टाइमक्राईम्स : परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स
>> Wednesday, May 27, 2009
सुखान्त शेवट म्हणजे काय ? नायक (आणि असल्यास नायिका) हॅपीली एव्हर आफ्टर रहाण्याची सोय झाली की चित्रपट सुखान्त झाला असं आपण म्हणतो. आणि एका परीने ते बरोबर देखील आहे. कारण शेवटी प्रत्येक चित्रपट हा एका विशिष्ट दृष्टिकोनातून सांगितलेला असतो. हा दृष्टिकोन त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवून रचला जातो. तो नायक आणि त्याला पडलेल्या अडचणींचं निवारण हा कथानकाचा आवाका. हाच तर्क पुढे नेला तर फायदा नायकाचा हेच सुखान्त शेवटाचं प्रमुख लक्षण असणार हे उघड आहे.
मग उपप्रश्न असा, की नायक जेव्हा सांकेतिक प्रतिमेप्रमाणे सदगुणांचा पुतळा नसतो तेव्हाचं काय ? जेव्हा तो केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करून, वेळ प्रसंगी एखादा गुन्हा करूनही आपला स्वार्थ पाहतो, तेव्हाही आपण त्याला माफ करणं अपेक्षित आहे का? आणि ही माफी किती गंभीर गुन्ह्याबद्दल करायची ? चोरी ? मारामारी? की खून? गोड शेवटाचा पाठपुरावा करणा-या नायकाला कोणत्या थराला जाण्याची मुभा प्रेक्षकाने द्यावी ? नाचो विगालोन्दोच्या टाइमक्राईम्सच्या प्रेक्षकाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शोधावं लागेल.
प्रायमर नावाच्या लो- लो बजेट विज्ञानपटाविषयी नुकतीच पोस्ट टाकण्यात आली आहे. तो प्रायमर तांत्रिकदृष्ट्या विज्ञानपट होता. मात्र विज्ञानपटाकडून अपेक्षित असणारी दृश्य चमत्कृती त्यात नव्हती. दोन मित्रांनी अचानक लावलेला टाइम मशीनचा शोध आणि त्यांचा श्रीमंत होण्याचा बेत असं याच्या कथानकाचं स्वरूप असलं, तरी चित्रपटाचा जीव होता तो चर्चांमध्ये. कालप्रवास आणि त्यातून तयार होणा-या विसंगती याविषयी भरपूर बोलणं आणि प्रेक्षकांना चांगलंच गोंधळात पाडणं हा प्रायमरचा प्रमुख अजेंडा होता.
लो बजेट असणं, विज्ञानपट असणं आणि कालप्रवासातील विसंगतीसंबंधित कथानक असणं या तीनही गोष्टी टाइमक्राईम्समध्येदेखील आहेत, मात्र इथे त्यावर चर्चा करण्यात कोणाला रस नाही. इथला ढाचा आहे तो गुन्हेगारी चित्रपटाचा. एका सामान्य माणसाचं गुन्हेगारी वळणाच्या अनपेक्षित घटनांमध्ये गुरफटत जाणं इथे येतं. पटकथाकार अन् दिग्दर्शकाचा भर आहे, तो प्रेक्षकाला जराही विचार करायला उसंत न देता, एकावर एक धक्के देत राहणं, नवी वळणे घेत गोष्ट पुढे नेत राहणं यावर. प्लॉटिंग हे इथे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यक्तिरेखांच्या अस्सलपणापेक्षा लेखक दिग्दर्शकाच्या डोक्यातून येणा-या चाली प्रतिचालींना खेळण्याकरीता प्यादी उपलब्ध असण्याची इथे गरज आहे.
चित्रपटाचा नायक आहे हेक्टर (कारा एलेहाल्डे) आता याला नायक म्हणावा का हा प्रश्न चित्रपट संपल्यावर ज्याचा त्याने सोडवावा, पण हेक्टर ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे ( का हेक्टर या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, असं म्हणूया ?) हे तर खरंच. तर हेक्टर आपल्या क्लारा (कॅन्डेला फर्नांडेझ) या मैत्रिणीसह गावाबाहेरच्या एका छोट्या घरात उतरलाय. परिसर त्याला परिचित नसावा. दुर्बिण घेऊन आजूबाजूचं निरीक्षण करताना त्याला जंगलात एक मुलगी दिसते. ही मुलगी आपले कपडे उतरवत असते. आता हेक्टरचं कुतूहल (!) जागं होतं आणि तो त्या मुलीच्या शोधात निघतो.
हेक्टरला मुलगी दिसते खरी. मात्र तिच्याजवळ पोहोचण्याआधीच एक मुखवटाधारी माणूस त्याच्या हातात कात्री खुपसतो. जिवाच्या आकांताने पळत अन् मागावरल्या मुखवटाधा-याला चुकवत हेक्टर टेकडीवरच्या एका घरात पोचतो जिथे त्याची एका शास्त्रज्ञाशी (दिग्दर्शक विगालान्दो) गाठ पडते. हा शास्त्रज्ञ त्याला लपवण्याच्या मिशाने एका कालयंत्रात बसवतो.
यंत्रातून बाहेर आलेला हेक्टर हा काळाच्या प्रवाहात थोडासाच, म्हणजे तासभर मागे गेलेला असतो. अर्थात बंगल्यावर ताबडतोब परत जाणं आता शक्य नसतं, कारण जंगलातल्या मुलीचा सुगावा लागायला अजून थोडा वेळ बाकी असणारा हेक्टर अजून बंगल्यातच असतो.
टाइमक्राईम्सला विशिष्ट परिस्थितीत उदभवणा-या शक्यतांची परम्युटेशन्स पाहण्याचा एक प्रयोग म्हणता येईल. दोन घरं, सहा व्यक्तिरेखा (त्यातल्या तीन म्हणजे स्वतः हेक्टर) अंदाजे दीड-दोन तासांचा कालावधी आणि कालप्रवाहात मागे-पुढे जाण्याची सोय या गोष्टी गृहीत धरून काय काय घडू शकेल (पण मन्कीज पॉच्या नियमानुसार केवळ वाईट घडवण्याच्या शक्यताच लक्षात घेऊन) याचा चित्रपट तपास करतो. मला हा पाहताना थोडी ग्राऊंडहॉग डे चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नायक जसा एकच दिवस पुन्हा-पुन्हा जगत परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, तसाच काहीसा करुण प्रयत्न हेक्टरदेखील करताना दिसला. मात्र बिल मरीने उभा केलेला ग्राऊंडहॉग डेचाचा नायक आणि हेक्टर यांच्या परिस्थितीत एक मोठा फरक आहे. बिल मरीने कितीही चुका केल्या, तरी रोज दिवस नव्याने सुरू होत असल्याने, तो नवा प्रयत्न करायला नेहमीच मोकळा राहू शकतो. हेक्टरची गोष्ट तशी नाही. त्याच्या हातून घडलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काळात नोंदल्या जातात, त्यामुळे त्याचा मार्ग अनेकदा कितीतरी पटीने बिकट होऊ शकतो.
आधी मी शेवटाबद्दल एक प्रश्न उपस्थित केला असला, तरी इथला शेवट मला आवडला. तो काही प्रमाणात विकृत निश्चित आहे, पण त्याला स्वतःचं तर्कशास्त्र आहे. चित्रपटाने घालून दिलेल्या नियमांचे तो पालन करतो. हेक्टरच्या वागण्यालाही तो सुसंगत आहे. त्यातून हेक्टर आपल्या हातून घडलेली कृत्यं मोठ्या आनंदातून करतो अशातला भाग नाही. ब-याचदा त्याचा नाईलाज झालेलाही दिसून येतो. आपल्या वैज्ञानिक गुन्हेगारीपट या स्वतःच आखून घेतलेल्या मर्यादेपलीकडे मात्र टाइमक्राईम्स जाऊ इच्छित नाही. काहीवेळा मुळात गिमिकवर आधारलेले चित्रपटही (उदा ग्राऊंडहॉग डे, मेमेन्टो) शेवटच्या काही प्रसंगांमधून असं काही भाष्य करतात ज्यांनी त्यांच्या गिमिक्सचा विसर पडावा. इथे मात्र तसं होत नाही. याला दोष म्हणता येणार नाही. त्याचं यश मर्यादित आहे. एवढं म्हटलं, तरी पुरे.
- गणेश मतकरी
1 comments:
Enlightening.
Post a Comment