पल्प फिक्शनः स्टाईल स्टेटमेंट
>> Friday, November 28, 2008
सामान्यतः चित्रपटांना कथा असते, आणि या कथेचे तीन भाग असतात. सुरूवात,मध्य आणि शेवट. या नियमाला जे अनेक सन्मान्य अपवाद आहेत त्यातला जवळजवळ सर्वात महत्त्वाचा, अनेक दिग्दर्शकांना प्रेरणा देणारा आणि आधुनिक कथानिवेदनात मोठा लक्षवेधी प्रयोग घडवून आणणारा चित्रपट म्हणजे पल्प फिक्शन (१९९४). मुळात व्हिडीओ स्टोअरमध्ये नोकरीला असणा-या क्वेन्टीन टेरेन्टीनोचा रिझरव्हॉयर डॉग्जनंतरचा, म्हणजे दुसरा चित्रपट.
पल्प फिक्शन म्हणून ओळखलं जाणारं साहित्य या एकेकाळी प्रामुख्याने सवंग लोकप्रियता मिळविणा-या रहस्यकथा होत्या, ज्या लिहिणा-यातले अनेक लेखक पुढे नावाजले गेले आणि रहस्यकथांनाही काही प्रमाणात प्रस्थापित समजलं जाऊ लागलं. "फिल्म न्वार' (Film Noir) नावाने ओळखल्या जाणा-या आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या अखेरच्या काळात गाजलेल्या गडद गुन्हेगारीपटांवरही या कथा,कादंब-यांचा ठसा होता. टेरेन्टीनोने पल्प फिक्शन चित्रपटासाठी या लेखी आणि दृश्य अशा दोन्ही संदर्भाचा मुक्तहस्ते वापर केला आहे.
पल्प फिक्शनची कथा, किंवा पल्प फिक्शनच्या कथा ( ज्या पात्रांच्या एकाच संचात घडत असल्या तरी चार आहेत) महत्त्वाच्या नाहीत, किंबहूना त्या केवळ निमित्तमात्र आहेत. आपलं रचना कौशल्य उपहासात्मक ब्लॅक ह्यूमर, आपल्याला आवडलेल्या चित्रपटांचे संदर्भ आणि काही अत्यंत आकर्षक (दिसायला नव्हे पण नाट्यमयतेच्या दृष्टीने) व्यक्तिरेखा यांना एकत्र गुंफवण्यासाठी लागणारा धागा म्हणून त्याने कथानकाचा वापर केला आहे.
व्हिसेन्ट व्हेगा (जॉन ट्रावोल्टा) आणि ज्यूल्स विनफिल्ड (सॅम्यूएल एल जॅक्सन) हे गँगस्टर, त्यांचा बदमाश बॉस मार्सेलस वॉलेस (विन्ग रामीस), वॉलेसची पत्नी मिआ (उमा थर्मन) आणि कारकिर्दीच्या अखेरीला पोचलेला बॉक्सर बुच (ब्रूस विलीस) ही यातली प्रमुख पात्र. त्याबरोबर इतर अनेक बारीकसारीक पात्र. सुरुवात, शेवट आणि मधली तीन एकमेकांत मिसळणारी कथानकं असं याचं ढोबळमानाने स्वरूप आहे. चित्रपटात घटना घडतात, पण मागेपुढे सरकणा-या कथानकांमुळे आपण त्या क्रमाने पाहू शकत नाही आणि मनातल्या मनात त्यामध्ये जोडकाम करून घ्यावं लागतं. या घटना या टेरेन्टीनो शैलीच्या विनोदाचा आणि विसंगतीचा उत्तम नमुना आहे.
इथे व्हिन्सेन्ट आणि ज्युल्स बर्गरला फ्रेन्चमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करतात. एकमेकांना पम्कीन आणि हनीबनी अशा लाडक्या नावाने हाका मारणारं जोडपं फास्ट फूड हॉटेलवर दरोडा घालतं. मार्सेलसच्या अनुपस्थितीत त्याच्या बायकोची सरबराई करण्याची जबाबदारी व्हिन्सेन्टवर येऊन पडते. बुचला त्याच्या वडिलांचं सोन्याचं घड्याळ आपल्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय वाटतं.
ज्यूल्स एका हातात पिस्तुल पकडून बायबलमधले उतारे म्हणून दाखवतो, बुच मार्सेलसला डबलक्रॉस करतो, गाडीतल्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी विन्स्टन वुल्फ (हार्वी कायटेल) या एक्सपर्टला बोलावलं जातं आणि हे काम आपली बायको घरी येण्याआत उरकणार नाही, अशा काळजीत जिमी (क्वेन्टीन टेरेन्टीनो) पडतो.
या आणि अशा घाडामोडींनी भरलेल्या पल्प फिक्शनचा विषय हा, की तो गँगस्टरना एका वेगळ्या पद्धतीने ग्लॅमराईज करतो. त्याचं उदात्तीकरण करतो. याआधी गँगस्टरना नायक म्हणून दाखवलेले अनेक चित्रपट होते, पण त्यांचा प्रकार गंभीर होता. शेवटही अनेकदा ते अडचणीत येण्यावर होत असे. टेरेन्टीनो आपल्या गँगस्टरना पडद्यावर आणताना अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश पद्धतीने आणतो. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल,वागण्याच्या पद्धती, संवाद यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तो या व्यक्तिरेखा त्रिमितीत आणतो. या चित्रपटाला हिंसाचारही तो संयतपणे न दाखवता खोटा वाटेल इतक्या अतिप्रमाणात दाखवतो. आणि प्रसंगांना गंमतीदार कलाटणी देण्यावर पटकथेला भर देतो.
टेरेन्टीनोचा हा दृष्टीकोन पल्प फिक्शन लोकप्रिय व्हायला कारणीभूत झाला. यातल्या प्रत्येक गोष्टीकडे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहिलं गेलं आणि आज अनेक वर्षानंतरही यातल्या व्यक्तिरेखांचे, प्रसंगांचे संदर्भ आपल्याला विविध चित्रपट,टीव्ही मालिका,त्याचबरोबर व्हिडीयो गेम्समध्येही पाहायला मिळतात. स्वतः टेरेन्टीनोनेही आपल्या गडद विश्वाची रिझरव्हॉयर डॉग्जमध्ये सुरू केलेली रचना या चित्रपटापासून पुढे नेली. आता तो पम्पकीनची भूमिका करणारा आणि पुढे स्वतंत्रपणे दिग्दर्शनात उतरणारा टिम रॉथ यांच्या चित्रपटांमध्ये कायम त्यांच्या आधीच्या चित्रपटांचे संदर्भ आणून जोडलेले पाहायला मिळतात. दोन वेगळ्या चित्रपटांमधल्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या नात्यातल्या असणं (डॉग्जमधली प्रमुख व्यक्तिरेखा लॅरी, ही पल्प फिक्शनमधल्या जिमीचा चुलतभाऊ आहे.) किंवा एका चित्रपटात वापरलेली गोष्ट दुस-यात पुन्हा आणणं (बिग काहुना बर्गर. या कल्पित फास्ट फु़ड चेनचा उल्लेख टेरेन्टीनोच्या अनेक चित्रपटात आढळतो.) चित्रपटाचे थेट किंवा अप्रत्यक्ष संदर्भ आणणं (रॉथच्या होस्टेलमध्ये टीव्हीवर पल्प फिक्शन चालू असलेला दिसतो.)
अशा अनेक प्रकारांनी टेरेन्टीनो त्याच्या चित्रपटांना एकमेकांत अडकवताना दिसून येतो. अंतिमतः पाहायचं तर आकर्षक,गतिमान आणि डोक्याचा उत्तम वापर करून काढलेल्या टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच पल्प फिक्शनदेखील अतिरंजीत आणि पोलिटिकली इनकरेक्ट किंवा चुकीच्या बाजूला वर उचलून धरणारा आहे. अर्थात चित्रपट ही कला आहे. आणि तो पाहताना कलावंतांचं आविष्कारस्वातंत्र्य गृहीत धरणं आणि ते पाहताना आपलं डोकं ताळ्यावर ठेवणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे. चित्रपटाचं अनुकरण वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार मानत असताना हे चित्रपटही कुठेतरी वास्तवावरच आधारलेले आहेत हे विसरून चालणार नाही.
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment