गंमतीदार दुःस्वप्न

>> Wednesday, October 8, 2008


उबदार रात्र. ख्रिसमस इव्ह. एक गोड छोटा मुलगा सान्ताक्लॉजची वाट पाहत बसलाय.यथावकाश फायर प्लेसमध्ये एक दोरी सोडली जाते आणि सान्ता अवतरतो. मुलाला आनंद, सान्ता पोतडीतून हळूच एक खेळणं काढून मुलापुढे करतो. मुलगा ते उचलतो. प्रसंग प्रत्यक्षात इथेच संपायला हवा. पण सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन चित्रपटात तो चालूच राहतो. आता फायरप्लेसमधून आणखी एक सान्ता उतरतो. मग आणखी एक. सगळे खेळणी काढून ती मुलापुढे करायला लागतात. आता मुलाच्या आनंदाची जागा हळूहळू भीतीने घेतलेली. हे वाढत चाललेले सान्ता आता खोली भरून टाकतात.त्यांचे हसरे चेहरेही आता बदलायला लागलेले,विकृत होत चाललेले. हे सगळं मुलगा सहन करू शकत नाही. तो भयंकर घाबरलेला. आता तो रडायला लागतो, बांध फुटल्यासारखा.
जाँ पिएर जुनेट या फ्रेंच दिग्दर्शकाचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणावा लागेल एमिली. जो लगाबरोबर इंग्रजीतर भाषेतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात होता, आणि ब-याच जणांना तो जिंकण्याची खात्री होती. एमिली त्यावर्षी पारितोषिक प्राप्त ठरला नाही. (युद्धावर विदारक भाष्य करणा-या नो मॅन्स लॅण्डने बाजी मारली.) पण जुनेट या दिग्दर्शकाचं नाव लक्षात राहिलं. एमिली हा त्याचा बहुसंख्य प्रेक्षकांना आवडणारा पहिलाच चित्रपट म्हणावा लागेल. एमिलीआधी मार्क कारोबरोबर केलेल्या विक्षिप्त आणि चमत्कृतीपूर्ण चित्रपटातील एक होता सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन. हा आणि त्याआधीचा डेलिकटेसन पाहिलेल्यांना जुनेट एमिली करण्याइतका सरळ कसा झाला याचं निश्चितच आश्चर्य वाटेल. एमिलीनंतरच्या व्हेरी लाँग एन्गेजमेंटमध्ये तो आणखीच माणसाळल्याची चिन्ह दिसू लागली. (व्हेरी लाँग एन्गेजमेंटबद्दल वाचा फेब्रुवारी महिन्यातील पोस्टमध्ये)
सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रनचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे त्याचं दृश्य स्वरूप. विकृती, चमत्कृती, भव्यता,आश्चर्य, किळस अशा अनेकविध आणि सतत बदलणा-या भावना हा चित्रपट आपल्या मनात उत्पन्न करत राहतो. त्याची निर्मिती अतिशय खर्चिक होती आणि हा खर्च आपल्या डोळ्यांना सतत दिसत राहतो. दिग्दर्शकांनी इथली गोष्ट घडविण्यासाठी एका नव्याच जगाला आकार दिलाय. हे जग भविष्यातलं नाही, भूतकाळातलं तर नाहीच नाही. पण आपल्या जगासारखंही नाही. आपल्या सर्वकाळाचं मिश्रण करणारं कोणत्याशा समांतर विश्वातलं हे जग असावं. किंवा कदाचित आपल्याच दुःस्वप्नातलं.
