पल्प फिक्शनः स्टाईल स्टेटमेंट

>> Friday, November 28, 2008


सामान्यतः चित्रपटांना कथा असते, आणि या कथेचे तीन भाग असतात. सुरूवात,मध्य आणि शेवट. या नियमाला जे अनेक सन्मान्य अपवाद आहेत त्यातला जवळजवळ सर्वात महत्त्वाचा, अनेक दिग्दर्शकांना प्रेरणा देणारा आणि आधुनिक कथानिवेदनात मोठा लक्षवेधी प्रयोग घडवून आणणारा चित्रपट म्हणजे पल्प फिक्शन (१९९४). मुळात व्हिडीओ स्टोअरमध्ये नोकरीला असणा-या क्वेन्टीन टेरेन्टीनोचा रिझरव्हॉयर डॉग्जनंतरचा, म्हणजे दुसरा चित्रपट.
पल्प फिक्शन म्हणून ओळखलं जाणारं साहित्य या एकेकाळी प्रामुख्याने सवंग लोकप्रियता मिळविणा-या रहस्यकथा होत्या, ज्या लिहिणा-यातले अनेक लेखक पुढे नावाजले गेले आणि रहस्यकथांनाही काही प्रमाणात प्रस्थापित समजलं जाऊ लागलं. "फिल्म न्वार' (Film Noir) नावाने ओळखल्या जाणा-या आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या अखेरच्या काळात गाजलेल्या गडद गुन्हेगारीपटांवरही या कथा,कादंब-यांचा ठसा होता. टेरेन्टीनोने पल्प फिक्शन चित्रपटासाठी या लेखी आणि दृश्य अशा दोन्ही संदर्भाचा मुक्तहस्ते वापर केला आहे.
पल्प फिक्शनची कथा, किंवा पल्प फिक्शनच्या कथा ( ज्या पात्रांच्या एकाच संचात घडत असल्या तरी चार आहेत) महत्त्वाच्या नाहीत, किंबहूना त्या केवळ निमित्तमात्र आहेत. आपलं रचना कौशल्य उपहासात्मक ब्लॅक ह्यूमर, आपल्याला आवडलेल्या चित्रपटांचे संदर्भ आणि काही अत्यंत आकर्षक (दिसायला नव्हे पण नाट्यमयतेच्या दृष्टीने) व्यक्तिरेखा यांना एकत्र गुंफवण्यासाठी लागणारा धागा म्हणून त्याने कथानकाचा वापर केला आहे.
व्हिसेन्ट व्हेगा (जॉन ट्रावोल्टा) आणि ज्यूल्स विनफिल्ड (सॅम्यूएल एल जॅक्सन) हे गँगस्टर, त्यांचा बदमाश बॉस मार्सेलस वॉलेस (विन्ग रामीस), वॉलेसची पत्नी मिआ (उमा थर्मन) आणि कारकिर्दीच्या अखेरीला पोचलेला बॉक्सर बुच (ब्रूस विलीस) ही यातली प्रमुख पात्र. त्याबरोबर इतर अनेक बारीकसारीक पात्र. सुरुवात, शेवट आणि मधली तीन एकमेकांत मिसळणारी कथानकं असं याचं ढोबळमानाने स्वरूप आहे. चित्रपटात घटना घडतात, पण मागेपुढे सरकणा-या कथानकांमुळे आपण त्या क्रमाने पाहू शकत नाही आणि मनातल्या मनात त्यामध्ये जोडकाम करून घ्यावं लागतं. या घटना या टेरेन्टीनो शैलीच्या विनोदाचा आणि विसंगतीचा उत्तम नमुना आहे.

इथे व्हिन्सेन्ट आणि ज्युल्स बर्गरला फ्रेन्चमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करतात. एकमेकांना पम्कीन आणि हनीबनी अशा लाडक्या नावाने हाका मारणारं जोडपं फास्ट फूड हॉटेलवर दरोडा घालतं. मार्सेलसच्या अनुपस्थितीत त्याच्या बायकोची सरबराई करण्याची जबाबदारी व्हिन्सेन्टवर येऊन पडते. बुचला त्याच्या वडिलांचं सोन्याचं घड्याळ आपल्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय वाटतं.
ज्यूल्स एका हातात पिस्तुल पकडून बायबलमधले उतारे म्हणून दाखवतो, बुच मार्सेलसला डबलक्रॉस करतो, गाडीतल्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी विन्स्टन वुल्फ (हार्वी कायटेल) या एक्सपर्टला बोलावलं जातं आणि हे काम आपली बायको घरी येण्याआत उरकणार नाही, अशा काळजीत जिमी (क्वेन्टीन टेरेन्टीनो) पडतो.
या आणि अशा घाडामोडींनी भरलेल्या पल्प फिक्शनचा विषय हा, की तो गँगस्टरना एका वेगळ्या पद्धतीने ग्लॅमराईज करतो. त्याचं उदात्तीकरण करतो. याआधी गँगस्टरना नायक म्हणून दाखवलेले अनेक चित्रपट होते, पण त्यांचा प्रकार गंभीर होता. शेवटही अनेकदा ते अडचणीत येण्यावर होत असे. टेरेन्टीनो आपल्या गँगस्टरना पडद्यावर आणताना अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश पद्धतीने आणतो. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल,वागण्याच्या पद्धती, संवाद यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तो या व्यक्तिरेखा त्रिमितीत आणतो. या चित्रपटाला हिंसाचारही तो संयतपणे न दाखवता खोटा वाटेल इतक्या अतिप्रमाणात दाखवतो. आणि प्रसंगांना गंमतीदार कलाटणी देण्यावर पटकथेला भर देतो.

टेरेन्टीनोचा हा दृष्टीकोन पल्प फिक्शन लोकप्रिय व्हायला कारणीभूत झाला. यातल्या प्रत्येक गोष्टीकडे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहिलं गेलं आणि आज अनेक वर्षानंतरही यातल्या व्यक्तिरेखांचे, प्रसंगांचे संदर्भ आपल्याला विविध चित्रपट,टीव्ही मालिका,त्याचबरोबर व्हिडीयो गेम्समध्येही पाहायला मिळतात. स्वतः टेरेन्टीनोनेही आपल्या गडद विश्वाची रिझरव्हॉयर डॉग्जमध्ये सुरू केलेली रचना या चित्रपटापासून पुढे नेली. आता तो पम्पकीनची भूमिका करणारा आणि पुढे स्वतंत्रपणे दिग्दर्शनात उतरणारा टिम रॉथ यांच्या चित्रपटांमध्ये कायम त्यांच्या आधीच्या चित्रपटांचे संदर्भ आणून जोडलेले पाहायला मिळतात. दोन वेगळ्या चित्रपटांमधल्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या नात्यातल्या असणं (डॉग्जमधली प्रमुख व्यक्तिरेखा लॅरी, ही पल्प फिक्शनमधल्या जिमीचा चुलतभाऊ आहे.) किंवा एका चित्रपटात वापरलेली गोष्ट दुस-यात पुन्हा आणणं (बिग काहुना बर्गर. या कल्पित फास्ट फु़ड चेनचा उल्लेख टेरेन्टीनोच्या अनेक चित्रपटात आढळतो.) चित्रपटाचे थेट किंवा अप्रत्यक्ष संदर्भ आणणं (रॉथच्या होस्टेलमध्ये टीव्हीवर पल्प फिक्शन चालू असलेला दिसतो.)
अशा अनेक प्रकारांनी टेरेन्टीनो त्याच्या चित्रपटांना एकमेकांत अडकवताना दिसून येतो. अंतिमतः पाहायचं तर आकर्षक,गतिमान आणि डोक्याचा उत्तम वापर करून काढलेल्या टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच पल्प फिक्शनदेखील अतिरंजीत आणि पोलिटिकली इनकरेक्ट किंवा चुकीच्या बाजूला वर उचलून धरणारा आहे. अर्थात चित्रपट ही कला आहे. आणि तो पाहताना कलावंतांचं आविष्कारस्वातंत्र्य गृहीत धरणं आणि ते पाहताना आपलं डोकं ताळ्यावर ठेवणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे. चित्रपटाचं अनुकरण वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार मानत असताना हे चित्रपटही कुठेतरी वास्तवावरच आधारलेले आहेत हे विसरून चालणार नाही.
-गणेश मतकरी

Read more...

निःशब्द दुःखाची नायिका - मलेना

>> Monday, November 24, 2008



मलेनाच्या आठवणी रेनातो सांगतोय. संपूर्ण चित्रपटात मलेना एकही शब्द बोलत नाही- अपवाद फक्त कोर्टाच्या सीन्सचा आणि रेनातोच्या स्वप्नदृश्‍यांचा. एरवी तिच्या तोंडून येणारे शब्द म्हणजे नावडत्या घटनांच्या प्रतिक्रियाच आहेत. मात्र मलेनाचं हे निःशब्द दुःख आणि मलेनाच्या साह्यार्थ आटलेले समाजाचे शब्द, या दोन्ही गोष्टींतल्या मूकपणातला फरक स्पष्टपणे जाणवतो. ........

कुणालाही पडू नये असं दुःस्वप्न म्हणजे "मलेना'; पण मलेनाला मात्र ते जागेपणी पडतं आणि ती त्यात पार होरपळून निघते. इटलीमधलं छोटंसं गाव सिसिलिया. महायुद्धाचा काळ. मुसोलिनीची राजवट सुरू आहे. ही फॅसिस्ट राजवट सुरू झाल्याचं रेडिओवरून ठिकठिकाणी लोकांना कळतं त्याच वेळी गल्लीतली टवाळ मुलं रस्त्यावरच्या मुंगळ्याला भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणांच्या चटक्‍यानं भाजून मारतात आणि मलेना स्कॉर्दियाचं आयुष्य उलगडायला सुरवात होते.
मलेना ही एका सैनिकाची तरुण, सुंदर बायको आहे. तिचा नवरा महायुद्धाच्या आघाडीवर गेलाय. ही गावात एकटी. त्यामुळे गावातल्या समस्त पुरुषांच्या नजरा तिला आपादमस्तक न्याहाळायला मोकळ्या आणि म्हणूनच समस्त स्त्रियांच्या टोमण्यांचीही ती धनीण. रेनातो हा गावातलाच एक पौगंडावस्थेतला मुलगा. तो आणि त्याची गॅंग गावात भटकणे, वर्गात शिक्षकांना त्रास देणे, यासारख्या गोष्टींबरोबरच मलेनाला रस्त्यात जाता- येता बघणे, हाही कार्यक्रम राबवतात. रेनातोच्या शारीरिक बदलानुरूप कल्पनाविलासाकरिता आवश्‍यक असणारी स्त्रीप्रतिमा म्हणजे मलेना! तो मलेनाच्या प्रेमात पडतो. कल्पनेत तिच्याबरोबर संग करतो. शाळेतली मुलं तिच्याविषयी अचकटविचकट बोलतात तेव्हा तो त्यांच्याशी मारामारी करतो. त्याने पाह्यलेल्या चित्रपटातली द्रुष्यं तो आपल्या कल्पनेत आणतो, तिथे तो हिरो आणि मलेना हिरोईन. मलेनाच्या घरात चोरून बघतो, तिचं अंतर्वस्त्र चोरतो- थोडक्यात वयात येणारा मुलगा जे जे काही म्हणून करेल ते सर्व तो करतो- त्याची नायिका आहे मलेना, पण यातलं काहीही मलेनाला कळत नाही. तिचं एकाकी जीवन सुरू आहे.
पण हे जीवन एकांतात नाही. तिचा नवरा युद्धात मेल्याची बातमी आल्यानंतर तिच्याबद्दल सहानुभूती असणारा एक जण रात्री तिच्या घरून बाहेर पडताना गावातल्या एका डेंटिस्टशी मारामारी करतो आणि त्याचं खापर मलेनावर फुटतं. तिच्याविरुद्ध छिनालपणाचा खटला कोर्टात दाखल होतो. संपूर्ण कोर्टात होणारी तिची बदनामी ऐकायला आंबटषौकिनांची गर्दी होते. रेनातो येतो; पण त्याची सहानुभूती मलेनापर्यंत पोचत नाही. तिला खटल्यातून वाचवणारा वकील रात्री तिच्या घरात घुसून आपली "फी' वसूल करतो. रेनातो मूकपणे बघतो!
आघाडीवर नवरा मरण पावल्याची बातमी आणि बॉंबहल्ल्यात वडिलांचा झालेला मृत्यू, यामुळे सर्वस्व गमावलेल्या मलेनाला जगण्यासाठी स्वतःचं शरीर वापरण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात गावातल्या सभ्य गृहस्थांनी तिला हा मार्ग केवळ सुचवलाच नाहीये तर त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीची सक्रिय मदतही देऊ केलीय. बॊम्ब हल्ल्यात म्रुत्यूमुखी पडलेल्या वडिलांच्या श्रद्धांजली सभेनंतर तिचं चुम्बन घ्यायला लोकांची रांग लागते! ’आम्ही आहोत हे जवळ्जवळ प्रत्येक जण अत्यंत मनापासून सांगतो. ’शेजा़ऱ्यांवर प्रेम करा’ ह्या येशूच्या संदेशाचं पालन करण्यासाठीची कोण ही अहमहमिका! मलेना स्वतःमध्ये संपूर्ण बदल करते. मान खाली घालून साधेपणे वावरणारी मलेना आता ताठ मानेनं बिनधास्तपणे रस्त्यावर चालत चौकातल्या कॅफेटेरियामध्ये बसते आणि सिगारेट काढून तोंडात धरते, तेव्हा ती शिलगावयाला सभ्य गृहस्थांचे हजारो हात लायटरसह पुढे होतात- दिग्दर्शकानं अतिशय तब्येतीनं हा सीन घेतलाय. आता मलेना सगळ्यांसोबत दिसते तशी नाझी सैनिकांसोबतही दिसते. मात्र रेनातोला हे सहन होत नाही-त्या कल्पनेनं तो बेशुद्ध पडतो. त्याच्या घरी मंत्रतंत्र सुरू होतात. पण वयात आलेल्या रेनातोची ’गरज’ त्याला यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी मारहाण करणारा त्याचा बाप ओळखतो आणि त्याला घेऊन ’बावनखणी’त जातो! तिथल्या स्त्रीमध्येसुद्धा रेनातो मलेनालाच बघतो.

महायुद्ध संपतं. अमेरिकन सैनिक सिसिलियाला मुक्त करतात. आता मात्र त्या आनंदात सामील झालेल्या गावातल्या सभ्य गृहस्थांच्या सभ्यस्त्रिया कुणाचीही वाट बघत नाहीत. त्या मलेनाला घरातून फरफटत बाहेर आणतात आणि त्यांच्या दृष्टीनं "गावभवानी' असणाऱ्या मलेनाची यथेच्छ धुलाई त्याच कॅफेटेरियात करतात. तिचे कपडे फाडतात, डोकं भादरतात. तिचा आकांत कुणाचंही काळीज चिरून जात नाही. छिनाल म्हणून तिच्या शरीरावर बसणाऱ्या तडाख्यांपैकी एकाही फटक्‍याचा साधा ओरखडाही तिला त्या मार्गाला लावणाऱ्या बघ्यांच्या मनावर उमटत नाही. रेनातो मूकपणे हे दृश्‍य बघतोय. तो हताश आहे; पण काही करूही शकत नाही. तिच्या नकळत का होईना; पण इतरांप्रमाणे त्यानंही तिला वापरूनच घेतलंय आणि इच्छा नसतानाही तो इतर बघ्यांपैकीच एक झालाय.
मलेना गाव सोडून जाते. कालांतरानं तिचा नवरा जिवंत परत येतो. रेनातो मलेनाचा ठावठिकाणा त्याला कळवतो. आता मलेना तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा त्याच गावात येते आणि सारं गाव त्या दोघांकडे टक लावून बघत राहतं. त्यात रेनातो आणि त्याची मैत्रीणसुद्धा आहेत. "मिसेस स्कॉर्दिया' म्हणून सगळे तिला अभिवादन करतात आणि तीही पूर्वीचं विसरून त्या बायकांशी बोलते. बाजारातून परत जाताना तिच्या पिशवीतली संत्री सांडतात. रेनातो ती उचलायला मदत करतो- दोघांची ही पहिलीच नजरानजर! "गुडलक मिसेस मलेना' एवढं तो म्हणतो. परत जाताना वळून बघतो, मलेनाची चाल मंदावलेली दिसते.
संपूर्ण चित्रपट हा रेनातोच्या आठवणीतल्या रूपात येतो आणि संपताना त्याचं वाक्‍य ऐकू येतं- "माझी आठवण होते का' असं विचारणाऱ्या असंख्य स्त्रियांपैकी आज मला फक्त तिचीच आठवण होते जिनं मला असं कधीच विचारलं नव्हतं.मलेनाला रेनातोची जाणीव कधीच नव्हती. किंबहुना अशा जाणिवा, आठवणी आणि तरल भावनांना गोंजारत बसायला तिला संधीच मिळाली नाही. तिचा वापर झाला. कुणी स्वप्नात केला आणि स्खलित झाले तर कुणी अस्खलितपणे जागेपणी केला आणि तिलाच स्खलनशील ठरवून मोकळे झाले! तिला वखवखलेल्या नजरेनं बघूनही हे मोकळे, तिला धंद्याला लावूनही हे मोकळे, तिची भर चौकात विटंबना झाली तेव्हाही हे मोकळे आणि नवऱ्याबरोबर ती परत आली तेव्हाही तिला "मिसेस स्कॉर्दिया' म्हणून अभिवादन करायलासुद्धा हे मोकळेच! मलेनाच्या पुनर्वसनानं तिचा झालेला अपमान परत कसा यायचा? द्रौपदीच्या विटंबनेची शिक्षा कौरवांना मिळाली; पण तिच्या विटंबनेचे मूक साक्षीदार असणाऱ्या पांडवांना काही इतिहासानं जाब विचारला नाही, ही खरी शोकांतिका. काहीही न करता मिळालेलं मलेनाचं दुःख तिचं तिलाच भोगावं लागतं, हीच जनरीत म्हणायची. एकट्याच्या दुःखाची अनुभूती घेताना हटकून आठवणारा गालिब मलेना बघतानाही आठवतो-


"हम कहॉं के दाना थे किस हुनर में यकतां थे
बेसबब हुआ "गालिब' दुश्‍मन आसमॉं अपना।'


महाकाव्यातली द्रौपदी, महाकवी गालिब आणि कोण कुठली कल्पनेतली मलेना; पण या तिघांच्याही दुःखाची संवेदना जाणिवेच्या एकाच तारेनं छेडली जावी, हा निव्वळ योगायोग की आपल्याच मनाचा हळवेपणा?

- प्रसाद नामजोशी
(point of view या सदरामधून. अप्रकाशित भागासह)

Read more...

साच्याबाहेरचा कालप्रवास

>> Friday, November 21, 2008


कालप्रवासाचा विषय केंद्रस्थानी ठेवून ऍक्शन, विनोदी चित्रपट हे हॉलिवूडसाठी नवे नाहीत; पण या साच्याबाहेर पडून कालप्रवासाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन "द लेक हाऊस' आणि "प्रिमॉनिशन' या चित्रपटात पाहायला मिळतो. कालप्रवासाबाबतच कोणत्याही वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे ओझे या चित्रपटांमध्ये नाही, हे अजून विशेष!

सॅंड्रा बुलकचे सलग दोन चित्रपट हे कालप्रवासाशी संबंधित असणे, मात्र तरीही ते हॉलिवूडच्या यशस्वी बॉक्स ऑफिस गणिताच्या चौकटीत न बसणारे असणे, हे विशेषच म्हणायला हवे. दर्जेदार; पण सर्व मसाल्याने भरपूर असणारे अत्यंत यशस्वी कालप्रवासी हॉलिवूडपट म्हणजे "टर्मिनेटर' मालिका आणि "बॅक टु द फ्युचर' मालिका. अनुक्रमे ऍक्शन आणि विनोदासाठी गाजलेले हे चित्रपट आपल्या अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा पूर्ण अभ्यास करून बनवलेले होते. आणि त्यांच्या निर्मितीत असणारा जेम्स कॅमेरोन आणि स्टीवन स्पीलबर्ग यांचा हात पाहता ते फारसे आश्चर्यकारक नाही. बुलकच्या "द लेक हाऊस'बद्दल किंवा त्यानंतर आलेल्या "प्रिमॉनिशन'बद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही.
"द लेक हाऊस' आपल्याकडे प्रदर्शित झाला होता आणि फार गाजावाजा न होताही तो पाहिलेल्यांना लक्षात आले असेल, की तो नेहमीच्या फॉर्म्युलात बसणारा नव्हता. समांतर आणि व्यावसायिक यांच्या सीमेवरल्या या चित्रपटात "स्पीड' मधली प्रसिद्ध जोडी पुन्हा अवतरली होती. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे शेवटचा प्रसंग सोडता बुलक आणि किआन रीव्हज आमनेसामने येतील, असा प्रसंगच इथे नव्हता. साउथ कोरिअन चित्रपटावर आधारित असलेल्या या चित्रपटात एक प्रेमकथा सांगितली होती. एका घरात दोन वर्षांच्या अंतराने राहणाऱ्या दोन व्यक्तींची. ती दोघे संवाद साधू शकतात ती केवळ एका मेलबॉक्सच्या साह्याने, ज्यात ठेवलेली पत्रे काळाच्या नियमांना झुगारून देऊन दुसऱ्याच्या हाती पडू शकतात. "लेक हाऊस'मध्ये कच्चे दुवे अनेक होते; पण शेवट हा त्यातला सर्वांत मोठा. तरीही हा चित्रपट पाहण्यासारखा होता, तो मध्यवर्ती कल्पना पटेल अशा पद्धतीने पडद्यावर आणल्याने आणि दोन प्रमुख अभिनेत्यांच्या कामामुळे.
नुकताच बुलकचा दुसरा चित्रपटही पाहण्यात आला- "प्रिमॉनिशन'. "लेक हाऊस'ची वर्गवारी "रोमान्स' या चित्रप्रकारात होऊ शकते. "प्रिमॉनिशन'चे मात्र तसे नाही. काळाशी चाललेला खेळ हा इथे सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मात्र याला सायन्स फिक्शनही म्हणता येत नाही. कारण यातल्या घटनांना वैज्ञानिक स्पष्टीकरण (मग ते काल्पनिक का असेना) मिळू शकत नाही. एका प्रसंगात ते देण्याचा केलेला प्रयत्नही हास्यास्पद वाटतो. त्यामुळे घटनाक्रमामागे स्पष्टीकरण न शोधता त्याचे तसे असणे गृहीत धरणे, हाच चित्रपट पाहण्याचा योग्य मार्ग आहे. एकदा का तो अवलंबला, की मग मात्र "प्रिमॉनिशन' आवडू शकतो.
काळ हा एक ठराविक मार्गाने पुढे जातो. सोमवार नंतर मंगळवार, मग बुधवार वगैरे. "प्रिमॉनिशन'ची नायिका लिंडा हॅन्सन (सॅंड्रा बुलक) हिच्या आयुष्यात मात्र एका विशिष्ट कालावधीसाठी हा क्रम बदलून जातो. एका गुरुवारी नेहमीप्रमाणे घरची कामे उरकताना तिच्या घरी गावचा शेरीफ येतो. आणि सांगतो, की तिच्या बाहेरगावी गेलेल्या नवऱ्याला म्हणजे जिम (जुलिअन मॅकमोहन) ला काल अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. लिंडाला मोठा धक्का बसतो. मात्र मुलींना शांत करणे, स्वतःच्या आईला कळवून तिला बोलावून घेणे वगैरे गोष्टी ती उरकायला लागते. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही मात्र अधिकच धक्कादायक असते. कारण आता जिम जिवंत असतो. एवढेच नाही, तर आता वारही मागे गेलेला असतो. गुरुवारनंतर शुक्रवार न उजाडता, ती आधीच्या सोमवारवर येऊन पोचलेली असते. यानंतरचा प्रत्येक दिवस हा वेगळ्याच क्रमवारीने येणारा असतो, मात्र या दिवसांचा केंद्रबिंदू असतो बुधवार. जिमच्या अपघाताचा दिवस. लिंडाला काय घडतेय हे कळायला, त्यावर काही उपाय आहे का हे शोधायला आणि स्वतःला वेडी न म्हणवून घेता मदत मिळवायला बराच वेळ लागतो आणि बुधवार तिच्या आयुष्यात उगवण्याआधी यावर मार्ग काढणे अशक्य होऊन बसते.

एकदा का यातले काळाचे पुढेमागे होणे हे आपण पार्श्वभूमी म्हणून लक्षात घेतले, की चित्रपट दोन प्रमुख प्रश्न उपस्थित करतो. एक नैतिक तर दुसरा घटना घडण्यामागच्या मूलभूत प्रक्रियेच्या स्वरूपासंबंधीचा. एखाद्याचा मृत्यू होणार हे माहीत असून केवळ तो थांबवायचा प्रयत्न न करणे हे व्यक्तीला नैतिकदृष्ट्या खुनी ठरवेल का हा पहिला, तर एखादी घटना थांबवण्याचा प्रयत्नच ती घटना घडण्याला कारणीभूत होऊ शकतो का, हा दुसरा. चित्रपटात हे दोन प्रश्न पुरेसे महत्त्वाचे आहेत. आणि चित्रपटाच्या शेवटाकडचा भाग या प्रश्नांभोवतीच गुंफलेला आहे हे खरेच, पण तरीही चित्रपटाची मांडणी पूर्णपणे निर्दोष नाही.
मांडणीतला दोष प्रामुख्याने दिसतो तो त्याच्या रहस्यावर नको इतके लक्ष केंद्रित करण्यात. जिमचा मृत्यू आणि त्याच्या आगे मागे येणारे प्रसंग महत्त्वाचे आहेत; पण त्यांचा विचार हा जिम आणि लिंडाच्या नातेसंबंधाला केंद्रस्थानी ठेवून व्हायला हवा. त्या ऐवजी दिग्दर्शक मेनान यापो यांचे लक्ष हे दिवसांचा क्रम, प्रत्येक दिवसाचे शेवट आणि सकाळ, त्यांचे आपापसांत जोडले जाणे, इतर व्यक्तिरेखा, त्यांच्यावर संशय आणण्याची पद्धत, याकडेच अधिक गेलेले दिसते. त्यामुळे चित्रपटाचे स्वरूप हे थोडे गुन्हेगारी तपास कथेसारखे होताना दिसते.
त्याबरोबरच लिंडाची व्यक्तिरेखा गोष्टी समजून घ्यायला आणि त्यावर पावले उचलायला फार वेळ लावते. आणि काही वेळा चुकीचे निष्कर्षदेखील काढते. ती स्वतःहून पुढाकार घेऊन काही करण्यापेक्षा असहायपणात अधिक वेळ घालवते. त्यामुळे घटनांना वेग असूनही चित्रपट संथ वाटतो. त्यातून एकदा का सुरवातीला काय घडणार हे लक्षात आले, की त्यात काही फार नवीन माहितीची भर घातली जात नाही. किंवा काही अनपेक्षित वळणेही पटकथेत येत नाहीत. शिवाय लिंडाला माहीत नसलेली एक गोष्ट प्रेक्षकाला माहीत असते, ती म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळे ती वास्तव गतीने विचार करत ज्या मुद्द्यांपर्यंत येते, त्यापर्यंत प्रेक्षक चित्रपटाचे लॉजिक वापरून आधीच पोचतो. त्यामुळे प्रेक्षक हा बहुतेकदा कथेच्या किंवा पात्रांच्या पुढे असतो, हा चित्रपटाचा एक मोठाच दोष म्हणावा लागेल.
"प्रिमॉनिशन'चा प्रेक्षकवर्ग नक्की कुठला, याबद्दल मला कुतूहल आहे. "लेक हाऊस' आवडणाऱ्यांना हा आवडू शकेल; पण मुळात "लेक हाऊस' फार लोकांना आवडला होता, असे वाटत नाही. सामान्य प्रेक्षक हा टाइम ट्रॅव्हल असणाऱ्या चित्रपटाकडून तो सायन्स फिक्शन किंवा ऍक्शन या चित्रप्रकारातच असल्याची अपेक्षा ठेवतात. आणि या प्रकारांची मनोरंजन मूल्ये चित्रपटात असावीत, अशी त्यांची कल्पना असते. "प्रिमॉनिशन'चा कालप्रवास हा नेहमीच्या कालप्रवासासारखा तर नाहीच, वर तो सांकेतिक साच्याचा आधार घेत नसल्याने, या हमखास प्रेक्षकवर्गाचा उपरा वाटू शकतो. याउलट वेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्यांना त्याचे तपशिलावर रेंगाळणे आणि तात्त्विक किंवा काव्यात्म पातळीवरून कथानकाचा विचार न करणे खटकू शकेल.
मला स्वतःला "लेक हाऊस' आणि "प्रिमॉनिशन' हे दोन्ही चित्रपट आवडले. आवडण्याचे मुख्य कारण हेच, की ते साच्याबाहेर विचार करताना दिसतात. दोघेही कालप्रवासाच्या कल्पनेकडे वेगळ्या नजरेने आणि त्यातले वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे ओझे काढून टाकून पाहणारे आहेत. शैलीबाबतीतले त्यांचे चाचपडणे हे विषयाच्या नव्या सादरीकरणामुळेच होते आहे; पण नवे रस्ते शोधणाऱ्यांनी चाचपडायलाही आपली हरकत नसावी. अखेर त्यामुळेच आपल्याला वेगळे काही पाहायला मिळण्याच्या शक्यता तयार होतात. काही वेळी नावीन्य हे परफेक्शनहून अधिक मोलाचे असू शकते.
- गणेश मतकरी

Read more...

इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग सायरस

>> Tuesday, November 18, 2008



२००५ साली एक चित्रपट प्रदर्शित झाला. "बिईंग सायरस'. याचं महत्त्व हेच, की तो आपल्या टारगेट प्रेक्षक कोणता, हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांना कसा वाटेल, यांसारख्या गोष्टींचा विचारच करत नाही. त्यामुळेच तो स्वतःभोवती काल्पनिक मर्यादा घालून घेत नाही. मोठ्या कलाकारांना घेऊन केलेली ही छोटी निर्मिती अनेक बाबतींत नियम झुगारून देते.

भारतीयांनी लिहिलेलं इंग्रजी साहित्य आणि भारतीय दिग्दर्शकांनी केलेले इंग्रजी चित्रपट यांची संख्या आज वाढती असली, तरी हे कलाप्रकार अजूनही काही एका हिशेबातच विचार करताना दिसतात. साहित्यात प्रामुख्याने दिसतं ते आपलं भारतीय असणं, आपली प्रादेशिकता अधोरेखित करण्याची वृत्ती. आता लिहिणारा भारतीय असल्यावर त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत काहीतरी आपल्या मातीतलं जरूर असेल; पण त्याचं भांडवल करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची वृत्ती योग्य नाही.
थोड्या वेगळ्या दृष्टीनं हीच गोष्ट आपल्या तथाकथित इंग्रजी चित्रपटांची. हे साहित्यासारखे अस्सल परदेशी जनतेला गृहीत धरून मात्र केले जात नाहीत. त्यांचा भर असतो तो परदेशी भारतीयांवर (वा परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांवर). त्यामुळे आपल्याकडचा इंग्रजी क्रॉसोव्हर चित्रपट हा खरं तर क्रॉस्ड ओव्हर प्रेक्षकांसाठी असतो म्हटलं तरी चालेल.
थोडक्यात म्हणजे, आपल्या साहित्याने वा चित्रपटाने इंग्रजी भाषा जवळ केली असली तरी या जवळिकीला विषयांची, संस्कृतीची, पार्श्वभूमीची आणि अपेक्षांची अनेकानेक बंधनं आहेत. हे कलाप्रकार मुक्त नाहीत. अर्थात, या विधानाचा संबंध हा कलाकृतींच्या दर्जाशी नसून, त्यांच्या प्रकाराशी आहे. मात्र जोपर्यंत आपण विशिष्ट चौकटीपासून बंधनमुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या कलानिर्मितीच्या कक्षा पुरेशा विस्तारणार नाहीत, हेदेखील खरं.
मात्र ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, अशी शक्यता दर्शविणारा एक चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला. "बिईंग सायरस'. याचं महत्त्व हेच, की तो आपल्या टारगेट प्रेक्षक कोणता, हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांना कसा वाटेल, यांसारख्या गोष्टींचा विचारच करत नाही. त्यामुळेच तो स्वतःभोवती काल्पनिक मर्यादा घालून घेत नाही. मोठ्या कलाकारांना घेऊन केलेली ही छोटी निर्मिती अनेक बाबतींत नियम झुगारून देते. दिग्दर्शक होमी अद् जानिआने आपल्याला काय गोष्ट सांगायला आवडेल, ती कोणत्या भाषेत सांगणं सोईस्कर आहे, आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी कोणते कलाकार योग्य आहेत, या तीनच बाबींचा विचार केल्याचं दिसतं; जे योग्यच आहे.
त्यामुळे एक गमतीची गोष्ट मात्र होते, की हा चित्रपट बॉलिवूडचा आहे की नाही याबद्दल पाहणारा संभ्रमात पडतो. केवळ कलाकारांबद्दल बोलायचं, तर इथं बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट नटमंडळी पाहायला मिळतात. सैफ, नासिरुद्दीन शाह, डिम्पल आणि बोमन इराणी यांच्यासारख्या शंभर टक्के बॉलिवूडच्या मानल्या जाणाऱ्या कलाकारांनी इथे हजेरी लावली आहे; मात्र त्यांची इथली कामगिरी कोणत्याही व्यावसायिक तडजोडीच्या खुणा दाखवणारी नाही. सर्वच पात्रांमध्ये नकारात्मक छटा असणारा बिईंग सायरस खरा उभा राहतो या उत्तम नटसंचाच्या जोरावर. आणि या मंडळींना अशा चाकोरीबाहेरच्या व्यक्तिरेखा करण्याच्या फार कमी संधी उपलब्ध असल्याची खंत वाटायला लागते.
"बिईंग सायरस' एक बऱ्यापैकी चांगला इंग्रजी चित्रपट आहे. आणि त्याचा बॉलिवूडच्या अपेक्षित रंजनमूल्यांशी काही संबंध नाही. सायरसची कथा आहे ती सेथना या पारशी कुटुंबाची. आणि त्यांच्या घरात शिरलेल्या सायरस मिस्त्री (सैफ अली खान) या तरुणाची. सेथना कुटुंब हे पारशांना शोभेशा विक्षिप्तपणाची रेलचेल असणारं आहे. दिनशॉ (नासिरुद्दीन शाह) हा एके काळी गाजलेला स्कल्पटर आहे. पण आता गावाबाहेरच्या एका प्रशस्त घरात तो आपल्या केटी (डिम्पल) या पत्नीबरोबर राहतोय. दिनशॉच्या फारूक (बोमन इराणी) या भावाने मुंबईतली कुटुंबाच्या मालकीची इमारत हडप केली आहे. आणि तिथे तो टीना (सिमोन सिंग) या पुष्कळच तरुण पत्नीबरोबर संसार करतोय, आणि फरदून (हनी छाया) या आपल्या वडिलांची काळजी घेतोय किंवा निदान तसं दाखवतोय.
अशा या कुटुंबात सायरस शिरतो, तो दिनशॉचा मदतनीस म्हणून. वरवर पाहता निरुपद्रवी वाटणारा सायरस फारसा सरळ नसतो आणि सेथना कुटुंबातही साऱ्या गोष्टी आलबेल नसतात. हळूहळू उलगडत जातं, की कुटुंबातली एक व्यक्ती इतरांच्या विरुद्ध कारस्थान रचते आहे आणि त्यासाठी सायरसला वापरून घेण्याचा तिचा इरादा आहे. मात्र सायरसच्या डोक्यात काही वेगळ्याच योजना असतात.
"बिईंग सायरस' हे नाव चित्रपटाला योग्य असलं तरी त्यावरून तो कोणत्या प्रकारात मोडतो हे कळू शकत नाही. चित्रपटाची जाहिरातही त्याच्या विषयाबद्दल सुचवणारी नाही. हे का ते कळायला मार्ग नाही. कारण चित्रपटात रहस्य आहे आणि रहस्यपटांना सामान्यतः मागणी असते. तरीही प्रेक्षकांना विषयाबद्दल अनभिज्ञ ठेवण्याचा सायरसचा प्रयत्न आहे.
एका दृष्टीनं पाहायचं, तर चित्रकर्त्यांनी निवडलेला मार्ग योग्य आहे. कारण सायरसमध्ये रहस्य असलं, तरी सांकेतिक अर्थानं हा रहस्यपट नाही. सामान्य प्रेक्षक रहस्यपटाकडून ज्या अपेक्षा करेल, त्या इथं पुऱ्या होतीलच असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आपल्याकडली रहस्यपटांची परंपरा ही "हूडनइट' छापाच्या चित्रपटांची आहे, ज्यामधला पहिला बराचसा भाग ऍक्शन, कॉमेडी आणि इतर नेहमीच्या मसाल्याला वाव देणारा असतो, तर शेवटचा एक धक्का हाच खरा रहस्याला न्याय देतो. सायरसमध्ये नेहमीच्या मसाल्याचा पूर्ण अभाव तर आहेच, वर इथलं रहस्य हे केवळ शेवटावर सोडलेलं नसून, टप्प्या टप्प्यावर बदलत जातं. कधी ते सायरसच्या वागण्याचा अर्थ सांगणारं असतं, कधी त्याच्यावर सोपवलेली कामगिरी कोणती यासंबंधातलं असतं. कधी ती कोणी सोपवली याच्याशी निगडित असतं, तर कधी सायरसच्या भूतकाळाचा संदर्भ लावणारं. त्यामुळे कथा केवळ एका धक्क्यावर अवलंबून राहत नाही, तर तिचा फोकस बदलत राहतो.
बिईंग सायरसचा जीव छोटा आहे. पूर्वी आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेन्ट् स मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या आणि संग्रहित केल्या गेलेल्या गोष्टींची आठवण व्हावी, असं चित्रपटाचं एकूण स्वरूप आहे. त्यामुळे साहजिकच काही वेळा चित्रपट संथ वाटतो. खास करून सुरवातीच्या भागात जेव्हा त्याची दिशा अनिश्चित असते, त्यातली गुन्हेगारी वळणं प्रकट व्हायची असतात. सायरसच्या पटकथेतल्या काही त्रुटी काढणं चित्रकर्त्यांना शक्य होतं. उदाहरणार्थ सेथना कुटुंबाशी सायरसचा पूर्वी कधी संबंध आला होता का, हा मुद्दा इथं स्पष्ट होत नाही. सायरसचा भूतकाळ, आणि चित्रपटाच्या शेवटी सुचवण्यात आलेली एक शक्यता पाहता, तसं असावं असं वाटतं, मात्र ते पुरेसं नाही. कारण तसं असल्यास त्याचा पटकथेत स्पष्ट उल्लेख हवा, जो इथं नाही.
तसंच रहस्याचा अंतिम उलगडा, चित्रपटात वेळोवेळी पडणाऱ्या सर्व प्रश्नांना पुरून उरायला हवा. तसंही इथं होत नाही. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
मात्र तरीही सायरस त्या वर्षीचा उल्लेखनीय चित्रपट ठरावा. दिग्दर्शकाचा कथेच्या मांडणीमागचा दृष्टिकोन, पारशी कुटुंबाच्या विक्षिप्तपणाचं मोकळं चित्रण, तिरकस विनोद, जागोजागी येणारे रहस्याचे लहान मोठे तुकडे, आणि कृत्रिम नाट्यमयतेचा अभाव ही सगळी सायरसची वैशिष्ट्यं आहेत.मोठं वैशिष्ट्य आहे, ते सैफ अली खानचा आत्मविश्वासपूर्ण वावर. "हम तुम' पर्यंत सोलो नायक म्हणून पडद्यावर येण्याची भीती असलेल्या या अतिशय गुणी नटानं या प्रकारची पूर्ण नकारात्मक भूमिका घेण्याची ना अपेक्षा होती, ना तो ती पेलवू शकेल अशी कल्पना. त्याचा व्यावसायिक चित्रपटातला अनुभव, आणि कामगिरी चांगली असली तरी एका चाकोरीतल्या भूमिकांत फिरणारी. इथला सायरस त्याच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा कितीतरी अधिक खरा आणि अंगावर येणारा आहे.
आजवर बॉलिवूडमध्ये असा समज होता, की सर्व व्यक्तिरेखा नकारात्मक असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडत नाहीत. (उदाहरणार्थ संजय गुप्ताचा कोणताही चित्रपट) त्यामुळेच सायरस चालल्याचं मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केलं गेलं माझ्या मते, या प्रकारचे ढोबळ नियम ठरवणं आता बॉलिवूडनं बंद केलं पाहिजे. आजचा प्रेक्षक पुरेसा मोकळ्या मनाचा आहे हे सायरसच्या यशानं सिद्ध केलं होतं. "चित्रपट मनापासून करा, तो चालतो', हा एकच नियम हिशेबी बॉलिवूडनं आपल्या डोक्यात शिरवणं गरजेचं आहे. बाकी निव्वळ अंधश्रद्धा!
- गणेश मतकरी

Read more...

"इन्कन्व्हिनियंट ट्रुथ' - मागचे सत्य!

>> Saturday, November 15, 2008


अल्‌ गोर यांच्या "ऍन इन्कन्व्हिनियंट ट्रुथ' या माहितीपटाविषयी ऐकत होतो. २००७ चा ऑस्करही त्याला मिळाल्याची बातमी होती. प्रत्यक्ष माहितीपट पाहिला, तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. एक तर हा माहितीपट अल्‌ गोर "यांचा' म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेला असा जो माझा समज होता, तो संपूर्ण चूक होता. .......
दुसरं म्हणजे आपल्याकडे चित्रपट हा हिरोच्या नावाने ओळखला जातो (शाहरूखचा "ओम शांती ओम' इ.) तो खरं तर दिग्दर्शकाचा असतो आणि हॉलिवूडमध्ये तसं होत नाही. तिकडे फिल्म ही दिग्दर्शकाचीच म्हणून ओळखली जाते वगैरे तत्त्वज्ञान पुस्तकी आहे की काय अशी शंका या निमित्तानं आली. तात्पर्य "ऍन इन्कन्व्हिनिअंट ट्रुथ' हा माहितीपट आहे डेविस गगेनहेम यांचा. प्रमुख भूमिका अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अल्‌ गोर आणि विषय आहे ग्लोबल वॉर्मिंग!


निसर्गातल्या "जल-जंगल-जमीन' प्रकारच्या काही शॉट्‌सने माहितीपटाला सुरवात होते. (पर्यावरणासंदर्भात काही लिहायचं आणि हे तीन "ज'कार लिहायचे नाहीत; हे बरं नव्हे. याच भावनेतून इथे आलेले आहेत. एरवी हा "शॉर्टकट' फिल्म्सचा आहे; पर्यावरणाचा नाही!) अल्‌ गोर स्वतःच्या लॅपटॉपवर पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी बघताना दिसतात, अभ्यास करतात आणि त्यांच्या सादरीकरणाला सुरवात करतात...
संपूर्ण शंभर मिनिटांच्या या माहितीपटातला ऐंशी टक्के भाग हा गोर यांच्या पॉवरपॉईंट सादरीकरणाने व्यापलेला आहे. अवकाशातून १९७२ मध्ये घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राची तुलना ते १९६८ मध्ये घेतलेल्या छायाचित्राशी करतात आणि हळूहळू तापमानवाढीचा सर्व जगावर होणारा परिणाम प्रभावी पद्धतीने सांगू लागतात. स्वतःच्या बालपणाविषयी, कॉलेज जीवनाविषयीचे फ्लॅशबॅक्‍सही यात आहेत. साडेसहा लाख वर्षांच्या कार्बनडाय ऑक्‍साईड वायूच्या प्रमाणाबद्दल बोलताना जागतिक संदर्भही त्यात येतात. सध्याचं प्रमाण दाखवताना कार्बनडाय ऑक्‍सॉईडनं गाठलेल्या "उंची'च्या आलेखातील सगळ्यात वरच्या बिंदूपाशी पोचताना ते चक्क लिफ्टचा वापर करतात आणि त्याची परिणामकारकता अधिक तीव्रतेनं श्रोत्यांपर्यंत पोचवतात.
गोर यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच संबंधित सादरीकरणाच्या निमित्तानं त्यांचा जगभर अनेक ठिकाणी झालेला प्रवासही आपल्याला दिग्दर्शक दाखवतो. गोर यांच्या वडिलांची तंबाखूची शेती होती. त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली त्यांची सख्खी बहीण नॅन्सी धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊन मरण पावली, तेव्हा त्या दोन गोष्टींचा संबंध त्यांना जाणवला. जागतिक संकटाची आच स्वतःच्या दाराशी आल्यावर त्याची दाहकता किती जाणवते, याचा अनुभव ते प्रांजळपणे मांडतात.
माहितीपटाच्या शेवटी "आय नीड टू वेकअप' हे मायकेल ब्रुकचं गाणं पार्श्‍वभूमीला वाजू लागतं आणि छोटे छोटे संदेश आणि एंड टायटल्स एकत्रच दिसू लागतात. जागतिक तापमानवाढीसंदर्भात सर्व प्रेक्षकांना स्पष्ट माहिती देऊन माहितीपट संपतो... संपतानाच तो अल्‌ गोर "यांचाच' असल्याची खात्री पटते! याचं मुख्य कारण म्हणजे अल्‌‌‌ गोर यांचं या विषयावरचं सादरीकरण बघून प्रभावित होऊनच तो दिग्दर्शकानं केलाय. स्वतः गोर कुठे कुठे आणि किती वेळा जाणार, या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठीच हा माहितीपट आहे, याची जाणीव अगदी ताबडतोब होते. कारण त्यात दिग्दर्शकाचं स्वतःचं कौशल्य वेगळेपणानं कुठंच जाणवत नाही. गोर यांच्या सादरीकरणातला शंभर टक्के भाग प्रेक्षकांपर्यंत पोचतो. दिग्दर्शकीय हाताळणीमध्ये त्या शंभराचे ऐंशी टक्के कुठेही होत नाहीत, हे खरं असलं तरी त्याच वेळी त्या शंभराचे एकशेवीस टक्केही होत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे गोर यांचं प्रभावी वक्तृत्व, ऍनिमेशन्स, कार्टून्सच्या साह्यानं केलेलं अत्यंत सुरेख सादरीकरण, एवढाच भाग माहितीपट संपल्यानंतर लक्षात राहतो. माहितीपटाला मिळालेलं ऑस्कर हे त्यातल्या "माहिती'साठीच आहे आणि जागतिक घडामोडींच्या संदर्भात पर्यावरणरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनच त्याकडे बघायला हवं.
या माहितीपटाचं बजेट सुमारे दहा लाख डॉलर एवढं होतं. जगभर त्यानं सुमारे पाच कोटी डॉलरचा व्यवसाय केला! जगभराच्या टीकाकारांनी हा माहितीपट पाहायलाच हवा, इथपासून ते यात काही अतिरंजित "सत्यं' आहेत, इथपर्यंत सर्वांगीण टीकाही केली आहे. एबर्ट नावाचा वरिष्ठ चित्रपट समीक्षक तर असंही म्हणतो, की "तुम्ही हा माहितीपट बघायलाच हवा नाही तर काही काळानंतर तुमच्या नातवांना तुम्हाला तो न बघण्याची कारणं सांगत बसावी लागतील!' सुमारे वीस पारितोषिकं या माहितीपटाला मिळाली. (आणि अल्‌ गोर यांना नोबेलही मिळालंय); पण याचबरोबर या माहितीपटावर गोर यांनी सांगितलेल्या काही बाबींवर कठोर टीकाही करण्यात आली आहे. विशेषतः समुद्राची पातळी अंटार्क्‍टिकाचा बर्फ वितळल्यामुळे वीस फुटांनी वाढेल यासारख्या विधानांना शास्त्रीय आधार नाही. माहितीपटात असलेल्या सर्व मुलाखती रिपब्लिकनांच्याच आहेत, हॅरिकेन किंवा कतरिना या वादळांचा आणि जागतिक तापमानवाढीचा संबंध नाही. "आपण आपल्या जगण्याचा मार्ग बदलत नाही' असं सांगून निःश्‍वास सोडणारे गोर स्वतः मात्र जेटनेच प्रवास करतात यांसारख्या काही गोष्टींवर टीकाकारांचे आक्षेप आहेत.
हे सगळं असूनही माहितीपट डोळे उघडणारा आहे, हे निश्‍चित. माहितीपट बघून प्रेक्षकांनी जागतिक तापमानवाढीविरोधात स्वतःपुरते काही निर्बंध जरी घालून घेण्याची तयारी दाखवली तरी ते माहितीपटाचं यशच आहे. अर्थात स्वतः गोर यांनी या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही, तर ते या माहितीपटाचा सीक्वेल तयार करण्याच्या मागे लागले! "द पाथ टू सर्व्हाइवल' या नावानं तो यावर्षी जगभरात प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात तुमचा अभ्यास होणार असेल तर ठीक; नाही तर मात्र "ऍन इन्कन्व्हिनिअंट ट्रुथ' तुम्ही जरूर पाहायलाच हवा.

- प्रसाद नामजोशी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP