आऊटसायडर स्कोर्सेसी

>> Friday, February 27, 2009



गणेश मतकरी लिखित ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाचे बुधवारी दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीच्या चित्रपटांचे विश्लेषण करणाऱ्या ‘फिल्ममेकर्स’ मधील प्रकरणाचा हा संपादित अंश.

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट दृश्य. एका नक्षीकाम केलेल्या वॉलपेपरवरून कॅमेरा उजवीकडे सरकतो आणि दृष्टीपथात येते ती समोर चाललेली पार्टी. स्त्रीपात्र विरहीत. उपस्थित सज्जनांचं वय हे साधारण पंचविशीच्या आसपासचं. डावीकडून उजवीकडे सहजगतीने गेलेला कॅमेरा दाखवून देतो या मुलांचे घोळके, त्यांचे चाललेले उद्योग, गप्पा, फोनकॉल्स वगैरे. समोरच बाटल्या, त्यामुळे मद्यपानही जोमाने आलंच. बरोबर संगीत, आता कॅमेरा आपली दुसरी फेरी चालू करतो. पुन्हा डावीकडून उजवीकडे. या खेपेला थोडं अधिक जवळून.
लवकरच या दृश्यासाठी वापरलेली शैली स्पष्ट व्हायला लागते. वर्तुळाकार गतीचा आभास तयार करणारी कॅमेरा मूव्हमेन्ट. एक दुसऱ्यात डिझॉल्व्ह होणारे, मिसळून जाणारे शॉट्स, सलगता आणून देणारे, संवाद ऐकू येत नाहीत, पण संगीताबरोबर आता सुरू झालेलं गाणं हे पार्टीचा मूड पकडणारं. कॅमेरा फिरण्याची गती दर शॉटगणिक थोडी वाढणारी, पण सहभागी पात्रांच्या हालचाली स्लो मोशनमध्ये चाललेल्या. आता जमलेल्या घोळक्यातलं कोणी एक पिस्तुल काढतं. मग थोडा पिस्तुलाशी ढोळ. एकाकडून दुसऱ्याकडे. मग तिसऱ्याकडे. मग एक जण पिस्तुल समोर कोणावर तरी रोखतो. सगळे हसतात, थोडी गंमत. आता कॅमेऱ्याचं वर्तुळाकार फिरणं थांबलेलं, पण डिझॉल्व्हज सुरू. लवकरच एका मुलाला लक्ष्य केलं जातं. भीती घातली जाते. इतरजण मागे पळतात. काही जण हळूच गंभीर झालेली, इतरांच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित. लक्ष्य ठरलेल्या मुलाची मानगूट पिस्तुलवाल्याने धरलेली, मुलगा रडकुंडीला आलेला. थोडी पळापळ. मग मुलाला जमिनीवर ढकलण्यात येतं, आणि पिस्तूल रोखलं जातं, मात्र मुलावर नाही, तर दारूच्या बाटल्यांवर. गोळी सुटते. काच फुटल्याचे आवाज. पडद्यावर आता दिसतात ती ‘रिओ ब्राव्हो’ या वेस्टर्न चित्रपटातली छायाचित्रं. पाश्र्वभूमीला आवाज बंदुकीच्या गोळ्यांचे.
हे दृश्य मार्टिन स्कोर्सेसीच्या ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर?’ (१९६९) चित्रपटातलं. स्कोर्सेसीचा हा पहिला चित्रपट. फिल्म स्कूलमधली ग्रॅज्युएशन फिल्म म्हणून सुरू झालेला. अनेक अडचणींमधून गेलेला. पैशांची चणचण, तुकडय़ातुकडय़ात केलेलं चित्रीकरण/संकलन, नवे कलाकार, वितरकांच्या अटी, असे अनेक प्रश्न. तरीही महत्त्वाचं हे, की पुढल्या काळात एक मोठा दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेला दिग्दर्शक, इथे त्याच्या अनेक वैशिष्टय़ांसह आपल्याला सर्वप्रथम दिसतो. खास करून या दृश्यात फिल्मस्कूलमधल्या शिक्षणाने तयार झालेली प्रयोग करून पाहण्याची वृत्ती, तांत्रिक कौशल्यं, अर्थपूर्ण दृश्यरचना, संगीताचा ठळक वापर, इतर चित्रपटांचा प्रभाव, हॉलिवूडवरचं प्रेम आणि आशयात अचानक समोर येऊन प्रेक्षकांना (आणि क्वचित पात्रांनाही) कोंडीत पकडणारं हिंसेचं टोकदार दर्शन. थोडक्यात म्हणजे अस्सल स्कोर्सेसी.
हॉलिवूडच्या महत्त्वाच्या चित्रकर्त्यांपैकी एक असलेला स्कोर्सेसी हा एका परीने हॉलिवूडच्या तथाकथित परंपरेला उपरा आहे. ज्याला आपण हॉलिवुडपट म्हणतो तो सिनेमा हा प्रामुख्याने चार लोकांच्या मनोरंजनाला वाहिलेला, मुख्य धारेतला, व्यावसायिक सिनेमा आहे. या सिनेमाचं लक्ष्य हे प्रामुख्याने त्यातून होणाऱ्या नफ्यावर केंद्रित झालेलं आहे, आणि हा नफा इथे नेहमीच चित्रकर्त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीहून अधिक महत्त्वाचा मानला जातो. अर्थात हॉलिवूडमध्येही या चौकटीत राहून कलात्मकदृष्टय़ा दर्जेदार निर्मिती करणारे कलावंत आहेत. पण मार्टिन स्कोर्सेसी ही चौकटही मानत नाही. आजवर त्याने केलेले सर्व चित्रपट, क्वचित ‘द कलर ऑफ मनी’ किंवा ‘केप फिअर’ सारखे अपवाद वगळता, स्वत:च्या मनाशी प्रामाणिक राहूनच बनवलेले आहेत. त्या दृष्टीने पहायचं तर त्याचं काम हे मुख्य धारेपेक्षा अमेरिकेतल्या समांतर चित्रपट चळवळीच्या, म्हणजेच इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकिंगच्या अधिक जवळ जाणारं आहे.
या दिग्दर्शकाच्या संपूर्ण कारकीर्दीकडे एक नजर टाकली तर लक्षात येईल की तिला एक निश्चित आकार आहे. या चित्रपटाच्या विषयाची निवड, त्यांची रचना, त्यातल्या व्यक्तिरेखांचं स्वरूप हे दिग्दर्शकाच्या जाणीवेतून आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की स्कोर्सेसीने वारंवार तेच विषय त्याच प्रकारे हाताळले. उलट या विषयांमध्ये चिकार विविधता जाणवते. ‘गुडफेलाज’ किंवा ‘मीन स्ट्रीट्स’सारखे गँगस्टर्सचं व्यक्तिगत आयुष्य चित्रीत करणारे, कुंदन किंवा एव्हिएटरसारखे चरित्रात्मक, लास्ट टेम्प्टेशन ऑफ क्राईस्टसारखे धार्मिक कल्पनांचा नव्याने अर्थ शोधणारे चित्रपट आणि ‘केप फिअर’सारखे थ्रिलर्सदेखील त्याने दिले. मात्र या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या विषयांमध्येही काही समान सूत्रं आहेत जी आपल्याला या निवडीमागच्या कारणांपर्यंत घेऊन जाऊ शकतील.
१९४२चा स्कोर्सेसीचा जन्म हा अमेरिकेतल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय इटालियन वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातला. या ठिकाणी पाहायला मिळालेलं वातावरण, घरच्यांचे संस्कार, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीवर लहान वयात पाहायला मिळालेले इटालियन नव-वास्तववादी (ठी फीं’्र२३) चित्रपट यांचा स्कोर्सेसीच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. माफिया साम्राज्याच्या एका कोपऱ्यातत असलेल्या वस्तीत त्याला गुन्हेगारीने पोखरलेला समाज पाहायला मिळाला. इथली तरुण मुलं ही गुंडगिरी, लहान प्रमाणातला अमली पदार्थाचा व्यवसाय करताना सर्रास पाहायला मिळतो. या मंडळींमध्येच मोठा होणारा मार्टीन, हा या हळूहळू तयार होणाऱ्या गँग्जमध्ये मिळून मिसळून असे, पण प्रत्यक्षात स्वत:कडे फार लक्ष वेधून न घेता शांतपणे राहण्याचा प्रयत्न करी. मात्र कधीतरी आपणही या दुष्टचक्राचा कायम हिस्सा बनू ही भीती होतीच. या वस्तीत मान होता तो प्रामुख्याने तीन प्रकारच्या लोकांना, माफिया, गँगलीडर्स आणि धर्मगुरू. गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कोर्सेसीने या सुमारास धर्मगुरू होण्याचं ठरवलं ते हा मान मिळवण्यासाठी. हा काळ आणि हे वातावरण या ना त्या मार्गे स्कोर्सेसीच्या कारकीर्दीवर प्रभाव पाडून राहिलेले आहे. पुढे चित्रसृष्टीत जायचं ठरवल्यावर त्याने आपली धार्मिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली, पण त्याच्या कथासूत्रांच्या निवडीमागे हा भूतकाळ जाणवण्यासारखा आहे. गुन्हेगारी, हिंसाचार आणि धर्म या तीन सूत्रांभोवती स्कोर्सेसीचे चित्रपट फिरतात. ही सूत्रं त्याच्या प्रेरणा आहेत ज्या त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात.
अमेरिकन चित्रपट व्यवसायाकडे ढोबळमानाने पाहिलं, तर १९७० च्या आसपास एक मूलभूत फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. या आधी आलेली दिग्दर्शकांची पिढी ही मुख्यत: व्यवसायात तयार झालेली होती. त्यांचे आडाखे, कामाची पद्धत ही प्रामुख्याने त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आणि आपल्या आजूबाजूला पाहायला मिळणाऱ्या इतर दिग्दर्शक, कलावंतांच्या निरीक्षणातून तयार झालेली होती. या मंडळींनी काही प्रमाणात जागतिक सिनेमा पाहिला होता हे निश्चित, पण त्यापासून काही शिकण्यात त्यांना रस नव्हता. स्टुडिओ सिस्टीमही या काळी जोरात असल्याने दिग्दर्शकांचा कलही निर्मात्यांच्या बाजूने विचार करण्याकडे होता.
१९६०-७० च्या सुमारास स्टुडिओ सिस्टीमचं प्रस्थ कमी झालं आणि चित्रपटांचं पद्धतशीर शिक्षण घेतलेल्या दिग्दर्शकांची एक फळी पुढे आली. फ्रान्सिस फोर्ड कपोला, जॉर्ज लुकस, स्टीवन स्पीलबर्ग अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकांबरोबरचं स्कोर्सेसीदेखील व्यवसायात उतरला. या सर्वाची चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी ही आधीच्या पिढीपेक्षा खूपच वेगळी होती. त्यांचा जगभरातल्या चित्रपटांचा अभ्यास होता आणि आपल्या हिचकॉक किंवा काप्राबरोबरचं इटलीच्या डेसिका किंवा फेलीनीकडून वा फ्रान्सच्या त्र्युफो किंवा गोदारकडून काही शिकण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता. आशयाबरोबरच तंत्रातही प्रयोग करण्याचा त्यांना उत्साह होता. या दिग्दर्शकांनी तरुण पिढीत आपला नवा प्रेक्षक शोधला आणि चित्रसृष्टीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली. या बदललेल्या चित्रसृष्टीने स्कोर्सेसीची दखल घेतली ती १९७३ मधल्या ‘मीन स्ट्रीट्स’मुळे. मीन स्ट्रीट्स हा चित्रपट स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, वर तत्कालीन तरुण पिढीची दिशाहीनता दाखवणारा आणि समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचं चित्रण करणारा चित्रपट म्हणून तो उल्लेखनीय आहे. एका परीने तो तथाकथित ‘अमेरिकन ड्रीम’विषयी देखील आहे. समाजाच्या सर्व थरातल्या लोकांना भासणारी सुबत्तेची गरज तो दाखवतो आणि जेव्हा ही गरज कायद्याच्या चौकटीत राहून पुरी करता येत नाही तेव्हा ही चौकट खिळखिळी व्हायला वेळ लागत नाही. या चित्रपटातला तरुण वर्ग हा साधारण ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर? मधलाच आहे. किंबहुना मीन स्ट्रीट्समधली चार्लीची प्रमुख भूमिका हे त्या चित्रपटातल्या जे आरचंच एक रूप आहे. स्कोर्सेसीने दोन्ही चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी केलेली हार्वी कायटेलची निवडही हेच सांगते. असं असूनही दोन चित्रपटांमधला प्रमुख फरक म्हणजे आता त्याला आलेलं स्पष्ट गुन्हेगारी वळण आणि मजकुराचा, त्याच्या दृश्य परिमाणातही परावर्तित झालेला गडदपणा.