तर या जगात एक शास्त्रज्ञ आहे. समुद्रात मध्यभागी प्रयोगशाळा उभारून राहणारा. याचं नाव क्रँक (डॅनियल एमिलफोर्क) क्रँक फार झपाट्याने म्हातारा होतोय. कारण त्याला स्वप्नच पडू शकत नाहीत. क्रँकच्या तळावर एक फिशटँकमध्ये तरंगणारा मेंदू , मिस बिस्मथ नावाची बुटकी बाई आणि एकसारखे दिसणारे (अर्थातच) सहा क्लोन्स आहेत. आपलं वाढणारं वय वेळीच आवरण्यासाठी क्रँक करतो काय, तर लहान मुलांना पळवून आणून त्यांची स्वप्न चोरण्याचा प्रयत्न. या पळवलेल्या मुलांमधला एक असतो डेनरी. डेनरीला पळवणं क्रँकला महागात पडेलसं दिसायला लागतं. कारण डेनरीचा (बहुदा मानलेला) भाऊ असतो, जत्रेत शक्तीप्रदर्शन दाखवणारा वॅन (रॉन पर्लमन) , वॅन डेनरीच्या मागावर राहण्याची शर्थ करतो. आणि या प्रयत्नात त्याला साथ मिळते ती मिएट (जुडीथ विटेट) या चोर अनाथ मुलांच्या गँगचं नेतृत्व करणा-या मुलीची. कथेची इतपत वळणं सांगितली, तरी लक्षात येईल की कथा किती विचित्र आहे. व्यक्तिरेखा त्याहून विचित्र.
लॉस्ट चिल्ड्रनमधली गंमत म्हणजे तो या चमत्कारिक विश्वातली प्रत्येक गोष्ट ही बारकाईने रंगवायचा प्रयत्न करतो. भावनिकदृष्ट्या नाही, तर व्हिजुअली.
उदाहरण एक. इथे मुलं पळवणारे क्रँकचे काही हस्तक आहेत. ते एका परीने आंधळे आहेत. म्हणजे त्यांचा एक डोळा सफेद झाला आहे. तर दुस-यावर अनेक चक्रांची बनलेली एक यंत्रणा लावली आहे. जिचा वापर त्यांना टीव्हीच्या पडद्यासारखी दृश्य दिसण्याकरता होतो. ही चक्रांची यंत्रणा कशा प्रकारे वापरात येत असेल याचा पूर्ण विचार दिग्दर्शकाने केला आहे आणि त्याचा अंगावर शहारे आणण्यासारखा वापरही एका प्रसंगात करून दाखविला आहे.
उदाहरण दोन. क्रँकच्या फिशटँकमधला मेंदू. हा मेंदू कुणाचा आहे ? तो इतरांशी काय संवाद साधत असेल ? त्याची क्लोन्सबरोबर बोलण्याची पद्धत अन् क्रँकबरोबर बोलण्याची पद्धत यात काय फरक असेल ? याचा पूर्ण अभ्यास दिग्दर्शकाने केलेला दिसतो.
अशी अनेक उदाहरणं घेता येतील. दिग्दर्शकांनी चित्रपटाची जणू फोड करून प्रत्येक प्रसंग स्वतंत्रपणे भरत नेला आहे. कल्पनेच्या यथासांग भरा-या मारत त्यांनी ही गोष्ट रंगवत नेली आहे. लॉस्ट चिल्ड्रनला एखाद्या गटात बसवायचं तर त्याला फॅन्टसी किंवा अदभुतिका म्हणता येईल. पण एक तर ही अदभुतिका (यात मुलांच्या भूमिका असूनही) मोठ्यांचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे आणि फॅन्टसीप्रमाणेच इतर चित्रप्रकारांचे, खासकरून सायन्स फिक्शनचे अनेक गुणधर्म इथे लक्षात येण्यासारखे आहेत. इथे विनोदही आहे, पण तो मुख्यतः काळा.
जुनेट आणि कारोचं हे जग सर्वांनाच आवडणार नाही, काहींना पटणार नाही, काहींना पाहवणार नाही. पण वेगळ्या चवींचं काही चाखण्याची तयारी असणा-यांनी तो जरूर पाहावा. नाहीतरी रुचीपालट सर्वांनाच हवा असतो.
-गणेश मतकरी

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP