ल जेटी आणि ट्वेल्व्ह मंकीज - विज्ञानापलिकडे ते विज्ञानकथा

>> Monday, October 27, 2008


१९६२चा ल जेटी हा पूर्ण लांबीचा चित्रपट नाही. विज्ञानपटाशी नातं सांगणारी ही एक अठ्ठावीस मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे, मात्र उल्लेखनीय चित्रपटीय प्रयोग म्हणून तिचं नाव आजही घेतलं जातं. ल जेटीचं एक थेट चित्रपट रुपांतरदेखील आहे, ते म्हणजे टेरी जिलिअमने १९९५मध्ये केलेला ट्वेल्व्ह मन्कीज. सायन्स फिक्शन आणि स्पेशल इफेक्ट्स या शब्दांची हल्ली एक जो़डी बनून गेली आहे. ज्या जो़डीत एकाशिवाय दुस-याला अस्तित्व नाही. मात्र विज्ञानपटांचं खरं आकर्षण हे स्पेशल इफेक्ट्समध्ये नाही. किंवा असल्यास त्याची गरज नाही. खरे बुद्धीला चालना देणारे विज्ञानपट हे या इफेक्ट्सवर अवलंबून असत नाहीत. तर काळ/भविष्य/त्यांच्या परस्परसंबंधातून तयार होणा-या विसंगती यासारख्या बुद्धीला चालना देणा-या कल्पनांना त्यामध्ये प्राधान्य असतं. ल जेटीमध्येही तसंच आहे, मात्र स्पेशल इफेक्ट्स तर सोडाच इथे तर दिग्दर्शक क्रिस मार्करने चित्रपटाच्या मूळ संकल्पनेत अभिप्रेत असलेल्या हालचालींनादेखील कात्री लावली आहे. ही केवळ एक स्टिल फोटोग्राफ्सची मालिका आहे, आणि या मालिकेच्या अनुषंगाने येणारे, त्रयस्थपणे मुद्रित करण्यात आलेलं निवेदन.
खरं तर कथेत दृश्यात्मकतेला वाव आहे, पण तो वापरण्यासाठी जाणूनबुजून खोटे वाटणारे (त्या काळी निश्चितच) तांत्रिक चमत्कार न करता इथे प्रयत्न होतो, तो या फोटोमधल्या दृश्यरचनेला अधिक अर्थपूर्ण आणि विचारांना चालना देणारा बनवण्याचा. गतीचा आभास तयार होतो तो जोडकाम वापरलेल्या संकलीय क्लृप्त्यामधून. पॅरिसमध्ये घडणारा ल जेटी सुरू होतो, तो आई वडिलांबरोबर विमानतळावर आलेल्या एका छोट्या मुलापासून. इथे हा मुलगा पाहतो एका तरुणीचा चेहरा आणि दुसरं काहीतरी जे त्याला आयुष्यभर लक्षात राहील.
पुढे लवकरच तिसरं महायुद्ध होतं आणि बेचिराख फ्रान्समध्ये अणुहल्ल्यापासून जिवंत बचावलेले मोजके नागरिक जमिनीखाली आपली वस्ती तयार करतात. विमानतळावरला छोटा मुलगा आता मोठा झालेला असतो आणि आपली त्या संध्याकाळची आठवण जिवापाड जपत असतो.
आता या मुलावर, म्हणजेच नायकावर नजर पडते ती वस्तीतल्या वैज्ञानिकांची, ज्यांचे कालप्रवासावर प्रयोग सुरू असतात. योजना असते, ती कोणालातरी भविष्यकाळात पाठवून मदतीची व्यवस्था करण्याची, मात्र आजवर प्रयोग यशस्वी झालेला नसतो. नायकाच्या भूतकाळातल्या आठवणींमुळे काळाशी त्याचा घट्ट धागा असतो. हा धागा वापरून त्याला आधी भूतकाळात पाठवून कितपत यश येतं ते पाहावं असं ठरतं. नायक भूतकाळात जातो आणि त्याच्या आठवणीतल्या मुलीला भेटतो. आता एक काळापलीकडे जाणारी प्रेमकहाणी सुरू होते. जिचा शेवट सुखात होणं तर अशक्यच असतं. मात्र जे घडतं ते पूर्णपणे अनपेक्षित असतं.
गतिमान कॅमेराऐवजी फोटोग्राफ्सचा वापर हे ल जेटीच्या वैशिष्ट्यांमधलं एक वैशिष्ट्य. निवेदनामार्फत सुरूवात आणि शेवट एकत्र बांधण्याचा प्रयोग हे दुसरं. कथानकाला विज्ञानाचा वरपांगी आव आणला असला तरी ही फिल्म मुळात वैज्ञानिकतेची चाैकट मानत नाही. त्यातली कथासूत्र ही अनेक विषयांचा विचार स्वतंत्रपणे करताना दिसतात. आठवणींचं स्वरूप, शरीरसंबंधांपलीकडे जाणारं प्रेम, भविष्याबद्दलची अनिश्चितता, असुरक्षितता आणि त्याचवेळी प्रत्येकाचं प्राक्तन निश्चित असतं. यावरचा विश्वास अशा अनेक विषयांना या थोडक्या वेळात स्थान दिलं जातं.
अणुयुद्ध, कालप्रवास यासारख्या भव्य कल्पनांनाही किती साधेपणाने प्रेक्षकांपुढे मांडता येतं. आणि प्रेक्षकही त्या किती चटकन गृहीत धरतात. याचं हा चित्रपट उदाहरण आहे. कृष्णधवल असल्याचा फायदाही त्याला जरूर मिळाला आहे, कारण रंगीत स्थिरचित्रणात असणारा नको इतका अस्सलपणा काळ्या-पांढ-यात अस्पष्ट करणं आणि एरवीच्या साध्या गोष्टींनाही अधिक भेडसावणारं बनवणं इथे शक्य झालेलं आहे. चित्रपटाची शक्ती तो काय प्रत्यक्ष दाखवतो यापेक्षा तो काय सुचवू शकतो. यातच असते, कारण मग आपली गोष्ट सांगण्यात तो प्रेक्षकालाही सहभागी करून घेतो. त्यात कल्पनाशक्तीचा वापरही तो आपल्या कथानकाला अधिक भव्य करण्यासाठी करू शकतो.
जिलिअमने जेटीला नवं रूप देताना यातला साधेपणा पूर्णपणे शाबूत ठेवला नसला तरी गाभा शाबूत ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळे स्पेशल इफेक्ट्सच्या चलतीच्या काळात येऊनही ट्वेल्व्ह मन्कीज सांकेतिक गणितापलीकडे पोचू शकला.


ल जेटीपासून टेरी जिलिअमने घेतलेल्या स्फूर्तीचा त्याच्या ट्वेल्व्ह मंकीज चित्रपटाच्या श्रेयनामावलीत उल्लेख असला तरी ही जशीच्या तशी नक्कल नव्हे. एका उत्तम कल्पनेचा आधार येवढंच या स्फूर्तीचं प्रमाण राहतं. ही कल्पना कुठली, तर नायकाने आपल्या लहानपणी पाहिलेली एक विलक्षण घटना त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहणं आणि कालांतराने त्याच घटनेत त्याच घटनेत वेगळ्या रीतीने सहभागी होण्यासाठी त्याला भाग पडणं ही.अर्थातच या कल्पनेत कालप्रवास अधांतरीच आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये तो आहे हे उघडच आहे. मात्र दोन्ही चित्रपटांना प्रामुख्याने वेगळं करतो तो दिग्दर्शक टेरी जिलियमचा दृष्टिकोन.
चित्रपटाचं नाव ट्वेल्व्ह मंकीज असलं तरी प्रत्यक्षात त्याचा माकडांशी काही संबंध नाही. हे चमत्कारिक नाव आहे एका संघटनेचं. जी कदाचित जगाच्या विनाशाला कारणीभूत झाली आहे, किंवा होणार आहे. खरं तर ट्वेल्व्ह मंकीज प्रकार म्हणजे हिचकॉकने लोकप्रिय केलेल्या मॅकगफिन या संज्ञेचं उत्तम उदाहरण ठरेल. मॅकगफिन म्हणजे कथानकाचा असा धागा जो चित्रपटातील व्यक्तिरेखांना जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखा भासेल आणि कथानक पुढे नेताना महत्त्वाचा ठरेल, मात्र प्रत्यक्ष कथानकाच्या दृष्टीने त्याला जराही महत्त्व असणार नाही. इथेच पाहा ना. चित्रपटाच्या नायकाच्या दृष्टीने या संघटनेचा पत्ता लावणं अत्यंत गरजेचं आहे. इतकं की मानवजातीचा भविष्यकाळ त्यावर अवलंबून आहे. हा नायक धडपड करतो ती या संघटनेचा रहस्यभेद करण्यासाठी. मात्र चित्रपटाच्या कथानकात या संघटनेचं स्थान इतकं दुय्यम आहे, की तिचा उल्लेख न करताही आपल्याला पूर्ण कथानक सांगता येईल. तिची भूमिका आहे ती उत्प्रेरकाची, प्रत्यक्ष घटनाचक्रात तिला जागा नाही.
ट्वेल्व्ह मंकीजचा नायक आहे जेम्स कोल (ब्रूस विलीस) ल जेटीच्या नायकाप्रमाणेच लहानपणी विमानतळावर पाहिलेल्या घटनेने झपाटलेला. आता त्या घटनेला अनेक वर्षे लोटली आहेत. आणि पृथ्वीवर साम्राज्य आहे ते वन्य प्राण्यांचं. मनुष्य जात एका संसर्गजन्य आणि अत्यंत धोकादायक विषाणूंपासून सुटका करून घेऊन जमिनीखाली वास्तव्य करीत आहे, हालाखीच्या परिस्थितीत. विषाणूंच्या संसर्गावर उपाय काढण्यासाठी माहिती गोळा करायला जमिनीवर गेलेल्या कोलला असा पुरावा मिळतो की, १९९७मध्ये पृथ्वीला नेस्तनाबूत करणारा प्लेग पसरवायला कारणीभूत होती ती ट्वेल्व्ह मंकीज ही संघटना. आता या संघटनेविषयी माहिती काढण्याचं कामही कोलवरच येतं आणि कालप्रवास करून कोल भूतकाळात पोचतो. मात्र चुकीच्या भूतकाळात. १९९६ऐवजी १९९०मध्ये. त्य़ात त्याची रवानगी तत्परतेने केली जाते ती वेड्यांच्या इस्पितळात. इथे त्याची गाठ पडते ती डॉ. कॅथरिन केली (मेडलिन स्टो) या मानसोपचार तज्ज्ञाशी आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. लेलॅन्ड गाईन्स (क्रिस्टोफर प्लमर) यांच्या वेड्या मुलाशी, जेफ्रीशी (ब्रॅड पिट)

सामान्यतः कालप्रवासाशी संबंधित चित्रपट हे कालचक्रातील कुठलीतरी घटना बदलण्याशी संबंधित असतात. त्यामुळे टाइम पॅराडॉक्सेस किंवा कालप्रवाहाशी केलेल्या खेळातून तयार होणा-या विसंगती यांना यात फार महत्त्व असतं आणि दिग्दर्शकाला (किंवा लेखकाला) हा खेळ जमला नाही तर चित्रपट पार फसतो, हा चित्रपटही या विसंगतीच्या अवतीभवतीच फिरतो. मात्र यातल्या नायकावर सोपवलेली कामगिरी ही थोडी पटण्यासारखी आहे. तो प्लेग टाळून सर्वत्र आनंदी आनंद करण्यासाठी आलेला नाही. उलट प्लेग होऊन गेलाय, तो कसा टळेल, असा अधिक प्रगल्भ भासणारा त्याचा विचार आहे. तो भूतकाळात जातो. तो केवळ माहिती काढण्यासाठी. त्यामुळे नायक सुपरहीरो बनत नाही आणि आपण त्याच्या अडचणी अधिक समजून घेऊ शकतो.
अशा चित्रपटांमध्ये भविष्यकाळ दिसतो, तो दोन प्रकारचा. एक अगदी चकाचक अन दुसरा अगदी मोडकळीला आलेला. इथला भविष्यकाळ आहे तो दुस-या प्रकारचा. फिलिप के डीक या विक्षिप्त विज्ञानकथा लेखकाच्या कथानकात शोभण्यासारखा (अर्थातच इथे वर्तमानकाळही बराचसा तसाच आहे.) याला मूळ लघुपटाहून अधिक जबाबदार आहे तो दिग्दर्शक ज्याचा गाजलेला ब्राझिल चित्रपटदेखील याच प्रकारात मोडणारा आहे. त्याशिवाय इथे सहपटकथाकार आहे तो फिलिप के डीकच्या डू अँड्रॉईड्स ड्रीम आँफ इलेक्ट्रिक शीप ? या कादंबरीला ब्लेडरनर हे चित्रपट रुप देणारा डेव्हिड पीपल्स. साहजिकच मन्कीजच्या दृश्य रूपांत यांनी आपला गडदपणा सढळ हस्ते वापरला आहे.
मन्कीज विज्ञानपट आहे हे स्पष्ट आहे, मात्र बहुतेक विज्ञानपटासारखा तो अँक्शनला प्राधान्य देत नाही. आणि संहितेची रचनाही अशी करतो की, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारांनी पाहता येईल. कालप्रवास असणारी विज्ञानपट ही तर सरळ उकल झालीच, पण सामाजिक टीकाटिप्पणी करणारी ब्लॅक कॉमेडी किंवा मनोरुग्ण नायकाचं दिवास्वप्न म्हणूनही याकडे पाहता येईल. जे घडायचं आहे, ते घडणार. असा असा निर्वाणीचा इशारादेखील हा चित्रपट देतो.
पोस्टरवरल्या टॅग लाईन्स ही हॉलीवूड चित्रपटांची खासियत आहे. अनेकदा ते इतक्या थोडक्यात चित्रपटाचा आशय, टोन आणि शैलीबद्दल सांगतात, की कमाल वाटते. ट्वेल्व्ह मंकीजची टॅग लाईन मला सर्वात आवडणा-या टॅगलाइन्सपैकी आहे. द फ्यूचर इज हिस्टरी असं आगाऊपणे आधीच प्रेक्षकांना सांगणारं हे वाक्य कोणालाही सुखांत शेवटाची आशा लावत नाही, हे वेगळं सांगायला नकोच.
-गणेश मतकरी

2 comments:

सिनेमा पॅरेडेसो October 27, 2008 at 1:17 AM  

या ब्लॉगवर येणा-य़ा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. खास अभिजित बाठेसाठी (आणि कमेंट करणा-या न करणा-या सर्वांसाठीही) ही दिवाळी भेट.

Punekar November 3, 2008 at 12:22 AM  

Do you have ur blog widgets so that I can place it on my blog?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP