"इन्कन्व्हिनियंट ट्रुथ' - मागचे सत्य!
>> Saturday, November 15, 2008
अल् गोर यांच्या "ऍन इन्कन्व्हिनियंट ट्रुथ' या माहितीपटाविषयी ऐकत होतो. २००७ चा ऑस्करही त्याला मिळाल्याची बातमी होती. प्रत्यक्ष माहितीपट पाहिला, तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. एक तर हा माहितीपट अल् गोर "यांचा' म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेला असा जो माझा समज होता, तो संपूर्ण चूक होता. .......
दुसरं म्हणजे आपल्याकडे चित्रपट हा हिरोच्या नावाने ओळखला जातो (शाहरूखचा "ओम शांती ओम' इ.) तो खरं तर दिग्दर्शकाचा असतो आणि हॉलिवूडमध्ये तसं होत नाही. तिकडे फिल्म ही दिग्दर्शकाचीच म्हणून ओळखली जाते वगैरे तत्त्वज्ञान पुस्तकी आहे की काय अशी शंका या निमित्तानं आली. तात्पर्य "ऍन इन्कन्व्हिनिअंट ट्रुथ' हा माहितीपट आहे डेविस गगेनहेम यांचा. प्रमुख भूमिका अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अल् गोर आणि विषय आहे ग्लोबल वॉर्मिंग!
निसर्गातल्या "जल-जंगल-जमीन' प्रकारच्या काही शॉट्सने माहितीपटाला सुरवात होते. (पर्यावरणासंदर्भात काही लिहायचं आणि हे तीन "ज'कार लिहायचे नाहीत; हे बरं नव्हे. याच भावनेतून इथे आलेले आहेत. एरवी हा "शॉर्टकट' फिल्म्सचा आहे; पर्यावरणाचा नाही!) अल् गोर स्वतःच्या लॅपटॉपवर पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी बघताना दिसतात, अभ्यास करतात आणि त्यांच्या सादरीकरणाला सुरवात करतात...
संपूर्ण शंभर मिनिटांच्या या माहितीपटातला ऐंशी टक्के भाग हा गोर यांच्या पॉवरपॉईंट सादरीकरणाने व्यापलेला आहे. अवकाशातून १९७२ मध्ये घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राची तुलना ते १९६८ मध्ये घेतलेल्या छायाचित्राशी करतात आणि हळूहळू तापमानवाढीचा सर्व जगावर होणारा परिणाम प्रभावी पद्धतीने सांगू लागतात. स्वतःच्या बालपणाविषयी, कॉलेज जीवनाविषयीचे फ्लॅशबॅक्सही यात आहेत. साडेसहा लाख वर्षांच्या कार्बनडाय ऑक्साईड वायूच्या प्रमाणाबद्दल बोलताना जागतिक संदर्भही त्यात येतात. सध्याचं प्रमाण दाखवताना कार्बनडाय ऑक्सॉईडनं गाठलेल्या "उंची'च्या आलेखातील सगळ्यात वरच्या बिंदूपाशी पोचताना ते चक्क लिफ्टचा वापर करतात आणि त्याची परिणामकारकता अधिक तीव्रतेनं श्रोत्यांपर्यंत पोचवतात.
गोर यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच संबंधित सादरीकरणाच्या निमित्तानं त्यांचा जगभर अनेक ठिकाणी झालेला प्रवासही आपल्याला दिग्दर्शक दाखवतो. गोर यांच्या वडिलांची तंबाखूची शेती होती. त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली त्यांची सख्खी बहीण नॅन्सी धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊन मरण पावली, तेव्हा त्या दोन गोष्टींचा संबंध त्यांना जाणवला. जागतिक संकटाची आच स्वतःच्या दाराशी आल्यावर त्याची दाहकता किती जाणवते, याचा अनुभव ते प्रांजळपणे मांडतात.
माहितीपटाच्या शेवटी "आय नीड टू वेकअप' हे मायकेल ब्रुकचं गाणं पार्श्वभूमीला वाजू लागतं आणि छोटे छोटे संदेश आणि एंड टायटल्स एकत्रच दिसू लागतात. जागतिक तापमानवाढीसंदर्भात सर्व प्रेक्षकांना स्पष्ट माहिती देऊन माहितीपट संपतो... संपतानाच तो अल् गोर "यांचाच' असल्याची खात्री पटते! याचं मुख्य कारण म्हणजे अल् गोर यांचं या विषयावरचं सादरीकरण बघून प्रभावित होऊनच तो दिग्दर्शकानं केलाय. स्वतः गोर कुठे कुठे आणि किती वेळा जाणार, या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठीच हा माहितीपट आहे, याची जाणीव अगदी ताबडतोब होते. कारण त्यात दिग्दर्शकाचं स्वतःचं कौशल्य वेगळेपणानं कुठंच जाणवत नाही. गोर यांच्या सादरीकरणातला शंभर टक्के भाग प्रेक्षकांपर्यंत पोचतो. दिग्दर्शकीय हाताळणीमध्ये त्या शंभराचे ऐंशी टक्के कुठेही होत नाहीत, हे खरं असलं तरी त्याच वेळी त्या शंभराचे एकशेवीस टक्केही होत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे गोर यांचं प्रभावी वक्तृत्व, ऍनिमेशन्स, कार्टून्सच्या साह्यानं केलेलं अत्यंत सुरेख सादरीकरण, एवढाच भाग माहितीपट संपल्यानंतर लक्षात राहतो. माहितीपटाला मिळालेलं ऑस्कर हे त्यातल्या "माहिती'साठीच आहे आणि जागतिक घडामोडींच्या संदर्भात पर्यावरणरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनच त्याकडे बघायला हवं.
या माहितीपटाचं बजेट सुमारे दहा लाख डॉलर एवढं होतं. जगभर त्यानं सुमारे पाच कोटी डॉलरचा व्यवसाय केला! जगभराच्या टीकाकारांनी हा माहितीपट पाहायलाच हवा, इथपासून ते यात काही अतिरंजित "सत्यं' आहेत, इथपर्यंत सर्वांगीण टीकाही केली आहे. एबर्ट नावाचा वरिष्ठ चित्रपट समीक्षक तर असंही म्हणतो, की "तुम्ही हा माहितीपट बघायलाच हवा नाही तर काही काळानंतर तुमच्या नातवांना तुम्हाला तो न बघण्याची कारणं सांगत बसावी लागतील!' सुमारे वीस पारितोषिकं या माहितीपटाला मिळाली. (आणि अल् गोर यांना नोबेलही मिळालंय); पण याचबरोबर या माहितीपटावर गोर यांनी सांगितलेल्या काही बाबींवर कठोर टीकाही करण्यात आली आहे. विशेषतः समुद्राची पातळी अंटार्क्टिकाचा बर्फ वितळल्यामुळे वीस फुटांनी वाढेल यासारख्या विधानांना शास्त्रीय आधार नाही. माहितीपटात असलेल्या सर्व मुलाखती रिपब्लिकनांच्याच आहेत, हॅरिकेन किंवा कतरिना या वादळांचा आणि जागतिक तापमानवाढीचा संबंध नाही. "आपण आपल्या जगण्याचा मार्ग बदलत नाही' असं सांगून निःश्वास सोडणारे गोर स्वतः मात्र जेटनेच प्रवास करतात यांसारख्या काही गोष्टींवर टीकाकारांचे आक्षेप आहेत.
हे सगळं असूनही माहितीपट डोळे उघडणारा आहे, हे निश्चित. माहितीपट बघून प्रेक्षकांनी जागतिक तापमानवाढीविरोधात स्वतःपुरते काही निर्बंध जरी घालून घेण्याची तयारी दाखवली तरी ते माहितीपटाचं यशच आहे. अर्थात स्वतः गोर यांनी या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही, तर ते या माहितीपटाचा सीक्वेल तयार करण्याच्या मागे लागले! "द पाथ टू सर्व्हाइवल' या नावानं तो यावर्षी जगभरात प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात तुमचा अभ्यास होणार असेल तर ठीक; नाही तर मात्र "ऍन इन्कन्व्हिनिअंट ट्रुथ' तुम्ही जरूर पाहायलाच हवा.
- प्रसाद नामजोशी
2 comments:
खुपच छान !!!
मी हा माहिती पाट पहिला आहे. खुपच अंतर्मुख करणारा आहे.
माहिती बद्डल खूप खूप धन्यवाद!!!
-अभी
धन्यवाद अभी.
Post a Comment