‘हू’ज दॅट.. मध्ये भर होता तो नायक/नायिकेमधल्या भावनिक नातेसंबंधावर. प्रेम आणि शरीरसंबंध याबद्दलचे सांकेतिक आणि आधुनिक विचार, त्याचबरोबर पुरोगामीत्वाच्या आणि पावित्र्याच्या कल्पनांमधून येणारा दुरावा अशा प्रामुख्याने स्त्री-पुरुषांमधल्या जवळीकीसंबंधातल्या मुद्दय़ांवर त्याची बांधणी केली गेली होती. यातले काही मुद्दे मीन स्ट्रीट्समध्येही आहेत. पण नावाला जागून इथला भर आहे, तो स्ट्रीट कल्चरवर. चार्ली हा माफिआच्या जवळच्या संपर्कातला तरुण आणि त्याच्या तेरेसा या खास मैत्रिणीचा विक्षिप्त चुलतभाऊ जॉनी बाय यांची ही गोष्ट आहे. चार्लीचं आपली पत सांभाळत जॉनी बॉयला सावरून घेण्याचा प्रयत्न करणं आणि जॉनी बॉयचं जवळजवळ ठरल्याप्रमाणे विनाशाकडे धावणं असा या चित्रपटाचा आकार आहे.
काळाचा हिशेब ठेवायचा, तर १९९० च्या गुडफेलाजला स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या मध्यावर येणारा चित्रपट म्हणावं लागेल, पण चित्रपटांची संख्या आणि त्यांचा प्रभाव या दोन्ही दृष्टींनी पाहायचं तर गुडफेलाजपर्यंतचा काळ हा कितीतरी यशस्वी म्हणावा लागेल. याचा अर्थ पुढल्या काळात स्कोर्सेसीच्या चित्रपटांचा दर्जा ढासळला असा मात्र नव्हे, किंबहुना ‘केप फिअर’ (१९९१) ही युनिव्हर्सल पिक्चर्ससाठी लगेचच स्कोर्सेसी केलेली निर्मिती ही अनेक बाबतीत विक्रमी ठरली होती. २००२ च्या ‘गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’ने पुन्हा दिग्दर्शनाचं नामांकन मिळवण्यापर्यंतच्या काळात स्कोर्सेसीने चित्रपट अभ्यासकांना आणि चाहत्यांना उपयुक्त अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली, खरं तर हे स्वतंत्र चित्रपट नव्हते, तर अमेरिकन आणि इटालियन चित्रपटांच्या इतिहासाचा अनेक चित्रपटांच्या दृश्यासह घेतलेला वैयक्तिक आढावा असं यांचं स्वरूप होतं. ‘ए सेन्चुरी ऑफ सिनेमा : ए पर्सनल जर्नी विथ मार्टिन स्कोर्सेसी थ्रू अमेरिकन मुव्हीज’ (१९९५) आणि ‘माय व्हॉएज टु इटली’ (२००१) हे दोन्ही चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ इतिहास मांडण्याचा नसून स्कोर्सेसीच्या नजरेतून तो मांडायचा असला तरी एका परीने हीच त्यांची खासियत आहे. कारण मग तो केवळ अहवाल राहत नाही, तर हा इतिहास जोडत जाणाऱ्या एका तल्लख व्यक्तिमत्त्वाची मदत आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळते. या माणसाचा हा गुण त्याच्या समकालीन असणाऱ्या अनेक चित्रकर्मीहून वेगळा आहे. इतिहास जपण्याची, जुने चित्रपट अभ्यासण्याची, ते पुन्हा प्रदर्शित करायला किंवा डीव्हीडीवर उपलब्ध होण्याला मदत करण्याची त्याला मनापासून हौस आहे. फेलिनीला ला स्टड्राच्या डीव्हीडी प्रकाशनासाठी प्रास्ताविक दे, मायकेल पॉवेलच्या पीपींग टॉमला किंवा निकोलस रेच्या जॉनी गिटारला अमेरिकेत प्रदर्शित व्हायला मदत कर, मॉडर्न लायब्ररी ऑफ मुव्हीजसारखी चित्रपटविषयक उत्तम पुस्तकं मालिका संपादित कर असे अनेक उद्योग त्याने केले आहेत, करतो आहे.
मार्टिन स्कोर्सेसीच्या कलाजीवनाचा मोठा भाग आज उरकून गेला असला, तरी त्याची अखेर समीप असल्याची चिन्हं नाहीत. आणखी अनेक र्वष तो याच जोमाने चित्रपट बनवू शकेल. मात गुडफेलाज ही त्याच्या प्रायोगिक चित्रपटांनी भरलेल्या करियरच्या पहिल्या टप्प्याची अखेर मानली अन् डिपार्टेडचं ऑस्कर ही तुलनेने व्यावसायिक म्हणता येईलशा दुसऱ्या टप्प्याची अखेर मानली, तर येणारा काळ त्याच्या खेळीला तिसऱ्या टप्प्यावर घेऊन जाताना दिसेल. हा पुढला टप्पा या सर्जनशील दिग्दर्शकाकडून काय घेऊन येतो हे पाहण्याची उत्सुकता आता आहे. ती शमवण्यात हा सर्जनशील कलावंत कुठेही कमी पडणार नाही याची खात्रीदेखील.

2 comments:

Abhijit Bathe March 1, 2009 at 2:23 PM  

गणेश - तुझं पुस्तक ’तुझं’ म्हणुन एरवीही वाचायचं होतंच, पण त्यात हा आणि असे लेख आहेत हे कळल्यावर उत्सुकता आणखीनच वाढलिए. पिक्चर आपण बघतोच, पण असं थांबुन स्कॉर्सीझी किंवा कपोला किंवा ऑलिव्हर स्टोनने त्या त्या वेळी तसे तसे पिक्चर का बनवले वगैरे वाचायला मजा येते. दुसरं आणखी कि - आणि बहुतेक हा पुस्तकाचा विषय नाहिए पण - चित्रपटांतल्या लोकांच्या एकमेकांच्या नात्यांबद्दलही. उदा. स्कॉर्सेझी आणि डि निरो. १९८० ते १९९० - हे लोक नक्की काय करत होते आणि का? त्यांची careers तशी बऱ्यापैकी समांतर पण - आणि बऱ्यापैकी समान टॅलंट असुनही - काही लोक जिम कुरियर होतात, काही आन्द्रे अगासी आणि काही पीट सँप्रास - ते का? असा काहीसा हा प्रश्न आहे. शिवाय आपल्याकडेही जसं विशाल भारद्वाज आणि अक्षय कुमार - ह कॉम्बिनेशन जरा ऑकवर्ड वाटतं तसंच थोडंसं - स्कॉर्सेझी आणि टॉम हॅंक्स....असं काहीतरी....
पण कदाचित एवढा फोकस विस्तारत गेलं तर तुला स्कॉर्सेझी वर लेख न लिहिता त्याचं चरित्र लिहायला लागेल!
एनीवे काल पाहिलेल्या ’कमीने’ च्या ट्रेलरएवढाच तुझ्या पुस्तकाचा ट्रेलरही उत्सुकता वाढवणारा आहे यात वादच नाही. I hope भरपुर लोक तुझं पुस्तक वाचतील.

ganesh March 2, 2009 at 9:50 AM  

thanks AB.
actually, i havent seen the trailor of kamine!!!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP