेल्या चालू लायब्रऱ्यांविषयी, ज्यांचं महत्त्वाचं गिऱ्हाईक नव्या चित्रपटांच्या चोरून काढलेल्या कॅमेरा प्रिन्टस् पाहण्यात धन्यता मानतं त्यांच्याविषयी नव्हे.) या लायब्रऱ्यांचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारचा परिणाम झाला. चांगला हा, की ज्यांना चाकोरीबाहेरचं काही पाहण्यात खराखुरा रस होता, त्या मंडळींची थोडीफार सोय झाली. आणि वाईट हा, की प्रेक्षकांना चित्रपट छोट्या पडद्यावर पाहण्याची अधिकाधिक सवय झाली. याला वाईट परिणाम म्हटलं, त्याला कारण आहे. प्रत्येक कला काय प्रकारे पाहवी याचे काही नियम असतात, ज्यांनी ती रसग्रहण करणाऱ्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोचते. पुस्तक हा जसा वाचकाने एकट्याने घेण्याचा अनुभव आहे, तसा चित्रपट हा मोठ्या पडद्यावर समूहाने एकत्रितपणे घेण्याचा अनुभव आहे. छोट्या पडद्यावरचा चित्रपट ही त्यामुळे एक प्रकारची तडजोडच आहे. अर्थात आपल्याला एरवी जे चित्रपट पाहायला मिळणारच नाहीत, ते पाहण्यासाठी ही तडजोड करण्याला पर्याय नाही हे देखील खरं.
आज उपलब्ध झालेली डी. व्ही. डी. मार्केट ही या व्हिडिओ कॅसेटनी सुरू केलेल्या क्रांतीची पुढली पायरी आहे. आज त्या वैध आणि अवैध या दोन्ही मार्गांनी प्रेक्षकांपर्यंत पोचताहेत आणि जगभरातला जवळपास कोणताही चित्रपट या ना त्या मार्गाने, मोठ्या नाही तर निदान छोट्या पडद्यावर पाहणं आपल्याला शक्य झालं आहे; पण अशा रितीने चित्रपट आपल्यापर्यंत पोहला तरी तो पाहण्यात रस किती जणांना आहे, हा मुद्दा आज अधिक महत्त्वाचा ठरतो.
आज कुठल्याही प्रकारचे देशी-विदेशी चित्रपट मिळवणं शक्य असलं, तरी सर्वसाधारण प्रेक्षक हा त्यातल्या त्यात लोकप्रिय, नाव कानावर पडलेल्या चित्रपटांचीच निवड करतो. टी. व्ही.वर चित्रपटांच्या होत असलेल्या माऱ्याची नको इतकी सवय झाल्यामुळे तिथेही काळजीपूर्वक निवड न करता, तो जे समोर चाल? आहे ते तरी पाहत राहतो किंवा एकसारखे चॅनेल बदलत तरी राहतो.
मोठ्या पडद्याची परिस्थितीही फार वेगळी नाही. मल्टिप्लेक्सचं राज्य सुरू झाल्यावर प्रेक्षकांच्या या चित्रपटांच्या निवडीलाही आळा बसला. पूर्वी जो माणूस अमुक चित्रपट पाहायचा हे ठरवून त्या चित्रपटाला जात असे, तो आज छान कपडे घालून संध्याकाळ बायको-मुलांबरोबर मजेत घालवायला मल्टिप्लेक्सला जातो. त्याच्यासाठी तो कोणता चित्रपट पाहतो, हे तितकं महत्त्वाचं उरलेलं नाही. हा नाही, तर तो. त्यामुळे फरक काय पडतो, अशी मानसिकता वाढीला लागली आहे.
मग या परिस्थितीत ज्यांना खरंच चित्रपटात रस आहे, त्यांनी तो टिकवावा तरी कसा? एक गोष्ट स्पष्ट आहे, की ज्यांना चित्रपटांत खरंच रस आहे त्यांना डी. व्ही. डी.वाचून इलाज नाही. आज हिंदी व्यावसायिक चित्रपट हा पूर्णपणे रूपांतरित आहे आणि आपल्याकडे "श्वास'पासून एकदम सुधारणा झाल्याची हवा असली, तरी काही मोजके चित्रपट सोडल्यास बाकी दुष्काळच आहे. मध्यंतरी बाजारपेठ उघडल्यानं नवं विदेशी चित्रपट वेळ न दवडता पाहायला मिळताहेत; पण ते केवळ हॉलिवूडचे आणि तेही केवळ व्यावसायिक यशाची पूर्ण शक्यता असलेले. आज ज्यांना खरोखर उत्तम चित्रपट पाहायचे आहेत, त्यांनी सर्व देशांचे चित्रपट कोणत्याही सांकेतिक समजांना बळी न पडता पाहिले पाहिजेत. आज इतर देशांत व्यावसायिक निर्मितीपलीकडेही खूप काही घडतं आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून वेगवेगळे प्रयोग होताहेत. कथारचना आणि संकल्पना यांच्या शैलीत फरक पडतो आहे. चित्रपट आणि संगणकीय खेळ हे एकमेकांच्या जवळ येताहेत आणि त्यांचा वापर एकमेकांना पूरक म्हणून केला जातोय. नवे दिग्दर्शक तर मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात उतरताना दिसताहेत; पण जुने दिग्दर्शकही तंत्रज्ञानाने पुढे आणलेल्या शक्यता पाहून आपल्या कामाच्या पद्धतीत बदल आणू पाहताहेत. हे सगळं जरी अगदी आपल्या देशात घडत नसलं, तरी इंटरनेटसारख्या माध्यमातून आपण आपलं ज्ञान सहज वाढवत नेऊ शकतो. आज केवळ अभिजात म्हणून नाव मिळवलेले चित्रपट पाहण्यापेक्षा अनेक प्रकारांत मोडणारे लक्षवेधी चित्रपट पाहणं हे अधिक योग्य आहे. यातले काही विवाद्य असले तरी हरकत नाही. कधीकधी शंभर टक्के यशस्वी प्रयत्नांपेक्षा फसलेला; पण वेगळा प्रयोगही पाहण्यासारखा असू शकतो. चित्रपटांविषयी मत तयार करताना इतरांची मतं ध्यानात घेण्यापेक्षा जर आपण स्वतः विचार करायला लागलो, तर आपल्या अभिरुचीत आपोआपच फरक पडू शकतो
आणि आज हे घडणं महत्त्वाचं आहे.
चित्रपट हे अखेर मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर चालतात. निदान आपल्याकडे म्हणजेच, जेव्हा अधिक संपन्न, दर्जेदार चित्रपटांची मागणी होईल, तेव्हा तिची दखल घेणं चित्रकर्त्यांना भाग पडेल; मात्र हे घडायचं तर प्रेक्षकांनी अधिक चोखंदळ होण्याची गरज आहे. आपण कोणते चित्रपट पाहतो? हेच का पाहतो? आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं? हे तीन प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न आज प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपला निर्विकारपणा सोडून सतर्क होण्याची गरज आहे. टी. व्ही.पासून डी. व्ही. डी.पर्यंत आणि छोट्या चित्रपटगृहांपासून मल्टिप्लेक्सपर्यंत पसरलेला हा चित्रपटउद्योग या सर्व माध्यमांतून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे. आपण आपल्या मानसिकतेत घडवून आणलेलं परिवर्तनच त्याला आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोचवण्यात यशस्वी ठरेल.
- गणेश मतकरी
8 comments:
Which (& where) are good video libraries... I have searched many libraries (in & around Pune) for cinemas you mentioned. Is it possible to watch these movies on rented DVDs
hi nitin,unfortunately i am not aware of libraries in pune. in mumbai,u have several.dont underestimate pirated dvds, thats a huge source,they r availble everywhere.
try downloads from torrent sites. if you have a good broadband connection,u should be able to get what u want from net easily.
Shivajee putala kothrud, ithe gelaatr anee putalyakade tond ubhe karun rahilaat kee davikade ek rasta jato mothaa....tya rastaychya suruvateelaach ek video library ahe naav visarlo....almost sagale changle eng + marathi anee telugu(latest) pictures baghayla milteel tithe.
Reasonable rent ahe anee donek varshanpoorvi 30 rupaye ghyayche 2 divsansathee
वर्षपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन. आवर्जून वाचावा अश्या ब्लॉगांपैकी तुमचा एक ब्लॉग आहे. यावर्षातही असेच लेख येऊ द्यात
Anee ho Ganesh, happy b'day mhnayache rahilech kee.
Tumchyaa Blogla Happy B'day :)
प्रिय गणेश,
तुमचा ब्लॉग चांगला आहे. केवळ चित्रपटाच्या गोष्टीवर न लिहिता तुम्ही बरेच विचार करायला लावणारे लिहिता. तुमच्या साप्ताहिक सकाळच्या लेखांचाही मी वाचक आहे.
मला असं वाटतं की प्रेक्षकांना आता चित्रपटाची कथा चित्रपटाकडे ओढून आणते. त्यातला इतर फापटपसारा नव्हे. शिवाय करमणूकीची इतरही साधने तयार झाली आहेत - उदा. व्हिडिओ गेम्स, टि.व्हि. वर दिसणारे खेळ. यातून जर प्रेक्षकांना चित्रपटांकडे खेचायचे असेल, तर निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी चांगली गोष्ट निवडून ती आकर्षकरित्या सादर केलीच पाहिजे.
आपले लिहिणे असेच सुरू ठेवा.
गणेश -
तुला मागच्या कुठल्यातरी कमेंटमध्ये - तु थोर आहेस म्हटलं होतं - या लेखात तु प्रचंड - how should we put it - निरागस वाटतोस. म्हणजे चांगल्या अर्थाने निरागस.
म्हणजे मराठी आणि हिंदी निर्मात्यांनी चांगले पिक्चर बनवावेत, प्रेक्षकांनी चांगले पिक्चर पहावेत आणि मग राजुने ७६०० कोटी परत करावेत टाईप्स निरागस.
I think कुठलाही प्रेक्षक भारतीय किंवा परदेशी - एवढा पण पांडू नसतो. Open air theatre मध्ये तीन रुपयात पिक्चर पहाणारा प्राणीही "आपण कोणते चित्रपट पाहतो? हेच का पाहतो? आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं?" हा विचार करतोच!
तु म्हणतोस कि - "जे आहे ते ठीक आहे, असाच एक सार्वत्रिक समज पसरून राहिला आहे" - पण त्यात वाईट ते काय?
तुझा हा लेख वाचताना मी साहित्य आणि चित्रपट या माध्यमांची नकळत तुलना करत होतो - तशी तुलना करणं खरंतर योग्य नाही, पण तरिही.
तुझा हा लेख म्हणजे - असं म्हणणं झालं कि महाराष्ट्रात आणि मराठीत दर्जेदार पुस्तकं लिहिली जावीत, लाईब्ररीजनी ती विकत घ्यावीत आणि वाचकांनी ती वाचावीत. आता अशी अपेक्षा ठेवण्यात गैर काहीच नाही. पण you see - तसं होत नाही. म्हणजे दर्जेदार पुस्तकं लिहिली जातात, निवडक ठिकाणी ती विकायला आणी वाचायला ठेवली जातात आणि चोखंदळ वाचक ती विकत घेतात किंवा वाचतात (काही लोक दोन्ही करतात). पण कुठल्याही bookstore मध्ये गेलं तरी - हे पुस्तक (ते ही विकत घेऊन) कोण वाचेल - असं वाटणारी पुस्तकं - say कोसला आणि पानिपत आणि तत्समांपेक्षा जास्त धंदा करतात तेव्हा डोकं विस्मयाने थक्क होतं. I somehow expected कि मागच्या वीसेक वर्षांत ७ ते ८ हजार पिक्चर पाहिल्यावर तुझा "विस्मयिंडेक्स" बऱ्यापैकी बोथट झाला असेल!
माझे कित्येक मित्र ’डोक्याला ताप नको’ प्रकारचे डोक्याला ताप पिक्चर बघतात आणि इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमैया टाईप्स नटश्रेष्ठांच्या कारकिर्दी घडवतात - पण मला त्याबद्दल absolutely काहीही वाटत नाही - आणि ते न वाटण्याचा खेदही. हेच लोक चुकुन माकुन एखादा ’मॉन्सुन वेडिंग’ वगैरे बघुन - ह्या, फॅमिली बरोबर बघण्यासारखा नाही म्हणतो आणि ते पण एखादा ढिशुमढिशुम कम आयटम सॉंगपट फॅमिलीबरोबर पाहुन....तेव्हा मी त्याला - हो यार, तुझं बरोबर आहे - म्हणतो.
एनीवे - टायटलमध्येच ’disclaimer' होतं - पण त्याचाही विचार करताना वाटलं कि च्यायला मला तरी पिक्चर कुठे आवडतात? केवळ नाईलाज म्हणुन तिसापैकी अठ्ठावीस वर्ष म्हणुन एकामागे एक रतीब लावलाय फक्त.
चला ’स्लीप्लेस इन सिऍटल’ संपला - आता 'You've got mail' सुरु करतोय! बहुतेक याबद्दल तु माझा ’निषेध’ करणार!!
oh btw - परवा ’Frost/Nixon' पाहिला - चांगला आहे, पण best picture nomination? जरा ’ओढाताण’ नाय वाटत तिथे?
oh - afterthought - वर्धापन दिनाच्या शुभेच्छा! हाहाहाहाहाहाहा....
ब्लॉगचे प्रसुतीदिन लक्षात ठेवणं आणि वाढदिवस साजरे करणं.....जय गनेस! (श नाही स - आम्ही मित्रांनी नववीत असताना हाय हॅलो न करता ’जय गनेस’ करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता - त्याची आठवण झाली! हा. हा. हा.)
2/3 goshti.
1. everyone has a point of view. i dont object to anyones opinion ,but you already know that. tula mazya comment madhe innocence
(kontyahi arthane )watayla kahi harkat nahi,pan i believe what i say here is true.
2. i actually do think ki prekshakankadun jo vichar vayla hava to hot nahi or chukicha lines var hoto.jo sudharaychi garaj ahe.mhanje they should conciously see films. tyani kontyahi prakarcha films pahavyat, mazya books madhe tya changlya asaychi garaj nahi ,pan tyancha dokyat ek process suru vayla hava which should lead them to question what they r getting out of it.it is not as obvious as it sounds in the way u put it.but it doesnt matter.
3.everyone has a pov.
me generally nishedh karnyacha virodhat ahe. tyamule me to tuza comment baddalhi karnar nahi ani u've got mail baddalhi.kinva seattle baddalhi.i happen to like both these films. have u seen shop around the corner on which ygm is based?even that is charming.
anyway wardhapan dinabaddal me kahi bolu shakat nahi. that is paradeso's department. i have nothing to do with it.
i havent seen frost nixon yet. but i do like slumdog.
Post a Comment