आर्बिट्रेज-ज्याची त्याची नीतिमत्ता

>> Monday, October 8, 2012

नायक किंवा हीरो या शब्दापेक्षा काही चित्रपटांकरिता प्रमुख व्यक्तिरेखा किंवा प्रोटॅगनिस्ट हा शब्दप्रयोग वापरणे अधिक योग्य वाटते. खासकरून अशा चित्रपटांना, ज्यांचा आशय हा भल्या-बु-याच्या सोप्या ढोबळ कल्पनांवर आधारलेला नसतो, आणि ज्यांना प्रत्यक्ष जगातल्या नैतिक भ्रष्टाचाराची, तडजोडींची जाणीव असते. यात मला उघड नाट्यपूर्ण खलनायकी बाण्याच्या अँटिहीरोंविषयी बोलायचे नाही, तर क्राइम्स अँड मिसडिमिनर्स, वॉल स्ट्रीट, आइड्स आँफ मार्च, ड्राइव्ह अशा चित्रपटांमधल्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांचा संदर्भ इथे अपेक्षित आहे. या व्यक्तिरेखा उघड काळ्या, पांढ-या रंगात येत नाहीत, तर त्यांच्यात गुणावगुणांचे मिश्रण पाहायला मिळते. ब-याचदा आलेल्या संकटातून सुटण्यासाठी त्या टोकाची पावले उचलतात, पण तसे करण्यावाचून इलाज नाही असे त्यांना खरोखरच वाटते. त्यांच्या नजरेत स्वत:ची प्रतिमा इतकी मोठी असते, की आपल्या निर्णयामागे स्वार्थ असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपण करत असलेली कोणतीही गोष्ट ही अखेर ‘ग्रेटर कॉमन गुड’च्या विचारातूनच येत असल्याच्या भ्रमात ते असतात. या वर्षीच प्रदर्शित झालेल्या ‘आर्बिट्रेज’ या चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा रॉबर्ट मिलर (रिचर्ड गेअर) ही साधारण याच साच्यातून उतरली आहे.
 टायपेज किंवा टाइप कास्टिंग ही पद्धत ब-याचदा चित्रपटाचा परिणाम वाढवणारी असते. व्यक्तिरेखेचा पूर्ण विचार करून तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा अभिनेता त्या भूमिकेसाठी घेण्याचा मोठा फायदा म्हणजे प्रेक्षक त्या अभिनेत्याची प्रतिमा ही व्यक्तिरेखेशी जोडून घेतो आणि चित्रकर्त्याला ती उभी करण्यासाठी प्रसंग घडवत बसावे लागत नाहीत. क्वचित दिग्दर्शकाला प्रतिमा संकेतांच्या पलीकडली हवी असेल, तर बरोबर विरुद्ध प्रतिमेचा नटदेखील घेता येतो. आर्बिट्रेजमध्ये रिचर्ड गेअरचे कास्टिंग हे त्याच्या प्रतिमेच्या बाजूनेही आहे आणि विरोधातही, म्हणजे टाइप कास्टिंगही आहे आणि अगेन्स्ट टाइपही. हे कसे? सांगतो.
 गेअरचे दिसणे एका विशिष्ट प्रकारचे आहे. तो आपल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी असणारी श्रीमंत खानदानी असामी दिसतो. गेअर हा महत्त्वाकांक्षी, हाताखालच्यांबरोबर सहज मिसळणारा परंतु त्यांना थोड्या अंतरावर ठेवणारा एक चांगला बॉस वाटतो. चित्रपटातल्या मिलरची हीच प्रतिमा आहे. त्यामुळे तिच्याशी प्रामाणिक राहत दिग्दर्शक निकलस जरेकी अक्षरश: दोन-तीन प्रसंगांत मिलरला उभा करतो. एका प्रचंड यशस्वी उद्योगाचा तो प्रमुख आहे. श्रीमंत, कामात गुंतलेला, पण प्रेमळ, कुटुंबवत्सल. त्याची मुलेही त्याच्याच कंपनीत काम करताहेत. आपली कंपनी एका दुस-या उद्योजकाला विकण्याच्या बेतात तो आहे. आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर तो पोहोचलेला आहे, म्हटले तरी चालेल. रिचर्ड गेअरला पाहताच मिलरच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू क्षणात पटते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू मात्र गेअरच्या सद्वर्तनी प्रतिमेच्या बरोबर उलट. अगेन्स्ट टाइप. मिलरने आपल्या कंपनीत बराच घोटाळा केलाय आणि आपल्या बायकोमुलांना कल्पना न देता तो त्यातून सुटायचा प्रयत्न करतोय. पत्नी एलेनला (सुजन सरंडन) अंधारात ठेवून त्याचे एक प्रेमप्रकरणही चालू आहे. आपल्या ज्युली या मैत्रिणीला (लेटेशिआ कास्टा) त्याने एक आर्ट गॅलरी काढून दिली आहे आणि तिची मर्जी राखण्याचा शक्य तेवढा प्रयत्न तो करतो.
कंपनी मर्जरच्या तणावाखाली असतानाच त्याच्या हातून एक अपघात होतो आणि ज्युली दगावते. मुळातच अतिशय चतुर आणि हिशेबी असणारा रॉबर्ट याही प्रसंगातून मार्ग काढायचे ठरवतो आणि आवश्यक ती सारी पावले  उचलतो. मात्र काय घडले याचा संशय आलेला पोलिस डिटेक्टिव्ह ब्रायर (टिम रॉथ) त्याचा पिच्छा सोडत नाही. मर्जर प्रकरणही डळमळीत दिसायला लागते, पण मिलर हार मानत नाही. मिलरच्या व्यक्तिरेखेचे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व हा आर्बिट्रेजचा सर्वात खास भाग आहे, आणि तो भागच आपल्याला पटकथेत गुंतवून ठेवतो. चित्रपट त्याच्या चांगल्या बाजू दाखवून देतो, पण ते करताना तो त्याच्या गडद बाजूंवर रंगसफेदी करत नाही. नायक निर्दोष हवा, हा एकेकाळचा नियम इथे लागू करण्याचा प्रयत्न करत नाही. खरे तर इथला दृष्टिकोन अधिक पटण्यासारखा आहे. एरवी चित्रपटात सद्वर्तनी लोकांवर खोटाच आळ आलेला दिसतो, मात्र आळ येताच ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न शोभणा-या गतीने विचार आणि कृती करताना दिसतात. मिलर हा मुळातच लबाड असेल तर अशी कसरत हा त्याच्या सेफ्टी मेकॅनिझमचाच एक भाग असणार! आणि धोका दिसताच तो कार्यरत होणार, हे स्पष्टच आहे.
 जरेकीने आपली पटकथा ही प्रसंगांची लांबी आणि संवाद यांचा थोडक्यात पण अर्थपूर्ण वापर करत मांडली आहे. छोट्या छोट्या वाक्यांमधूनही यातला पटकथेचा दृष्टिकोन आणि व्यक्तिचित्रणातले तपशील उघड होतात. इथे मिलरला एक पात्र म्हणते, ‘यू थिंक द मनी इज गोइंग टु फिक्स धिस?’, त्यावर त्याचे उत्तर असते, ‘व्हॉट एल्स इज देअर?’ या व्यक्तिरेखेचा पैशावरचा आणि केवळ पैशावरचा विश्वास अशा ठिकाणी दिसून येतो. तरीही व्यक्तिरेखा वरवरची होत नाही. तिला इमानदारी, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा या विषयांत भले रस नसेल, पण त्या गुणांना सर्वाधिक मानणारे लोक आहेत हे ती मानते, आणि अशा व्यक्तींबद्दल तिला थोडे कौतुकही आहे.
थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवण्यासाठी सतत गतिमान असण्याची आणि काही ना काही घडवत ठेवण्याची सतत गरज पडत असते. हे करताना अनेकदा त्यांचा फोकस सुटण्याची आणि कथा मूळ मुद्द्यावरून भरकटून केवळ नायकाच्या हारजितीवर अडकून पडण्याची शक्यता असते. ‘आर्बिट्रेज’ असे होऊ देत नाही. त्याची गती ही अ‍ॅक्शनमध्ये नसून युक्तिवादात आहे. त्यामुळे काय घडले याची उत्कंठा वाढवत नेतानाही तो त्यातल्या नैतिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करत नाही. मात्र योग्य बाजू लक्षात येऊनही आपली सहानुभूती कायम राहते ती मिलरच्याच बाजूला. एके काळी भल्याच्या बाजूला असणा-या नायकाच्या विजयाची प्रतीक्षा करणारा तमाम प्रेक्षकवर्ग आज मिलरसारख्या भ्रष्ट व्यक्तीच्या बाजूने उभे राहायला मागेपुढे पाहत नाही, ही या चित्रपटाची खरी गंमत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचा अंतिम उद्देश त्याच्या प्रेक्षकांची बदलती नीतिमत्ताच चव्हाट्यावर आणण्याचा असावा का?
- गणेश मतकरी 

3 comments:

aativas October 9, 2012 at 4:35 AM  

<< चित्रपटाचा अंतिम उद्देश त्याच्या प्रेक्षकांची बदलती नीतिमत्ताच चव्हाट्यावर आणण्याचा असावा का? >>

सहमत. अगदी सहमत.

Vishalkumar October 11, 2012 at 9:53 PM  

लेख वाचून एका चित्रपटाची आठवण झाली.. थॅंक यू फॉर स्मोकिंग. त्या बद्दल लेख पूर्वी आलाच आहे. " प्रेक्षकांची बदलती नीतिमत्ता" अथवा "आजुबाजुचे वास्तव स्वीकारायची तयारी" असावी . प्रत्यक्ष जगात रामायणा प्रमाणे फक्त काळे व पांढरे असा फरक करता येत नाही तर महाभारताप्रमाणे कोणालाही 'ग्रे' शेड मध्ये स्वीकारायची तयारी असावी लागते.

भानस November 6, 2012 at 9:41 AM  

लवकरात लवकर हा सिनेमा पाहायचाच आहे.


<< चित्रपटाचा अंतिम उद्देश त्याच्या प्रेक्षकांची बदलती नीतिमत्ताच चव्हाट्यावर आणण्याचा असावा का? >>

परिक्षण वाचून असेच वाटतेय...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP