बॉबीः ऐतिहासिक-अनैतिहासिक
>> Friday, December 4, 2009
बॉबीचं (२००६)वर्णन हे मुख्य धारेतला प्रायोगिक चित्रपट असं सहजपणे करता येईल. प्रायोगिक अशासाठी, की त्याला सांकेतिक रचना नाही. म्हणण्यासारखं कथानक नाही. केवळ एका ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे. पण केवळ संदर्भ. कारण चित्रपटभर आपण ज्या घटना पाहतो, त्यांचा या घटनेशी किंवा त्यात दिसणा-या व्यक्तिरेखेशी काही संबंध नाही. किंबहूना या इतर घटनाक्रमाला सत्याचा काही आधार नाही. यातली पात्रं ही काल्पनिक आहेत. ही काल्पनिक पात्रं एका हॉटेलमध्ये दिवसभर घडणा-या घाडामोडी दाखवितात आणि ती आपापल्या स्वतंत्र कथासूत्रात बांधलेली आहेत. या प्रत्येक कथासूत्राची लांबी स्वतंत्रपणे १०-१२ मिनिटांहून अधिक नसेल, पण चित्रपट बनतो या कथासूत्राच्या एकत्र येण्यातून. क्वचित एका कथेतील पात्र दुस-यात जातं, नाही असं नाही, पण एरवी या गोष्टी स्वतंत्रपणे पाहण्यासारख्या आहेत.
चित्रपटाला मुख्य धारेतला म्हणता येईल तो प्रामुख्याने त्यात भाग घेणा-या कलावंतांमुळे. ही छोटी छोटी कथानकं हॉलीवू़डच्या मोठ्यात मोठ्या स्टार्सनी उभी केली आहेत. चित्रपटाची गंमतही या मोठ्या ता-यांना छोट्या (किंवा काही वेळा सूक्ष्म) भूमिकांत बघण्यातही आहे.
चित्रपटाचं नाव हे उघडच फसवणारं आहे. गांधी, हॉफी, माल्कम एक्स किंवा अली यांसारखे प्रसिद्ध व्यक्तिरेखांच्या नावाचा वापर करणारे चित्रपट हे सामान्यपणे त्या त्या व्यक्तिविषयी सांगणारे, ब-याच प्रमाणात चरित्रात्मक असतात. बॉबी हे नाव आहे १९६८मध्ये होऊ घातलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जॉन एफ केनडींचे बंधू रॉबर्ट एफ केनडी यांचं. ज्यांची ४ जून १९६८ रोजी कॅलिफोर्नियामधल्या अँबेसेडर हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. या हॉटेलमध्येच त्यांचं प्रसिद्धी कार्यालय होतं आणि हा दिवस त्यांच्या एका छोट्या राजकीय विजयाचा दिवस होता. राष्ट्राध्यक्षपदाकडे नेणारं आणखी एक पाऊल. दुर्दैवाने हे पाऊल त्यांचं, अखेरचं ठरलं. आपल्याकडे फार माहिती नसलं तरी बॉबी केनड़ी हे अमेरिकेतलं तसं लोकप्रिय नाव आहे आणि अनेकांचा विश्वास आहे की जर ते निवडून आले असते तर युद्धबंदीबरोबर अनेक सकारात्मक गोष्टी घडवून त्यांनी देशाचं स्वरूप आमूलाग्रपणे बदललं असतं.
बॉबी चित्रपट घडतो अँबेसेडर हॉटेलमध्ये. जिथे रात्री केनडी येणं अपेक्षित आहे. तुकड्या तुकड्यांत केनडींच्या त्या दिवसभरातल्या हालचालींची माहितीही तो आपल्याला देतो. हे प्रत्यक्ष चित्रिकरण असल्याने केनडींची भूमिका कोणा अभिनेत्याने केली नसून पडद्यावर दिसणारे प्रत्यक्ष बॉबी केनडीच आहेत, मात्र हा भागही चित्रपटांच्या इतर कथासूत्रांच्याच लांबीचा असल्याने बॉबीदेखील या स्टारकास्टचाच एक भाग म्हणावे लागतील आणि त्यांची गोष्ट छोट्या कथानकांपैकी एक. इतर स्टार्समध्ये विलियम एच. मेसी (हॉटेल मॅनेजर), शेरोन स्टोन (त्याची पत्नी), हीदर ग्रॅहेम (त्याची प्रेयसी आणि टेलिफोन आँपरेटर), ख्रिश्चन स्लेटर (नुकताच नोकरीवरून काढलेला असिस्टंट मॅनेजर), डेमी मूर (कायम नशेत असणारी गायिका), अँथनी हॉपकिन्स (निवृत्त डोअरमन), लॉरेन्स फिशबर्न ( शेफ), हेलन हण्ट आणि मार्टिन शीन (समारंभासाठी आलेलं जोडपं), लिंडसे लोहान आणि एलाया वूड (स्वतःच्या लग्नासाठी हॉटेलात उतरलेलं जोडपं) आणि अँश्टन कचर (ड्रग डीलर) यांची वर्णी लागते. ही यादी संपूर्ण नाही, पण एकंदर स्वरूपाची कल्पना याययला पुरेशी आहे. दिग्दर्शक एमिलिओ एस्तवेज स्वतःही अभिनेता असल्याने त्याने स्वतःही एक भूमिका (डेमी मूरच्या नव-याची) केली आहे.
चित्रपट बॉबी केनेडीच्या अखेरच्या दिवसांवर असून आणि अर्थातच त्यांच्या हत्येने संपत असून, तो त्यांच्यापासून दूर घडवणं हा कलात्मक निर्णय म्हणून योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहे, पण आहे त्या परिस्थितीत तो त्यावेळच्या अमेरिकेचं चित्रं चांगल्यारीतीने रेखाटतो हे खरं. त्यावेळी असलेले जनतेपुढचे प्रश्न, व्हिएतनाम युद्धामुळे आलेली अंदाधुंदी, वर्णभेदाचा नवा टप्पा, बदलते सामाजिक प्रवाह, नव्या (आणि काही अंशी वैफल्यग्रस्त) पिढीचा स्वैराचार, स्वातंत्र्याच्या कल्पना या सगळ्या गोष्टींना तो एकत्र करतो आणि शेवटच्या केनेडींच्या भाषणाचा प्रभावी वापर. या परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि समस्यांवर त्यांच्या मनात असणारे तोडगे आपल्यापुढे मांडण्यासाठी करतो. केनेडींचं हे चित्र सकारात्मक आणि पूर्णपणे एकतर्फी आहे हे मान्य, पण त्या क्षणापुरता चित्रपट आपल्याला इतिहासातल्या एका निर्णायक क्षणावर नेऊन पोहोचवतो आणि या माणसाला न मिळालेल्या संधीची हळहळ वाटायला लावतो. ऐतिहासिक नसूनही एका व्यक्तीच्या विचारांचं दर्शन घडवणारा विचार म्हणून बॉबी उल्लेखनीय वाटतो.
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment