‘इट्स ऑल गॉन पीट टाँग’ - एका डीजेचा अस्‍तोदय!

>> Monday, October 1, 2012



मध्यंतरी माहितीपट या विषयावर बोलण्यासाठी एका महाविद्यालयात गेलो होतो. चित्रपट पाहण्याच्या सवयीने अनेक माहितीपटदेखील आपसूक पाहून झाले असले तरी या विषयावर कधी बोललो नव्हतो. त्यामुळे उजळणी करणे भाग होते. माहितीपटाच्या विविध प्रकारांकडे पाहताना एक इंटरेस्टिंग प्रकार आठवला. तो म्हणजे मॉक्युमेंटरी. अर्थात मॉक डॉक्युमेंटरी. प्रत्यक्ष डॉक्युमेंटरी या विभागात हे चित्रपट येत नसले तरी ते माहितीपटाला उत्तम रीतीने जाणतात आणि त्याचा फॉर्म, आराखडा वापरतात. यांचा आव हा डॉक्युमेंटरी बनवल्याचा असतो आणि या चित्रप्रकाराची बरीच वैशिष्ट्ये त्यात वापरली जातात. ‘टॉकिंग हेड्स’ नावाने ओळखल्या जाणा-या विषयाला संबंधितांच्या मुलाखती/प्रतिक्रिया, संगीताचा जेवढ्यास तेवढा वापर, चित्रीकरणात सौंदर्यापेक्षा उस्फूर्ततेला अधिक महत्त्व, वास्तववादी शैली असे घटक या प्रकाराला माहितीपटाचे स्वरूप देतात. किंबहुना अनेकदा हे चित्रपट पाहताना आपण खरा माहितीपट पाहिल्याचा भास होतो.
2004 चा ‘इट्स ऑल गॉन पीट टाँग’ हा माहितीपट मॉक्युमेंटरी फॉर्म्युल्यात थोडा बदल करून काढण्यात आला आहे.  यात माहितीपटाच्या शैलीचा वापर असणे आणि मुळात दाखवण्यात आलेली घटना खरी नसणे, ही दोन्ही लक्षणे तर मॉक्युमेंटरीचीच आहेत. मात्र हा खरा माहितीपट नाही, हे पाहणा-याच्या चटकन लक्षात येईल अशा काही स्पष्ट जागा इथे आहेत; ज्या सामान्यपणे मॉक्युमेंटरीत टाळल्या जातात.एखाद्या विशिष्ट घटनेशी संबंधित माहितीपट हा अपवाद वगळता, प्रत्यक्ष घटना घडून गेल्यावरच बनवला जात असल्याने, त्या घटनेचे तपशीलवार छायाचित्रण उपलब्ध असण्याची काहीच शक्यता नसते. पीट टाँगमधले प्रमुख घटनाचक्र हे  फ्रँकी वाइल्ड (पॉल के) या सुप्रसिद्ध डिस्क जॉकीच्या अर्थात डीजेच्या करिअरच्या अचानक ओढवलेल्या अंताशी संबंधित आहे. हा अंत ओढवतो तो अनपेक्षितपणे त्याला येणा-या बहिरेपणामुळे. प्रत्यक्ष माहितीपटात या प्रकारच्या बहिरेपणाची सुरुवातीची लक्षणे कधीच चित्रित होऊ शकली नसती, खासकरून त्या लक्षणांचे गांभीर्य त्या वेळी त्याच्या स्वत:च्याही लक्षात आले नसताना!
शिवाय या प्रसंगांची सुरुवात एखाद्या समारंभात वा मुलाखतीदरम्यान न होता फ्रँकी एकटाच घरी असताना झाल्यामुळे या प्रसंगांचा व्हिडिओ रेकॉर्ड कोणी आणि का ठेवला असावा यालाही स्पष्टीकरण नाही. या एका विसंगतीप्रमाणेच ख-या माहितीपटाबरोबर न जाणारी दुसरी विसंगती आहे फ्रँकीच्या भासांची. त्याच्या ड्रग्जच्या सवयीचे दृश्यरूप असणारा अस्वलासारखा दिसणारा बॅजर हा प्राणी इथे वेळोवेळी दिसतो. एकदा तर बॅजरच्या मुखवट्याआड दडलेली फ्रँकीचीच प्रतिकृतीदेखील दिसते. हा सारा भाग जरी ख-याची शक्य तितकी नक्कल करणा-या मॉक्युमेंटरीत खटकू शकतो हे मानले, तरी तो इतर अस्सल घटनांत इतका छान लपतो, की आपण त्याचा फार विचार करत नाही.
चित्रपटाचे नाव हा थोडा शब्दांचा खेळ आहे. ‘पीट टाँग’ हे बीबीसीवर काम करणा-या आणि स्वत:चे रेकॉर्ड लेबल असणा-या प्रसिद्ध डीजेचे नाव आहे. ‘इट्स ऑल गॉन पीट टाँग’मधला ‘पीट टाँग’ हा ‘बिट राँग’ ऐवजी वापरून तयार केलेला वाक्यप्रयोग चित्रपटाच्या खूप आधी, म्हणजे 1987 मध्ये पॉल ओकनफील्ड या ब्रिटिश रेकॉर्ड प्रोड्युसरने वापरला होता. या वाक्याची लोकप्रियता, त्याचा संगीत क्षेत्राशी असणारा संबंध आणि चित्रपटाचा विषय पाहून दिग्दर्शक मायकल डाउजने हे वाक्य इथे उसने घेतले आहे. त्यात भर म्हणून सुरुवातीच्याच एका प्रसंगात पीट टाँगने हजेरीदेखील लावली आहे. स्वत:च्याच गुर्मीतल्या फ्रँकीचा इंटरव्ह्यू घेताना ‘पीट टाँग’च्या चेह-यावरले हावभाव पाहण्यासारखे आहेत. टाँगप्रमाणेच संगीत क्षेत्रातल्या अनेकांचा इथे असणारा सहभाग, त्यांनी फ्रँकीच्या कामाविषयी, करिअरविषयी बोलणे, हे जाणकारांसाठी खरोखर माहितीपूर्ण आहे.
चित्रपट साधारण दोन अंकांत विभागला जाऊ शकतो. त्याची सुरुवात होते ती इबिझास्थित डीजे फ्रँकी यशाच्या शिखरावर असताना. क्षेत्रातल्या थोरामोठ्यांकडून त्याच्या डान्स म्युझिकशी सहजी खेळण्याविषयी हेवामिश्रित कौतुक, त्याच्या डोक्यातली हवा आणि विस्कळीत जीवनशैली दाखवणारे प्रसंग आणि इबिझाच्या क्लब सीनमधले तुकडे एकत्र गुंफून हा भाग तयार होतो. डॉक्युमेंटरीकडे प्रत्यक्ष घटनांचे चित्रण म्हणून न पाहता वास्तवाचे संकल्पनेच्या पातळीवरले दर्शन म्हणून पाहिले, तर हा भाग सर्वच बाबतीत खराखुरा. कलावंत एका पातळीला पोहोचल्यावरचा त्याचा माज, या व्यवसायातले वातावरण, नात्यांमधला तकलादूपणा, कामाची/लोकप्रियतेची आणि खरीखुरी नशा, हे सगळे आपल्या अनुभवापलीकडल्या विश्वाची झलक दाखवणारे. हे सारे संपते ते फ्रँकी पूर्ण बहिरा झाल्यावर. संगीतावरच व्यवसाय अवलंबून असणारा फ्रँकी आता निरुपयोगी ठरतो. आजवर त्याला डोक्यावर बसवणारे लोक मग त्याला चटकन बाजूला करायला मागेपुढे पाहत नाहीत. फ्रँकी व्यवसायातून फेकला जातो, त्याची बायको त्याला सोडून जाते आणि आपल्या नि:शब्द जगात तो स्वत:ला कोंडून घेतो. दुसरा अंक म्हणजे पुन्हा स्टारडमकडे नेणारा प्रवास मात्र थोडा जमवून आणलेला आहे. तसाच त्याचा आदर्शवादी शेवटदेखील. तरी इथेही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. फ्रँकीला ध्वनीमध्ये दिसणारे पॅटर्न्स दृश्यात दिसायला लागणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, पण इतर जागाही आहेत. पण इथली सर्वात अशक्य गोष्ट म्हणजे या प्रवासादरम्यान कोणा डॉक्युमेंटरी फिल्ममेकरचा कॅमेरा चालू असणे. त्यामुळे इथे नाट्य आहे, पण छायाचित्रणासाठी प्रेरक स्थिती नाही. शिवाय फ्रँकीचा पुन:प्रवेशही खूपच सहज झाल्यासारखा. सुखांत शेवटाची गरज म्हणून.
मात्र या दृष्टिकोनातल्या त्रुटी बाजूला ठेवून चित्रपट पाहावा, तो त्याच्या एकसंध परिणामासाठी. फ्रँकीची दंतकथा त्यातल्या दृश्य परिमाणासाठी, कोपरखळ्यांसाठी, वेगळ्या जगाच्या सफरीसाठी नक्कीच आवडण्यासारखी आहे. त्यातला ध्वनीचा वापर खास लक्षपूर्वक ऐकण्याजोगा. फ्रँकीच्या बहिरेपणातले टप्पे, बॅजरची बडबड, शांततेचा वापर, संगीत आणि व्हायब्रेशन्स यामधला संबंध आणि त्याचे   दृश्यरूप अशा अनेक गोष्टी प्रेक्षक साउंडट्रॅकप्रमाणे पाहतो. साउंडट्रॅकवरून आठवण झाली, या चित्रपटाची एक हिंदी आवृत्ती ‘साउंडट्रॅक’ नावाने आपल्याकडे येऊन गेली. ती करावी असे वाटणे एवढी एकच गोष्ट उल्लेखनीय. बाकी सगळा आनंदच! नेहमीप्रमाणेच
- गणेश मतकरी

4 comments:

Vivek Kulkarni October 2, 2012 at 7:55 AM  

पहिली गोष्ट म्हणजे 'साउंडट्रक' नावाचा हिंदी सिनेमा आला होता हेच माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट एका डीजेच आयुष्य दाखवण्यात काय हशील? किती लोकांपर्यंत हा चित्रपट व त्याचा विषय पोहोचला. डीजे ही पाश्चिमात्य संस्कृती व मोठ्या शहरांची देण आहे. त्यामुळे असा विषय जो की एका इंग्रजी चित्रपटावरन घेणं कितपत बरोबर आहे? जिथे मोठे हिंदी चित्रपट चालण्याची शक्यता कमी होत चालली आहे तिथे असा विषय जो की शहरी लोकांपुरताच मर्यादित आहे तो चित्रपटासाठी निवडून या लोकांनी काय साधलं? मला इथे त्यांच्या प्रयत्नानबद्दल जराही शंका उपस्थित करायची नाहीये. मला म्हणायचंय छोट्या शहरात किंवा खेडेगावात असे विषय चालणार कसे; कारण डीजे कोण असतात व डीजेंच आयुष्य काय असतं हेच मुळात माहित नाही. लहान शहरात आणि खेड्यात डीजे म्हणजे कमाल पातळी ओलांडून जो कर्णकर्कश आवाजात हिंदी आणि मराठी कंठाळी गाणी रीमिक्सफिमिक्स करून वाजवतो तो. त्यामुळे मला कधी कधी यांचा चित्रपट बनवायचा हेतू काय असा प्रश्न पडतो. चित्रपट सर्वांना अपील होईल असा असावा लागतो कारण लातुरात माझे बरेच मित्र एखादा मुंबई-दिल्लीशी निगडीत चित्रपट आला की तो बघायला नाकं मुरडतात. ते सलमानच्या चित्रपटांनासुद्धा नाके मुरडतात.

ganesh October 2, 2012 at 8:22 PM  

Vivek, I agree that adapting Pete Tong is largely pointless but I don't think that just because the profession is alien for the audience, a film cant be made on it. In fact, most films want the audience to get immersed in something outside their sphere of influence so in theory, it should work. Also, if ur friends don't like any films including Salman and all urban cinema ,what do they llike? And the industry can't consider the people who don't like everything, from something as offbeat as Soundtrack to something as main stream as salman's film ,as part of the film audience.

Vivek Kulkarni October 2, 2012 at 11:41 PM  

तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मला जाणवलेली गोष्ट सध्याच्या संक्रमणाच्या काळात (माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार) चित्रपटाकडून काही ठोस मिळत नाहीये ही बाब त्यांना जास्त प्रमाणत जाणवते आहे. तसेच चित्रपटामधलं जग हे वास्तवापासून दूर असतं हे वास्तव त्यांना पचवायला जड जात आहे. काही दिवसांपूर्वीच आमची या विषयावर चर्चा झाली होती. इतके दिवस चित्रपटालं (अर्थात बॉलीवूडमधलं) जग हे खरखुरं असतं असा भाबडा विश्वास त्यांना होता पण नोकरी लागल्यापासून चित्रपटातल्या रंजकतेन मनावर चढवलेली झूल फेकून दिली अन उगडनागडं वास्तव डोळ्यासमोर दिसायला लागल्यामुळे त्यांची भंबेरी उडालीय. त्यामुळेच सलमानसारख्या तद्दन व्यावसायिक सिनेमा नटाचे चित्रपटसुद्धा नकोसे झाले आहेत.

attarian.01 October 6, 2012 at 1:00 AM  

मतकरी जी , मी काही जुने तुम्ही लिहलेले चित्रपट पाहतो आहे , आणि नंतर मला तुमचे त्यावरचे लेख वाचे छे असतात , पण ते सर्च कारता येत नाही , सापडत नाही , आता IRRVERSIBLE पाहिला लेख वाचायचा आहे , सर्च केला तरी सापडत नाही .जुने चित्रपट पटकन सपद्ता येतील आसे काही करा . धन्यवाद .

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP