किडनॅप- ऍक्‍शन कोलाज

>> Wednesday, October 29, 2008


"किडनॅप' चित्रपटात अनेक उघड दोष आहेत. मात्र केवळ हे दोष म्हणजे हा चित्रपट नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध नक्कीच चांगला आहे. पटकथेतल्या मुख्य पात्रांचं स्वतंत्र अस्तित्व, चांगलं चित्रीकरण, इमरान खानचा विचारी अभिनय ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत.

हॉलिवूडची उचलेगिरी शोधणं, हे तसं जिकिरीचं आणि खरं तर निरर्थक काम असतं. कारण मुख्यतः ही आयात ही लोकांना परकीय कलाकृतीचे विशेष दाखवण्याच्या प्रामाणिक हेतूनं आणि त्यांचं ऋण मान्य करून केलेली नसते, तर स्वतंत्र विचार करण्याचे कष्ट टाळणं आणि मुळात दुसऱ्या कोणीतरी स्वतंत्रपणे कल्पिलेल्या कल्पनांना रिसायकल करून वेळ मारून नेणं, एवढाच हेतू त्यामागे सामान्यतः संभवतो. साहजिकच कल्पना आपला मूळ संदर्भ सोडून आपल्या व्यवसायाच्या अलिखित नियमांशी अन्‌ प्रेक्षकांच्या मानसिकतेशी जुळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि परिणामी त्या ना आपल्या राहत, ना त्यांच्या.
या सर्व प्रकारात कथावस्तूंची संपूर्ण आयात होत नाही, तर सुटे सुटे चमकदार प्रसंग/ प्रसंगमालिका/ स्टंट्‌स/ छायाचित्रणातल्या क्‍लृप्त्या असं काही ना काही घेऊन विविध ठिकाणी सुचेल तसं चिकटवलं जातं. एकेक हिंदी चित्रपट हा किमान दोन तीन परभाषिक (कारण आता आपण फक्त हॉलिवूड नव्हे, तर जागतिक चित्रपटांमधून उचलेगिरी करतो.) चित्रपटांना आपलंसं करून काढला जातो. काही काही चित्रपटांत तर हे उचललेले क्षण इतक्‍या प्रमाणात असतात, की संपूर्ण चित्रपट हा एक कोलाज होऊन बसतो. अशा वेळी मग चित्रपटाच्या संदर्भाकडे दुर्लक्ष करणं आणि कोलाजकडे स्वतंत्रपणे पाहून काही अर्थ लागतो का हे पाहणंच, योग्य ठरतं.
संजय गढवी हे अशा कोलाज आर्टिस्टमधलं यशस्वी नाव आहे. दोन्ही "धूम' आणि आता "किडनॅप' हे इतक्‍या प्रचंड प्रमाणात परकीय कल्पनांवर आधारित आहेत, की त्यांना स्वतंत्र म्हणणं हे धाडस ठरावं. मग हे पाहताना करण्यासारखी गोष्ट हीच, की ते ज्या "थ्रिलर' या चित्रप्रकाराचं नाव लावतात, त्याच्याशी ते प्रामाणिक राहतात का? जी गोष्ट सांगायला ते सुरवात करतात, तिची गती आणि आलेख ते अखेरपर्यंत चढवत नेऊ शकतात का? ज्या व्यक्तिरेखांना ते प्रेक्षकांपुढे आणतात, त्या कचकड्याच्याच राहतात, की त्यांना एक आकार येऊ शकतो?
या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतला सर्वांत फसवा आणि न जमलेला होता "धूम-2,' तरी त्याच्या या फसवाफसवीचा बॉक्‍स ऑफिसवर फार परिणाम झाला नाही. "किडनॅप' हा त्याचा सर्वांत बरा चित्रपट आहे, जरी त्याच्या अनइव्हन असण्यामुळे आणि मर्यादित ग्लॅमरमुळे तो "धूम' इतका जोरदार चालेल असंही सांगता येत नाही.
"किडनॅप' सर्वांत बरा म्हटला म्हणजे तो सर्वगुणसंपन्न आहे अशातला भाग नाही. उलट त्याच्यात उघड दोष अनेक आहेत. यांतले बहुतेक दोष हे दिग्दर्शकाच्या शैलीशी निगडित आहेत आणि जे त्याच्या सर्व चित्रपटांत आढळतात. उदाहरणार्थ व्यक्तिरेखांच्या संकल्पनेविषयी त्याच्या ठरलेल्या कल्पना. नायिकेनं किती बारीक असावं, कसं दिसावं, कसे कपडे घालावेत याबद्दल तो फार मेहनत घेताना दिसतो. मात्र सर्व चित्रपटांना किंवा सर्व नायिकांना तेच नियम लागू होत नाहीत. मिनिषा लांबा ही अभिनेत्री इथं सेक्‍स सिम्बॉल म्हणून रिइन्व्हेन्ट करण्याचा गढवीचा प्रयत्न हा "किडनॅप'च्या अतिशय मूलभूत दोषांमधला एक दोष आहे. या प्रयत्नांमुळे ही व्यक्तिरेखा कधीच खरी होत नाही आणि अनेकदा हास्यास्पद होते.
स्वतःच्या मर्जीसाठी किंवा काही उसन्या कल्पना कथानकात बसवण्याच्या प्रयत्नांमुळे प्रेक्षकांच्या कॉमन सेन्सकडे दुर्लक्ष करणं हा आणखी एक दिग्दर्शकीय दोष. जेव्हा दिग्दर्शक एखादी घटना वास्तव जागेत रचतो, तेव्हा त्याचे काही नियम पाळण गरजेचं असतं. जेव्हा तो म्हणतो की ही मुंबई आहे, तेव्हा तिथली पात्र ऊठसूट मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जायला लागलेली बरी वाटत नाहीत किंवा संजय दत्तची व्यक्तिरेखा मुंबईहून (म्हणजे नक्की कुठून ते माहीत नाही) पनवेलला जाताना तिला वाशी पुलाबरोबरच गोव्यातली मांडवी नदीवरची फेरीबोट लागणंही फारसं पचत नाही. जेव्हा दिग्दर्शकाला असं स्वातंत्र्य घ्यायचं असतं, तेव्हा त्यामागे तितकंच महत्त्वाचं कारण असावं लागतं किंवा मग मुंबई/ पनवेल अशी काही विशिष्ट जाणिवा, विशिष्ट पार्श्‍वभूमी असलेली नावं वापरण्यापेक्षा त्यानं सरळ काल्पनिक विश्‍वातच ही गोष्ट घडवणं योग्य ठरतं.
मध्यंतरापर्यंत "किडनॅप' हा या "गाढवीझम'मुळे फारसा परिणामकारक होत नाही आणि यथातथाच राहतो. त्यातल्या व्यक्तिरेखाही पोकळच राहतात. नायिका सोनियाचं (मिनिषा लांबा) किडनॅप होणं, तिच्या आईनं (विद्या माळवदे) हवालदिल होऊन आठ वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या आपल्या नवऱ्याला, उद्योगपती रायनाला (संजय दत्त) पाचारण करणं, किडनॅपर कबीरनं (इमरान खान) पैसे नाकारून रायनाबरोबर उंदरामांजराचा खेळ सुरू करणं, यातच हा भाग खर्ची पडतो. एव्हाना आपण दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट माहीत असून येण्याचा धोका का पत्करला, अशा विचारात पडलेले असतो. मध्यंतरानंतर मात्र पटकथेचा सरधोपटपणा जाऊन तिच्यात अचानक बदल होतो आणि आपण या पात्रांच्या जवळ यायला लागतो.
मध्यंतरानंतर थोड्याच वेळात एक पाठलाग आहे. ज्याचं कसिनो रोयालमधल्या पाठलागावरून बेतलेलं असणं आपण विसरायचं म्हणूनही विसरू शकत नाही; पण एक मात्र आहे- या पाठलागाचं पटकथेत बसणं आणि त्याचं चित्रीकरण हे उत्कृष्ट आहे. बंगल्यात सुरू होऊन कन्स्ट्रक्‍शन साईटवर संपणारा हा पाठलाग "भरधाव' या शब्दाचं दृश्‍यरूप आहे. प्रत्यक्ष पात्रांची गती, त्याबरोबर अचूकपणे समतोल साधणारी कॅमेऱ्याची गती आणि दोन्ही व्यक्तिरेखांच्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांचा जलदपणा यांचा हा मिलाफ आहे. यात कुठं प्रत्यक्ष अभिनेते आहेत, कुठं स्टंटमन वापरण्यात आले आहेत, कुठं केबल्ससारख्या उपकरणांचा प्रत्यक्ष स्टंटमध्ये वापर आहे किंवा कुठं संगणकाचा वापर आहे, हे जवळजवळ अदृश्‍य आहे. या पाठलागापासून पुढला कथाभाग हा आधीच्या भागाला न शोभण्याइतका चांगला आहे आणि त्याचा दर्जा शेवटपर्यंत टिकणारा आहे.
"किडनॅप' त्याच्या सर्व मर्यादांसह मला आवडला त्यामागे अनेक कारणं आहेत. किडनॅपिंगची गोष्ट असूनही त्याला खलनायक नाही; दोन्ही नायकच आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पात्रं सारख्या पातळीवर डेव्हलप होणं आणि प्रेक्षकांनी दोघांबरोबरही आयडेन्टीफाय करणं कठीण असतं. "किडनॅप' ते करू शकतो. त्यातल्या संघर्षाचं स्वरूपही असं आहे, की त्याचा समाधानकारक शेवट असणंही कठीण आहे. समाधानकारक म्हणजे दोन्ही व्यक्तिरेखांना न्याय देणारा. बहुधा असे चित्रपट नाट्यपूर्णतेसाठी किंवा एखाद्या नटाला अधिक महत्त्व आणण्यासाठी दुसऱ्या व्यक्तिरेखेवर अन्‌ पर्यायानं ती निभावणाऱ्या नटावर अन्याय करतात. "किडनॅप' हे होऊ देत नाही. तो या दोन्ही पात्रांमधल्या झगडा न्याय्य पद्धतीनं मिटवतो. नाही म्हणायला मात्र रायनावर कबीरनं सोपवलेल्या काही कामगिऱ्या तो अगदी बाळबोध पद्धतीनं पुऱ्या करतो (उदाहरणार्थ कबीरच्या मित्राची जेलमधून सुटका) पण शेवटाचं योग्य वळण, हे आपण या आधीच्या भागाला माफ करण्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं.
"किडनॅप'मधल्या दोन्ही पात्रांच्या प्रेरणाही खऱ्या वाटणाऱ्या आहेत. कबीरचा राग आणि तो शमवण्याचा त्याचा मार्ग आततायी असला तरी पटण्यासारखा आहे. त्याचबरोबर रायनालाही बाजू आहे. म्हणजेच पात्रं केवळ पटकथेच्या सोयीसाठी तयार झालेली नाहीत; त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.
बहुधा मी अभिनयावर बोलणं टाळतो, मात्र इथं इमरान खानवर बोलणं गरजेचं आहे. "किडनॅप'मध्ये तो "जाने तू....' इतका कम्फर्टेबल नाही; मात्र तो विचारी अभिनेता असल्याचं त्याच्या दोन्ही भूमिकांतून दिसतं. त्याचे दोन्ही चित्रपट आपल्या विचारी नट अशीच प्रतिमा असलेल्या मामाच्या पहिल्या दोन चित्रपटांशी समांतर आहेत (कयामत से कयामत तक ही रोमॅंटिक लव्ह स्टोरी होती, तर "राख' हा सूडपट) हादेखील योगायोग. "किडनॅप'मध्ये संजय दत्तसारख्या कसलेल्या नटाहून तो प्रभावी ठरतो, यातच सगळं आलं. त्याचं कामदेखील चित्रपट आवडण्याचंच एक कारण. "किडनॅप'मधले दोष उघड आहेत, अन्‌ कोणालाही सहज दिसणारे. मात्र केवळ हे दोष म्हणजे हा चित्रपट नव्हे. या एका चित्रपटावरून हा दिग्दर्शक सुधारतोय असं विधान करणं धाडसाचं ठरेल; पण निदान आशेला जागा आहे.

- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP