वैचारिक सत्याचा पाठपुरावा

>> Wednesday, May 20, 2009



पंधरा वर्षांपूर्वी आलेला "क्वीझ शो' हा चित्रपट पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणावर आधारित आहे. ताजेपणा टिकवून ठेवल्यामुळे इतक्‍या वर्षांनंतरही "क्वीझ शो' विचार करायला लावतो.


आयुष्याने शिकवलेले धडे, व्यक्तीच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वापेक्षा तिच्या प्रतिभेने तयार होणारा आभास, व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा तिने मिळविलेल्या पैशांचा देखावा मांडणारा क्वीझ शो, या शोदरम्यान झालेल्या फसवणुकीचा संशय आणि तपास लावण्याचा प्रयत्न, हे सर्व मुद्दे आपण हल्लीच "स्लमडॉग मिलेनिअर'मध्ये पाहिले आणि त्याच्या गुणदोषांची चर्चा केली. गंमत म्हणजे, स्लमडॉगपेक्षा संपूर्णपणे वेगळा आणि तरीही वर उल्लेखलेल्या मुद्‌द्‌यांनाच अचूक स्पर्श करणारा 1994 चा "क्वीझ शो' मात्र कसा कोण जाणे, सर्वांच्याच विस्मरणात गेला. मला याची अचानक आठवण झाली ती परवा रात्री एक वाजता तो टीव्हीवर दिसला तेव्हा. मात्र एकदा पाहिला असूनही मी तो पुन्हा एकदा संपूर्णपणे पाहिला. आज पंधरा वर्षांनंतरही तो आपला ताजेपणा तसाच टिकवून आहे.
क्वीझ शो आणि स्लमडॉग यात एक महत्त्वाचा फरक आहे. स्लमडॉग हा बॉलिवूड घटकांना अंगीकारत असणारा "मसाला' थ्रिलर आहे. क्वीझ शोमध्ये थ्रिलरचे काही घटक जरूर आहेत, मात्र तो केवळ करमणूक या एकमेव हेतूने बनवलेला नाही. 1950 च्या दशकात अमेरिकेत घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणावर तो आधारित आहे आणि स्वतःचे सत्य घटनेवर आधारित असणे तो अत्यंत गांभीर्याने घेतो. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकन समाजात एक प्रकारचा भाबडेपणा होता. पुढे समाजाच्या अनेक प्रतिष्ठित चेहऱ्यांनी, स्वच्छ प्रतिमा बाणवणाऱ्या अनेकांनी जनतेची दिशाभूल सातत्याने केली. यात चित्रपट तारे- तारका होत्या, खेळाडू होते, कायदेपंडित होते. या अनेकांनी जनतेला दिलेल्या धक्‍क्‍यांनी समाज इतका बदलत गेला, की आज कशावरही चटकन विश्‍वास ठेवणं त्याला अवघड जावं. एका बाजूने याला शहाणपण म्हटलं, तरी सत्यावर, पवित्रतेवर, चांगुलपणावर विश्‍वास ठेवण्याची क्षमता हरवत जाणं, ही काही चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. समाजाच्या या बदलाची सुरवात प्रथम झाली ती क्वीझ शोमध्ये येणाऱ्या प्रकरणापासून, असं मानणारा एक वर्ग आहे. मी म्हणेन, की सुरवात असो वा नसो, चार्ल्स व्हॅन डोरेन आणि ट्‌वेंटीवन नामक क्वीझ शो यांचा समाजाच्या निबर होण्यात निदान हातभार लागला असेल हे निश्‍चित.
"ट्‌वेंटीवन'ची लबाडी बाहेर आल्यानंतर आपल्या वागण्याचं समर्थन करणारं एक पात्र इथे म्हणतं की, "इट इजन्ट लाईक वुई आर हार्डन्ड क्रिमिनल्स हिअर- वुई आर इन शो बिझनेस'. आपलं टीव्ही उद्योगाचा भाग असणंच आपल्याला जणू नैतिक मूल्यांच्या चौकटीतून बाहेर काढत असल्याचं मानणारी इथली पात्रंच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या अनेक घटनांमागच्या कारणांची सूचक आहेत.
चित्रपटाचा काळ आहे 1958 चा. गेमशोंचं नाव तर मी सांगितलं आहेच- "ट्‌वेन्टीवन'. एन. बी.सी. या प्रथितयश चॅनेलवरच्या या शोमध्ये दोन प्रतिस्पर्धी साउंडप्रूफ बूथ्समध्ये बसून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देतात. प्रश्‍न तसे कठीण; सहजासहजी उत्तर माहीत नसलेले. चित्रपट सुरू होताना या प्रश्‍नांची अचूक उत्तरं देत, प्रत्येक भागात बाजी मारणारा अन्‌ पुनरागमन करणारा तरबेज खेळाडू आहे हर्बी स्टेम्पल (जॉन टर्टुरो). जॉन हा स्पर्धेत टिकून आहे. संचालकांना आणि कार्यक्रमांच्या प्रायोजकांना (छोट्या भूमिकेत, दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी) हवा आहे. कारण तो दिसायला मध्यम, काहीसा आगाऊ असला तरी सामान्य प्रेक्षकाला आपला वाटणारा आहे. मात्र अखेर आजच्याप्रमाणेच तेव्हाही महत्त्व असणार ते शोच्या रेटिंगला किंवा अधिक ओळखीचा शब्द वापरायचा तर टी.आर.पी.ला. ते फार वर जात नसल्याचं लक्षात येताच निर्माता डॅन एनराईट (डेव्हिड पेमर) हर्बला सांगतो, की स्पर्धेतून बाहेर पड. डॅनची इच्छा असते की चार्ल्स व्हॅन डोरेन (राल्फ फाइन्स) या प्रत्येकाला आवडेलशा, देखण्या, विद्वान घराण्याचा वारसा सांगणाऱ्या तरुणाला शोचा नवा नायक करण्याची. हर्ब नाखुषीनेच हरायला तयार होतो, पण एकदा बाहेर पडल्यावर त्याला आपल्या चुकीचा पश्‍चात्ताप व्हायला लागतो. चार्ल्सच्या वाढत्या लोकप्रियतेचा मत्सरही वाटायला लागतो आणि तो डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नीकडे धाव घेतो. कोर्टात केस दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असताना डिक गुडविन (रॉब मॉरो) या कॉंग्रेशनल कमिटी इन्वेस्टिगेटरची नजर या प्रकरणावर पडते आणि तो त्याच्या मुळाशी जायचं ठरवतो.
"क्वीझ शो' हा तीन बाजूंनी कथानकाकडे पाहतो. हर्ब, चार्ल्स आणि गुडविन ही तीन पात्रं. या तिघांचे दृष्टिकोन कथानकाच्या प्रत्येक पातळीवर महत्त्वाचे ठरतात. ते उघडच परस्परविरोधी आहेत. हर्बला स्वतःवर होणारा अन्याय दिसतो आहे. मात्र, क्वीझ शोने मिळवून दिलेले पैसे उडवून टाकणं, ही त्याचीच चूक आहे. त्याचा राग हा तो या घडीला कफल्लक असण्यातून आला आहे. हर्ब नेहमी स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करतो. आपण लबाडी करून, संयोजकांच्या संगनमताने जिंकत होतो. याचाच अर्थ चार्ल्सही तेच करतो, अशी त्याची खात्री आहे. चार्ल्सचे पुलित्झर पारितोषिक मिळवणारे वडील आणि काका, लोकप्रिय कादंबरीकार आई, त्याचं उच्च शिक्षण हे हर्बच्या खिजगणतीत नाही. त्याचं चार्ल्स भ्रष्ट आहे असं मानणं खरं आहे. मात्र पुराव्याशिवाय तसा आरोप करणं योग्य नाही.
दुसऱ्या बाजूला आहे चार्ल्स. चार्ल्सला सारा मोह पैशांचा नाही, मात्र लोकप्रियतेचा आहे. आपल्या घराण्यातल्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपुढे आपलं कोणीच नसणं त्याला खाणारं आहे. त्याचं भ्रष्ट होणं हे आपली समाजापुढली प्रतिमा उच्च करण्याच्या इच्छेमधून आलं आहे. आपला खोटेपणा त्याला डाचत राहतो. मात्र स्वतःच तयार केलेल्या सापळ्यातून बाहेर पडणं त्याला कठीण जातं.
तिसरा दृष्टिकोन आहे तो गुडविनचा. गुडविन या प्रकरणाच्या मागे आहे. कारण टेलिव्हिजनचा वाढता वरचष्मा त्याच्या कल्पनेपलीकडचा आहे. गुडविन सत्यापर्यंत तर पोचतो, पण चार्ल्सशी झालेल्या मैत्रीमुळे तो त्यात गोवला जावा, हे गुडविनला पटत नाही. मात्र त्याला वाचवणार तरी कसा? कारण चार्ल्स हा ट्‌वेंटीवनचा सर्वांत यशस्वी स्पर्धक आणि त्याला वाचवून केस डळमळीत करणं हेदेखील आता गुडविनच्या शक्तीपलीकडे गेलेलं असतं.
क्वीझ शोचे हे तीन दृष्टिकोन पाहिले तर लक्षात येईल, की इथे काळा-पांढरा असा प्रकार नाही. गुडविन त्यातल्या त्यात सद्‌वर्तनी आहे, पण तो त्रयस्थ आहे. प्रकरणाशी त्याचा संबंध केवळ तपासापुरताच आहे. हर्ब आणि चार्ल्स हे वेगवेगळी पार्श्‍वभूमी असणारे असले तरी, त्यांच्या वागण्यामागची कारणं वेगवेगळी असली तरी अखेर दोघेही भ्रष्ट आहेत. चार्ल्सचं खाणारं मन हे त्याला प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून नायक किंवा प्रोटॅगॉनिस्ट बनवतं. पण हर्बप्रमाणे त्याचं चित्रणही ग्रे शेड्‌समधूनच तयार होणारं आहे.
दिग्दर्शक रॉबर्ट रेडफर्ड आणि पटकथाकार पॉल अटान्सिओ हे वेळोवेळी या दृष्टिकोनांमधला अन्‌ व्यक्तिरेखांमधला संघर्ष हा समाजाच्या नैतिक अधोगतीचा दिशादर्शक म्हणून वापरतात. मुळात टीव्ही उद्योगाला कायद्याचा बडगा दाखवायला निघालेल्या गुडविनचा अखेर भ्रमनिरास होणं आणि ट्‌वेंटीवन शो बंद पडूनही या कारवाईचे बळी हे कमी-अधिक प्रमाणात हर्ब किंवा चार्ल्स ठरणं, हे याचंच एक उदाहरण. क्वीझ शोची शैली ही प्रत्येक प्रमुख घटनेला, व्यक्तिरेखेच्या वागण्याला, युक्तिवादाला काउंटरपॉइंट उभा करणारी आहे. हर्बच्या दृष्टीने चार्ल्स खलनायक आहे, परंतु प्रत्यक्ष चार्ल्सचं घटनांवर नियंत्रण आहे का? गुडविनला चार्ल्सच्या भ्रष्ट असण्याचा सुगावा आहे. मात्र चार्ल्सच्या विद्वान घराणेशाहीचा त्याला मोहही पडतो आहे. मग चार्ल्सच्या वागण्याचं कारण तो या परिस्थितीत समजू शकेल का? चित्रपटातल्या व्यक्तिरेखा एकमेकांना समजून घेतील किंवा नाही? मात्र चित्रपट प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची संधी देतो ती व्यक्तिरेखांवरचा फोकस बदलता ठेवून, एकाच दिशेने संघर्ष घडवत न नेता, त्यातल्या प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी देत, संघर्षामध्ये बदलाच्या शक्‍यता जाग्या ठेवत.
क्वीझ शोवर काही प्रमाणात टीका झाली होती ती पटकथाकार आणि दिग्दर्शकाने घटना मांडतेवेळी घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे. नावं आणि प्रत्यक्ष संदर्भ न बदलता काळात आणि इतर तपशिलात केलेल्या बदलांमुळे. माझ्या दृष्टीने हे क्षम्य आहे. अखेर सत्यदेखील दोन प्रकारचे असते. प्रत्यक्ष घटनात्मक पातळीवरचं सत्य आणि त्या घटनांमधून जे सिद्ध होत जातं त्याचा पाठपुरावा करणारं वैचारिक सत्य. या वैचारिक सत्याला तपशिलातला बदल इजा पोचवू शकत नाही. चित्रकर्त्यांचा या बदलामागचा दृष्टिकोन हा या दुसऱ्या पातळीला अधोरेखित करण्याच्या हेतूने आला आहे, म्हणूनच चालण्यासारखा. मूळ घटनांना पन्नास अन्‌ चित्रपटाला पंधरा वर्षं होऊनही "क्वीझ शो' आजही विचार करायला लावतो, त्याचे कारणदेखील या वैचारिक सत्याच्या पाठपुराव्यात शोधता येईल.
- गणेश मतकरी

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP