ग्राउंडहॉग डे- हाच खेळ उद्या पुन्हा

>> Monday, May 18, 2009

दिग्दर्शक हेरॉल्ड रामीसच्या ग्राउंडहॉग डेला कथानक आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, कारण एका बाजूला पाहिलं तर हा एका आत्मकेंद्री माणसाचा सज्जन, मोठ्या मनाचा माणूस होण्याकडे झालेला प्रवास आहे. पण दुस-या बाजूने घटना आणि इतर पात्रांच्या कथेतला सहभाग पाहिला तर ती एका घटनाक्रमाची अनेकवार होणारी पुनरावृत्ती आहे. कारण संपूर्ण चित्रपट हा एका विशिष्ट दिवसाभोवती फिरतो, जो कथानायक सोडता इतरांसाठी बदलत नाही किंवा कथानायकाच्या उचापतीमुळे जितका बदलू शकेल तितकाच बदलतो. दिवस आहे अर्थातच ग्राउंडहॉग डे.
पन्कासाटोनी गावात प्रथा आहे, ज्यानुसार पन्कासाटोनी फिल नावाने ओळखला जाणारा ग्राउंडहॅम, म्हणजे सशासारखा छोटा प्राणी, एका ठराविक दिवशी हिवाळा किती टिकेल याविषयीचं भाकीत वर्तवतो. आडगाव असलेल्या पन्कासाटोनीसाठी हा एक मोठा सणच आहे. यावर्षी हा सण टीव्ही वृत्तांतात पकडण्यासाठी, हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं काम करणारा, स्वार्थी,स्वतःच्या कोषात राहणारा, आगाऊ आणि भांडखोर फिल (बिल मरी) या गावात येऊन पोहोचला आहे. बरोबर आहे त्याचा कॅमेरामन आणि दिग्दर्शिका रिटा (अँन्डी मॅकडोविच). आधीच या कामगिरीवर नाखूष असणा-या फिलचा दिवस काही बरा जात नाही. काम चांगलं होत नाही, भांडणं होतात, त्याचा जुना कंटाळवाणा वर्गमित्र भेटतो आणि अखेर हायवेवर झालेल्या हिमवर्षावाने ही मंडळी गावातच अडकून पडतात.
दुसरा दिवस उजाडतो तो पहिल्या दिवसासारखाच. रेडियोवर तेच संगीत, तेच निवेदन. लवकच फिलच्या लक्षात येतं की हा दिवस पहिल्या दिवसासारखा नसून पहिला दिवसच आहे, म्हणजे ग्राउंडहॉग डेच आहे. हा दिवस जसा उलगडत गेला तसाच तो पुन्हा उलगडणार आहे आणि फिलला त्याला पुन्हा एकदा तोंड द्यावं लागणार आहे.
हा दिवस पुन्हा पुन्हा घडत राहणं आणि फिलचं त्यावर रिअँक्ट होणं एवढीच चित्रपटाची कल्पना आहे. चित्रपट सायन्स फिक्शन वैगैरे नाही, त्यामुळे नायकापुरता हा कालप्रवाह अडकून राहण्याला चित्रपट कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, आणि चित्रकर्त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे. हे का होतं याला अंतिमरीत्या महत्त्व नाही. आपलं आयुष्य हे अखेर आपण स्वतःच घडवतो. ते चांगलं की वाईट हे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे, असं चित्रपट सांगतो. मात्र हे सांगण्यासाठी तो कधीही शब्दांच्या आहारी जात नाही.
एका घटनाक्रमाच्या असंख्य शक्यता प्रेक्षकांसमोर उलगडताना तोचतोचपणा येऊ न देणं सोपं नाही. कारण फिलमुळे दिवस बदलत असला तरी इतरांचं आयुष्य याने बदलेपर्यंत ठराविक रितीनेच घडणार आहे. फिलचं वागणं कसं बदलत जातं आणि फिल विविध प्रकारे या दिवसाचा उपयोग कसा करतो, ते पाहणं रंजक आहे, तसंच आपल्याला अंतर्मुख करणारंही आहे. स्वतःच्या वागण्याचा अन् त्याच्या दुस-यांवर होणा-या परिणामांचा विचार करायला लावणारं आहे. इथे फिल आधी चिडतो, भांडण करतो, मग आपल्याला माहीत असणा-या घटनांचा फायदा करून घेण्याचं ठरवतो. म्हणजे त्याला एखादी मुलगी आवडली तर एखाद्या दिवशी तिची माहिती काढून घेऊ शकतो आणि दुस-या दिवशी त्या मुलीच्या कल्पनेतला पुरुषोत्तम असल्याचं नाटक करून तिला पटवू शकतो.
रिटाला पटविण्यासाठी तो यथाशक्ती प्रयत्न करतो. पोलिसांना चिथावण्यापासून आत्महत्या करेपर्यंत कोणतीच गोष्ट त्याला या दिवसापासून मुक्ती देत नाही, हे लक्षात आल्यावर तो हळूहळू मिळालेल्या क्षणाचा वावर चांगल्या रितीने करायला शिकतो. गावच्या लोकांना (त्यांना फिल माहित नसला तरी इतक्या दिवसांनी फिल मात्र सगळ्यांना ओळखायला लागलेला) मदत करतो, पिआनो, आईस स्कल्पटींग शिकतो. स्वतःचं आयुष्य एकापरीने सुधारायचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न अखेर त्याच्या आयुष्यात दुसरा दिवस उजाडायला कारणीभूत ठरतात.
ग्राउंडहॉग डे म्हटलं तर कॉमेडी आहे. त्यात अनेक विनोदी प्रसंग आहेत आणि मरीसारखा प्रसिद्ध कॉमेडीयन नायकही. त्यातल्या फिल आणि रिटाच्या बदलत्या नात्याच्या सुंदर चित्रणामुळे त्याला रोमँटिक कॉमेडीही म्हणता येईल. पण खऱं तर त्याला अशा विशिष्ट विभागात न बसवणं हेच न्याय्य राहील. कारण अंतिमतः त्याला स्वतःला एक माणूस म्हणून सुधारण्याचा संदेश, हा संदेश म्हणून येत नसला तरी तो स्पष्ट आहे, तो एरवीच्या कॉमेडी (किंवा रोमँटिक कॉमेडी) वर्गाकडून अपेक्षित नाही. किंवा त्याची एकाच वेळी गुंतागुंतीची आणि सोपी रचनाही.त्या दृष्टीने ग्राउंडहॉग डेचा स्वतंत्र चित्रप्रकार आहे. जो त्याच्यापुरता मर्यादित आहे. एकट्या चित्रपटासाठीही राखून ठेवलेला.
-गणेश मतकरी.

3 comments:

सर्किट May 18, 2009 at 11:51 AM  

एकदम पटलं. पहिल्यांदा पाहिला, तेव्हाच मी ह्या चित्रपटाचा फ़ॅन झालो होतो. कितीतरीदा पाहून झाला, आणि अनेकांना सुचविलाही. फ़क्त एकच जाणवलं की सुरूवातीपासून मस्त स्पीड पकडलेला हा सिनेमा शेवटचा अर्धा तास बराचसा स्लो होतो. आणि ’दुसऱ्या’ दिवशी झोपेतून उठल्यावर, तो त्या चक्रातून सुटला ह्याचा आपल्याला जेवढा आनंद झालेला असतो, त्याच्या अर्धा ही बिल च्या चेहऱ्यावर येत नाही. त्या सीन मध्ये त्याच्या अभिनयात अजून एनर्जी हवी होती असं वाटत रहातं.
सुरेख परीक्षण!

ganesh May 19, 2009 at 11:17 AM  

Thanks circuit. its a truly amazing film.

सचिन उथळे-पाटील April 6, 2010 at 7:33 AM  

सर,एकदम मस्त आहे चित्रपट आहे. पहिल्यादा पाहिला तेव्हा जरा अवघड च वाटला.

तुमची पोस्ट वाचल्यावर पुन्हा एकदा पाहिला.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP