चौकट मोडताना...

>> Monday, October 15, 2012


’चौकटीबाहेरचा सिनेमा'ही लेखमाला सुरु करण्याच्या काही दिवस आधीपासूनच या प्रकारचं काहितरी लिखाण करणं आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आता या प्रकारचं म्हणजे कुठल्या , तर सांगतो.
आपला बहुतेक प्रेक्षक एका मर्यादित आणि परिचित वर्गातले चित्रपट पाहातो. तथाकथित बाॅलिवुड आणि एका विशिष्ट प्रकारच्या व्यावसायिक धोरणाला कवटाळून बनवलेलं -ब्लाॅकबस्टरी वळणाचं हाॅलिवुड यांनी या वर्गाचा बहुसंख्य भाग व्यापलेला.कारण उघड आहे, आणि ते म्हणजे उपलब्धता. आपल्याकडे चित्रपटांकडे अजूनही कलेपेक्षा विरंगुळ्याचं साधन म्हणूनच पाहिलं जाण्याची प्रथा आहे आणि ज्या चित्रपटगृहांत आणि लायब्र-यांत ते मोठ्या प्रमाणात सापडतात तिथे या वर्गातलाच सिनेमा सहजपणे उपलब्ध असतो. याला अपवाद आहेत ,नाही असं नाही.
प्रादेशिक चित्रपट आवर्जून पाहाणारा प्रेक्षक, तसंच फिल्म सोसायट्या / चित्रपट महोत्सव यांना हजेरी लावणारा किंवा विविध मुव्ही चॅनल्सवरच्या बहुभाषिक जागतिक चित्रपटांना पाहून प्रभावित होणारा प्रेक्षक जरुर आहे पण त्याचं प्रमाण तुलनेने खूपच कमी.बराच प्रेक्षकवर्ग हा संकेतांच्या परंपरेत बसणा-या , लोकप्रिय आडाख्यांच्या आणि आराखड्यांच्या गणितात गुरफटलेल्या चित्रपटांना पाहाण्यातच समाधान मानणारा. बहुधा नियतकालिकातून प्रसिध्द होणारी परीक्षणंदेखील साहजिकपणे या चित्रपटांच्या गुणवत्तेचीच चर्चा करणारी.
असं असतानाही, इंटरनेटने अचानक घडवलेल्या मिडिआ क्रांतीमुळे नव्याच्या , वेगळ्या वळणांच्या शोधात असणारी नवी पिढी तयार झाली आहे हेदेखील खरं. या पिढिकडे सरळ वा वाकड्या मार्गाने पाहाण्यासारखं बरंच काही उपलब्ध आहे, परंतु सारंच समोर असताना ,त्यातलं काय घ्यावं आणि काय नको ,ही निवडही तशी अवघडच म्हणायची. या मंडळींना काही हाती लागण्यासाठी मदत व्हावी म्हणून, आणि इतरांसाठी परिचित करमणुकीपलीकडलं दार किलकिलं व्हावं म्हणून काहीतरी लिहावं असं डोक्यात असतानाच ’महानगर’कडून नव्या लेखमालेची विचारणा झाली आणि हवी ती संधी मिळाल्यासारखं झालं.
या दिशेने विचार करताकरताच लेखमालेची संकल्पना अधिक स्पष्ट व्हायला लागली.प्रत्येक कलामाध्यम हे काही संकेतांचा, काही फॉर्म्युलांचा ,काही अलिखित नियमांचा आधार घेताना दिसतं. चित्रपटदेखील याला अपवाद नाही.  चित्रपटात कथानक कोणत्या पध्दतीने मांडलं जावं इथपासून व्यक्तिरेखाटनाच्या तपशीलापर्यंत अनेक गोष्टिंची पध्दत ठरुन गेलेली असते ,आहे. या पध्दतींचा वापर हा चित्रपटांना एक अोळखीचा आकार ,एक फाॅर्म आणून देत असतो.मात्र अनेकदा हा परिचित आकार सर्जनशील दिग्दर्शकांच्या दृष्टिने अपुरा असतो. त्यांना जे सांगायचं ते ,ज्या पध्दतीने सांगायचं त्या पद्धतीने सांगण्यासाठी ही ठरलेली चौकट मोडण्याची गरज भासते. या ओळखीच्या विश्वात न अडकता मोकळा विचार करणा-या चित्रपटांकडे एक नजर टाकण्याचा प्रयत्न म्हणजेच ’चौकटीबाहेरचा सिनेमा’.
इथे असणारे चित्रपट हे विशिष्ट देश ,काळ वा चित्रप्रकाराचे प्रतिनिधी नाहीत. त्यांच्यात समान धागा आहे तो केवळ त्यांचा वेगळेपणा हाच. त्यांच्या विचारशैलीला, वेगळेपणाला अधोरेखीत करण्यासाठी मी मूळ प्रसिध्दिच्या तारखा बाजूला ठेवून इथल्या लेखांना पाच विभागात मांडलं आहे. नरेटिव किंवा कथानक मांडण्याच्या पध्दतीचे संकेत मोडणारे चित्रपट ’निवेदनाच्या चौकटीबाहेर’ या विभागात आहेत, तसंच दृश्य संकेत आणि व्यक्तिचित्रणाचे अलिखित नियम बाजूला टाकणारे चित्रपट अनुक्रमे ’दृश्यात्मकतेच्या चौकटीबाहेर’ आणि ’ व्यक्तिचित्रणाच्या चौकटीबाहेर' या विभागात येतात.वरवर अोळखीच्या संकल्पना वापरूनही अंतिमत: त्या संकल्पनांच्या मर्यादांमधे न अडकणारे चित्रपट ’परिचिताच्या चौकटीबाहेर या विभागात आहेत. या चारांखेरीज आणखी एक विभाग इथे आहे. आणि तो म्हणजे ’मर्यादांमुळेच चौकटीबाहेर’ . या विभागातल्या चित्रपटांचं संकेत मोडणं हे ते पाळत असलेल्या वा त्यांना पाळाव्या लागत असलेल्या मर्यादांचा परिणाम आहे. कधी या मर्यादा नाईलाजातून येणा-या ,म्हणजे आर्थिक अडचणींसारख्या आहेत ,तर काही केवळ संकल्पनांच्या पातळीवरल्या, जाणीवपूर्वक केलेल्या , म्हणजे मर्यादित अवकाश वा व्यक्तिरेखांच्या उपयोगासारख्या ,कलाविषयक विचारातून आलेल्या आहेत.
लेखांची लांबी ही तशी छोटी, सदराच्या स्वरुपाचा विचार करुन ठ़रवलेली आहे, मात्र ती अडचण मला फार महत्वाची वाटत नाही . शब्दमर्यादा आणि आशयचं वजन, त्याची निकड ,यांचा थेट संबंध असतोच असं नाही. अर्थात इथे तो काय प्रमाणात आहे, हे अखेर वाचकानेच ठरवायचं.
या पुस्तकाच्या मांडणीचं स्वरुप हे ब-याच विचारांती ठरलं. लेखाच्या शब्दमर्यादेच्या बंधनात न अडकता मांडणीतूनही विचार पोचवला जावा अशी त्यामागची योजना होती. पोस्टर्स हे नेहमीच केवळ फोटोग्राफ वा सुंदर चित्र यापलीकडे जाणारे असतात. त्यांमधे  चित्राची /फोटोची शैली , मांडणी, टॅग लाईनचा वापर हे सारं दिग्दर्शकाच्या भूमिकेविषयी ,दृष्टिविषयी बोलणारं असतं.त्यामुळे त्यांना या पुस्तकाच्या मांडणीत आणणं लेखाला कॉम्प्लिमेन्टरी ठरणारं. त्याखेरीज दिग्दर्शकाच्या महत्वाच्या चित्रपटांची यादी पुस्तकाच्या संदर्भमूल्यात भर घालते, आणि ती क्राॅस रेफरन्सिंगलाही उपयुक्त ठरावी अशी अपेक्षा.
पुस्तकानिमित्ताने चौंघांचे आभार मानणं आवश्यक.सर्वप्रथम ज्यांच्या मागणीमुळे हे सदर सुरु झालं आणि ज्यांच्या अक्षर प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकशित होतय ते  निखिल वागळे आणि मीना कर्णिक. माझ्या लेखनाशी अनेक वर्षं  परिचय असलेल्या मीना कर्णिकांचे थोडे अधिकच, त्यांच्या थोडक्यात अधिकाधिक सांगू पाहाणार््या  प्रस्तावनेसाठी.त्याखेरीज मांडणीपासून मुखपृष्ठापर्यंत दर गोष्टिचा पुन्हा पुन्हा विचार करणारा केदार प्रभावळकर, ज्याचा पुस्तकाच्या अंतिम स्वरूपात महत्वाचा वाटा आहे.आणि सरतेशेवटी अनंत भावे यांचे आभार ,ज्यांची पुस्तकावर शेवटचा हात फिरवताना मोलाची मदत झाली.
गणेश मतकरी
(चौकटीबाहेरचा सिनेमा पुस्तकातील मनोगत)

1 comments:

Vivek Kulkarni October 16, 2012 at 8:15 AM  

मी आपले हे पुस्तक वाचलेले आणि आपणास तसे कळवलेले आहे. त्यामुळे यावर काहीही भाष्य करणार नाही.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP