थेट रूपांतर
>> Tuesday, March 31, 2009
रूपांतरामध्ये गैर काहीच नाही. मात्र महत्त्वाचं हे, की ते रूपांतर राहावं; उचलेगिरीच्या दर्जाला जाऊ नये, आणि मूळ चित्रपटाची ताकद त्यात उतरावी. त्या त्या देशाप्रमाणे या रूपांतराच्या प्रभावात फरकही पडेल, पण हा फरक एका मर्यादेत राहावा, त्याने चित्रपटाचं स्वरूपच बदलण्याची शक्यता तयार होऊ नये.
जपानी आणि इंग्रजीत हा देवाणघेवाणीचा व्यवहार फार जुना आहे. सर्जनशील दिग्दर्शक कुरोसावा यांच्या सेव्हन सामुराय किंवा योजिम्बोसारख्या चित्रपटांची हॉलिवूडने मॅग्निफिसन्ट सेव्हन किंवा फिस्टफुल ऑफ डॉलर्स (आणि अलीकडे "लास्ट मॅन स्टॅंडिंग') सारखी चलाख रूपांतरे केली, पण तेव्हाही त्यांनी या नायकांमधलं आणि वेस्टर्न चित्रपटांच्या नायकांमधलं साम्य डोळ्यासमोर ठेवून लागतील तेवढेच बदल केले. कुरोसावानेही शेक्žसपिअरच्या मॅकबेथ किंवा लिअरसारख्या कथाकल्पनांना आपल्या "थ्रोन ऑफ ब्लड' आणि "रॅन'मध्ये जिवंत केलं, पण ते आपल्या परंपरांची जाण ठेवत.
नंतरच्या काळातही जॉन वू, जॅकी चॅन यासारख्या ऍक्žशन दिग्दर्शकांनी, नटांनी हॉलिवूड प्रभावित झालं आणि त्यांच्याशी लवकरच संधान बांधलं गेलं. सध्याची लाट आहे ती मात्र जपानी भयपटांची.
1998 च्या "रिंगू' (द रिंग)ने आणलेली आणि जु आन (द ग्रज)ने वाढवलेली. या पाठोपाठ तिसरा लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे द आय (Jian gui). अमेरिकेत याचंही कौतुक आहे. टॉम क्रूझच्या संस्थेने याच्या हॉलिवूडनिर्मितीचे हक्कदेखील उचलले आहेत. आपण मात्र भलतीच चपळाई दाखवली होती. हॉलिवूडनिर्मितीचा पत्ता नसताना आपला "नैना' मात्र चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला होता. त्याच्याबरोबर प्रदर्शित झालेल्या "नजर'मध्येही काही गोष्टी "द आय'वरूनच उचललेल्या असल्या, तरी ती उचलेगिरी होती. नैनाचा प्रयत्न मात्र प्रामाणिक होता आणि म्हणूनच तो का यशस्वी झाला नाही, हे पाहणं गरजेचं.
"नैना'ची कल्पना भयपटाला फारच छान आहे. अतिशय लहान वयात डोळे गेलेल्या लंडनवासी नैनाचं (ऊर्मिला मातोंडकर) ऑपरेशन होऊन तिला दृष्टी मिळते. मात्र ही दृष्टी न पाहण्याजोग्याही अनेक गोष्टी पाहू शकते. मरणानंतर देह सोडून जाणारे आत्मे, मुक्ती न मिळाल्याने इथेच अडकून राहिलेले जीव तिला दिसतात. काही भयंकर घटनांची पूर्वसूचनाही मिळते. अर्थातच हे सगळं खरं असेल यावर तिची आजी किंवा डॉक्टर कम मित्र मुळीच विश्वास ठेवत नाहीत. पुढे एका प्रसंगी डॉक्टरचा विश्वास बसतो आणि तो नैनाबरोबर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवतो.
नैनाची चांगली बाजू ही आहे, की ती सुरवातीपासून शेवटपर्यंत आपल्या कथेला चिकटून राहतो. भरकटत नाही. पाणचट विनोद, गाणी, आयटेम सॉंग्ज यावर वेळ न काढता, तो आपल्या प्रमुख व्यक्तिरेखांवरच केंद्रित राहतो. दुसरी म्हणण्यासारखी चांगली गोष्ट म्हणजे, तो काही वेळा तांत्रिकदृष्ट्या चांगली दृश्यं देतो. वाईट हे, की इथल्या स्पेशल इफेक्ट्सचा दर्जा एकसारखा नाही. पेंटिंग क्लासमध्ये दिसलेली मुलगी किंवा फूटपाथवर बसलेली बाई यांच्याशी संबंधित इफेक्टस चांगले आहेत. पण चित्रपटाच्या सुरवातीला दिसणारं ग्रहण हे अगदी स्पष्टपणे संगणकीय वाटणारं आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष चित्रीकरण आणि वेशभूषेतून साधलेले धक्के हे कॉम्प्युटर ग्राफिक्सहून अधिक परिणामकारक आहेत.
जपानी भयपटांकडे, खासकरून हल्ली प्रकाशात आलेल्या भयपटांकडे पाहता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्यांच्या कल्पना फारशा स्वतंत्र नाहीत. (इथली एका व्यक्तीला भुतं दिसण्याची कल्पनाही पीटर जॅक्सनच्या "फ्राइटनर्स'पासून श्यामलनच्या सिक्स्थ सेन्सपर्यंत चित्रपटांनी वापरलेली आहे.) पण त्यांचा भर असतो तो वातावरणनिर्मिती, त्यांचं स्वतःचं असं तर्कशास्त्र आणि काही जबरदस्त धक्के (प्रत्यक्ष कथानकातले नाहीत, पण दृश्य स्वरूपातले.) यांवरच. अमेरिकी भयपट हा प्रामुख्याने स्लॅशर जातीचा आहे. यातल्या भुतांनाही प्रामुख्याने माणसं वेगवेगळ्या तऱ्हेने मारण्यात रस असतो. जपानी भयपट मात्र भुतांकडे अधिक गंभीरपणे पाहतो. असं असूनही त्यांचा आवाका भयपटाच्या संकल्पनेहून मात्र मोठा होताना दिसत नाही. सिक्स्थ सेन्समधल्या छोट्या मुलाला भुतं दिसत असली तरी चित्रपटाचा मूळ हेतू हा लोकांना घाबरवणं नसून, नायकाचा आपल्या आयुष्यातल्या घटनांचा स्वीकार आणि त्याची मोक्षाकडे होणारी वाटचाल, हा होता. हे जपानी चित्रपटात संभवत नाही. अर्थात सिक्स्थ सेन्स काही सांकेतिक अर्थाने भयपट नव्हता. त्यामुळे अशी तुलना योग्य नाही.
जपानी चित्रपटांतलं भय हे साध्या साध्या गोष्टीतून तयार होतं. त्यांना इफेक्टसची फार गरज नसते. रिंगमधला टीव्हीचा स्टॅटीक किंवा चेहरे विद्रूप झालेला फोटो, तसंच ग्रजमधलं लांबच लांब केस असणारा चेहरा किंवा लहान मुलाचा पांढरा मेकअप हे सहजपणे प्रेक्षकाचा थरकाप उडवतात. या प्रसंगांना आणि त्यातल्या धक्यांना परिणामकारक करायचं तर बरोबरचा म्युझिकचा वापर अतिशय कमी आणि अचूक हवा. दृश्य आणि ध्वनी यांच्या तोलावरच इथली दिग्दर्शकाची कामगिरी बहुतांशी अवलंबून असते. श्रीपाल मोहराकियांनी हा तोल मात्र खूपच विस्कटला आहे. इथला साऊंड इफेक्टचा वापर कर्कश आणि सततचा आहे. जो प्रेक्षकाला भीती म्हणून वाटू देत नाही. प्रेक्षकाला अस्वस्थ करू शकते ती शांतता; आवाज नाही. आवाजाची त्याला उलट सोबत होते.
नैनाच्या पटकथेत काही ठळक दोष आहेत. मी मूळ चित्रपट पाहिला नसल्याने ते रूपांतरित दोष आहेत का स्वतंत्र आहेत, हे सांगू शकणार नाही. मात्र दोष खरेच. एक म्हणजे नैनाला दिसणाऱ्या घटनांना निश्चित तर्कशास्त्र नाही. म्हणजे तिला नक्की काय दिसतं. भुतं दिसतात? का गोष्टींची पूर्वसूचना मिळते? या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची चित्रपट सतत सरमिसळ करतो. एक उदाहरण घ्यायचं, तर नैना हॉस्पिटलमध्ये असताना तिची छोटी मैत्रीण ऍनी तिचा निरोप घ्यायला येते. तिच्या मृत्यूचा नैनाला धक्का बसतो. नर्सशी बोलताना मात्र ती म्हणते, ऍनी मरणार आहे. या वेळी ऍनी असते ऑपरेशन थिएटरमध्ये- जिथे ती मेलेली असणं सहज शक्य आहे. मग नैनाला दिसलं ते खरं, की पूर्वसूचना? आणि पूर्वसूचना असेल तर ती पूर्वसूचना असल्याचं नैनाला कसं कळलं?
हाच प्रकार डोळ्यांच्या, शक्तीच्या बाबतीत. शक्ती डोळ्यांत आहे, की ते जिचे होते तिचा आत्मा हीच त्यांची शक्ती आहे? चित्रपटाच्या पूर्वार्धात नैनाला आरशात स्वतःऐवजी खेमी दिसत असते. कारण डोळे खेमीचे होते. पुढे खेमीला मुक्ती मिळाल्यावर प्रतिबिंबात नैनाच दिसायला लागते. याचा अर्थ डोळ्यांची शक्ती गेली, मग पुन्हा शेवटच्या प्रसंगात डोळ्यांची शक्ती कुठून परत आली?
त्याशिवाय कथेत काही चांगल्या जागा, मुद्दे आहेत. उदाहरणार्थ- आरशात दिसणारी मुलगी हे आपलं प्रतिबिंब नसल्याचं नैनाच्या लक्षात येणं, किंवा चाचपडून पाहणं आणि दृष्टीला दिसणं यातला वेगळेपणा दाखवणारा स्टेपलरचा प्रसंग, वगैरे. पण पटकथा या जागांचा वापर करूच इच्छित नाही. त्यांचं महत्त्व बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही.
जी गोष्ट पटकथेची, तिचं संवादांची. हे संवाद अतिशय आंग्लाळलेले आहेत. अनेकदा त्यांच्या शब्दशः अर्थावरून आणि रचनांवरून हे उघड होतं. "आज तो तेराही दिन होगा', "तुम्हें लगा मैं तुम्हारा मन बहला रहा हूँ?', "तू तो भगवान की बच्ची है' यासारखी वाक्यं क्षणोक्षणी खटकतात. भगवान की बच्ची प्रकार तर फारच त्रासदायक. ते वाक्य इतके जण, इतक्या वेळा म्हणतात, की नंतर नंतर हसू दाबणं मुश्कील व्हायला लागतं.
दिग्दर्शनातही, शहरी भाग जमलेला वाटतो तर भूजमधला भाग अजिबात नाही. हा सर्व भाग खोटाच वाटतो. नेपथ्य रंगभूषेपासून कलाकारांपर्यंत हे गावकरी, गावकरी न वाटता नटच वाटतात. अपवाद कदाचित खेमीचा (श्वेता कुन्नूर).
"नैना'च्या भूमिकेसाठी ऊर्मिला मातोंडकरला घेण्याची कल्पना कदाचित प्री-प्रॉडक्शनच्या वेळी बरी वाटली असेल, पण ही निवड योग्य नसल्याचं जाहिराती पाहताच स्पष्ट होतं. एक तर याआधी तिचे "भूत' आणि "कौन' हे चित्रपट येऊन गेले आहेत. ज्यांच्या जाहिराती याच प्रकारच्या होत्या, आणि भूमिकेतल्या बऱ्याच छटाही त्या चित्रपटांत येऊन गेल्या होत्या. मग तिला घ्यायचंच असेल तर ही भूमिका वेगळी वाटण्यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज होती. जे इथे ना अभिनेत्रीने घेतलेले, ना दिग्दर्शकाने.
रूपांतरामध्ये गैर काहीच नाही. मात्र मूळ संहितेशी प्रामाणिक राहूनही चित्रपटाने ज्या प्रेक्षकांसाठी हे रूपांतर होणार आहे, त्यांना विसरून चालणार नाही. मूळ कलाकृतीचा गाभा शाबूत ठेवण्यासाठी रूपांतरित पटकथेला अधिक मोठ्या जबाबदारीला तोंड देणं आवश्यक आहे. केवळ थायलंडचं भूज होणं हे रूपांतर नव्हे. "नैना' ही अशा प्रकारच्या थेट रूपांतराची सुरवात आहे. या फसलेल्या प्रयोगावरून इतर धडा घेतील, तर त्याचा काही फायदा झाला असं म्हणता येईल.
-गणेश मतकरी