इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग सायरस
>> Tuesday, November 18, 2008
२००५ साली एक चित्रपट प्रदर्शित झाला. "बिईंग सायरस'. याचं महत्त्व हेच, की तो आपल्या टारगेट प्रेक्षक कोणता, हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांना कसा वाटेल, यांसारख्या गोष्टींचा विचारच करत नाही. त्यामुळेच तो स्वतःभोवती काल्पनिक मर्यादा घालून घेत नाही. मोठ्या कलाकारांना घेऊन केलेली ही छोटी निर्मिती अनेक बाबतींत नियम झुगारून देते.
भारतीयांनी लिहिलेलं इंग्रजी साहित्य आणि भारतीय दिग्दर्शकांनी केलेले इंग्रजी चित्रपट यांची संख्या आज वाढती असली, तरी हे कलाप्रकार अजूनही काही एका हिशेबातच विचार करताना दिसतात. साहित्यात प्रामुख्याने दिसतं ते आपलं भारतीय असणं, आपली प्रादेशिकता अधोरेखित करण्याची वृत्ती. आता लिहिणारा भारतीय असल्यावर त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत काहीतरी आपल्या मातीतलं जरूर असेल; पण त्याचं भांडवल करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची वृत्ती योग्य नाही.
थोड्या वेगळ्या दृष्टीनं हीच गोष्ट आपल्या तथाकथित इंग्रजी चित्रपटांची. हे साहित्यासारखे अस्सल परदेशी जनतेला गृहीत धरून मात्र केले जात नाहीत. त्यांचा भर असतो तो परदेशी भारतीयांवर (वा परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांवर). त्यामुळे आपल्याकडचा इंग्रजी क्रॉसोव्हर चित्रपट हा खरं तर क्रॉस्ड ओव्हर प्रेक्षकांसाठी असतो म्हटलं तरी चालेल.
थोडक्यात म्हणजे, आपल्या साहित्याने वा चित्रपटाने इंग्रजी भाषा जवळ केली असली तरी या जवळिकीला विषयांची, संस्कृतीची, पार्श्वभूमीची आणि अपेक्षांची अनेकानेक बंधनं आहेत. हे कलाप्रकार मुक्त नाहीत. अर्थात, या विधानाचा संबंध हा कलाकृतींच्या दर्जाशी नसून, त्यांच्या प्रकाराशी आहे. मात्र जोपर्यंत आपण विशिष्ट चौकटीपासून बंधनमुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या कलानिर्मितीच्या कक्षा पुरेशा विस्तारणार नाहीत, हेदेखील खरं.
मात्र ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, अशी शक्यता दर्शविणारा एक चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला. "बिईंग सायरस'. याचं महत्त्व हेच, की तो आपल्या टारगेट प्रेक्षक कोणता, हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांना कसा वाटेल, यांसारख्या गोष्टींचा विचारच करत नाही. त्यामुळेच तो स्वतःभोवती काल्पनिक मर्यादा घालून घेत नाही. मोठ्या कलाकारांना घेऊन केलेली ही छोटी निर्मिती अनेक बाबतींत नियम झुगारून देते. दिग्दर्शक होमी अद् जानिआने आपल्याला काय गोष्ट सांगायला आवडेल, ती कोणत्या भाषेत सांगणं सोईस्कर आहे, आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी कोणते कलाकार योग्य आहेत, या तीनच बाबींचा विचार केल्याचं दिसतं; जे योग्यच आहे.
त्यामुळे एक गमतीची गोष्ट मात्र होते, की हा चित्रपट बॉलिवूडचा आहे की नाही याबद्दल पाहणारा संभ्रमात पडतो. केवळ कलाकारांबद्दल बोलायचं, तर इथं बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट नटमंडळी पाहायला मिळतात. सैफ, नासिरुद्दीन शाह, डिम्पल आणि बोमन इराणी यांच्यासारख्या शंभर टक्के बॉलिवूडच्या मानल्या जाणाऱ्या कलाकारांनी इथे हजेरी लावली आहे; मात्र त्यांची इथली कामगिरी कोणत्याही व्यावसायिक तडजोडीच्या खुणा दाखवणारी नाही. सर्वच पात्रांमध्ये नकारात्मक छटा असणारा बिईंग सायरस खरा उभा राहतो या उत्तम नटसंचाच्या जोरावर. आणि या मंडळींना अशा चाकोरीबाहेरच्या व्यक्तिरेखा करण्याच्या फार कमी संधी उपलब्ध असल्याची खंत वाटायला लागते.
"बिईंग सायरस' एक बऱ्यापैकी चांगला इंग्रजी चित्रपट आहे. आणि त्याचा बॉलिवूडच्या अपेक्षित रंजनमूल्यांशी काही संबंध नाही. सायरसची कथा आहे ती सेथना या पारशी कुटुंबाची. आणि त्यांच्या घरात शिरलेल्या सायरस मिस्त्री (सैफ अली खान) या तरुणाची. सेथना कुटुंब हे पारशांना शोभेशा विक्षिप्तपणाची रेलचेल असणारं आहे. दिनशॉ (नासिरुद्दीन शाह) हा एके काळी गाजलेला स्कल्पटर आहे. पण आता गावाबाहेरच्या एका प्रशस्त घरात तो आपल्या केटी (डिम्पल) या पत्नीबरोबर राहतोय. दिनशॉच्या फारूक (बोमन इराणी) या भावाने मुंबईतली कुटुंबाच्या मालकीची इमारत हडप केली आहे. आणि तिथे तो टीना (सिमोन सिंग) या पुष्कळच तरुण पत्नीबरोबर संसार करतोय, आणि फरदून (हनी छाया) या आपल्या वडिलांची काळजी घेतोय किंवा निदान तसं दाखवतोय.
अशा या कुटुंबात सायरस शिरतो, तो दिनशॉचा मदतनीस म्हणून. वरवर पाहता निरुपद्रवी वाटणारा सायरस फारसा सरळ नसतो आणि सेथना कुटुंबातही साऱ्या गोष्टी आलबेल नसतात. हळूहळू उलगडत जातं, की कुटुंबातली एक व्यक्ती इतरांच्या विरुद्ध कारस्थान रचते आहे आणि त्यासाठी सायरसला वापरून घेण्याचा तिचा इरादा आहे. मात्र सायरसच्या डोक्यात काही वेगळ्याच योजना असतात.
"बिईंग सायरस' हे नाव चित्रपटाला योग्य असलं तरी त्यावरून तो कोणत्या प्रकारात मोडतो हे कळू शकत नाही. चित्रपटाची जाहिरातही त्याच्या विषयाबद्दल सुचवणारी नाही. हे का ते कळायला मार्ग नाही. कारण चित्रपटात रहस्य आहे आणि रहस्यपटांना सामान्यतः मागणी असते. तरीही प्रेक्षकांना विषयाबद्दल अनभिज्ञ ठेवण्याचा सायरसचा प्रयत्न आहे.
एका दृष्टीनं पाहायचं, तर चित्रकर्त्यांनी निवडलेला मार्ग योग्य आहे. कारण सायरसमध्ये रहस्य असलं, तरी सांकेतिक अर्थानं हा रहस्यपट नाही. सामान्य प्रेक्षक रहस्यपटाकडून ज्या अपेक्षा करेल, त्या इथं पुऱ्या होतीलच असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आपल्याकडली रहस्यपटांची परंपरा ही "हूडनइट' छापाच्या चित्रपटांची आहे, ज्यामधला पहिला बराचसा भाग ऍक्शन, कॉमेडी आणि इतर नेहमीच्या मसाल्याला वाव देणारा असतो, तर शेवटचा एक धक्का हाच खरा रहस्याला न्याय देतो. सायरसमध्ये नेहमीच्या मसाल्याचा पूर्ण अभाव तर आहेच, वर इथलं रहस्य हे केवळ शेवटावर सोडलेलं नसून, टप्प्या टप्प्यावर बदलत जातं. कधी ते सायरसच्या वागण्याचा अर्थ सांगणारं असतं, कधी त्याच्यावर सोपवलेली कामगिरी कोणती यासंबंधातलं असतं. कधी ती कोणी सोपवली याच्याशी निगडित असतं, तर कधी सायरसच्या भूतकाळाचा संदर्भ लावणारं. त्यामुळे कथा केवळ एका धक्क्यावर अवलंबून राहत नाही, तर तिचा फोकस बदलत राहतो.
बिईंग सायरसचा जीव छोटा आहे. पूर्वी आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेन्ट् स मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या आणि संग्रहित केल्या गेलेल्या गोष्टींची आठवण व्हावी, असं चित्रपटाचं एकूण स्वरूप आहे. त्यामुळे साहजिकच काही वेळा चित्रपट संथ वाटतो. खास करून सुरवातीच्या भागात जेव्हा त्याची दिशा अनिश्चित असते, त्यातली गुन्हेगारी वळणं प्रकट व्हायची असतात. सायरसच्या पटकथेतल्या काही त्रुटी काढणं चित्रकर्त्यांना शक्य होतं. उदाहरणार्थ सेथना कुटुंबाशी सायरसचा पूर्वी कधी संबंध आला होता का, हा मुद्दा इथं स्पष्ट होत नाही. सायरसचा भूतकाळ, आणि चित्रपटाच्या शेवटी सुचवण्यात आलेली एक शक्यता पाहता, तसं असावं असं वाटतं, मात्र ते पुरेसं नाही. कारण तसं असल्यास त्याचा पटकथेत स्पष्ट उल्लेख हवा, जो इथं नाही.
तसंच रहस्याचा अंतिम उलगडा, चित्रपटात वेळोवेळी पडणाऱ्या सर्व प्रश्नांना पुरून उरायला हवा. तसंही इथं होत नाही. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
मात्र तरीही सायरस त्या वर्षीचा उल्लेखनीय चित्रपट ठरावा. दिग्दर्शकाचा कथेच्या मांडणीमागचा दृष्टिकोन, पारशी कुटुंबाच्या विक्षिप्तपणाचं मोकळं चित्रण, तिरकस विनोद, जागोजागी येणारे रहस्याचे लहान मोठे तुकडे, आणि कृत्रिम नाट्यमयतेचा अभाव ही सगळी सायरसची वैशिष्ट्यं आहेत.मोठं वैशिष्ट्य आहे, ते सैफ अली खानचा आत्मविश्वासपूर्ण वावर. "हम तुम' पर्यंत सोलो नायक म्हणून पडद्यावर येण्याची भीती असलेल्या या अतिशय गुणी नटानं या प्रकारची पूर्ण नकारात्मक भूमिका घेण्याची ना अपेक्षा होती, ना तो ती पेलवू शकेल अशी कल्पना. त्याचा व्यावसायिक चित्रपटातला अनुभव, आणि कामगिरी चांगली असली तरी एका चाकोरीतल्या भूमिकांत फिरणारी. इथला सायरस त्याच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा कितीतरी अधिक खरा आणि अंगावर येणारा आहे.
आजवर बॉलिवूडमध्ये असा समज होता, की सर्व व्यक्तिरेखा नकारात्मक असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडत नाहीत. (उदाहरणार्थ संजय गुप्ताचा कोणताही चित्रपट) त्यामुळेच सायरस चालल्याचं मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केलं गेलं माझ्या मते, या प्रकारचे ढोबळ नियम ठरवणं आता बॉलिवूडनं बंद केलं पाहिजे. आजचा प्रेक्षक पुरेसा मोकळ्या मनाचा आहे हे सायरसच्या यशानं सिद्ध केलं होतं. "चित्रपट मनापासून करा, तो चालतो', हा एकच नियम हिशेबी बॉलिवूडनं आपल्या डोक्यात शिरवणं गरजेचं आहे. बाकी निव्वळ अंधश्रद्धा!
- गणेश मतकरी
1 comments:
मित्रा ..
तुझा ब्लॉग झकास आहे. मी मधूनमधून तुझ्या ब्लॉगवर येत असतो. मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. "ब्लॉग" या विषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.
शुभेच्छा !
Post a Comment